पाचगणी अनुभवावी कधीही... 

रविकांत बेलोशे, भिलार
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष
अलीकडच्या काळात पाचगणी बाराही महिने पर्यटकांना खुणावते. पावसाळ्यात बेफाम पावसात चिंब भिजायचे. हिवाळ्यात अंगाला झोंबणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीत गरमागरम चहा, मक्‍याची कणसे, चणे, जॅम-जेली यावर ताव मारायचा. उन्हाळ्यात निसर्गाच्या वाटा तुडवत निसर्गभ्रमंती, ट्रेकिंग करायचे आणि थंड वातावरण अनुभवायचे. थोडी हटके अशी पाचगणीची आनंदी सफर एकदा करून बघायलाच हवी. पण जर हे सगळे चवीने अनुभवायचे असेल, तर नक्कीच गर्दी टाळून जावे. सुटीच्या दिवसांत शांत-निवांत पाचगणी गोंगाटात हरवून जाते.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरच्या शेजारीच वसलेले अत्युत्तम थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. जवळपास महाबळेश्‍वर इतकेच उंच असलेले हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. महाबळेश्‍वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० किलोमीटर अंतरावर, तर पुण्यापासून फक्त १०२ किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्‍वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील निवासी शाळांमुळे जगभर नावाजलेले आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगर टेकड्यांच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेले असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. 
येथील आल्हाददायक हवेमुळे १८६० मध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणाला हवापालटासाठी प्राधान्य दिले. तेव्हापासून पाचगणी पर्यटनाच्या नकाशावर आले. टेबल लँड, पारसी पॉइंट, सिडने पॉइंट, केव्ह्ज या जुन्या पॉइंटबरोबरच आता स्वच्छ भारत पॉइंट नव्याने उदयास आला आहे. याच्या जोडीला पाचगणी परिसरात टेबल लँड केव्ह्ज, शेरबाग, ऑन व्हिल्ज, टेम्पटेशन, मॅप्रो गार्डन या ठिकाणांबरोबरच पाचगणीच्या भोवताली आता भिलार हे देशातील पाहिले पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने विकसित केले आहे. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याच्या खुणा सांगणारे तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव गोडवली टेबल लॅंडच्या कुशीत पहुडले आहे. पाचगणीच्या सभोवार असणारी पांडवकालीन, शिवकालीन ठिकाणेही पाचगणीला समृद्ध करतात. एकीकडे राजपुरीच्या पांडवकालीन कार्तिकस्वामी गुहा, गोडवलीतील तपनेश्‍वर मंदिर, दांडेघर येथील केदारेश्‍वर मंदिर, भुतेश्‍वर ही शिवकालीन मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात. 

पाचगणीचा मानबिंदू टेबल लॅंड 
टेबल लॅंड हे विस्तीर्ण पठार पाहिल्याशिवाय पाचगणीची सफर पूर्ण होत नाही. पावसाळ्यात हिरवी शाल पांघरलेले हे लॅंड मन प्रसन्न करते. या हिरव्या शालीत विविध रंगी, विविध आकाराची फुले अगदी फुलोत्सवाची उधळण करतात. या पठारावरील घोडे सवारी आणि टांग्यातील सैर निसर्गाच्या विविध रंगी छटांचे दर्शन देतात. येथील खोल दऱ्या आणि हिरवेगार डोंगर पाहण्यासारखे आहेत. येथील गुहा हेही येथील आकर्षण आहे. येथील सनसेट नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची सायंकाळी मोठी गर्दी असते. सिनेसृष्टीने या ठिकाणाची व निसर्गाची दखल घेतली आहे. बऱ्याच हिंदी, मराठी सिनेमांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. 

पारशी पॉइंट 
पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य रस्त्याला लागूनच तायघाट गावाजवळ पारशी पॉइंट आहे. कृष्णेचा उगम आणि धोम धरणाचे दिसणारे विहंगम दर्शन, निळेशार पाणी, डोंगरदऱ्यांचे दर्शन या पॉइंटवरून होते. पालिकेने येथे उभारलेला उंच टॉवर, झुलता पूल हे येथील आकर्षण आहे. दुर्बिणीतून दिसणारी वाईतील मांढरदेव, कमळगड पाहण्यासारखी आहेत. 

सिडने पॉइंट 
वाईहून येताना पाचगणीच्या प्रवेशद्वारावरच पालिका टोलनाक्‍याच्या उजव्या बाजूलाच टेकडीवर हा पॉइंट आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून या पॉइंटचे सुशोभीकरण केले आहे. थंडगार हवा हे या पॉइंटचे वैशिष्ट्य. या ठिकाणावरून धोम धरण अगदी जवळ असल्याचा भास होतो. 

स्वच्छ भारत पॉइंट 
पाचगणी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेऊन देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. याचेच फलित म्हणजे स्वच्छ भारत पॉइंट. पूर्वीच्या कचरा केंद्रावर आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. या ठिकाणी हिरवीगार बाग पालिकेने निर्माण केली आहे. या नव्या महत्त्वाकांक्षी पॉइंटला देश-विदेशातील अभ्यासक व पर्यटक आवर्जून भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेत आहेत. 

