कुंपणाआतली गोतावळ...

अमृता देसर्डा 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

शब्दांची सावली 
प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या परीनं या गोतावळ्यात सहभागी होतो. आणि हा प्रवास विलक्षण अनुभव देणारा आहे असं वाटत राहतं. कधी तो सुखाचा आभास होतो किंवा दुःखाचं कारणही ठरतो. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा.

अनेक जणांना घरांच्या बाल्कनीत किंवा मोकळी जागा असेल तर बाग करून रोपं लावायला आवडतात. त्यात अनेक शोभेची, नाहीतर घरगुती उपयोगाची झाडं लावलेली असतात, कढीपत्ता तर हमखास दिसतो. कधी कधी धने पण टाकलेले असतात. कोरफड, तुळशी तर असतेच असते. कितीतरी सुंदर आणि ओळखू न येणारी झाडं त्या घरात नांदत असतात. घराची शोभा वाढवत असतात. असंच एकदा एका ओळखीच्यांच्या घरी मी गेले होते, तेव्हा त्यांच्या बागेत एक मोठं कढीपत्त्याचं झाड होतं, चांगलं टुमदार होतं ते. त्याला खूप फुलंही आली होती आणि त्याच्याच सावलीखाली आजूबाजूला असंख्य कढीपत्त्याची छोटी छोटी रोपं आली होती. जवळजवळ त्या झाडाच्या आजूबाजूला पन्नास एक रोपांनी त्यांचा पसारा वाढवला होता. मला तर ती रोपं पाहून वाटलं, की ते झाड म्हणजे त्या रोपांची आईच! त्या झाडानं तिच्या आजूबाजूला आपल्या पिल्लांचा गुंतवळा निर्माण केला होता. तुळशीचं पण तसंच. तिच्या आजूबाजूलासुद्धा असंख्य तुळशी डोलत होत्या. 

ते पाहून माझ्या मनात विचार आला, आपणपण त्या झाडांसारखेच असतो ना, आपल्यालासुद्धा आपल्या माणसांचा पसारा वाढवायचा असतो. आपल्याभोवती मायेच्या माणसांचा गुंतवळा तयार करायचा असतो. माणूस आणि झाड दोन्हीही जिवंत. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्षमतेनं जगायचं असतं. फक्त माणसाला त्याची एक पद्धत अवगत झाली आहे, त्याला स्वतःची बोलीभाषा आहे. झाडांना बोलीभाषा नसली तरी जगण्याची पद्धत आहेच. फरक फक्त एवढाच, की झाडांना मेंदू नाही. बाकी तगून राहण्याचा संघर्ष झाडाला आणि माणसाला करायचा असतोच. 

मला नेहमी प्रश्न पडतो, की आपण असा हा नात्यांचा गुंता तयार का करतो? जन्मतःच माणूस ज्यांच्या पोटी जन्माला येतो तिथून त्याच्या नात्यांचा प्रवास सुरू होतो. मग असंख्य माणसं त्याच्या आयुष्यात येतात आणि एक एक माणूस जोडत जाऊन मरेपर्यंत माणूस कुठल्या तरी गोतावळ्यात राहतो. तो असं का राहतो? त्याला असं राहायला का आवडतं? नेमकं कशासाठी त्याला एवढ्या ओळखी, बंध वाढवायचे किंवा घडवायचे असतात? अर्थात या प्रवासात तो जगण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी सतत जोडला जातोच किंवा संपर्कात राहतोच असं नाही. 

