गोंधळात पडलेली भूमिका...

अमृता देसर्डा
शुक्रवार, 9 मार्च 2018

शब्दांची सावली
 प्रत्येक गोष्टीला असंख्य पैलू असतात, मी एका बाजूने विचार केला तर, कदाचित तुम्ही वेगळ्या बाजूने त्यावर विचार कराल. हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. आणि तो विचार करणाऱ्याच्या पद्धतीवर बहुतेक अवलंबून राहील. प्रत्येक माणूस काहीएक भूमिका घेऊन जगत असतो, काहींना त्यांची भूमिका कळत नाही, किंवा कळते पण सांगता येत नाही, पण तरीही त्याच्या त्याच्या परीने माणूस स्वतःच्या भूमिकेच्या चौकटीत जगत असतो.

मागच्या आठवड्यात रात्री साडे-आठ नऊ च्या दरम्यान जेवत असताना, कुठल्यातरी प्रसिद्ध आणि नामवंत बातम्यांच्या चॅनेलवर एक व्हिडिओ वारंवार दाखवत होते. त्यात एक वडील आपल्या पोटच्या मुलाला बेदम मारत होते, जोरात उचलून  फेकत होते.  धुणं आपटावं तसं आपटत होते आणि त्याचं शूटिंग चक्क त्या मुलाची आई करत होती. तो व्हिडिओ खूपच भयंकर होता. त्यात त्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा चेहरा दिसत नव्हता. पण ते वडील त्याला उचलून उचलून मारत होते, त्याला जमिनीवर फेकत होते. तो लहान जीव विव्हळत होता. ते पाहून माझा घासच अडकला. आणि क्षणभर जेवावस वाटलं नाही.

आम्ही पटकन टीव्ही बंद केला. मला ते पाहवतच नव्हतं. काय करावं सुचेना. डोळ्यात पाणी पण साठलं आमच्या. माझ्याबरोबर माझी मैत्रीण आणि बाई होत्या. त्यांना पण खूपच कसंतरी झालं. टीव्ही बंद केला तरी ते दृश्‍य माझ्या मनातून जात नव्हतं. आता या घटनेला पंधरा एक दिवस झाले. पण आता मी लिहायला बसले तरी ते दृश्‍य माझ्या मनापुढे येतं आहे, आणि मला अस्वस्थ करतं आहे. 

मला कळत नाही, अशा घटना माध्यमांमध्ये का दाखवल्या जातात, त्या सोशल मिडीयावर का व्हायरल होतात, असे मारामारीचे प्रसंग दाखवून त्यांना काय मिळतं? बहुधा त्यांचे चॅनल चर्चेत यावे, त्यांचा टीआरपी वाढावा म्हणून असेल कदाचित. पण त्या काही क्षणांच्या व्हिडीओनं मनात प्रश्न निर्माण झाले. तो माणूस त्या मुलाला ज्या पद्धतीने मारत होता, ती क्रूरता, तो पाशवीपणा इतका भयानक होता आणि इतक्‍या सहजपणे तो माध्यमांवर दाखवत होते त्यावरून आपण किती कोरडे आणि व्यावहारिक झाले आहोत. हे कुठेतरी उगाच बोचत होतं. तो प्रसंग एका घरातला. त्या घरातली आई स्वतःच्या मुलाला वाचवायचं सोडून चक्क शूटिंग करतेय, आणि ते माध्यमांना पाठवतेय. मुळात इतकं क्रूरपणे त्या मुलाला त्याच्या वडिलांनी का मारले? आणि त्याच्या आईने त्याला का नाही वाचवलं? आणि त्या क्षणी तिच्या डोक्‍यात का आलं ते शूट करण्याचं? आपली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था इतकी हलकी झाली आहे का? आणि अशा परिस्थितीत आपण इतके कोडगे कसं होतो? 

