मा, पा चे फ्रेंड्स
साराची डायरी
मार्मालेडला खूप बॉयफ्रेंड्स आहेत. म्हणजे फ्रेंड्स हू आर बॉईज. ती लहानपणापासूनच चिल आहे. म्हणजे तिचा एक फ्रेंड आहे, तो अमेरिकेत असतो. तो जेव्हा येतो तेव्हा ते दोघं डिनर डेटवर जातात. पा नाही जात. पण त्यात आम्हाला कुणाला काही ऑड वाटत नाही. पण एकदा माझ्या फ्रेंड्सना सांगितलं तर त्या उडल्याच. म्हणजे असं झालं, की त्या विचारात होत्या की आमच्या आयांची भिशी आहे तर तुझी आई येईल का. मी म्हटलं येईल पण नेक्स्ट टाइम, कारण आज ती करण अंकलबरोबर डेटवर जाणार आहे. तर शॉक लागल्यासारख्या त्या बघायला लागल्या माझ्याकडं.
‘तुझी मॉम डेटिंग करते? पण तिचं लग्न झालं आहे ना?’
‘तुझ्या बाबाला चालतं?’
‘आजी काहीच म्हणत नाही?’
‘मोठ्या बायका कधी डेटवर जातात का?’
असं खूप काय काय एकदम बोलल्या. मी म्हटलं, ‘त्यांची डिनर डेट ठरली आहे म्हणून डेटवर जाणार म्हटलं.’ पण सिया म्हणाली, ‘तुझ्या मॉम डॅडचं ओके आहे ना? अशी ती दुसऱ्या कुणाबरोबर डेटला जायला लागली तर डिव्होर्स होईल एक दिवस..’
मला टेंशनच आलं. मी म्हटलं, ‘ पण ते आवडतात एकमेकांना. म्हणजे भांडणं होतात त्यांची मधून मधून, पण मिटतात पण ती. कशाला होईल डिव्होर्स?’ मी असं म्हणाले पण जरा घाबरले. म्हटलं आपण १स्पाय’सारखं ऑब्झर्व्ह करावं काही दिवस. मी एकदम नीट लक्ष ठेवायला लागले. तर सगळं नॉर्मल होतं. नॉर्मल गप्पा, नॉर्मल चेष्टामस्करी, नॉर्मल भांडण. नथिंग डिफरंट. मी रिलॅक्स झाले. म्हटलं सिया उगाच फंडे देते आहे.
पण महिन्याभरापूर्वी वेगळंच नाटक सुरू झालं . एक दिवस पा सकाळी म्हणाला, ‘मी आज डिनरला जाणार आहे.’ मा म्हणाली ‘कुठं?’ तर तो जरा Conscious झाला आणि म्हणाला, ‘प्रिया आली आहे’ तर मा एकदम गप्प झाली आणि म्हणाली, ‘ओह!’
बास! मला कळलं सगळं. प्रिया म्हणजे बाबाची कॉलेजमधली मैत्रीण. तो मान्य करत नाही, पण आम्हाला माहीत आहे की ती त्याचा पहिला क्रश आहे. म्हणजे मा कधीकधी त्याला चिडवतेपण. पण यावेळी मा हसलीपण नाही. मला कळलं की काहीतरी गडबड आहे आणि आता पा प्रियाकडं जाणार आहे आणि मा आणि पा चा डिव्होर्स होणार आहे.
महिनाभर हे चाललं होतं. पा दर दोन-तीन दिवसांनी प्रियाला (मी अज्जिबात मावशी, आंटी म्हणणार नाहीये. आय हेट हर..) भेटायला जायला लागला. मा ला सरळ सांगायचा, ‘प्रियाकडं जायचं आहे’ आणि ती म्हणायची, ‘हं!’ मला खूप राग यायला लागला होता पा चा. बिच्चारी मा. मला लक्षात आलं, की काहीतरी केलं पाहिजे. पण मी काय करणार?
काल तो डिनरला जाणार होता तिच्याबरोबर. हाईट म्हणजे त्यानी साडी आणली होती तिच्यासाठी. बेडवर ठेवली होती. माझी खिट्टीच सरकली. मी दूध घेऊन आत गेले आणि मुद्दाम मग उलटा केला साडीवर आणि जोरात ओरडले. मा आणि पा धावत आले. साडीवर दूध सांडलेलं पाहून पा भडकलाच! मला खूप ओरडला आणि निघून गेला. असं काही झालं की तो कधीच ओरडत नाही मला. पण काल ओरडला. मला खूप राग आला आणि खूप रडू आलं. पण मा नी हाईटच केली! स्वतः साडीवरचा डाग काढायचा प्रयत्न करायला लागली. मी तिला म्हणाले, ‘मा, तो तुला डिव्होर्स देणार आहे आणि त्या प्रियाकडं जाणार आहे! आणि तू तिचीच साडी साफ करते आहेस..’ मा नी शॉक लागल्यासारखं माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाली, ‘काय बोलते आहेस तू? वेडी आहेस का? तुला काहीही माहीत नाहीये. तू लहान आहेस. तू मुद्दाम केलंस का हे? व्हेरी व्हेरी रॉंग!’ मला आणखी रडू आलं. मी हिच्यासाठी सगळं करते आहे आणि हीच असं करते!
संध्याकाळी पा माझ्या रूममध्ये आला. माझ्याजवळ बसून म्हणाला, ‘प्रियाआंटी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती आजारी आहे. बरी होईल की नाही माहीत नाही. I am just trying to make her happy. पण माझी बेस्ट फ्रेंड तुझी मा च आहे. म्हणून ती मला मदत करते आहे. आमचा कधीच डिव्होर्स होणार नाही आणि तसं काही असेल, तर आम्ही तुला खरं खरं सांगू.’ मला एकदम रडू आलं. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि ‘सॉरी’ म्हणाले. तो पण मला सॉरी म्हणाला.. म्हणाला, ‘तू पण माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मी तुझ्या मा ला सांगितलं तसं तुलापण सांगायला हवं होतं. I am sorry too!’
मी आज प्रियामावशीला भेटून आले. ‘गेट वेल सून’चं कार्डपण दिलं. मा म्हणतेय ती बरी होईल नक्की, मी विश करते आहे.
ओके बाय.. गुडनाइट...