महेशकाकाचा वाडा 

विभावरी देशपांडे
सोमवार, 15 जुलै 2019

साराची डायरी
 

‘असं कसं करू शकतो महेशकाका? आपल्या सगळ्यांच्या घरापेक्षा बेस्ट घर आहे त्याचं. एकदम एथनिक आणि अर्दी. मी तर रेवाला प्रॉमिस केलं होतं, की तिच्या साड्यांचं नेक्‍स्ट फोटोशूट महेशकाकाकडं करू म्हणून.. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून ती मला पोज करायला बोलावणार होती. आता काय उपयोग! शी!’ मेकूडचा कशामुळं मूड ऑफ होईल सांगता येत नाही. हिला रेवानी पोज करायला बोलवायचं तिच्या साड्यांच्या फोटोशूटसाठी म्हणून महेशकाकानी वाडा विकायचा नाही का? 

पण सगळेच जरा अपसेट आहेत, महेशकाकानी घर विकलं म्हणून. तुम्हाला वाटेल त्याचं घर म्हणजे पिक्‍चरमध्ये दाखवतात तसा भारीतला बंगला आहे, पण तसं नाहीये ते. Actually पुण्यातल्या ओल्डेस्ट घरांपैकी एक आहे त्याचा वाडा. त्याच्या पणजोबांनी बांधलेला, १२० वर्षांपूवी! पार्सल आणि महेशकाकाचे बाबा हे भाऊबहीण होते. (ते कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि पार्सल म्हणते तसं इतकं काही जवळचं नातं नाहीये आमचं); पण ते जवळ राहतात आणि महेशकाका आणि पा एकदम फास्ट फ्रेंड्‌स पण आहेत. त्यामुळं आम्ही क्‍लोज आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तो वाडा. एकदम जुन्या स्टाइलचा आहे. ब्लॅक स्टोन्सचा. बाहेर कितीही गरम असलं तरी आत natural एसी असतो. मस्त! गार गार! बाहेर अंगण आहे. त्यात प्राजक्ताचं झाड आहे. मी कावेरीकडं म्हणजे महेशकाकाच्या मुलीकडं राहायला जाते, तेव्हा सकाळी लवकर अंगणात येते, तर जमीनच दिसत नाही! फुलंच फुलं! मग आम्ही ती वेचून वेणूआजीला देतो. मध्ये मोठा चौक आहे. गणपतीत तिकडं आम्ही मस्त आरास करतो. दगड का माती, रुमाल पाणी, विषामृत... खेळायला खूप जागा आहे. त्यांच्या खाली टेंट्‌स आहेत एक, त्यांच्या मुलाची मुंज पण त्यांनी चौकात केली होती! मागं पण छोटं अंगण आहे. मधून उघडणारी आणि बंद होणारी लाकडी दारं आहेत, मागं हौद आहे, आंब्याची झाडं आहेत. आणि संडास आहे इंडियन स्टाईल! तो पण बाहेरच्या साईडला! त्यांच्याकडं गेलं, की आपण टाईम मशीनमध्ये बसून एकदम शंभर वर्षं मागं गेलोय असं वाटतं. आमच्या घरासारख्या भारी गोष्टी नाहीयेत तिकडं, पण खूप मस्त आहे ते घर. मला खूप आवडतं. मी आणि माझ्या सोसायटी फ्रेंड्‌स चान्सच शोधत असतो कावेरीकडं खेळायला जायचा. पण ती लईच शहाणी आहे! तिला माहीत आहे तिचं घर डिमांडमध्ये आहे त्यामुळं ती सगळं तिच्या मनासारखं करते आम्ही तिकडं गेलो की! 

तर झालं असं, की महेशकाकानी ते घर एका बिल्डरला विकलं आहे. तो तिकडं अपार्टमेंट्‌स करणार आहे आणि भारी भारी फ्लॅट्‌स महेशकाकाला देणार आहे. खरंतर महेश काका ग्रीडी नाहीये बिलकूल! पण मग त्यानी असं का केलंय मला कळलंच नाहीये. पार्सलपण खूप चिडली. कावेरी तर तिच्या बाबाशी भांडून आमच्याकडंच आली राहायला. परत जाणारच नाही म्हणाली. महेशकाका तिला घ्यायला आला तर ती बोलली नाही त्याच्याशी. पार्सल त्याला म्हणाली, ‘सगळं जुनं मातीमोल करतायेत सगळेच. तू वेगळा आहेस असं वाटलं होतं. पण शेवटी मोहानी तुझा बळी घेतलाच ना!’ काका एकदम थांबला. बोलला काहीच नाही. कावेरीला म्हणाला, ‘चल! उद्या शाळा आहे’ एकदम स्ट्रिक्‍ट आवाजात. ती जरा घाबरली आणि त्याच्याबरोबर गेली. 

ती गेल्यावर वेणूआजी म्हणाली, ‘त्या पोराचा जीव आहे त्या घरात. पण गेल्या वर्षी पावसात भिंत खचली. खालच्यांचा बिट्टू थोडक्‍यात वाचला. पत्त्यांच्या बंगल्यासारखं झालंय घराचं. इकडं सावरलं की तिकडं कोसळतं. खूप पैसे खर्च झालेत त्याचे... आणि असे कमावतोय किती? मीच त्याला म्हणाले, ‘चांगली ऑफर देतोय तो बिल्डर तर घेऊन टाक. शपथच घातली त्याला. तेव्हा तयार झाला’ मी शॉकच झाले. आम्हाला व्हिलन वाटत होता तो, पण खरंतर हिरो होता तो. 

वेणूआजीला घरी जाताना कंपनी द्यायला मी गेले. दारातून तिला बाय करून बाहेर येणार तेवढ्यात मला मागच्या साईडला खसखस आवाज आला. तो डेंजर काळा बोका असेल म्हणून मी बघायला गेले तर तो महेशकाका होता. मागच्या आंब्याच्या झाडाजवळची माती तो एका पिशवीत भरून घेत होता... आणि मी कधीकधी रडते तसा रडत होता. एवढ्या मोठ्या माणसाला रडताना मी कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे बाबा गेले तेव्हापण नव्हता असा रडला. मलापण खूपच रडू यायला लागलं. त्याला कळू नये म्हणून मी पळून आले. 

आज त्यांच्या घराचं भूमिपूजन झालं. उद्यापासून ते घर पडणार! लाँग कट पडला तरी चालेल पण मी मागच्या रस्त्यानी जाणार आहे क्‍लासला, तिकडून नाही. 

ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या