चूक की बरोबर?! 

विभावरी देशपांडे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

साराची डायरी
 

आमच्या फ्लोअरवर एका बोक्यानी स्वतःला पाळून घेतलं आहे, मी असं नानीला सांगितलं तर तिला काही कळलंच नाही. पण तिला हसू आलं. मी असं भन्नाट मराठी बोलले, की तिला हसू येतं. ती खूप हसते आणि मग म्हणते, ‘छान आहे की शब्द! तू मराठी भाषेला एक भेट दिलीस!’ म्हणजे एकदा काय झालं, की मा पाव भाजी करणार होती. म्हणून मी माझी भूक खूप सेव्ह करत होते. दुपारी नानी आली खजूर घेऊन. नानांच्या एका मित्रानी अबूधाबीहून जायंट साइझ खजूर आणले होते. मला जाम आवडतात. पण मी म्हटलं, ‘ठेवून दे, आत्ता नको, माझी भूकमोड होईल.’ तर ती खूप हसली. मी म्हटलं, ‘त्यात काय? झोपमोड होते तशी भूकमोड नाही का होऊ शकत?’ तर ती म्हणाली, ‘होऊ शकते की! मस्त आहे हा शब्द!’ 

... तर मी काय सांगत होते? ‘एका बोक्यानी पाळून घेतलं आहे.’ म्हणजे कसं.. आपल्याला कुत्रा हवा असेल तर आपण तो पाळतो. म्हणजे मी ठरवलं की साद आजपासून माझा आहे. पण या बोक्यानी ठरवलं आहे की तो माझा आहे. म्हणजे तो आमच्या दारासमोर बसून राहायचा. सारखा ओरडायचा. जरा दार उघडं राहिलं, की आत घुसायचा. मग साद ओरडायला लागायचा. मला वाटायचं की साद चिडून त्याला हाकलतो आहे. पण नंतर मला समजलं, की त्याला त्या बोक्याची भीती वाटते आहे! मी खूप हाकललं त्या बोक्याला. पण ऐकेचना. एक दिवस त्याचं म्यांव म्यांव ऐकून मला जाम म्हणजे जाम वाईट वाटलं. मी एका प्लॅस्टिकच्या डब्यात त्याला दूध दिलं. मला वाटलं दूध पिऊन तो निघून जाईल. पण उलटंच झालं. तो जाईचना. रोज सकाळी आणि संध्याकाळी दारासमोर उभं राहून म्यांव म्यांव करायचा. मी कितीही ठरवलं तरी मला दयाच यायची. मग मी त्याला दूध द्यायचे. 

आमच्या समोरच्या काकांनी दारात एक जुनी खुर्ची ठेवली आहे. ‘ती कुणालातरी देऊन टाक’ असं ते त्यांच्या मुलाला रोज सांगतात. पण त्याला रोज सकाळी ऑफिसला उशीर झालेला असतो आणि रोज  संध्याकाळी तो खूप दमलेला असतो. त्यामुळं दोन महिने ती तशीच आहे. आमचे बोकेराव आता इतके लाडात आले आहेत, की त्यांना वाटतं ही खुर्ची त्यांच्यासाठीच आहे. ते आरामात त्याच्यावर चिल करत असतात. खरंच! राजासारखा झोपतो तो त्या खुर्चीत. परवा मिलिंदकाका आला, तर हा त्याच्या अंगावर जोरात ओरडला. ‘कोण आहेस तू?’ असं. मिलिंदकाका पटकन ‘सॉरी साहेब’ म्हणाला! तो खूप फनी आहे. म्हणे, ‘तुमच्या साहेबांना मी आवडलो नाही वाटतं!’ मा पटकन म्हणाली, ‘नाही नाही, आमचा नाहीये तो. एक साद आहे तेवढा पुरे!’ 

मागच्या आठवड्यात एकदम थंडी पडली. आम्ही डिनर करून घरी आलो तर हा बोका थरथर कापत होता. माझ्याकडं बघून त्यानी एक बिच्चारं ‘म्यांव’ केलं. मला खूपच वाईट वाटलं. मी मा च्या नकळत एक जुना टॉवेल आणून टाकला त्याच्या अंगावर. त्यात गुरगुटून तो झोपून गेला. मला हळूहळू आवडायला लागला तो. सादइतका नाही, पण मला असं वाटायला लागलं की माझ्याशिवाय याचं काही खरं नाही... आणि मला असं कुणाबद्दल वाटलं की मला खूप छान आणि इम्पॉर्टन्ट वाटलं. 

पण परवापासून बोकेराव एकदम दिसेनासे झाले. मी खूप शोधलं त्याला, पण नाही सापडला. मला खूप वाईट वाटलं. मेकूडनी सांगितलं की मा नी watchman काकांना त्याला लांब सोडून यायला सांगितलं होतं. मला खूप म्हणजे खूप राग आला. असं कसं केलं तिनी. मी तिच्याशी भांडायला गेले तर तिचा चेहरा हुप्प्यासारखा सुजला होता. तिला बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं. काहीच करता येत नव्हतं. मला लक्षात आलं, तिला मांजरींची allergy आहे. मेकूडनी सांगितलं की सकाळी मी गेल्यावर बोकेराव घरात घुसले. सगळ्यांनी पळापळ केली त्यांना पकडायला. पण बोकेराव दूध पिऊन पिऊन सोकेराव झाले होते. शेवटी watchman काकांनी त्याला पकडलं. पण तोवर मा ची हालत खराब झाली होती. मला कळेना तिनी केलं ते चूक का बरोबर! म्हणजे ती खूप प्रेमळ आहे. सादला तिनी घरी आणू दिलं, पण बोक्याला नाही येऊ दिलं. नानी म्हणाली, ‘काही गोष्टी अशा असतात की त्या चूक का बरोबर ठरवणं अवघड असतं. सगळं ब्लॅक ॲण्ड व्हाइट नसतं’.. असेल.. नानी म्हणतेय म्हणजे खरंच असणार ते. 

आत्ता मिलिंदकाका आला होता. म्हणाला ‘साहेब कुठे गेले?’ पा नी त्याला सगळा किस्सा सांगितला. तर तो म्हणाला, ‘वा! तुमच्या घरातही बिल पास झालेलं दिसतं आहे!’ यावर सगळे जोरात हसले. मला काही कळलं नाही. तो फनी आहे खूप. पण त्याचे काही जोक्स मला बाउन्सर जातात! 

ओके बाय 
गुड नाइट बोकेराव.. wherever you are!

संबंधित बातम्या