सेलिब्रेशन कॉम्पिटिशन 

विभावरी देशपांडे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

साराची डायरी
 

आमच्या सोसायटीत गणपती खूप म्हणजे खूप सिरीयसली घेतात. म्हणजे सगळाच इज्जत का सवाल असतो. असं नाही की केली काहीतरी आरास आणि बसवला गणपती! खूप इंपॉर्टंट असतात हे सगळे दिवस. दोन महिने आधीपासून तयारी सुरू होते. कमिटी तयार केली जाते. म्हणजे तशा खूप कमिट्या ऑलरेडी आहेतच. सिक्युरिटी कमिटी, क्लबहाऊस कमिटी, कल्चरल कमिटी, मेंटेनन्स कमिटी, एक मंदिर कमिटीपण आहे! कारण सोसायटीत दोन मंदिरं आहेत.. तर या सगळ्या कमिट्या सोडून गणपतीची एक वेगळी कमिटी तयार करतात. त्यासाठी व्होटिंगपण होतं! मग त्यांच्या खूप मिटींग्स होतात. त्यात सगळे खूप भांडतात आणि मग एक थीम ठरते. डेकोरेशन कुठलं करायचं त्याची. आमच्या चार बिल्डींग्स आहेत, ए बी सी आणि डी. सगळ्या बिल्डींग्समधले एन्थु लोक ठरवतात काय करायचं ते. मग त्या मेन कमिटीच्या छोट्या छोट्या कमिट्या होतात. डेकोरेशन कमिटी, कल्चरल कमिटी, महाप्रसाद कमिटी, ढोल ताशे कमिटी, पूजा कमिटी! मग त्या कमिट्यांचा एक मेन माणूस असतो. तो सगळ्यांना कामं वाटून देतो. पार्सल, पूजा कमिटीच्या मेन लोकांपैकी एक आहे कारण ती यातली एक्सपर्ट आहे. मी सगळं सिरीयसली करते. एरवी मी देवाला नमस्कार करतेच असं नाही. पण रोज पूजेला ट्रॅडिशनल कपडे घालून जाते. जोरजोरात झांजा वाजवते, आरत्यापण म्हणते. मला पाठ आहेत. मी देवाची फॅन आहे असं नाहीये पण मला खूप मज्जा येते हे सगळं करायला. माझा आख्खा ग्रुप या दिवसात खालीच असतो. पार्सल म्हणते, ‘अगदी मॉडर्न वाडा संस्कृती आहे ही! नाहीतर आजच्या काळात आपले संस्कार कसे होणार मुलांवर?’ संस्कार वगैरे मला नाही माहीत, पण मला खूप म्हणजे खूप मज्जा येते सात दिवस. 

पण यावेळी सगळा झोलच झाला! पहिल्या मिटिंगमधेच ए बिल्डिंग आणि डी बिल्डिंगच्या मेंबर्समध्ये सॉलिड भांडण झालं. ए बिल्डिंगमधल्या देवेशनी मागच्या आठवड्यात क्रिकेट खेळताना जोरात बॉल मारला. तो डायरेक्ट उडून मारुतीच्या देवळातल्या समईला लागला. ती पडली आणि शेजारचा पडदा जळला. Actually गुरुजी तिथंच होते, पण ते कुठलातरी व्हिडिओ बघत होते युट्युबवर. (मी नाही पाहिलं, देवेशचे बाबा म्हणाले). त्यावरून डी बिल्डिंगमधले Do die do आजोबा चिडले. (म्हणजे कर मर कर!) आणि म्हणाले, ‘यंदा ए बिल्डिंगला गणपतीच्या कुठल्याच निर्णयात घ्यायचं नाही.’ खरं तर हे wrong आहे ना? चुकून लागला बॉल! पण ए बिल्डिंगमधले लोक सॉरी म्हणाले नाहीत. ते म्हणाले, ‘डी  बिल्डिंगमधली मुलं जोरजोरात म्युझिक लावतात. त्यामुळं सगळे डिस्टर्ब होतात. ते कुठं सॉरी म्हणतात?’ आणि मग सगळे अशा २२० छोट्या छोट्या तक्रारी करायला लागले. गणपती सिरीयसली घेण्याऐवजी भांडणच सिरीयस झाली आणि फायनली ठरलं की दोन गणपती बसवायचे. ए आणि बी मध्ये एक आणि सी आणि डी मध्ये एक. पुन्हा कमिट्या फॉर्म झाल्या. पुन्हा वेगळं प्लॅनिंग सुरू झालं. पण या मिटींग्समध्ये आपण काय करायचं हे कुणी फार बोलायचंच नाही. ‘ते’ काय करतायेत, आणि ‘त्यांचं’ सगळं कसं फसणार आहे हेच सगळे बोलत बसायचे. सगळं बिघडलं होतं. दोन मांडव, दोन आरत्या, दोन प्रसाद! सेलिब्रेशनपेक्षा कॉम्पिटिशन चालू होती. आम्हाला कळतच नव्हतं काय करायचं ते. आमचं सगळं मिक्स्ड आहे ना! म्हणजे डी बिल्डिंगमधली पद्माताई एक नंबर डान्स बसवते. आमच्या बिल्डिंगमधली पूजाताई एक नंबर गाते. सी मधला प्रथमेशदादा नाटक बसवतो दरवर्षी. असे वेगळे वेगळे ग्रुप्स झाल्यावर कुणी काही बसवायलाच तयार नव्हतं. आमचा सगळं इंटरेस्टच गेला. 

