मी आणि रिझवाना 

विभावरी देशपांडे
सोमवार, 24 जून 2019

साराची डायरी
 

माझा ना एक जेन्युईन प्रॉब्लेम आहे. मला कुणाला असं नीट हेट करताच येत नाही. म्हणजे ऑफ कोर्स मला राग येतो, पण म्हणून मी कुणाला हेट करते असं नाही म्हणता येणार. फॉर example ं माझं आणि मेकूडचं एखाद्या दिवशी भांडण झालं, की मी तिला सॉलिड हेट करते थोडावेळ. पण रात्री झोपेत मला कळतं, की मी फेकून दिलेलं पांघरूण ती मला घालते. सकाळी थंडीनी ‘बाझं दाक बद्द होतं भडून’ (म्हणजे नाक बंद होतं म्हणून. ते बंद झालं की असं ऐकू येतं!) तिला मग मला तिला हेट नाही करता येत. 

पण यामुळं माझा एक प्रॉब्लम झाला. आमच्या क्‍लासमध्ये मागच्या आठवड्यात नवीन मुलगी आली. तिनी काळा बुरखा घातला होता. सगळे तिच्याकडे झू मधल्या प्राण्यांसारखे पाहात होते. आमच्या शाळेत कुणीच घालत नाही बुरखा. ऑब्व्हियस होतं, की ती मुस्लिम आहे. तिचं नाव रिझवाना होतं. सगळे तिला ‘वेलकम रिझवाना’ असं म्हणाले, पण मिसनी सांगितलं म्हणून. खरंतर कुणाच्याच मनात काही वेलकम बिलकम नव्हतं. तिला पहिल्या बेंचवर बसवलं. एकटीला. तिनी बुरखा काढून मागं पाहिलं. ती इतकी सुंदर होती! माझ्या शेजारी अर्जुन बसतो. त्याचा दिसेल त्या मुलीवर क्रश होतो. ही इतकी सुंदर, गोरीपान, कतरीना कैफ टाइप होती. मी म्हटलं झालं. आता हिच्यावर पण क्रश! पण त्यानी मानच फिरवली. मला काही कळलंच नाही. म्हटलं जाऊ दे. मला काय! पण मी पाहिलं, दिवसभर कुणीही तिच्याशी बोललं नाही. रिसेसमध्येपण ती एकटी डबा खात होती. मला वाटलं तिच्या डब्यात कबाब, बिर्याणी असं काहीतरी असेल. मी जाता जाता हळूच पाहिलं, तर शी... ती पोळी आणि तोंडल्याची भाजी खात होती! मला वाटलं तिच्याशी जाऊन बोलावं पण का माहीत नाही, मी का नाही गेले. पण नेक्‍स्ट डे फर्स्ट बेलच्या आधी ती बेंचवर डोकं ठेवून बसली होती. बहुतेक रडत होती. मला कसंतरीच वाटलं. मी गेले तिच्याकडं. तिला म्हटलं, ‘सलाम वालेकुम, क्‍या हुआ तुम्हे?’ तर ती एकदम कडक मराठीत म्हणाली, ‘मला खूप आठवण येते आहे माझ्या शाळेची..’ मी म्हटलं, ‘व्वा! तुला मराठी येतं?’ ती म्हणाली, ‘हो! मी नाशिकला होते आधी. माझ्या पप्पांची ट्रान्सफर झाली..’ सेम आमच्यासारखं बोलत होती की ती. मी उगाच सलाम बिलाम म्हटलं तिला... आणि मग मज्जाच झाली. आम्ही बोलायला लागलो आणि बेस्ट फ्रेंड्‌सच झालो इन्स्टंट! कारण सिम्पल होतं. ती पण हॅरी पॉटर फॅन आहे आणि पॉटरहेड्‌सना बेस्ट फ्रेंड्‌स व्हायला काहीच वेळ लागत नाही. तेवढ्यात मिस आल्या म्हणून मी माझ्या जागेवर गेले. तर अर्जुननी मला एक घाण लूक दिला. मला कळलंच नाही. मी त्या दिवशी टिफिनपण तिच्याबरोबर खाल्ला. तिनी अंडा बिर्याणी आणली होती. मी खूषच झाले. 

