धार्मिक पर्यटनाचा सातारा

संजय साळुंखे, सातारा
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष
सातारा जिल्हा हा शूरांचा जिल्हा, छत्रपतींच्या गादीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; तसाच तो समर्थांची भूमी म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळेच तलवारीच्या चमकणाऱ्या पात्याप्रमाणेच येथे टाळ-मृदंगाचा, रामनामाचा जपही दुमदुमत असतो. जिल्ह्याने पराक्रम आणि अध्यात्म तेवढ्याच ताकदीने जपल्याने आजही देशातील पर्यटक अन्‌ भाविकांचा जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळांकडे ओढा वाढलेला दिसतो. 

सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांनी वेढलेल्या सातारा जिल्ह्याला अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक असे विविधांगी अधिष्ठान लाभले आहे. समर्थांच्या अध्यात्मिक उपासनेने पावन झालेला सज्जनगड, नामसाधनेची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणारे गोंदवले, शिवरायांच्या पराक्रमाच्या खुणा अलंकाराप्रमाणे मस्तकी धारण करून इतिहासात अमर झालेला प्रतापगड, शिवप्रभूंचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर, महागणेशाचे वास्तव्य असलेली व कृष्णाकाठावर वसलेली वाई, समर्थांची कर्मभूमी चाफळ, यमाई देवीच्या जागृत पीठाचे सान्निध्य लाभलेले औंध, सिद्धनाथांची सिद्धभूमी म्हसवड, सेवागिरी महाराजांच्या तेजःतपाने उजळून निघालेले पुसेगाव, साताऱ्यातील चार गोपुरे असलेले व आनंद नटेश्‍वराचे सान्निध्य असलेले श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर अशा अनेक धर्मपीठांचे कृपाछत्र सातारा जिल्ह्याला लाभले आहे. 

या धार्मिक स्थळांपैकी अनेक स्थळे ही वार्षिक यात्रांसाठी प्रसिद्ध आहेत. या यात्रांना दरवर्षी राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक हजेरी लावतात. म्हसवडच्या सिद्धनाथाच्या रथावर उधळला जाणारा गुलाल, सेवागिरी महाराजांच्या रथावर अर्पण केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या माळा, पालच्या खंडोबावर पडणारा भंडारा, कडक बंदोबस्तात होणारी मांढरदेवीची यात्रा, औंधच्या यमाईदेवीच्या यात्रेतील जातिवंत जनावरांचा बाजार, अन्नदानासह नामस्मरणासाठी प्रसिद्ध असलेला गोंदवले बुद्रूकच्या ब्रह्मचैतन्य महाराजांचा उत्सव, दासनवमी व रामनवमीत हजारो भाविक गड चढून येऊन साजरी होणारी सज्जनगडावरील यात्रा, मकर संक्रांतीला वाणवसा घेण्यासाठी हजारो महिलांना एकत्र करणारी चाफळची यात्रा व मुंगी घाटातून कावडी वर जातानाचा अविस्मरणीय क्षण दाखविणारी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा इत्यादी वैशिष्ट्य असलेल्या यात्रा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. या यात्रांतून समाजमनाचे अंतरंग प्रकाशमान करण्याचे अलौकिक कार्य झालेले दिसते. 

चाफळ ही समर्थांची कर्मभूमी, तर सज्जनगड ही विश्रांतीभूमी. याचबरोबर समर्थांनी स्थापलेल्या ११ मारुतींपैकी सात मारुती सातारा जिल्ह्यात आहेत. सात्त्विक आनंदाची व आत्मिक समाधानाची अनुभूती देणारे गोंदवले हा साताऱ्याचा मानबिंदू. नामसाधनेतून जीवनमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वास्तवाने ही नगरी पावन झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या संत परंपरेत धावडशीचे ब्रह्मेंद्रस्वामी व त्रिपुटीचे गोपालनाथ महाराज यांनीही सपूंर्ण जीवनात समाजाचे केवळ हितच पाहिले. धावडशीच्या मंदिराचे बांधकाम आणि तळे, संगम माहुलीतील मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा नमुनाच आहे. महाबळेश्‍वरला येणारा प्रत्येक पर्यटक हा क्षेत्र महाबळेश्‍वरात जाऊन महाबळेश्‍वराचे (शंभू महादेवाचे) दर्शन घेऊनच जातो. या ठिकाणी झालेला पाच नद्यांचा उगम पाहण्यासारखाच आहे. 

