अस्तित्वाच्या उर्वरित खुणा

अमृता देसर्डा
गुरुवार, 21 जून 2018

शब्दांची सावली
माणूस आज एक एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करू पाहत आहे. त्याचे जगणे, त्याचे असणे टिकवून ठेवण्यासाठी धडपडतो आहे; त्यासाठी स्पर्धात्मक आभासी जग उभे करतो आहे... आणि हे काही आत्तापासून नाही, तर जेव्हा पृथ्वीवर एक प्राणी म्हणून जन्माला आलो तेव्हापासून हा संघर्ष चालू आहे. फक्त तो काळानुसार, परिस्थितीनुसार बदलतो आहे...

गुजरात राज्यात तेजगड नावाचे एक आदिवासी गाव आहे. याच गावाजवळ टेकडीवजा एक छोटासा डोंगर आहे. त्यात दगडाची गुहा आहे. ती गुहा गेली बारा हजार वर्षे ऊन, पाऊस आणि वारा झेलत आहे. बारा हजार वर्षांपूर्वी माणसांनी त्या दगडावर काढलेले चित्र जपण्याचे काम करत आहे. तेजगढला भाषा अकादमी आहे, ती पाहण्यासाठी म्हणून गेलो आणि ही गुहा पाहायला मिळाली. भाषा अकादमीत आदिवासींच्या बोलींवर, त्यांच्या संस्कृतीवर अभ्यास आणि संशोधनाचे काम केले जाते. जवळजवळ बारा हजार वर्षांपूर्वी एका गुहासदृश्‍य दिसणाऱ्या दगडावर काही माणसांनी चित्रे काढली. त्यात आकृत्या होत्या, तेही ओबडधोबड माणसांची, प्राण्यांची आणि हत्यारांची चित्रे. ती चित्रे आजही त्या दगडावर दिसत आहेत. काळाच्या ओघात ही चित्रे पुसट झाली असली तरीही त्या चित्रांचे आकार त्या दगडावर स्पष्ट दिसत आहेत. इतक्‍या वर्षांपूर्वीच्या माणसांनी काढलेली चित्रे आजही आपल्या डोळ्यांना दिसतात, अनुभवता  येतात हे पाहून खूप भारावल्यासारखे वाटते. अशा पद्धतीचे काहीतरी करावे असे त्या काळच्या माणसाला का वाटले असावे? असा प्रश्न ती चित्रे पाहताना मला पडला. 

 माणूस स्वतःचे अस्तित्व राहावे म्हणून काहीतरी करायचा प्रयत्न सातत्याने करत असतो. एखादी गोष्ट अशाप्रकारे निर्माण करायचा प्रयत्न करत असतो, की जेणेकरून ती गोष्टी चिरकाल टिकेल, माणसाच्या असण्याच्या किंबहुना स्वतःच्या असण्याच्या खुणा मागे राहतील. त्या तेजगढच्या गुहेतली चित्रे असो, नाहीतर अजिंठा, वेरूळ मधल्या लेणी,मध्यप्रदेशातील भीम बेटका असो किंवा पुण्यातले पाताळेश्वर मंदिर. अशा कितीतरी वास्तू. वस्तू आणि कला भारतात आहेत ज्या हजारो वर्षांपूर्वी माणसाने त्याच्या समाधानासाठी, सोयीसाठी निर्माण केल्या. काही काळाच्या आड गेल्या, काही झिजून पूर्णपणे नष्ट झाल्या, पण काही आजही टिकून आहेत. माणसाला असे का करावे वाटते? आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड त्याच्या मनात उपजत असते का? की एक दिवस आपण जाणार आहोत आणि त्याच्या आधी आपण असे काहीतरी निर्माण करून गेले पाहिजे जेणेकरून आपल्या नसण्याने जी पोकळी निर्माण होईल ती त्या निर्माण केलेल्या गोष्टीमुळे कमी होईल, आणि त्यातून आपण एकेकाळी होतो याची जाणीव दुसऱ्यांना राहील, आणि हळूहळू आपलाही इतिहास निर्माण होईल. 

