मा हरली, ती गोष्ट...
साराची डायरी
काल एका भारी कॉम्पिटिशनमध्ये मारमालेड खतरनाक हरली. म्हणजे actually तिला हरवलं. म्हणजे मी जिंकले आणि तिला हरवलं असं नाही झालं, माझ्यामुळं ती हरली. पण खरंतर यात तिचीही चूक नव्हती आणि माझीही. कारण ही कॉम्पिटिशन आहे हेच हरेपर्यंत आम्हाला दोघींना माहीत नव्हतं. मग काय करणार ना! माहीत असतं, तर चार - पाच वर्षांपूर्वीच आम्ही तयारी सुरू केली असती. तर झालं असं, की काल आमच्या डेलिया क्लासच्या मुलांच्या आयांची पार्टी होती. आमच्या क्लासेसची नावं फुलांवरून ठेवली आहेत. कारण त्यांना असं वाटतं, की मुलं ही देवाघरची फुलं असतात. पण आम्ही अज्जिबात फुलं बिलं नाहीयोत असं आमच्या अनुराधा मिस म्हणतात. त्यांचं म्हणणं असं, की आम्ही राक्षस आहोत. त्यामुळं आमच्या क्लासेसची नावं ‘नरकासुर, महिषासुर, रावण’ अशी ठेवायला हवी होती. आम्ही म्हणतो, ‘का नाही ठेवली? आम्ही कुठं म्हणतोय की आम्ही फुलं आहोत.’ पण त्यांनी राक्षसांची नावं ठेवली नाहीत, कारण मग शाळा म्हणजे नर्क आहे असं प्रूव्ह झालं असतं. जाऊदे! पॉइंट तो नाहीये. तर मी काय सांगत होते? आमच्या क्लासमधल्या मुलांच्या आयांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. Actually तो इम्पॉर्टंट मेसेजेस द्यायला आहे, की बाबा.. प्रोजेक्ट सबमिशनची डेट काय आहे, उद्या नक्की सुट्टी आहे का नाही? आज मिस झालेला क्लासवर्क काय आहे.. वगैरे वगैरे. पण त्यावर काहीकाही आया फुल टाइमपास करत असतात. ढोकळ्याची रेसिपी, मुलतानी मिट्टीचा पॅक, रणबीरची नवीन गर्लफ्रेंड, कुठल्यातरी एक्झिबिशनचे निरोप, जयपूरहून आणलेल्या ड्रेसेसची जाहिरात... असं काहीही चालू असतं. कारण शाळेबद्दल बोलण्यासारखं एवढं काहीच नसतं. ती आपली आपली नीट चालत असते. आम्ही शाळेत जात असतो, येत असतो, होम वर्क करत असतो, बोर होत असतो. पण आयांना वाटतं, की त्यांना ग्रुपवर बोलायला हवं नाहीतर ग्रुप आपला आपण डिलीट होईल. त्यामुळं त्या बोलत असतात. मारमालेड कधीच त्यात ॲक्टिव्ह नसते. मीच वाचते ग्रुप टाइमपास म्हणून. मागं तिनी एकदा ग्रुप सोडला होता, ती ॲक्टिव्ह नसते म्हणून तर आश्लेषाची आई म्हणाली, ‘तुझ्या आईला तुझ्या शाळेपेक्षा काय इम्पॉर्टंट वाटतं म्हणून ग्रुप सोडला?’ मग मारमालेडनी परत जॉईन केला ग्रुप. तेव्हापासून ती उगाच हायपर झाली आहे. उगाचंच ‘OMG, TTYL, LOL’ असे मेसेजस टाकते. तर त्या ग्रुपची काल अभिषेक व्हेजमध्ये पार्टी होती. त्याला ते ‘गेटटूगेदर’ म्हणतात मराठीत. मा म्हणाली आपण जाऊयात. मी म्हटलं कशाला? मला माहीत आहे, तिला त्यांच्या गप्पांमध्ये फार इंटरेस्ट नसतो. ती उगाचंच जोरजोरात हसून वाईट ॲक्टिंग करते. पण आश्लेषाच्या आईनी तसं म्हटल्यापासून ती खूप हायपर झाली आहे. म्हटलं जाऊ या. मला तिकडचं बेक्ड व्हेज आवडतं. आम्ही गेलो. थोडा उशीर झाला. पोचलो तेव्हा ‘कुणाची मुलगी/मुलगा भारी’ अशी कॉम्पिटिशन चालू होती.