काहींशी विसंवाद होतो किंवा गैरसमज होऊन नाती गोठून जातात. पण काही काळ गेल्यानंतर तीच माणसं एकमेकांच्या संपर्कात येतात आणि अगदी जिवलग बनून जातात. एकमेकांशिवाय त्यांना मग करमत नाही. एकमेकांच्या अखंड प्रेमात पडतात. मला तर खूप आश्‍चर्य वाटतं, माणूस म्हणून आपण किती बदलत असतो. आपल्या वागण्यात किंवा स्वभावात किती फरक पडतो. वय, आजूबाजूची परिस्थिती किंवा एकूणच आपलं जगणं हे सतत बदलत राहतं. म्हणजे दहा वर्षांपूर्वीची मी आणि आत्ताची मी यात किती बदल झाला आहे याचा जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला जाणवत राहतो माझ्यातला मानसिक बदल. शारीरिक बदल तर नैसर्गिक आहेच. पण मुळात विचार करण्याची पद्धत, एखादी गोष्ट समजून घेण्याची माझी दहा वर्षांपूर्वीची जी सवय होती ती आता बदलली आहे. 

अर्थात असा बदल प्रत्येकाचाच थोड्याफार प्रमाणात होतो किंवा अजिबात होतही नसेल. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांमुळे किंवा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपल्यात थोडेफार बदल होतात, ते काहींना प्रकर्षानं जाणवतात किंवा अजिबातच जाणवत नाहीत. पण आपल्या आजूबाजूच्या माणसांमुळे नकळत आपल्यात सूक्ष्म बदल होत असतात हे नक्की. 

त्या बागेतली कढीपत्त्याची इवलुशी रोपं किती जगतील किंवा तिथेच किती मोठी होतील माहीत नाही.त्यांच्यात काही नातं असेल का तर ते मला माहीत नाही, त्या झाडाला आपण इतकी रोपं बनवली आहेत हे कळत असेल का? ते झाड त्या रोपांत गुंतत असेल का? एखादं रोप जर उन्हानं जळून गेलं तर त्या मोठ्या झाडाला वाईट वाटत असेल का? त्याला कळत असेल का ते रोपसुद्धा त्याच्यासारखंच उद्या मोठं होईल? त्या झाडानं त्याच्या आजूबाजूला केलेला हा त्याच्याच रोपांचा गुंतवळा मला माणसानं निर्माण केलेल्या नात्यांसारखा वाटतो. फक्त ते झाड त्या रोपांना त्यांना हवं तसं वाढू देतं. स्वतःचं अस्तित्व त्या रोपांवर लादत नाही किंवा त्या रोपांना जपतही नाही. 

माणूस आपल्या भवताली असलेल्या किंवा आपलं मानलेल्या माणसाला जपायचा प्रयत्न करत राहतो. कधीकधी जपतही नाही. त्या झाडाला त्याचा वंश वाढवायचा आहे असं जर मी म्हटलं तर कदाचित ते ऐकायला विसंगत वाटेल, पण हेच जर माणसांच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला विसंगत वाटणार नाही. कारण प्रत्येकाच्या आत एक ऊर्मी असते, जी त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्यातून तो निर्मिती करण्याची धडपड करत राहतो. दुसऱ्या माणसानं माझ्यासारखं व्हावं असं प्रत्येक माणसाला थोड्याफार प्रमाणात वाटत राहतं. मग आईवडिलांना वाटतं, की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखं व्हावं किंवा शिक्षकांना वाटतं की त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखं व्हावं. मोठ्या भावंडांना वाटतं धाकट्या भावंडांनी आपल्यासारखं व्हावं. याच्या उलट मुलांना, विद्यार्थ्यांना आणि लहान भावंडांना पण वाटू शकतं. 

माणूस या प्रवासात एक एक पाऊल पुढं जात राहतो. एकमेकांचा उपयोग करून, मदत करून, किंवा मदत घेऊन पुढं सरकत राहतो. आणि नात्यांमधून स्वतःसाठी आधार शोधत राहतो. काही नाती त्याला आधार देतात. जगण्याला बळ देतात आणि त्या आशेवर माणूस नवीन माणसांना जोडून घेतो 

किंवा नव्यानेच जुन्या माणसांना जवळ करत राहतो आणि स्वतःचं माणसाचं बेट तयार करतो. 

मला वाटतं की माणूस स्वतःचं आयुष्य त्या गुंतावळीत गुंफत राहतो. स्वतःच्या विचारांची माणसं जोडून साखळी तयार करतो, आणि स्वतःचं आणि त्याच्यासारख्या इतर माणसाचं जगणं सुसह्य व्हावं म्हणूनही ती साखळी सतत वाढवायचा प्रयत्न करत असतो.  