इतिहास घडवण्याची धडपड प्रत्येक माणसात असते. ती थोड्याफार फरकाने कमी जास्त होत असते. जितकी माणसे तितकी त्यात वैविध्यता. वर्षानुवर्षे माणूस आपल्या अस्तित्वाच्या खुणा निर्माण करण्यासाठी काम करतो. रोजच्या चाकोरीच्या जगण्यातून घाम गाळणारा माणूस त्याच्या पुढच्या पिढीसाठी नकळतपणे तरतूद करत राहतो. अर्थात त्याच्या स्वतःच्या जगण्याची आधी तो सोय पाहतो, मग आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचे असे ठरवून काम करत राहतो. किंवा माणूस जे काही करतो ते त्याच्या स्वतःच्या समाधानासाठी जरी असले तरीही ते समाधान दीर्घकाळ टिकून राहावे, आणि त्या सुखात सदैव राहता यावे ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात थोड्याफार प्रमाणात नांदत असते. 

 ती गुहेतली चित्रे पाहून मी विचार करायला लागले. त्या काळातल्या माणसाला का बरे असे वाटले असेल, की त्या दगडात चित्रे काढली पाहिजे? आणि ती चित्रे इतकी वर्षे टिकतील असे त्याला कधीतरी वाटले असेल का? तेव्हा तर आतासारखे रंग, ब्रश वगैरे नव्हते. त्याने रंग कसे निर्माण केले असतील? त्याला कल्पना कशी सुचली असेल? त्याची स्वतःशी आणि इतरांशी बोलण्याची भाषा किती प्रगल्भ असेल? किंवा त्याच्या चित्र काढण्यातून इतिहास घडला जाईल असे तेव्हा त्याच्या मनात तरी आले असेल का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येईलच असे नाही. कारण तेव्हा त्या माणसांनी कुठला हेतू मनात ठेवून ती चित्रे काढली हे त्यांनाच ठाऊक. मी फक्त अंदाज बांधून काहीएक विचार त्यातून काढू शकते किंवा मी असा जो काही विचार करते आहे तो करण्याची देखील गरज इतरांना वाटणार नाही. पण तरीही असा विचार मांडण्याचा मोह काही सुटत नाही. 

ज्या दिवशी आम्ही ही चित्रांची गुहा पाहिली त्याच रात्री आम्ही आकाश दर्शन केले. आपल्या डोक्‍यावर असलेले हे वेगळे विश्व किती अफाट आहे याची जाणीव झाली. आकाशातले तारे, ग्रह, चांदण्या पहिल्या. तेही साध्या दोन डोळ्यांनी. ते ग्रह, तारे आणि आपण या दोघांच्या मधले अंतर म्हणजे काही लाखो प्रकाशवर्षे. माणसाला तिथे जायला खूप वर्षे लागतील. आणि ते तारे, चांदण्या इतक्‍या लांब असूनही त्यांचे अस्तित्व ठिपके होऊन पाहणे म्हणजे फारच गंमत वाटत होती. काळ्याकुट्ट आकाशात दिसणाऱ्या चांदण्या म्हणजे आपला सूर्यच. फक्त फरक इतका, की आपला सूर्य हा पृथ्वीपासून फार लांब नाही, म्हणजे त्या चांदण्यांच्या इतका लांब नाही. तसेच आकाशात असंख्य गॅलॅक्‍सी आहेत, काही शास्त्रज्ञांनी तर असा दावा केला आहे, की आपल्या पृथ्वी ग्रहासारखे अनेक ग्रह ब्रम्हांडात फिरत आहेत. आपल्या सारखे जीव आणि अशा शेकडो पृथ्वी आकाशाच्या पोकळीत फिरत आहेत. फक्त ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. हे ऐकून तर खूपच आश्‍चर्य वाटले. म्हणजे आपण एक माणूस म्हणून पृथ्वीवर आहोत ही तुलनेने किती साधी गोष्ट आहे. आकाशगंगा किती प्रचंड मोठी आहे. ती अनंत आहे. तिला मरण नाही. केवढ्या मोठ्या विश्वात आपण राहतो आहोत. आपले अस्तित्व त्या विश्वात किती नगण्य आहे. हे ऐकून आणि वरचे आकाश पाहून तर या पृथ्वीवर राहणारे आपण आणि आपले  अस्तिव किती शून्य आहे हे जाणवायला लागले. आणि नकळत आकाशगंगा आणि चित्रांची गुहा मनात रेंगाळू लागली. 