पण नेक्‍स्ट डेला मी शाळेत गेले तेव्हा मला कळलं की माझ्याशी कुणीच बोलत नाहीये. दिवसभर. रिसेसमध्ये मी आरोही, समिहाकडं गेले तर त्या निघूनच गेल्या. मला काही झेपलंच नाही. शेवटी घरी जाताना मी त्यांना विचारलं, तर आरोही म्हणाली, ‘तू त्या रिझवानाशी का बोलतेस? ती आपली शत्रू आहे. पाकिस्तानी आहे. ते आपल्यावर अटॅक करतात. उरी नाही पाहिलास का? आणि पुलवामामध्ये काय झालं माहीत नाही का तुला? तुझे आजोबा मिलिटरीत होते ना? तरीही तू आपल्या शत्रूशी मैत्री केलीस? तिला हेट करायचं सोडून?’ त्या निघून गेल्या. मी एकदम फ्रीजच झाले. मला लक्षातच नाही आलं, मी इतकी मोठी चूक करते आहे ते. पण मला हेटच करता येत नाही तर मी काय करू? 

घरी पोचेपर्यंत मला रडू येत होतं. पोचले तर काय? नानी आणि नाना आले होते. मी इकदम धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि रडायला लागले. त्यांना काही कळेचना. मग खूप वेळानी मी त्यांना सांगितलं, काय झालं ते.. आणि सॉरीपण म्हणाले खूप वेळा. त्यांचा चेहरा एकदम सिरीयस झाला, मिशा फुगल्या. त्यांनी त्यांचा फोन हातात घेतला. खटाखट बटन्स दाबली. मला त्यांनी एक फोटो दाखवला, त्यांचा आणि त्यांच्या मित्राचा. सोल्जरच्या ड्रेसमधला. म्हणाले, ‘हा माझा मित्र आहे. इंडो - पाक वॉर झालं ना तेव्हा आम्ही एकत्र होतो फ्रंटवर. समोरून शूटिंग सुरू झालं. अचानक हा धावत आला आणि यानं मला ढकलून दिलं. मला कव्हर केलं. मी वाचलो, पण त्याच्या पायाला गोळी लागली, पाय गेला त्याचा.’ मी शॉक होऊन ऐकत होते. मग त्यांनी मला त्या दोघांचा आत्ताच फोटो दाखवला. लास्ट इयर त्यांचं रियुनियन झालं त्याचा. त्यात पण ते आजोबा होते wheelchair वर बसलेले. मी मनातल्या मनात त्यांना थॅंक यू पण म्हणाले. पण नाना मला हे सगळं का सांगतायेत ते मला कळलं नाही. मग त्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर क्‍लिक केलं. त्यांचं नाव होतं, रफीक खान. माझा चेहराच बदलला. मला एका मिनिटात कळलं, की माझं काहीच चुकलं नव्हतं. ते म्हणाले, ‘सरू, इंडिया पाकिस्तान युद्धात एका मुस्लिम माणसानी मला वाचवलं. एक लक्षात घे, मुस्लिम म्हणजे पाकिस्तानी नाही आणि सगळे मुस्लिम वाईट नाहीत. जगात दोनच माणसं असतात चांगली आणि वाईट... आणि खरंतर माणसं वाईटच असतात असं नाही. ती वाईट वागतात.’ 

I was not wrong! 
नेक्‍स्ट डे रिझवानाबरोबरच टिफीन खाल्ला. तिनी काय आणलं होतं माहीत आहे? भोपळ्याचे घारगे! एक नंबर. ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या