माझं आणि मेकूडचं भांडण

विभावरी देशपांडे
सोमवार, 22 जुलै 2019

साराची डायरी
 

मेकूड इतकी डोक्‍यात जाते ना माझ्या. स्वतःला ती प्रियांका चोप्राच समजते! सारखे नवीन कपडे, कॉस्मेटिक्‍स, शूज मागवते ऑनलाइन! परवा पा घरी आला आणि आत येण्याऐवजी एकदम परत बाहेरच गेला. मी म्हणाले, ‘बाबा, काय झालं तुला?’ तर म्हणे ‘आपलंच घर आहे का? मला वाटलं चुकून दुसऱ्याच्याच घरात शिरलो.’ मी मा कडं पाहिलं! मला वाटलं पिक्‍चरमधल्यासारखी पाची ‘याददाश खोगयी’ की काय! तो म्हणाला, ‘आज एक पण पार्सल नाही amazon , जबाँग, myntra कुठलंच! म्हणून वाटलं मी चुकीच्या घरात आलो! हा हा हा हा हा!’ 
(पा स्वतःच जोक करून स्वतःच खूप हसतो. मोस्टली तो एकटाच हसतो पण आजचा जोक मस्त होता आणि तो मेकूडवर असल्यानी मला आणखीच आनंद झाला.) 

तर परवा तिनी बारावी काजळ पेन्सिल आणली. (हो, ती नसली की मी तिच्या ड्रॉवरमध्ये स्पाय करते. आधी त्या वस्तूंचा एक फोटो काढते. मग तिच्या वस्तू उचक पाचक करते, माझा मेकप करते. मग माझा एक फोटो काढते, ज्यात मी भारीच दिसते आणि मग आधीच्या फोटोप्रमाणं सगळ्या वस्तू नीट लावते आणि मग सगळे फोटो डिलीट करते. खूप वेळा करून मी आता एक्‍स्पर्ट झाले आहे.) परवा स्पाईंग करताना मला ती दिसली. मी हळूच उघडून एका डोळ्याला लावली तेवढ्यात एक आवाज आला जोरात 

‘सारा! का हात लावलास माझ्या 
पेन्सिलला?’ - मेकूड 

‘नाही लावला’ - मी (किती डम्ब उत्तर आहे हे माझं!) 
‘नाही काय? मला दिसते आहे तुझ्या हातात. मला नाहीये ढापण तुझ्यासारखं. मला नीट दिसतं.’ - मेकूड 

‘मी जस्ट बघत होते’ - मी 
‘कशाला? तुला अलाऊड नाहीये काही. लहान आहेस तू.’ - मेकूड 

‘पण माझ्या फ्रेंड्‌स लावतात कधीकधी! तुझ्याकडे कितीतरी आहेत, मला दे ना एक’ - मी

‘मुळीच नाही! आई मला रागवेल आणि तुला चष्मा आहे. काजळ लावलं तरी दिसणार आहे का? उगाचच smudge होईल आणि आणखी बावळट दिसशील!’ - मेकूड 

मला एकदम काय बोलायचं ते सुचलंच नाही. मला आहे ढापण आणि मी सकाळी छान दिसते पण संध्याकाळ होईपर्यंत बावळट दिसायला लागते. माझा चेहरा ऑईली होतो, केस विस्कटतात, मी मळून जाते. मला माहीत आहे मी छान दिसत नाही. पण असं मला मुद्दाम सांगायची काय गरज आहे? मला खूप राग आला. मी काहीच बोलले नाही दोन दिवस तिच्याशी. पण तिला काही फरकच पडला नाही. तिला कळलंच नाही बहुतेक मी तिच्याशी बोलत नाहीये ते. जाऊ दे! अशीच आहे ती! आणि मी अशीच आहे... बावळट आणि अग्ली. 

पण आज गंमत झाली. आम्ही आज शेजारच्या बिल्डिंगमधल्या रेवाकडं तिच्या बर्थडे पार्टीला जाणार होतो. ‘swag’ अशी थीम होती! सगळ्या वन पीस घालणार होत्या आणि मेकप करणार होत्या, त्यांनी त्यांच्या आयांची परमिशनपण घेतली होती. त्या सगळ्या खूप डिस्कस करत होत्या खाली. पण मी म्हणाले मी साधा ड्रेस घालणार आहे आणि मेकपपण नाही करणार. एस्पेशली आय मेकप. कारण मी ढापणी आहे आणि मेकप केला की बावळट दिसते. सगळ्या म्हणाल्या ‘as u wish!’ वाईट वाटलं जरासं. पण इट्‌स ओके! नानी म्हणते काही गोष्टी accept करायला पाहिजेत. 

मी तयार व्हायला वर आले तर मेकूड जस्ट आली होती घरी, मला अचानक म्हणाली, ‘काय घालणार आहेस पार्टीला?’ म्हटलं हिला कसं कळलं? विचारणार होते तिला पण मग आठवलं, की we are not on talking terms! पण तेवढ्यात तिनी कपाटातून एक भारी वन पीस काढला. म्हणाली, ‘ऑर्डर केला होता पण छोटा साईज आला. एक्‍स्चेंज करायचा राहून गेला. तू घाल, मस्त दिसेल.’ 

खूप भारी वाटलं पण एकदम आठवलं, की not on talking terms! 

मी माझा नेहमीचा एक ड्रेस काढला. तेवढ्यात तिनी मला मागून मिठी मारली. म्हणाली ‘सारा, तू माझी गुंडू बाळ आहेस ना? मग मी तुला रेडी करणार.’ 

म्हणाले ‘नको, मी ढापणी आहे आणि बावळट.’ 
तर तिच्या काजळ घातलेल्या डोळ्यात पाणी आलं, ती म्हणाली ‘जो तुला असं म्हणेल त्याची आई टकली!’ 
‘म्हणजे मी?’ मार्मालेड म्हणाली. ही कधी आली? 

आम्ही तिघी खूप हसलो. मेकूड मला सॉरी म्हणाली! तिनी माझं आणि माझ्या फ्रेंड्‌सचं बोलणं ऐकलं होतं आणि तिला खूप वाईट वाटलं होतं. तिनी मला एक नंबर रेडी केलं! मी सॉलिड दिसत होते. तिनी चक्क आमचा फोटो तिच्या इंस्टावर टाकला आणि कॅप्शन लिहिली, ‘with my prettiest little sis!’ 

त्याला दोनशे लाइक्‍स आले! 
आज पार्टीत मी खरंच सगळ्यात भारी दिसत होते! थॅंक्‍स टू मेकूड... सॉरी दीदी! (आज एकच दिवस म्हणणार.) 
ओके बाय गुडनाईट.

Tags

संबंधित बातम्या