उगाच मी काहीबाही विचार करत बसले आणि अस्वस्थ होत राहिले. पुढे मी हा प्रसंग विसरूनही जाईल, त्याहीपेक्षा भयानक असं काहीतरी पाहायला मिळेल. कदाचित माध्यमांमध्ये त्यावर चर्चा- चरवित चर्वण देखील होईल. पण त्यातून काय साधले जाईल? त्या मुलाला जे त्याच्या वडिलांनी कुठल्यातरी कारणावरून मारले असेल ते भरून निघेल? त्या मुलाची मनःस्थिती सुधारेल? आत्ता त्या कुटुंबात काय वातावरण असेल? त्या मुलाचे वडील त्यांचा असा खाजगी प्रसंग जगासमोर आल्यामुळे खजील होईल? त्यांना आपली चूक समजल? किंवा ते पाहून त्यांना राग येईल? ते त्यांच्या बायकोला आणि मुलाला घरातून हाकलून देतील? बापरे, माझ्या मनात येणारे प्रश्न वाढतच होते. पण हेही तितकंच खरं, की मी काहीच करू शकत नव्हते. हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आणि दोन अश्रू गाळण्याव्यतिरिक्त माझ्याकडं करावं असे काही नव्हतं. किमान त्या क्षणी तरी. आणि आत्ताही मनातले विचार लिहून किमान माझ्यातली जी शून्यत्त्वाची भावना आहे तिचा तरी मी निचरा करू शकेल असे मला उगाच वाटत होतं. 

यात ज्यांनी हा प्रसंग दाखवला, त्या चॅनलवाल्यांनी त्या आईला कशा प्रकारे मदत केली असेल. किंवा त्यांचा फायदा व्हावा, त्यांचा चॅनल जास्तीतजास्त लोकांनी पहावा म्हणून त्यांनी हा फंडा वापरला असेल? पण इतके असंवेदनशील आपण का झालो ? फक्त आपला फायदा कशात आहे अशा गोष्टी दाखवून किंवा त्याचं गोष्टी फोकस करून आपण आपल्यातली चांगली गोष्ट संपवत चाललो आहोत का? मुळात असे प्रसंग दाखवणे हे समाजहिताच्या दृष्टिकोनातून चांगले आहे का नाही याचा विचार आपण का करणार नाही?  याचा अर्थ आपण सगळेजण फक्त काहीतरी सनसनाटी व्हायची वाट पाहतो आणि आपली प्रसिद्धी व्हावी आपले नाव चर्चेत यावे म्हणून काहीही करायला तयार होतो. म्हणजेच आता प्रसिद्धी, आपलं नाव चर्चेत येणं, सतत आपल्या नावाचा गाजावाजा होणं या गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या वाटतात. या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? आणि त्या जर नसत्या तर काय झालं असतं? माध्यमांची प्रसिद्धी आपल्या आयुष्यात कसा बदल करून देते, सध्याचा काळ हा जाहिरातींचा आहे. जाहिरात करणं हे एक प्रभावी माध्यम आहे, असे जरी आपण मान्य केलं, तरीही अशा व्हिडीओजचं चित्रीकरण करावं असं का वाटतं? त्यातून काय साध्य होणार आहे? समाजात जे घडतं ते सत्य पडद्यावर आलं म्हणजे लोकशाही बळकट झाली का? किंवा माध्यमांचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल का? या सर्वांचे हेतू काय, त्यामागची माध्यमांची आणि ज्या आईने तो प्रसंग शूट केला तिची भूमिका काय? त्याच्या मागचा व्यवहार काय? हे एकदा तरी आपल्याला पाहायला नको का? माध्यमांनी या गोष्टींचा विचार जर केला तर काय होईल? अर्थात त्यांना देखील काहीतरी मर्यादा आहेतच, किंवा त्यांच्यावर सुद्धा कुणाचा तरी दबाव असल? या अशा प्रकारच्या असंख्य दबावाचं, मर्यादांच आपण काय करणार आहोत? या साऱ्या गुंत्यात आपण आपले सामाजिक भान ठेवू शकणार आहोत का? किंवा मुळातच सामाजिक भान ही काही एक भानगड अस्तित्वात आहे? आणि त्या भानाचे आपण एक जर भाग असू तर त्याचे काय करायचे?, की आपण प्रसिद्धीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार आहोत, आणि त्यात आपला आत्मसन्मान लपवून खोटं हसू चेहऱ्यावर ठेवून वावरणार आहोत? त्या वडिलांच्या मारामारीचा एक खूप तत्कालीन प्रसंग हा असला आणि आपण तो कालांतराने विसरून जाणार असलो तरीही, मला वाटतं, की आपल्याला असं उदासीन होऊन चालणार नाही. प्रेक्षक म्हणून आपण जे पाहत असतो, ते आपल्या माथी मारलं तर जात नाही ना, किंवा आपल्याला ते पाहणं भाग पडतं, आणि नाइलाज म्हणून आपण आपल्या रिमोटची बटण दाबून त्याकडे दुर्लक्ष करत असतो असं मला वाटतं. हे कधी संपल मला माहीत नाही. किंवा याची सुरवात कशी आणि कधी झाली यामध्ये पडूनही काही उपयोग नाही. 