ज्या पृथ्वीचा एक भाग होऊन माणूस म्हणून आपण जगतोय, त्या पृथ्वीच्या बरोबरीने जगण्याचा आणि तिला टक्कर देण्याचा किती प्रयत्न करतोय. लुकलुक करणारा आणि लाखो प्रकाशवर्षे दूर असणारा तारा जेव्हा त्याचे अस्तित्व दाखवतो, तेव्हा त्या ताऱ्याला मी दिसत असेल? त्याला मी पाहते आहे याची जाणीव होईल? तो तारा त्याच्या परीने त्याचे आयुष्य जगतोय. त्याला पृथ्वीवरची आपली संस्कृती दिसेल? भाषा कळेल? का आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय? कशासाठी मंगळावर जायला निघतोय? हजारो पृथ्वी असणाऱ्या आकाशगंगेत आपले अस्तित्व किती असेल? एका कणाच्या बरोबरीचे तरी असेल का? पण इतके असूनही आपण पृथ्वीवर जगतोय. स्वतःच्या अस्मिता जगवत, टिकवत, स्वतःच्या खुणा निर्माण करत जगतोय. मग आपल्या अस्तित्वाचे वय किती असेल?  याचा विचार न करता देखील काहीतरी निर्माण करू पाहतो आहे ही किती मोठी गोष्ट आहे. 

पृथ्वीला पण वय आहे. काही अब्ज वर्षानंतर ती नष्ट होणार आहे असे म्हटले जाते. म्हणजे ती नष्ट झाली तर आपणही नसू. बापरे. मग त्या नंतर काय असेल? काहीच नाही. जीव नसतील? माणूस म्हणून आपण ज्या प्रकारे सध्या पृथ्वीवर राज्य करतो आहोत ते एका क्षणात नष्ट होईल? विचार करून डोक्‍यात आकाशगंगेसारखी पोकळी निर्माण व्हायला लागली आहे. आणि आपण या संपूर्ण प्रक्रियेत कुणीच नाही या विचाराने ती पोकळी भरू पाहत आहे. 

माणूस आज एक एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करू पाहत आहे. त्याचे जगणे, त्याचे असणे टिकवून ठेवण्यासाठी धडपडतो आहे. त्यासाठी स्पर्धात्मक आभासी जग उभे करतो आहे. आणि हे काही आत्तापासून नाही, तर जेव्हा पृथ्वीवर एक प्राणी म्हणून जन्माला आलो तेव्हापासून हा संघर्ष चालू आहे. फक्त तो काळानुसार, परिस्थितीनुसार बदलतो आहे. माणसाला माहीतच आहे, की या विश्वात त्याचा वाटा किती आहे. पण तरीही त्यातून बाहेर येऊन स्वतःचे अस्तित्व टिकवणे त्याला महत्त्वाचे वाटत आहे. म्हणूनच आज संशोधन करून, अभ्यास करून नवीननवीन जगण्याचे समृद्ध पर्याय आपण शोधत आहोत. हे करत असताना मोठ्याप्रमाणावर अनेक साधनांचा ऱ्हास आपल्याकडून होतो आहे. हा ऱ्हास थांबवणे आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करून आपले उर्वरित अस्तित्व धोक्‍यात जाऊ नये यासाठी काम करणे ही गोष्ट ध्यानात ठेवणे फार गरजेची वाटत राहते. 

   माणूस जिथे असेल, जिथे राहील तिथे त्याच्या अस्तित्वाच्या खुणा करत राहणार, कारण हा मूळ मानवी स्वभाव आहे. ते विसरून चालणार नाही. मग माणूस लाखो वर्षांपूर्वीचा असो, किंवा आत्ताच्या दशकातला शिकलेला, स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारा असो. माणसाची जी मूलभूत प्रवृत्ती आहे ती बदलणार नाही. त्याचे अस्तित्व टिकवून ठेवून जगण्याची जी आंतरिक ऊर्मी आहे ती कुणीच थांबवू शकत नाही. आकाशगंगा त्याच्यापेक्षा मोठी आहे हे निश्‍चित. पण एवढ्याशा मेंदूने माणूस जो विचार करतो आहे, त्यावरून तो आकाशगंगेला देखील कवेत घेऊ पाहण्याचे धाडस करू शकतो. आणि हे केवळ या प्रकारच्या विचारानं आणि कल्पनेनं प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपण माणूस म्हणून करणं हे फार भन्नाट आहे असं वाटत राहतं.

संबंधित बातम्या