गणपती बाप्पा मोरऽऽऽया! 

विभावरी देशपांडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

साराची डायरी
 

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना मला खूप आवडतो. युनिट टेस्ट जस्ट संपलेली असते. खूप खूप सुट्ट्या असतात. सोसायटीत गणेशोत्सवाच्या प्रोग्रॅम्सची प्रॅक्टिस चालू असते. मा पण सॉलिड एन्थु असते. ती पण प्रॅक्टिसमध्ये बीजी असते. पार्सल आमच्याकडंच असते, कारण ‘फॉरेनमध्ये करण्यापेक्षा गणपती-गौरी इकडंच असावं.’ खरंतर फॉरेनमध्ये सगळे जास्त जोरात सेलिब्रेट करतात सगळं. कारण, ‘थाऊसंड्स ऑफ माइल्स अवे असले तरी त्यांची हार्टस त्यांच्या कंट्रीत आणि कल्चरमध्येच रूटेड असतात.’ (असं माझी यू एसची काकू म्हणत असते. तिच्याकडं मोठ्ठा गणपती असतो. पण तिला सगळं येतं, त्यामुळं पार्सलला काही स्कोप राहत नाही बॉसिंग करायचा. मा ला या सगळ्यातलं काही कळत नाही आणि तिला फार इंटरेस्टपण नसतो. त्यामुळं ती पार्सलला फुल फ्रीडम देते. म्हणून बहुतेक पार्सल आमच्याकडं येत असावी.) पार्सल एरवी खूप इंस्ट्रक्शन्स देते, पण या दिवसांत ती आणि तिचे देव चिल करत असतात. त्यामुळं तिचं माझ्याकडं फारसं लक्ष नसतं. दिवे, पुरणपोळ्या, नारळीभात, सत्यनारायणाचा शिरा, मोदक असं काही ना काहीतरी सारखं करत असते घरात. पार्सलनं किचन टेक ओव्हर केलं, की मा फॅशन शो, डान्स, नाटक सगळ्याच्या प्रॅक्टिसला फ्री असते. थोडक्यात काय, सगळ्यात भारी टाइम असतो! 

पण काल आमच्याकडं जरा sad scene झाला. गणेशचतुर्थी म्हणून परवा मी आणि पा नी जाऊन मूर्ती आणली. ती नीट कव्हर करून ठेवली. मला सारखं उघडून बघावंसं वाटतं, पण पार्सल allow नाही करत. म्हणते, ‘बाप्पा झोपलेला असतो.’ मी आणि मेकूडनं एक नंबर डेकोरेशनपण केलं. ते संपलं आणि ती स्लीप ओव्हरला गेली. रात्री पार्सल लवकर झोपली. मा आणि पा जपानी लोकांबरोबर डिनरला गेले. पा मा ला सांगत होता, की मी सुशी खाणार आहे. (म्हणजे जपानी फिश, सू आणि शी नाही..) तर ते आईला सांगू नकोस. उद्या गणपती आहेत, उगाच त्यावरून वाद नकोत. सगळे पार्सलला जामच घाबरतात. मला झोपच येत नव्हती. डेकोरेशनमध्ये अजून काहीतरी करावं असं वाटत होतं. मी हळूच बाहेर गेले आणि दोन कागदाची फुलं add केली. मस्त दिसत होती. परत जाताना मला राहवलं नाही म्हणून बाप्पाचा घुंगट काढून बघितलं. किती क्यूट दिसत होता! कुणी पाहण्याच्या आत मी जायला लागले, तर हॉरिबल गोष्ट घडली. बाप्पाची मूर्ती माझाच धक्का लागून पडली! आणि सोंड मोडली त्याची. मी जाम म्हणजे जाम घाबरले. मी देवाला कधीच घाबरत नाही. पण पार्सल खूप चिडेल आणि मा आणि पा पण! गणेशचतुर्थीच्या आधी बाप्पा के साथ खिलवाड??? हो ही नाही सकता। लकीली पार्सलला ऐकू नाही आलं. मा आणि पा आले नव्हते अजून परत आणि चुगलखोर मेकूड येणारच नव्हती. मी हळूच त्याला उचललं. सॉरी म्हटलं आणि खोलीत घेऊन आले. माझ्या सुपर ग्लूनी त्याची सोंड चिकटवली. त्या ग्लूनी काहीही चिकटतं. काही कळलंपण नाही. मी हळूच मूर्ती परत ठेवून आले. 

दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे तयार झालो. पा नी धोतर नेसलं आणि पूजा केली. बाप्पाला आसनावर ठेवायला उचललं तर त्याची सोंडच पडली! सुपर ग्लूनी काहीही चिकटत नाही! २ मिनिटं सगळं स्टॅन्डस्टिल! (म्हणजे २ सेकंदच असणार, मला दोन मिनिटं वाटली..) मा आणि मेकूड ओरडल्याच! ‘हे काय? सोंड कशी तुटली? आता? आता काय करायचं?’ वगैरे वगैरे कल्ला सुरू झाला. पार्सल तर रडेल की काय असं वाटलं मला. ‘त्या सखाकडं घेऊन जातो परत! सबस्टॅण्डर्ड माल देतो आजकाल!’ - पा. 

‘राहुल! माल काय? गणपती आहे तो! काहीही बोलतोस का? आणि कशावरून आधी तुटली होती? आपल्याकडं तुटली असेल तर? - मा. 

‘कसं शक्यय? काल ओके होती मूर्ती, आम्ही डेकोरेशन केलं तेव्हा! काय सरू?’ - मेकूड. 

मग खूप काय काय बोलले ते. मी पार्सलकडंच बघत होते. ती एका साईडचा ओठ दाबून काहीतरी विचार करत होती. ती रडायच्या आत, 

‘मी.. मी पाडली मूर्ती... आणि मग सुपर ग्लूनी चिकटवली,’ एकदम मीच बोलले. 

‘काय? कशी? कधी? का? पण हातच का लावलास तू? किती वेळा सांगितलं आहे नाही ते उद्योग करू नकोस. सारखी बघायची असते मूर्ती. पेशन्स नाहीये तुला. आजीला चालत नाही तुला माहीत आहे ना?’ - मा, पा आणि मेकूड. कोण काय बोललं कळलं नाही. 

‘पुरे!’ - पार्सलचा जोरदार आवाज! मी म्हटलं माझा विषय एंड! आज टाइम आउट! नो मोदक! 

‘इतका कल्ला करायची गरज नाहीये. असतं कौतुक मुलांना! गेली असेल बाप्पाला बघायला, पडली असेल मूर्ती! पण कबूल केलं तिनं. खोटेपणा नाही केला!’ - पार्सल. 

काहीतरी गंडलंय! माझा विश्वासच बसेना! 
‘तू चिडली नाहीस आजी? बाप्पा चिडणार नाही?’ - मी. 

‘तूच म्हणाली होतीस ना एकदा मला? बाप्पाला घाबरायचं कशाला? आता तूच घाबरतेस? उलट तो खूष झाला असेल! फायनली त्याला डॉक्टर मिळाला चांगला! आणि आपण केलेली गोष्ट कबूल करणारी माणसं मला बाप्पापेक्षा जास्त आवडतात! काय राहुल? कसा होता जपानी मासा?’ पार्सल. 

सगळ्यात भारी गणेशचतुर्थी होती आज! वाकड्या सोंडेचा बाप्पा आणखीच गोड दिसत होता... आणि प्रामाणिकपणाबद्दल मला दोन मोदक जास्त मिळाले! 
ओके बाय, गुडनाईट...

संबंधित बातम्या