ट्रुथ, लाय, व्हाईट लाय... 

विभावरी देशपांडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

साराची डायरी
 

खोटं बोलायचं नाही असं सगळे आम्हाला सांगतात. डायरेक्ट गांधीजींपासून पार्सलपर्यंत सगळे! पण हे काही मी सांगायला नको की सगळे खोटं बोलतात. श्रावणात, नवरात्रात नॉनव्हेज खाल्लेलं, ड्रिंक्स घेतलेलं पार्सलला चालत नाही. तरीही पा पार्टीला गेला की दोन्ही करतो आणि पार्सलला सांगत नाही. (सांगायचं नाही म्हणजे खोटं बोलणं होतं का नाही हे मला माहीत नाहीये पण मला वाटतं सेमच आहे दोन्ही..) मी लहान असताना खूप चिडून विचारलं होतं पा ला, की तो अशी चीटिंग का करतो! तर मा नी एक्सप्लेन केलं होतं, की हे ‘व्हाईट लाय’ आहे. म्हणजे एखाद्या माणसाला वाईट वाटू नये म्हणून बोललेलं खोटं. म्हटलं ‘ओके! असं अलाऊड आहे!’ पण दुसऱ्याच दिवशी मी डबा परत आणला होता. मा नी भाजीत डबल मीठ घातलं होतं. सकाळी ती अर्धी झोपेत असते. त्यामुळं मी शुभंकरची भाजी खाल्ली. शुभंकरनी देवेशची. देवेश एनीवे रोज डब्बा खातच नाही. घरी येऊन मी हळूच पेपरमधे गुंडाळून भाजी टाकून दिली डस्टबिनमध्ये. रात्री मा आली आणि म्हणाली, ‘आजची भाजी कशी होती गं?’ मी म्हटलं, ‘एक नंबर!’ तर ती म्हणाली, ‘खोटं बोलतेस सरु? तू भाजी खाल्लीच नाहीस! मला कळणार नाही असं वाटलं तुला?’ मला खरंच कळलं नाही हिला कळलं कसं? रोज रात्री डस्टबिनपण चेक करते की काय? मी लहान होते, मला पटकन रडू यायचं. तसं आलं आणि मी सांगून टाकलं की मी व्हाईट लाय सांगितलं. तर मा म्हणाली, ‘हे असं नाही चालणार. मला सांगायचं की भाजी खारट झाली म्हणून मी नाही खाल्ली. अशी टाकून नाही द्यायची. अन्न आहे ते.’ मला कळलंच नाही. तिला वाईट नसतं का वाटलं तिनी मला खारट भाजी दिली म्हणून? पण मग मला कळलं की लहान मुलांना व्हाईट, ब्लॅक, पिंक, येलो कुठलंच लाय अलाऊड नाहीये. 

पण मागच्या महिन्यात आमच्या सोसायटीत एक खूप खूप वाईट गोष्ट घडली. बी बिल्डिंगमधल्या शर्वरीच्या आईला अचानक खूप ताप आला. दोन दिवस उतरला नाही म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. मा, पा ला सांगत होती की तिला डेंग्यू झाला. प्लेट्स कमी झाल्या बॉडीतल्या. (बॉडीत पण प्लेट्स असतात हे मला तेव्हाच कळलं..) खूप ट्राय केलं डॉक्टरांनी पण रात्री उशिरा तिची आई गेली. मी इमॅजिनपण नाही करू शकत शर्वरीला काय झालं असेल. ती खूप छोटी आहे. आत्ता कुठं फर्स्टमध्ये गेली आहे. मा, पा, पार्सल सगळे तिच्याकडं गेले. पण माझी हिंमतच नाही झाली जायची. शर्वरीचा विचार करूनच मला रडू यायला लागलं. पण दोन दिवस झाले आणि ती खाली खेळायला आली. आम्ही ठरवलं तिला जाऊन भेटायचं. तिला कन्सोल करायचं. पण ती मस्त हसत होती. खेळतपण होती. तिला काही वाईटच वाटत नव्हतं! आम्ही तिच्याशी जनरल काहीतरी बोलायला लागलो. तर बोलता बोलता ती म्हणाली, ‘मम्माला अमेरिकेला नेलंय मोट्ठ्या हॉस्पिटलमध्ये. बरी झाली की ती परत येणार आहे.’ आम्ही चाटच पडलो. काहीच बोलू शकलो नाही. ती उड्या मारत मारत निघून गेली. आमच्या लक्षात आलं की तिला अजून सांगितलंच नाहीये तिची आई गेली आहे हे. तिला वाटतंय ती बरी होणार आहे, परत येणार आहे. सगळ्यांनी तसंच सांगितलं आहे तिला. व्हाईट लाय. मला आता आणखीच वाईट वाटलं. कारण आता ती वाट पाहात बसणार आईची. कधीतरी म्हणेल मला मम्माशी फोनवर बोलायचं आहे. स्काईप करायचं आहे. मग काय करणार सगळे? तिला आणखी एक व्हाईट लाय सांगणार, की डॉक्टरनी सांगितलं आहे बोलायचं नाही फोनवर. मग ती कधीतरी म्हणेल, ‘मला घेऊन जा मम्माकडं.’ मग अजून एक व्हाईट लाय, की अमेरिका खूप लांब आहे, तिकीट मिळत नाही. मग हळूहळू तिला राग यायला लागेल तिच्या मम्माचा, की ती आपल्याला विसरून गेली. मग हळूहळू ती पण विसरून जाईल की आपली एक मम्मा होती. मला कसंतरीच व्हायला लागलं. एक खरं लपवायला केवढं खोटं बोलत होते सगळे. 

काल ती एक ग्रीटिंग कार्ड घेऊन आली होती खाली. तिच्या मम्माचा बर्थडे होता काल. म्हणाली, ‘पप्पा हे मम्माला देणार आहे.’ मला सहनच नाही झालं. मी बोलणार होते, ‘शर्वरी, खरं म्हणजे तुझी मम्मा..’ इतक्यात सखीनी मला ओढून नेलं. मला खूप झापलं. म्हणाली, ‘तू का सांगतेस तिला? तिचे पप्पा ठरवतील काय करायचं ते.’ बरोबर आहे सखीचं. तिच्या पप्पांना माहीत असणार तिच्यासाठी काय चांगलं काय वाईट ते. मला कळेनासं झालं आहे. ट्रुथ म्हणजे काय, लाय म्हणजे काय आणि व्हाईट लाय म्हणजे काय. शर्वरीला तेव्हाच सांगायला हवं होतं तिची मम्मा आता कधीच येणार नाहीये परत. तिला वाईट वाटलं असतं खूप. रडली असती, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, शंभर दिवस. पण हळूहळू विसरली असती. आता ती अशीच विसरून जाणार तिच्या मम्माला? 

मला नीट लिहिताच येत नाहीये. नीट दिसत नाहीये. रडू येतंय. मी झोपते. 
ओके बाय..  

संबंधित बातम्या