माझं मराठी
साराची डायरी
मला काल मराठीचा पेपर मिळाला. त्यात मला twenty out of forty मिळाले. Actually मी मी हार्ड वर्क केलं होतं आणि लॅंग्वेजेसमध्ये मी तशी स्ट्राँग आहे. पण मी सिली मिस्टेक्स खूप करते आणि त्यामुळं माझे ओव्हरऑल मार्क्स लूज होतात. पण मी आता डिसाइड केलं आहे की असं नाही करायचं. म्हणजे मी मराठीमध्ये पण स्कोअर करीन. तर असा डिसिजन फायनल करून मी घरी आले तर मला लिफ्टमध्येच जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. म्हटलं येस! गोडबोले काका आले असणार. नानी कुठल्यातरी एका क्लबची मेंबर आहे. ते गप्पा मारतात. बहुतेक मॅजेस्टिक का असं काहीतरी. गोडबोले काका त्याचे मेंबर आहेत. ते खूप हाय लेव्हल मराठी बोलतात. ते स्वतः रायटर आहेत आणि he simply loves Marathi. ते खरंतर खूप क्यूट आहेत पण ते चिडले की डेडली दिसतात. ते फारसे चिडत नाहीत पण कुणी चुकीचं मराठी बोललं की त्यांचा फ्यूजच उडतो. ते एकदम लाल लाल होतात आणि म्हणतात, ‘घ्या ती मराठी भाषा आणि मुठा नदीत विसर्जन करून टाका तिचं! एक जण धड मराठी बोलत नाही की लिहीत नाही. मराठी भाषा आपल्या पिढीबरोबरच संपणार मनीषा ताई! (म्हणजे नानी) आणि ते कशानी चिडतील तेही सांगता येत नाही राव! एकदा ते आले होते घरी, माझा क्लास लवकर सुटला कारण माझ्या टीचरचा दात दुखत होता. म्हणून मी लवकर घरी आले. तर ते म्हणाले,
‘अरे वा! सरस्वती, आज लवकर आलीस?’ - गोडबोले काका
‘हो, मॅडमचा दात दुखत होता सोssss’ - मी
‘सो?? सो?? सो काय? म्ह णू न! म्हणून हा शब्द मराठी भाषेतून अंतर्धान पावला आहे. प्रत्येकजण सारखं, ‘सो! मी हे केलं, सो मी ते केलं’ छे छे.. अमृताते पैजा जिंकणारी माझी मराठी...’
असं खूप बोलले ते नंतर. आता कोण अमृता? तिनी कसली बेट लावली मला काय माहीत? मी नानीकडं पाहिलं तर ती हसत होती गालातल्या गालात. मला डोळा मारून ‘आत जा’ म्हणाली. आणि गोडबोले काकांना चहा दिला. ते एकदम शांत झाले. चहा त्यांचा वीक पॉइंट आहे.
हां.. तर हेच काका काल चिडून चिडून बोलत होते नानीशी.
‘वीस चार म्हणजे चोवीस, आणि पन्नास तीन म्हणजे त्रेपन्न म्हणे! अरे काय चाललंय काय? का तर म्हणे जोडाक्षरं लिहायला अवघड आहेत. कसली अवघड? आम्ही नाही शिकलो? आणि या पोरांना बोलायला लागण्याआधी मोबाईल उघडून व्हिडिओ पाहता येतात, गाणी ऐकता येतात. जोडाक्षरं तेवढी अवघड जातात. मूर्खपणा आहे नुसता. मराठी भाषा विसर्जित करण्याचा कट आहे हा’ - काका
मी जरा हळूहळूच आले आत. नानी गॅसवर भांडं जस्ट ठेवत होती. म्हणजे चहा व्हायला वेळ होता. त्याच्या आत त्यांनी मला पाहिलं असतं तर..
‘सरस्वती. इकडे ये बेटा’ - काका.
पाहिलंच त्यांनी!
ओह गॉड! विषय एन्ड!
मी गुपचूप त्यांच्यासमोर उभी राहिले. त्यांनी मला एक कागद दिला आणि त्यांचं पेन. आणि मला म्हणाले.
‘लिही, छप्पन्न’ - काका
‘-----?’ - मी
‘लिही ना, छप्पन्न’ - काका
‘म्ह ..म्हणजे?’ - मी
‘फिफ्टी सिक्स’ - नानी.. द लाइफ सेव्हर
‘-----’ - काका (हे बघा... असं एक्स्प्रेशन)
हळूच पेन घेऊन लिहिलं आणि त्यांना दिलं.
‘चपन??? चपन? च प न??’ - काका.. (वाटलं ओरडतील पण ते एकदम हळू म्हणाले. मला वाटलं ते आता रडतीलच)
आणि खूप वेळ ते मान खाली करून बसून राहिले. नानीनी चहा आणला, तो ते न बोलता प्यायले आणि निघून गेले.
मला खूपच sad वाटलं. असं वाटलं की मी त्यांना लेट डाऊन केलं. पण आम्हाला थर्डमध्ये फिफ्टीपर्यंत लिहायला शिकवलं होतं मराठी नंबर्स पण नंतर नाही शिकवले. आठवत नाहीये मला. आणि मला येतं मराठी बोलता पण इंग्लिश सारखं येतं मधे मधे. मा आणि पा पण तसंच बोलतात. इनफॅक्ट सगळेच तसं बोलतात. कधीकधी मी आणि नानी एक गेम खेळतो. एकही इंग्लिश शब्द न वापरता मराठी बोलण्याचा. पण नानीसुद्धा एका पॉइंटला दमते आणि गिव्ह अप मारते. सगळे रिक्षावाल्यांशी, वाण्याशी, दुकानदाराशी हिंदी बोलतात. भारी जागी गेलं तर कंपल्सरी इंग्लिश. ‘शाळांची लेव्हल तशी ग्रेट नाहीये’ म्हणून मला इंग्लिश शाळेत घातलं आहे. तिकडं तर कंपल्सरी इंग्लिशमध्येच बोलायला लावतात. मी सीनियर केजीत असताना मला अज्जिबात इंग्लिश यायचं नाही. म्हणून मी टीचरशी मराठीतच बोलायचे, तर मला एक दिवस न बोलण्याची पनिशमेंट केली होती. मग काय करणार? मी मिक्स्ड व्हेजिटेबल सारखं मिक्स लॅंग्वेज बोलते. पा सांगत होता जपानमध्ये कुणाला इंग्लिश येतच नाही. आणि येत असलं तरी ते जपानीच बोलतात. तसा रुल आपल्याकडं केला तर मला येईलच सगळं.
पण तरी मला खूप वाईट वाटलं. काका चिडले असते तर ठीक होतं. पण ते खूप sad झाले. त्यांचा चेहरा पाहून मला खूपच कसंतरी झालं.
नेक्स्ट वीक त्यांचा सिक्सटीयेथ बड्डे आहे. सॉरी सॉरी.. पुढच्या आठवड्यात त्यांची साठी आहे. मी एक ते साठ हे अंक छान अक्षरात लिहून एक कार्ड.. शुभेच्छा पत्र बनवून त्यांना देणार आहे. (पन्नास सहा, पन्नास सात असं नाही. छप्पन्न, सत्तावन्न..असं) निदान ट्राय ...सॉरी.. प्रयत्न तरी करणार आहे.
ठीक आहे, अच्छा शुभ रात्री.