प्रियांकाचा लुक
साराची डायरी
माझ्याकडे एक ड्रेस आहे. भडक निळ्या रंगाचा. चकचकीत. त्याच्यावर एक खरंखरं मोरपीस आहे. पण मी तो एकदाही घातलेला नाहीये. तुम्हाला वाटेल मी घातला नाही, कारण मला तो आवडत नाही. पण तसं नाहीये. मला तो सॉलिड आवडतो. पण तो मी एकदाही घातला नाहीये. का? तर त्याची एक स्टोरी आहे.
‘पा’चे एक थोडेसे म्हातारे मित्र आहेत. (पार्सल म्हणाली त्यांना ‘म्हातारे’ असं नाही म्हणायचं. ‘वयस्कर’ म्हणायचं. गावस्करसारखं. आणि ‘मा’ म्हणाली ‘सीनियर कुलीग’ असं म्हणायचं. एक बरं आहे की मला त्यांना काहीच म्हणावं लागत नाही. एवढं लक्षात कोण ठेवणार तेंडुलकर का काय ते?) हं.. तर ते जपानला गेले होते. तेव्हा त्यांनी आमच्यासाठी काय काय आणलं. ते द्यायला ते घरी आले होते. ‘मा’ म्हणत होती, ‘इतके काही क्लोज नाहीयेत ते आपल्याला. मुळात आपल्यासाठी इतकं सगळं आणायचं कशाला? आणि असं सेल्फ इन्व्हाईट करून डिनरला यायचं म्हणजे जरा ओल्ड स्कूल आहे सगळं..’ काही कळलं नाही. किती स्वीट आहेत! न मागता गिफ्ट आणल्या.. आणि ते नुसतेच येणार होते. पा म्हणाला, ‘डिनरलाच या..’ आता मा हाणेल म्हणून सांगत नाहीये तो. मग पा मला म्हणाला, ‘प्लेसमेंटसाठी चालू आहेत प्रयत्न. मी लीड करतोय हा प्रोजेक्ट. त्यांना टोकियोला ट्रान्स्फर हवी आहे.’ कळलं नाही, ‘ते सीनियर कुलिग आहेत तर पा त्यांना कसा ट्रान्स्फर करणार?’ कळलं, की गावस्करसारखा सीनियर हा म्हातारा या शब्दाच्या जागी वापरलेला शब्द आहे. ते पा ला ज्युनिअर आहेत. म्हटलं जाऊ दे! कशासाठी का येईनात. माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे, ते पण जपानहून! ते आले. त्यांनी भारी भारी वस्तू आणल्या होत्या. ‘मा’साठी मोमोचा स्टीमर, (ज्यात नंतर पार्सलनी मोदक केले), ‘पा’साठी एक पेंटिंग, मेकूडसाठी एक भारी पंखा.. (म्हणजे हातात घेऊन वारा घ्यायचा पंखा, सीलिंगवरचा नाही.. जस्ट क्लिअर करतेय..) आणि माझ्यासाठी तो मोरपंखी ड्रेस. किमोनो. इतका भारी होता तो! पण मी तो ओपन केला तर मा आणि मेकूड फिसकन हसल्याच. का ते मला कळलंच नाही. खरंच सुंदर होता तो ड्रेस! मारमालेड फॅशन डिझायनर आहे आणि मेकूड तिची चमची. त्यामुळं दोघी सारख्या बाकीच्यांच्या ड्रेस चॉईसला नावं ठेवत असतात. मी म्हटलं जाऊ दे. म्हणून मी तो नीट ठेवून दिला कपाटात. मग मी रोज एकदा तो काढून बघायचे. तो कपाटातून माझ्याकडं पाहून हसायचा. पण मला चान्सच मिळत नव्हता तो ड्रेस घालायचा... आणि मग एकदा ‘पा’च्या गावस्कर कुलीगनीच मला चान्स दिला. ‘पा’च्या हेल्पमुळं त्यांना टोकियोला शिफ्ट व्हायचा चान्स मिळाला म्हणून त्यांनी एक पार्टी ठेवली होती. Marriot मध्ये आणि फॉर अ चेंज आम्हाला पण इन्व्हिटेशन होतं. नाहीतर एरवी अशा हॉटेलमधल्या