पण आम्ही जाम म्हणजे जामच हुशार आहोत. आम्ही आपापल्या बिल्डिंगवाल्या नाटकात कामच केलं नाही, डान्समध्ये पण भाग घेतला नाही. ‘अज्जिबात म्हणजे अज्जिबात वेळच नाही’ असं सांगितलं आणि आम्ही कुणाला कळू न देता सगळ्या बिल्डींग्सचे कॉमन कार्यक्रम बसवले. एक डान्स, एक नाटक आणि एक गाणं. खुफिया कल्चरल प्रोग्रॅम. 

विसर्जन बोअरच झालं. कारण दोन आरत्या, दोन ढोल ताशा पथकं. दोन्हीकडं ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ कोण जोरात म्हणतंय? आरडाओरडाच जास्त चालू होता. देव असेलच तर तो इरिटेट झाला असेल. पण सगळे लोक पेटले होते. कारण यावेळी गणपती सेलिब्रेशन नव्हतं! गणपती वॉर होतं. 

विसर्जनांनंतर सगळे कार्यक्रम पाहायला मंडपात जमले. आपापल्या! पण कुठलाच कार्यक्रम छान झाला नाही. कसा होणार? ‘लहान मुलांचा कार्यक्रम नाही तर मजा नाही’ असं म्हणत सगळे महाप्रसादाला चालले होते. इतक्यात मधल्या lawn वर प्रथमेशदादा उभा राहिला. विदाउट माईक मोठ्या आवाजात त्यानी सगळ्यांना बोलावलं. ‘या गणपतीत तुम्हाला कोण मोठं आहे हे सिद्ध करायचं होतं, ते तुम्ही केलंत. पण आम्हाला मनापासून एंजॉय करायचं होतं. बाप्पासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून आम्हीही एक कार्यक्रम करणार आहोत. तुम्हाला पाहायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र यावं लागेल.’ सगळे एकदम शांत झाले. परेरा मिस मॅथ्सचा पेपर द्यायला येतात तेव्हा आम्ही होतो तसे आणि मग पुढचा अर्धा तास आम्ही जगातला सगळ्यात भारी कार्यक्रम केला. 

मोठी माणसंपण रडू शकतात हे त्या दिवशी प्रूव्ह झालं. Do die Do आजोबांनी सगळ्यांची माफी मागितली आणि मग अचानक माफीची कॉम्पिटिशनच सुरू झाली. मला हसूच यायला लागलं. पण महाप्रसादाला मज्जा आली. दोन्हीकडचे यम्मी पदार्थ खायला मिळाले. कारण सगळे एकत्र आले होते. 

खाऊन खाऊन पोट फुटेल असं वाटतं आहे. 

ओके बाय.. गुडनाईट...

संबंधित बातम्या