मला वाटतं की आपण बऱ्याचदा तात्कालिक जगत असतो. परिस्थिती आणि गरजेनुसार आपण आपल्या ओळखीचा परीघ कमी जास्त करत असतो. आपल्या आजूबाजूला कुठल्या माणसाला ठेवायचं किंवा कुठल्या माणसाशी अंतर राखून बोलायचं याचं गणित करत असतो. कधी त्यात फसवणूक होते, तर कधी आपल्या बाजूची माणसं कोणती किंवा आपल्या विरुद्ध बाजूची कोणती हे कळतही नाही. अर्थात कुठला माणूस कधी कसा वागेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. 

एका झाडावरून मी कुठल्याकुठं विचार करायला लागले. उगाच झाडांची आणि आपली तुलना करू लागले आणि माझ्या मनातल्या विचारांचा गुंता वाढवायला लागले. असो. पण तरीही माणूस गुंतावळ का करतो याचं उत्तर जेव्हा मी शोधत राहते तेव्हा मला असं जाणवत राहतं, की माणूस स्वतःचं एकटेपण घालवण्यासाठी हा पसारा तयार करतो. मग त्यात रक्ताची नाती असोत, दूरची किंवा जिवाभावाची. त्यात मग मैत्री, ओळख, व्यावसायिक नाती, आजच्या भाषेत सोशल नेटवर्किंगमधली आभासी नाती, अशी असंख्य नात्यांची पिलावळ तयार करत राहतो आणि स्वतःची एक प्रतिमा तयार करत जगतो. 

मग स्वतः बनवलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडून, इतरांनाही त्या प्रतिमेच्या प्रेमात पाडतो, दुसऱ्यांवर प्रभाव टाकत स्वतःच्या बाजूचं करतो. आणि मग स्वतः केंद्रस्थानी राहून आजूबाजूला माणसांची असंख्य रोपं तयार करतो. त्याच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून खूप काळजी घेतो, कारण प्रत्येक माणसाला वाटत राहतं की दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल चांगलीच भावना हवी. आपली प्रतिमा कधीही कुठंही डागाळता कामा नये. त्यासाठी माणूस झटत राहतो. गोतावळ्यात राहून जगणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस. आणि त्यातही वेगवेगळी नाती तयार करून जगत राहण्याची सामूहिक प्रेरणा निर्माण करणाराही फक्त माणूसच. याला कदाचित खूप मोठ्या पातळीवर नेलं तर त्याला समाज असं म्हणता येईल. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात विचार न करता, माणसाच्या आजूबाजूच्या गोतावळ्याचा जर आपण विचार केला तर मग समाज ही संकल्पना स्पष्ट होईल असं वाटतं. कारण तिथूनच एक मोठं वर्तुळ तयार होतं. आणि त्या वर्तुळात अगणित मानवी साखळ्या निर्माण होतात. 

किती भारी आहे ना हे सारं, मला तर हबकून जायलाच होतं. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या परीनं या गोतावळ्यात सहभागी होतो. आणि हा प्रवास विलक्षण अनुभव देणारा आहे असं वाटत राहतं. कधी तो सुखाचा आभास होतो किंवा दुःखाचं कारणही ठरतो. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा. फक्त आपण आपल्या विचारांचं कुंपण त्या गोतावळ्याला घालतो आणि आपल्या चौकटीत न बसणाऱ्या माणसांना कुंपणाबाहेर उभं करतो. आत असलेल्या किंवा आपल्या कक्षेत येणाऱ्या माणसांना जागा करून देत नवीन माणसांना सामील करून घेण्यासाठी कुंपणाची एक फट सदैव मोकळी सोडून देत कढीपत्त्याच्या झाडासारखं केंद्रस्थानी राहून स्वतःच्या जगण्याचा पसारा नकळत वाढवत जातो...

संबंधित बातम्या