स्वच्छ व हरित पाचगणी पालिका 
गिरिस्थानावरील प्रशासन म्हटले, की पालिकेचा उल्लेख होतो. येथील निरभ्र निसर्गसुंदर वातावरणाप्रमाणेच पालिकाही सुंदर आहे. पर्यटकांना सेवा सुविधा देण्यात पालिकेचे नेहमी प्राधान्य असते, तर नवनवी पर्यटनस्थळे विकसित करून पर्यटकांना आकर्षित करण्यावर पालिकेच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा भर असतो. सध्या टेबल लॅंडला जाताना नागमोडी वळणाच्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जागेत छोटे छोटे कृत्रिम धबधबे, खेळणी, तसेच काचबावडी नाक्‍यावर संजीवन हायस्कूलसमोर एक छोटेखानी उद्यान आकाराला येत आहे. पाचगणीच्या रस्त्या-रस्त्यावर ओपन जिम साकारल्या आहेत. पर्यटक, मुले या जिमचा वापर करू लागले आहेत. पाचगणी नगरपरिषदेने २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणातील देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. २०१९ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा स्वच्छ सर्वेक्षणातील थ्री स्टार रेटिंगमध्ये देशपातळीवर १३ वे रॅंकिंग मिळाले. 
पाचगणी नगरपरिषदेने स्वच्छतेमधील आपले स्थान अबाधित राखत स्वच्छतेची चळवळ अधिक जोमाने सुरू ठेवत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतला आहे. महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांतील पालिका प्रतिनिधी पाचगणी या रोल मॉडेल ठरलेल्या पालिकेला आवर्जून भेट देताहेत, हेही आदर्शवत पर्यटनच आहे. 

निवासी शाळा हा पाचगणीचा जीव 
पाचगणी हे जसे थंड हवेमुळे प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने ते येथील ४० ते ५० निवासी शाळांनी जगभरात पोचले आहे. इंग्रजांच्या काळातील शाळा हे पाचगणीचे भूषण आहे. या शाळांमध्ये दरवर्षी देश-विदेशातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून पाचगणीची ओळख आहे. चित्रपटसृष्टीतील अनेकविध कलाकार तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज या पाचगणीतून शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करून आहेत. 

भिलार वॉटरफॉल 
पाचगणी - महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर पांगारी फाट्याजवळून कुडाळी नदीच्या उगमावर तयार झालेला फेसळणारा धबधबा पर्यटकांना मोहित करतो. जुलै माहिन्यात कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींना सदैव खुणावत असतो. महाबळेश्‍वरच्या मुख्य रस्त्यावरच हा धबधबा असल्याने पर्यटक वाहने आवर्जून थांबवून त्याचा आनंद घेतात. 

पुस्तकांचे गाव... 
महाबळेश्‍वरला जातानाच्या रस्त्यावर भोसे खिंड येथून डावीकडे भिलार हे स्ट्रॉबेरीचे गाव आहे. पाचगणीला येणारे पर्यटक स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी भिलारला पोचतात; परंतु आता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नव्या ढंगात प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, साहित्य सांस्कृतिक कार्यालय मंत्रालय आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलार आता सजले आहे. पाचगणीत आल्यावर पुस्तकांचे गाव न पाहणे म्हणजे एक प्रकारची रुखरुखच म्हणावी लागेल. पर्यटक आवर्जून या गावाला भेट देताहेत. तसेच साहित्यिक या गावाला भेट देण्यास येत असल्याने तेही पाचगणीची सफर करू लागले आहेत. 

पांडवकालीन मंदिरे 
पाचगणी या गिरिस्थानाच्या सभोवार विखुरलेली पांडवकालीन, शिवकालीन स्थळे पर्यटकांना खुणावतात. राजपुरीच्या पांडवकालीन गुहा या परिसराचा इतिहास सांगतात. कार्तिकस्वामीच्या गुहा म्हणून या प्रसिद्ध आहेत. तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थान गोडवलीतील पुरातन असे तपनेश्‍वर मंदिर, दांडेघर येथील केदारेश्‍वराचे प्रसिद्ध मंदिर, भुतेश्‍वर ही मंदिरेही पर्यटकांना आकर्षित करताहेत. 

विविध निसर्ग छटा आणि बाराही महिने पर्यटन 
अलीकडच्या काळात बाराही महिने पाचगणी पर्यटकांना खुणावत आहे. पावसाळ्यात येथे कोसळणारा बेफाम पाऊस अनुभवताना पावसात आणि फेसाळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्तपणे चिंब भिजायचे. हिवाळ्यात अंगाला झोंबणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीत गरमागरम चहा, मक्‍याची कणसे, चणे, जामजेली यावर पर्यटकांच्या उड्या पडतात. हिवाळा आणि पावसाळ्याच्या मध्यावर पडणारे दाट धुके अनुभवण्यास खास पर्यटक दाखल होतात. पावसाळ्यात विविध छटांची रंगीबेरंगी फुले, औषधी वनस्पती हेही आकर्षण आहे. उन्हाळ्यात निसर्गाच्या वाटा तुडवत निसर्गभ्रमंती, ट्रेकिंग आणि थंड वातावरण आकर्षित करते. उन्हाळ्यात जॅमजेली, लालेलाल स्ट्रॉबेरीची चव पर्यटकांना भावते. थोडी हटके अशी पाचगणीची आनंदी सफर एकदा करून बघायलाच हवी. पण जर हे सगळे चवीने अनुभवायचे असेल, तर नक्कीच गर्दी टाळून जावे. सुटीच्या दिवसांत शांत-निवांत पाचगणी गोंगाटात हरवून जाते. असे हे पाचगणीचे पर्यटन सर्वांनाच खुणावते. चला मग पाचगणी या गिरिस्थानाला भेट देऊयात.

संबंधित बातम्या