‘सोनियाला एलिमेंटरीला ए ग्रेड मिळाली..’
‘वा.. छान... पण ना आपल्या कंट्रीत आर्टिस्टला फ्युचर नाहीये. सिद्धांत मॅथ्स ऑलिंपियाडला पाचवा आला. मी पुढच्या वर्षीच आय आय टी एंट्रन्सचा क्लास लावते आहे..’
‘मलिष्काला यशराजमधून ऑडिशनचा कॉल आलाय. शाळा परवानगी देत नाही. पण कास्टिंग झालं तर होम स्कुलिंगचा ऑप्शन आहेच.’
‘सईचा सायन्स प्रोजेक्ट बॉस्टनला सिलेक्ट झाला..’
‘अर्जुन नक्की खेळणार इंडियन क्रिकेट टीममध्ये. त्याच्या कोचनी बेट लावली आहे..’
‘शनायाच्या यु ट्यूब व्हिडिओला लाइक्स आले आत्ताच. दुसराच आहे. दहावा करेपर्यंत १ k क्रॉस करेल सहज.’
मी सांगतेय हे एक पर्सेंट पण नाहीये. सगळ्या एकदम बोलत होत्या आणि सगळी मुलं फोनवर बिझी होती. एका पॉइंटला त्या आवाजांनी माझं डोकं दुखायला लागलं. मी ‘मा’कडं पाहिलं, तर ती शॉक बसल्यासारखी ऐकत होती फक्त. तिच्याकडं माझ्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नव्हतं. मला खूप बिचारी वाटली ती. माझ्यामुळं ती हरली. मला बेक्ड व्हेजिटेबलपण गेलं नाही. (त्याचं कारण फक्त वाईट वाटलं हे नाहीये. मला रडू येत असलं तरी मी खूप खाऊन मग रडते. पण सकाळपासून माझं पोट दुखत होतं, म्हणून मला गेलं नाही..’ आम्ही ते पॅक करून घेतलं. मी मेकूडला एकही घास न देता ते खाणार होते रात्री.
कॉम्पिटिशन संपली. त्यात मारमालेड सोडून सगळे जिंकले. आम्ही निघालो, तर बाहेर एक छोटुस्सा मुलगा भीक मागत होता. आश्लेषा किंचाळलीच. ‘ए.. जा जा...’ म्हणाली. अर्जुन गाडीत जाऊन बसला. शनायानी ‘पुअर लिट्ल बॉय! व्हेन इस द गव्हर्नमेंट गोइंग टू हेल्प द पुअर’ अशी इन्स्टा स्टोरी केली. मला वाईट वाटलं, पण काही सुचलं नाही. म्हणून मी माझं बेक्ड व्हेज त्याला दिलं.
रात्री मी मारमालेडला सॉरी म्हणाले. ‘माझ्याकडं काहीच स्पेशल टॅलेंट नाहीये म्हणून तू हरलीस,’ असं म्हणाले. तर ती म्हणाली, ‘तू जगातली सगळ्यात बेस्ट मुलगी आहेस. तू बाहेर त्या मुलासाठी जे केलंस ते कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यापेक्षा खूप भारी होतं. I am the proudest mother!’
कधीकधी काय होईल सांगताच येत नाही ना? एवढं काय त्यात? पण मा हरली असं तिला वाटत नाहीये हे बरं झालं. उद्या ती मला बेक्ड व्हेज खायला नेणार आहे. भारी ना?
ओके बाय, गुड नाईट...