विचार करून हातात काहीच येणार नाही. कारण आपण सगळेजण गोंधळात पडलो आहोत, आणि स्वतःला त्या गोंधळापासून दूर करण्यासाठी धडपड करीत आहोत. मग साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करून मानवी भावनांच्या युद्धात स्वतःला झोकून देऊन, त्यातून तरून जाण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. हा प्रयत्न मग सोशल मीडिया असो, किंवा डिजिटल मीडिया, किंवा प्रिंट मीडिया या सर्वांना आपण एक अस्त्र म्हणून स्वतःसाठी सज्ज ठेवतो. जसं, की त्या मुलाच्या आईने स्वतःवर आणि तिच्या मुलावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी का होईना माध्यमांची मदत घेतली. सखोल विचार जर केला तर कदाचित त्या आईचं बरोबर असूही शकेल. किंवा तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसेल. हा एक वेगळा दृष्टिकोन त्या घटनेच्या मागे असू शकतो. 

कुठलीही घटना नुसतीच घडत नाही त्यामागे काहीतरी कारण असतं, असं विधान अनेकजण करतात. पण ते मला काही अंशी पटत नाही. घटना का घडते? त्या मागे काय कारण आहे? किंवा अशी घटना मुळातच आधी घडून गेली का? त्याचा आधीच्या घटनेशी काही संबंध आहे का? अशा गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. उगाच काहीतरी किंवा कुठल्यातरी कारणांची जोड देऊन, तार्किक विचार न करता आपण कुठलातरी निष्कर्ष काढणे योग्य नाही असे मला वाटतं. म्हणून यातून मला कुठलाच निष्कर्ष काढायचा आहे किंवा काही एक भाष्य करायचे आहे असा जरी मी प्रयत्न केला, तरी माझा निष्कर्ष अंतिम नाही हे मात्र सत्य आहे. कारण प्रत्येक गोष्टीला असंख्य पैलू असतात, मी एका बाजूने विचार केला तर, कदाचित तुम्ही वेगळ्या बाजूने त्यावर विचार कराल. हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. आणि तो विचार करणाऱ्याच्या पद्धतीवर  बहुतेक अवलंबून राहील. 

प्रत्येक माणूस काहीएक भूमिका घेऊन जगत असतो, काहींना त्यांची भूमिका कळत नाही, किंवा कळते पण सांगता येत नाही, पण तरीही त्याच्या त्याच्या परीने माणूस स्वतःच्या भूमिकेच्या चौकटीत जगत असतो. ती भूमिका रोजच्या जगण्यात पाझरते. कदाचित काहीजण त्या भूमिकांना तत्त्व पण म्हणतात. त्या भूमिकेच्या कक्षेत मग त्याचं शिक्षण, व्यवसाय, किंवा नोकरी यांसारख्या गोष्टीत तो स्वतःला बसवतो आणि रोजचा चोवीस तासांचा दिवस जगत असतो. या संपूर्ण कालावधित प्रत्येकक्षणी आपल्या मनात भूमिका असतेच असे नाही. पण म्हणून आपण भूमिकाहीन आहोत असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. हे सारं सांगायचं किंवा मांडायचं कारण हेच की, कुठलीही कृती करताना, किंवा एखाद्याला ती दाखवताना आपली भूमिका ठरली पाहिजे, किंवा आपली चौकट ठरली पाहिजे, अशी चौकट जर नसेल तर उगाच गोंधळ माजेल असे मला वाटते. अर्थात तो गोंधळ काही फार मोठा गहजब निर्माण करणारा निश्‍चितच नसेल, पण किमान काही क्षणतरी तो तुम्हाला अस्वस्थ करेल आणि तुमच्या मनातल्या न्युनगंडाला खतपाणी घालल, किंवा तुमच्या मनातला शून्य मोठा करून विनाकारण मी आत्ता तुम्हाला जशी पिडते आहे तसा तो उगाच पिडत राहील. असो.

संबंधित बातम्या