नीती-अनीतीचा, ज्याचा त्याचा भोवरा! 

अमृता देसर्डा
गुरुवार, 19 जुलै 2018

`अनैतिकता म्हणजे काय? माणूस नेहमीच नैतिक वागू शकतो का? आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं?’ 

माझ्या एका मैत्रिणीनं मला तिच्याशी गप्पा मारता मारता विचारलं. मी तिच्याकडं पाहिलं, ती असा प्रश्‍न अचानक मला का विचारत आहे हा विचार माझ्या डोक्‍यात आधी आला आणि तिच्या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागले. 

`अनैतिकता म्हणजे काय? माणूस नेहमीच नैतिक वागू शकतो का? आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं?’ 

माझ्या एका मैत्रिणीनं मला तिच्याशी गप्पा मारता मारता विचारलं. मी तिच्याकडं पाहिलं, ती असा प्रश्‍न अचानक मला का विचारत आहे हा विचार माझ्या डोक्‍यात आधी आला आणि तिच्या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागले. 

‘बोल ना, गप्प का आहेस तू? माझा प्रश्‍न कळला ना तुला?’ 
‘हो हो, थांब की जरा. किती घाई आहे तुला. पचू तर दे मेंदूमध्ये तो प्रश्‍न.’ 
‘त्यात न पचण्यासारखं काय आहे?’ ती हसून माझ्याकडं पाहात म्हणाली. 
‘म्हणजे तुला या प्रश्‍नांची उत्तरं माहीत आहेत! मग मला कशाला विचारते आहेस?’ 
‘ओ नो... मी काय वेडी आहे का मग विचारायला? ठीक आहे विचार करून उत्तर दे. वेळ घे.’ 
आमच्या दोघींचं हे बोलणं झालं त्याला चार दिवस होऊन गेले. पण अजूनही तिनं विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर शोधायचा मी प्रयत्नच करते आहे. अनैतिकता म्हणजे काय? माणसाच्या मनात ती जन्मापासून असावी का? की एखादी गोष्ट चांगली आणि एखादी गोष्ट वाईट आहे हे आपल्याला वडीलधारी माणसं सांगतात म्हणून आपण त्या त्या कृतींना आणि विचारांना नैतिक-अनैतिकतेचे शिक्के देतो. पण मग अशा कुठल्या गोष्टी आहेत, ज्या या दोन्ही कल्पनांमध्ये बसतात? 
उदाहरणच घ्यायचे झाले तर भ्रष्टाचार या संकल्पनेचे घेऊ. भ्रष्ट आचार म्हणजे भ्रष्टाचार. काही दिवसांपूर्वी एका महत्त्वाच्या प्रसिद्ध राजकारणी माणसाने विधान केले होते, ‘भ्रष्टाचार हा शाश्‍वत आहे, तो आपल्या समाजातून जाणे अतिशय अवघड आहे.’ म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ते नकळतपणे आपल्याला काय सांगू इच्छितात, की भ्रष्टाचार हा कधीही न मरणारा आणि कधीही नष्ट न होणारा एक रोग आहे. अनैतिक वागणं म्हणजे भ्रष्ट वागणं. याचाच अर्थ अनैतिकता हीदेखील मानवी जीवनात तितकीच शाश्‍वत आहे जितकी नैतिकता आहे.. या सर्वांचा अर्थ मी माझ्या परीनं असा लावला. 
मी जेव्हा चार दिवसांनी माझ्या मैत्रिणीकडं गेले तेव्हा ती खूप उदास होती. मी तिला विचारलं, 
‘तुला काय झालं?’ 
‘काही नाही.’ 
‘मग तू अशी अबोल का?’ 
‘उगाच.’ 
‘गप, उगाच माझ्यापासून लपवू नकोस. बोल काय झालं आहे तुला?’ 
मी दटावून बोलल्यामुळं माझ्या मैत्रिणीचा चेहरा एकदम बारीक आणि रडवेला झाला. आम्ही दोघी मग शांत बसलो. तिच्या आवडीचं गाणं लावलं. मग तिची कळी खुलली. 
ते पाहून मी लगेच तिला विचारलं, ‘काय झालं, तू मला नाही सांगणार?’ 
‘अरे, काय सांगू? माझे बॉस आहेत ना, त्यांचे म्हणे आमच्या स्टेनोबरोबर अनैतिक सबंध आहेत. ती स्टेनो माझी चांगली मैत्रीण आहे. तिच्याशी बोलायची लाज वाटतेय आता मला. माझे बॉस विवाहित आहेत आणि तिचे लग्न झालेले नाही. म्हणून मी तुला तो प्रश्‍न विचारला होता. तू सांग ना, मी तिच्याबरोबरची माझी मैत्री तोडू का? ऑफिसमध्ये तिच्याबद्दल खूप वाईट बोलत असतात. गेला आठवडा झाला मी तिला टाळते आहे. आमची मैत्री आहे गेल्या दोन वर्षांपासून. पण ती असं काही करेल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. मी तिला ती असं का वागते हे विचारायला जायला पण टाळते आहे. इतके दिवस तिनं माझ्यापासून लपवून ठेवलं. ऑफिसमधल्या लोकांनी मला गुपचूप सांगितलं. मला तर ती अशी असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज पण मी तिला टाळलं. ती आली होती माझ्या टेबलवर, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. मी तिला डायरेक्‍ट सांगितलं, तुझा माझा सबंध संपला. आजपासून तू माझ्याशी बोलायचं नाही. मी चांगल्या घरातली मुलगी आहे. वगैरे वगैरे... आणि आत्ता घरी आल्यावर मी तिला काय काय बोलले रागाच्या भरात हे आठवून माझा मूड गेला आणि तू आलीस.’ 
