फटाके, पोल्युशन आणि अनू 

विभावरी देशपांडे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

साराची डायरी
 

सॉरी डायरी.. खूप दिवस मी तुला भेटलेच नाही. भयंकर हेक्टिक होतं सगळं लाइफ.. परीक्षेचं एवढं काही नाही. मी चिल असते. कारण तशीपण मला काही ए किंवा ए प्लस ग्रेड नसते. त्यामुळं ती टिकवायचा काहीच प्रश्न नाहीये. मी मज्जा करून दमून गेले होते. दिवाळी म्हणजे जाम हेक्टिक असते. आमचे इतके प्रोग्रॅम्स असतात ना की बास! दिवाळी सुरू व्हायच्या जस्ट आधी पार्सल आमच्याकडं येते. कारण तेव्हा लंडन आणि अमेरिकेत थंडी पडते. मला फार आवडतं ते, कारण पार्सलइतके भारी शंकरपाळे कुणीच करत नाहीत. म्हणजे शंकरपाळ्यावर ठरत असतं ना कुणी चीफ मिनिस्टर व्हायचं, तर पार्सल हंड्रेड पर्सेंट झाली असती. मला वाटतं तसंच ठरलं पाहिजे चीफ मिनिस्टरचं! शंकरपाळे कॉम्पिटिशन. आणि जज म्हणून अशी मुलं ज्यांना ज्यांना आज्ज्याच नाहीत. ऑर्फनेज मधली. म्हणजे पार्शलिटी नाही! इलेक्शनच्या आधी सुचायला पाहिजे होतं हे. पण मी तेव्हा बिझी होते. कारण हेक्टिक दिवाळी. तर माझी दिवाळी लई म्हणजे लईच भारी गेली. खा खा खाल्लं. पार्सल म्हणाली भस्म्या झालाय मला. इतकं की पोट बिघडून पहिल्याच दिवशी शाळा मिस झाली. पण ठीक आहे. थोड्या वर्षांनी माझं पण मेकूड आणि मा सारखं होणार. त्या नुसत्याच सगळ्याचा वास घेत होत्या आणि क्रिब करत होत्या. डाएट मोडतं म्हणून खाता येत नव्हतं. शिवाय नवीन कपडे, कल्चरल प्रोग्रॅम्स आणि सगळे नातेवाईक आणि फॅमिली फ्रेंड्स भेटले. मला खूप आवडतं. गिफ्ट्सपण मिळाले खूप. 

पण सगळ्यात भारी किस्सा झाला बी ४०७ मधल्या अनमोलचा आणि त्याच्या डॅडचा. अनमोल खूप क्यूट आहे. ६ वर्षांचा झालाय जस्ट. खूप हुशार आहे आणि बदमाश आहे. खूप प्रॅन्कस करतो. पण सारखा हॅपी असतो. मागच्या महिन्यात तो झोपाळ्यावरून पडला. त्याच्या कपाळावर ३ स्टिचेस पडले. आम्हाला वाटलं खूप रडेल. पण तो त्याच्या आजोबांचा गोल चष्मा घालून आला आणि कपाळावरचे स्टिचेस दाखवून म्हणाला मी हॅरी पॉटर आहे. किती भारी! कधीच रडत नाही. पण दिवाळीच्या दिवशी तो एकटाच बसला होता वडाच्या झाडामागं आणि रडत होता. आम्ही तायांनी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं की ‘काय झालं अनू?’ तर तो म्हणाला डॅडू परत आला स्वीडनहून. आम्हाला काहीच कळलं नाही यात रडण्यासारखं काय आहे. त्याचा बाबा स्वीडनला एका मोठ्या कंपनीत जॉब करतो. मोठा ऑफिसर आहे. ते सगळे खूप रिच आहेत. कारण त्यांचे दोन फ्लॅट्स आहेत. ३ कार्स आहेत. १ बाईक आहे आणि १ स्कूटर... आणि माणसं चार. त्यातलं अनू आणि आजोबा काहीच चालवत नाहीत. घरात सगळ्या रूम्समध्ये एसी! अगदी हॉलमध्ये सुद्धा. एक फुल भिंत भरून टीव्ही. मोठी सिस्टिम. त्यांच्या घरी करोडपती लागलं, की इतका मोठा आवाज येतो की वाटतं अमिताभ बच्चन खरंच आलाय. असं सगळं भारी आहे त्यांचं. तो अनूचे लाड पण करतो. अनूला तो आवडतो पण. कारण तो जेव्हा सुटी संपवून जातो तेव्हा अनूला खूप वाईट वाटतं. पण अनू रडत नाही कधीच. त्यामुळं आम्हाला कळलं नाही आत्ता हा का रडतो आहे. मग त्याच्या शेजारी राहणाऱ्या अस्मिताताईनी आम्हाला सांगितलं, की त्याला फटाके हवे होते पण त्याच्या डॅडूनी त्याला घेऊन दिले नाहीत. त्यानी खूप हट्ट केला पण तो म्हणाला की फटाक्यांनी पोल्युशन वाढतं. हवेतलंपण आणि साउंडचंपण. त्यांचा पॉईंट करेक्टच होता. आम्ही कुणीच दोन वर्षांपासून फटाके उडवत नाही. आम्हीच ठरवलं आहे तसं. पण अनू लहान आहे अजून. त्याला कळत नाही. त्याला समजायला लागेल तेव्हा तोच आपणहून ठरवेल. आम्ही अनूला समजवायचा प्रयत्न केला, की कसं फटाक्यांमुळं पोल्युशन होतं, धूर होतो, मोठा आवाज येतो. तो म्हणाला, ‘मला माहीत आहे सगळं, पण तरीपण हवेत मला फटाके!’ आणि पुन्हा रडायला लागला. आम्ही काहीच करू शकलो नाही. कारण त्याचा बाबा चूक नव्हता आणि अनूपण चूक नव्हता. कारण तो लहान आहे. 

पण आज संध्याकाळी मज्जाच झाली. आम्ही डबडा ऐसपैस खेळत होतो. इतक्यात ‘धाडधाड धाडधाड’ असा आवाज आला. रायफलसारखा. इतका जोरात की माझा साद घाबरून ओरडायला लागला. पिकू जस्ट चालायला लागली आहे. ती खालीच पडली. अमराळेआजोबा पण दचकले. आम्ही पाहिलं तर  गेटमधून ‘धूम’मधल्या जॉन इब्राहिमसारखी एक मोट्ठी बाईक घेऊन अनूचा बाबा आला. त्यानी स्टाईलमध्ये ती पार्क केली. हेल्मेट काढलं. वरून अनूची आई पूजेचं सामान घेऊन आली. सगळे गोळा झाले. त्याचा बाबा एकदम प्राऊडली म्हणाला, ‘बीएमडब्ल्यू १२०० सी सी फायनली. खूप वर्षं हवी होती मला..’ मी अनूकडं पाहिलं. तो हसला आणि म्हणाला, ‘मी चालवू?’ तर त्याचा बाबा म्हणाला, ‘मोठेपणी. आत्ता लहान आहेस.’ 

त्यांच्याकडं आधीच ३ कार्स आणि २ बाईक्स आहेत. तीन माणसांच्या. पण तरी त्यांनी बाईक घेतली. तिनी धूर होतो, आवाज वाढतो हे माहीत असून. पण अनूला फटाके नाही दिले. पोल्युशन होतं म्हणून. हाईट आहे. पण मोठेपणी चालतं बहुतेक सगळं. बिचारा अनू. 
ओके बाय.. गुडनाईट...

संबंधित बातम्या