श्री ज्ञानेश्‍वर माउलींचा पादुका सोहळा दरवर्षी पाच दिवस जिल्ह्यात विसावतो. वाई व कऱ्हाड येथील दरवर्षी होणारा कृष्णामाई उत्सव, औंधमधील नवरात्रोत्सव, फलटणच्या पुरातन राममंदिरात होणारी रामनवमी इत्यादी उत्सव पाहण्यासारखे असतात. साताऱ्यातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरही पाहण्यासारखे आहे. सज्जनगड, जरंडेश्‍वर, पाटेश्‍वर व प्रतापगड चालत चढून जाण्याची मजा काही औरच आहे. श्री क्षेत्र मोर्वे (ता. खंडाळा) व श्री क्षेत्र धारेश्‍वर (ता. पाटण) इत्यादी धार्मिक क्षेत्रेही पाहण्यासारखी आहेत. 

जरंडेश्‍वरचा मारुती, पाटेश्‍वरच्या शेकडो पिंडी, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, साताऱ्याजवळील यवतेश्‍वर-कुरणेश्‍वर-कृष्णेश्‍वर मंदिर, अजिंक्‍यताऱ्यावरील मंगळाई, सिद्धेश्‍वर कुरोली (ता. खटाव) येथील श्री. शंकर, लिंब गोवे येथील कोटेश्‍वर, क्षेत्र माहुली आणि वाईचे काशी विश्‍वेश्‍वर, घाटवण येथील घाटाई, औंधची यमाई, कार्वे (कऱ्हाड) येथील ढाणाई, चाफळ-उंब्रज-मसूर परिसरातील समर्थस्थापित मारुती अशा विविध श्रद्धास्थानांना श्रावणात भाविक आवर्जून भेट देतात. 

वैशिष्ट्यपूर्ण औंध संग्रहालय 
औंध येथील यमाईदेवीच्या दर्शनाला जाताना तेथील जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालयही पाहण्यासारखे आहे. चित्रकला, शिल्पकलेबरोबरच चंदन व हस्तिदंतातील कोरीव काम हे या वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य. हेन्री मूरचे आई व मुलाचे जगप्रसिद्ध शिल्प याच ठिकाणी आहे. सज्जनगडला जाताना ठोसेघरचा धबधबा व चाळकेवाडीच्या पठारावरील पवनऊर्जा प्रकल्प, तसेच उरमोडी धरण प्रकल्प पाहता येतात. पुसेगाव, गोंदवले, म्हसवड, शिखर शिंगणापूर येथील देवस्थानांचे दर्शन एकाच दिवसात होऊ शकते. मांढरदेवीला जाताना वाईच्या महागणपतीचे दर्शन घेता येईल. पाचगणी, महाबळेश्‍वरला वाईहून जाता येते. महाबळेश्‍वरला आल्यानंतर प्रतापगडची एक दिवसाची छान सहल होते. पाल, चाफळ व कऱ्हाडची धार्मिक पर्यटने एकाच दिवसात होऊ शकतात. कऱ्हाडमध्ये धार्मिक पर्यटनस्थळे पाहताना यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ प्रीतिसंगम पाहण्यासारखे आहे. कऱ्हाडमधील ऐतिहासिक मनोरेही लक्षवेधी आहेत. साताऱ्यातील अजिंक्‍यतारा किल्ला, श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर, संगम माहुलीतील मंदिरे व परिसर एका दिवसात पाहता येतील. जरंडेश्‍वर गड चढतानाचा आनंद काही वेगळाच असतो.  

रस्ता चांगला... राहण्याची व जेवणाची सोय 
या सर्व धार्मिक पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी एसटी तसेच खासगी वाहतुकीची व्यवस्था आहे. सज्जनगड, गोंदवले, पुसेगाव येथे देवस्थानची राहण्याची चांगली सोय आहे. इतर धार्मिक ठिकाणी देवस्थानची राहण्याची सोय नसली, तरी खासगी ठिकाणी सोय होऊ शकते. बहुतांश धार्मिक स्थळांनजीक एखादे मोठे शहर किंवा गाव आहे. तेथे राहण्याची व जेवणाची सोय होईल. काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी जाण्यासाठी पक्के डांबरी रस्ते आहेत. सज्जनगड, प्रतापगड, जरंडेश्‍वर, पाटेश्‍वर इत्यादी ठिकाणी मात्र काही अंतर चालत जावे लागते. ही सर्व स्थळे सातारा शहरापासून १०० ते १५० किलोमीटर अंतरावर आहेत, त्यामुळे साताऱ्यातून तेथे एक दिवसात जाऊन धार्मिक स्थळे पाहून येणे शक्‍य आहे. श्रावण महिन्यात एसटीतर्फे ११ मारुती दर्शन सेवा सुरू असते.

साताऱ्यापासून धार्मिक स्थळांचे अंतर   (किलोमीटरमध्ये)
म्हसवड                  १०५
पुसेगाव                  ३६ 
शिखर शिंगणापूर     ६०     
औंध                      ३८
गोंदवले                  ६१     
सज्जनगड             १८ 
चाफळ                   ४५     
प्रतापगड                ७१ 
पाल                      ३१     
मांढरदेव                ५८ 
वाई                      ३२

संबंधित बातम्या