पार्ट्या विदाऊट किड्स असतात आणि वाडेश्वर, श्रेयसमधल्या पार्टीला ‘मुलांना पण आणा हं’ असं असतं. (तिकडं जायलापण खूप आवडतं बाय द वे!) हां.. तर ‘मॅरिएट’मध्ये जायचं म्हणून मी आणि मेकूड खूप एक्साईटेड होतो. मेकूडनी तयार व्हायला २ तास घेतले. तिचं ठरतच नव्हतं काय घालायचं ते. पण माझं ठरलं होतं. तो ड्रेस! गावस्करकाकांना पण किती मस्त वाटेल, असा विचार होता माझा. मी तयार होऊन आले. तर मेकूड आणि मारमालेड खदाखदा हसायलाच लागल्या. चेहराच पडला. मा म्हणाली, ‘सरू.. तू खूपच गोड दिसते आहेस. तू कशातही छानच दिसतेस. पण बाळा, हा काही पार्टीला घालायचा ड्रेस नाहीये. एखाद वेळी फॅन्सी ड्रेसला किंवा japanese डान्सला घाल.’ मेकूड म्हणाली, ‘काय कॉमेडी दिसते आहेस तू. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये जायला पाहिजेस.’ माझा मूडच गेला. मी चुपचाप ड्रेस बदलून आले. पण त्या दिवशीपासून तो ड्रेस माझ्याकडं बघून रडतो आहे असंच वाटायला लागलं मला.
पण परवा गंमत झाली. मेकूड तिच्या फोनमध्ये बघत खो खो हसत आली. नानीपण होती. मेकूडनं आम्हाला प्रियांका चोप्राचा मेट गालाचा लुक दाखवला. मी संपले होते. आम्ही सगळे हसून हसून लोळत होतो. त्यावर खूप मीम पण आले. ती एक फ्लॉवरपॉट आणि कुठलातरी खारीसारखा प्राणी याच्यामधलं काहीतरी दिसत होती. इकडं सगळ्या पेपर्समधून तिची खूप चेष्टा झाली होती. दुपारी मेकूड तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या फ्रेंडशी फेसटाइम करत होती. ती म्हणत होती, की इकडे प्रियांकाचा लुक लोकांना प्रचंड आवडला आहे.
मी कन्फ्युज झाले. हा लुक कसा काय आवडू शकतो? मी नानीला म्हणाले पण तसं. तर ती म्हणाली, ‘का नाही? कुणाच्या डोळ्याला काय आवडेल आपण कसं ठरवणार? आणि का ठरवायचं? आपण जे करतोय, जे कपडे घालतोय ते आपल्याला आवडतात की नाही हे महत्त्वाचं. एकदा तिच्या चेहऱ्याकडं बघ नीट. किती स्ट्राँग आणि कॉन्फिडन्ट आहे ती! ती खूष आहे स्वतःवर. तिला कसं वाटतं आहे हे महत्त्वाचं आहे. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं यावर आपण कसं वागायचं, जगायचं ते ठरवलं तर अशक्य होऊन जाईल. कारण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. प्रियांकाच्या ज्या लुकला आपण सगळे हसलो तो अमेरिकेत सुपर हिट झालाच की!’
नानी इज द बेस्ट! तिनी सगळं सोप्पं करून टाकलं. आज ‘मा’ आणि ‘पा’ची ॲनिव्हर्सरी होती. आम्ही ‘बॅरोमीटर’मध्ये स्पेशल डिनरला गेलो होतो. गेस मी काय घातलं असेल? गावस्करवाला जपानी ड्रेस! एकूण एक सगळ्या टेबल्सनी माझ्याकडं वळून पाहिलं. ते हसत होते, की त्यांना आवडलं होतं मला माहीत नाही. पण नंतर मी फोटो पहिले त्यात माझं एक्स्प्रेशन सेम प्रियांकासारखं होतं.
ओके बाय गुडनाईट...