मी बेस्ट बहीण 

विभावरी देशपांडे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

साराची डायरी
 

आज शाळेला सुट्टी होती. १५ ऑगस्ट. पण मी सक्काळी उठून शाळेत गेले. मला खूप आवडतं १५ ऑगस्टला शाळेत जायला. रोज सकाळी उठायला मी ‘मा’च्या डोक्याला खूप शॉट देते. पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मी टुप्पूक्कन उठते आणि तयार होते. तशीच आजपण झाले. झेंडावंदन झालं आणि आम्हाला ओरिओ बिस्किट्स दिली. शाळेचं बजेट वाढलं बहुतेक. पूर्वी साधी बिस्किट्स द्यायचे, यावेळी क्रीमची दिली. मला शॉकच बसला! तर सवी म्हणाली, ‘अगं आज राखीपौर्णिमापण आहे ना!’ म्हटलं, ‘व्वा! टू इन वन. इंडिपेंडन्स डे आणि राखीपौर्णिमा!’ तर ती म्हणाली, ‘अगं, व्वा काय! सुट्टी बुडाली ना आपली एक!’ हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हटलं ठीक आहे! नाहीतरी राखीपौर्णिमा विसरूनच गेले होते मी. आमच्याकडं काही फार एन्थु नसतो राखीचा. कारण मला भाऊ नाही, ‘पा’चे दोन भाऊ इकडं नाहीत, आत्यापण नाही... आणि ‘मा’ला बहीणपण नाही, भाऊपण नाही. त्यामुळं आम्ही राखीपौर्णिमा सेलिब्रेटच करत नाही. मी ठरवलं जाऊ दे! आज सुट्टी आहे तर दिवसभर खेळायचं! 

पण पोपटच झाला! माझे सगळे फ्रेंड्स कुठं कुठं गेले होते. त्यांच्या बहिणींकडं, नाहीतर भावांकडं. नाहीतर त्यांच्याकडंच गेस्ट आले होते. शनायानी तर direct माझ्या तोंडावरच दार लावून घेतलं यार! ‘सॉरी! आज बीजी आहे, संतूदादा, शिवेशदादा आणि सगळे आले आहेत.’ तिच्या घरातून मस्त नारळीभाताचा वास येत होता. आमच्याकडे ‘पा’ जपानला गेला आहे. मा आणि मेकूड डाएटवर आहेत. (As usual! कधी बारीक होणार आहेत कोण जाणे!) आणि मला तर कुणी काही विचारतच नाही ना! त्यामुळं नारळीभात वगैरे चान्सच नाही. कुठल्यातरी बीन्स घातलेलं salad होतं आणि मुगाचं वरण! मी बहुतेक ‘मा’ची खरी मुलगी नाही. मला जामच राग आला. मी एकटी होते दिवसभर! म्हणजे मेकूड होती! पण सेक्रेड गेम्सचा नवा सीजन आला. त्यामुळं ती दार बंद करून बघत बसली. कुणीही मला विचारलंपण नाही, मला काय करायचं आहे ते! फ्रेंड्स नाहीत, नारळीभात नाही आणि भाऊ नाही. मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप राग आला आणि खूप वाईटपण वाटलं. पण मला नानी नेहमी सांगते, की जे नाही त्याबद्दल कम्प्लेंट करत, रडत बसायचं नाही. जे आहे त्याची value ठेवायची. मी खूप ट्राय केलं value ठेवायला. जोरात ट्राय केलं पण मला जमलंच नाही यार! रडू रडू व्हायला लागलं. म्हणून मी नानीला फोन केला. तिला काही सांगितलं नाही मी. सहज फोन केला आहे असं म्हणाले. पण तिला एका मिनिटात कळतं की मला वाईट वाटतं आहे. कसं काय माहीत नाही! 

संध्याकाळी बेल वाजली. मला वाटलं माझे फ्रेंड्स आलेत. पण नानी होती. तिच्या हातात एक डबा होता. गरम गरम नारळीभात!! यम्मी! तिला कसं कळलं? पण मला खावासा नाही वाटला! तिनी माझे डोळे पहिले आणि मला जवळ घेतलं. काहीच बोलली नाही. बॅगमधून ६ राख्या काढल्या. मी म्हटलं, ‘मला काय उपयोग याचा? मला भाऊच नाहीये! माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी राखी बांधली त्यांच्या भावांना! मीच नाही बांधली. कशाला आणल्यास तू या राख्या?’ 

राखीपौर्णिमेला काय करतात सांग. - नानी. 

राखी बांधतात भावाला. - मी. 

त्याला आणखी काय म्हणतात? - नानी. 

रक्षाबंधन. - मी. 

रक्षा म्हणजे काय? - नानी. 

‘Security!’ - मी (मला माहीत आहे हा शब्द). 

म्हणजे जो आपल्याला सेफ ठेवतो त्याला राखी बांधायची, बरोबर? - नानी. 

बरोबर.. - मी. 

मग आपल्याला सेफ काय फक्त आपले भाऊच ठेवतात का? - नानी. 

करेक्ट पॉइंट आहे! मला भाऊच नाहीये, तरी मी सेफ आहेच की! कुणामुळं? - मी. 

विचार कर सरू! आज तुला सेफ ठेवणारे लोक कोण कोण आहेत? त्यांना बांध की राखी..- नानी. 

मी दोन मिनिटं विचार केला आणि मला एक भारी आयडिया सुचली. मी राख्या घेतल्या आणि पळत सुटले. आमच्या मेनगेटवरचे मेन सिक्युरिटी गार्ड बांदल काका आहेत. ते नेहमी गाडी जोरात आणणाऱ्या लोकांना झापत असतात, ‘पोरं खेळतायेत सायेब! कसली घाई करताय?’ असं म्हणून. मी त्यांना राखी बांधली. मग A, B, C, D, E सगळ्या बिल्डिंग्जच्या सिक्युरिटी काकांना राखी बांधली. ते सगळे रात्री खुर्चीवर बसल्या बसल्या झोपतात. त्यांना पलंगपण नसतो झोपायला. मला वाईट वाटतं. पण ते सगळे आमच्याशी खूप गप्पा मारतात. म्हणून! मला मज्जा आली. मी घरी आले.. मी आणि नानी मग गप्पा मारत बसलो. मी २ प्लेट नारळी भात खाल्ला! इतक्यात बेल वाजली. दार उघडलं, तर सगळे सिक्युरिटी काका आले होते. बांदल काकांच्या हातात कॅडबरी सेलिब्रेशनचा पॅक होता. त्यांनी मला दिला. सगळे माझ्याकडं बघून नुसतेच हसत होते. मग म्हणाले, ‘आमच्या बहिनीला ओवाळनी!’ त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते निघून गेले. 

नानी म्हणाली, ‘सरू! तुला एकही भाऊ नसला ना तरी तू या जगातली सगळ्यात बेस्ट बहीण आहेस!’ 

मला आज खूप भारी वाटतं आहे. 
ओके बाय, गुडनाईट...

संबंधित बातम्या