तिचा दीर्घ मोनोलॉग मी ऐकून घेतला.. थोडावेळ आमच्या दोघींत कुणीच काही बोललं नाही. 
‘तू तिला तुझी मैत्रीण मानतेस?’ 
‘हो, म्हणजे आधी मानत होते, पण ते कळल्यापासून नाही.’ 
‘तुला कुणी सांगितलं?’ 
‘मला दोन - तीन जणांनी सांगितलं तिच्या चारित्र्याबद्दल. आधी मी दुर्लक्ष केलं. पण एक - दोन वेळा तिचं वागणं संशयास्पद वाटलं आणि मग खात्री झाली.’ 
‘हे बघ, एकतर तू प्रत्यक्ष पाहिलं नाहीस आणि इतर माणसांच्या सांगण्यावरून तू तिचा संशय घेत आहेस. एक वेळ आपण असे मानूयात की चालू आहे तिचं अफेअर तुझ्या बॉसबरोबर, तर मग त्यात इतकं गंभीर काय आहे? तो तिचा वैयक्तिक प्रश्‍न नाही का? तुला त्यावर इतका विचार करण्याची गरजच काय? आणि तिच्या अशा वागण्यानं तू तिच्याबरोबर असलेली मैत्री तोडावी हे काही मला मान्य नाही.’ 
‘तू असं कसं म्हणू शकतेस? आपण ज्या समाजात राहतो तिथं असं एखाद्या विवाहित पुरुषाबरोबर... शी नको, ते बोलायला पण मला कसंतरी होतं. मला नाही पटत हे. मी असेन जुन्या विचारांची, पण मला वाटतं हे नैतिकतेला धरून नाही. मी जरी प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरीही माझे कलिग काही खोटं बोलणार नाहीत. सोड ना, तुला मी प्रश्‍नच विचारायला नको होता. आपण नको बोलूयात या विषयावर. उगाच आपल्यात भांडण नको.’ 
‘तू रागावू नकोस माझ्यावर. पण आपण असं तुझ्या मैत्रिणीला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून तिच्याकडं पाहणं योग्य नाही. तिचीही काही बाजू असेल, काही अडचण असेल. तू एक मैत्रीण म्हणून समजून घ्यायला हवं. तू तुझ्या बाजूनं तिच्याशी चांगलं वागायला हवं. तुझ्या भाषेत तू तिच्याशी नैतिक वागलं पाहिजेस असं मला वाटतं.’ 
आमच्या दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं कारण तिची आई आली. मग थोडावेळ थांबून मी तिच्याकडून निघाले. पण डोक्‍यात आमचं बोलणं घुमत होतं. खरंच त्या मुलीचं असं काही अफेअर असेल तर मग ते चुकीचं आहे का? आणि तिचा बॉस? त्याच्याबद्दल तर एक चुकीचा शब्द पण तिनं उच्चारला नाही. जर तिची स्टेनो मैत्रीण दोषी असेल तर मग तिचा बॉसदेखील तितकाच दोषी नाही का या सबंध प्रकरणात? 
माणूस एका व्यक्तीशी एकनिष्ठ का राहू शकत नाही? किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीर आणि मानसिक पातळीवर प्रेम करणं म्हणजे अनैतिक वागणं आहे का? मग तर याचं प्रमाण समाजात किती असेल? असे छुपे सबंध किती लोक ठेवत असतील? केवळ अशा गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून किती माणसं त्या लपवून ठेवत असतील? हल्ली तर पत्नीचे बाहेर सबंध आहेत म्हणून तिचा खून करून स्वतःलादेखील मारून घेणारे लोक आहेत. अशा कितीतरी बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. आपण त्या वाचक म्हणून चवीनं वाचतो. आज सगळ्यात जास्त घटस्फोट आणि आत्महत्येमागचे कारण हे अशाप्रकारचे संबंध आहेत. 
या विषयावर आपण एकमेकांशी खुलेपणानं चर्चा करत नाही. स्त्री आणि पुरुषांची मैत्री आपण सहजपणे घेत नाही. त्यांच्यात काहीतरी प्रकरण चालू आहे असं गृहीत धरतो. किंवा स्त्री-पुरुषात निखळ मैत्री नसतेच हे समीकरण समाजमनात इतकं पक्कं होऊन बसलं आहे, की ते कितीही प्रयत्न करून आपल्या मनातून बाहेर जाऊ शकत नाही. एक समाज म्हणून आपण कुठं चाललो आहोत? एखादा माणूस जर अशाप्रकारचं नातं भिन्नलिंगी व्यक्तीशी ठेवत असेल तर समाज त्याचा स्वीकार करत का नाही? आपण एकमेकांशी वरवर वागत जगत आहोत का? खोलात जाऊन याचा विचार जर आपण केला तर आपल्या हाती काय येईल? 
मला माहीत नाही, माझी मैत्रीण तिच्या स्टेनो मैत्रिणीशी मैत्री ठेवेल की नाही. पण मग या एका कारणावरून जर तिनं तिच्या चांगल्या आणि निखळ मैत्रीच्या नात्याला बंद करून टाकलं तर त्याचा दोष माझ्या मैत्रिणीला द्यायचा की, नीती आणि अनीतीच्या सीमा-रेषांवर राहणाऱ्या समाजाला दोषी धरायचं? की स्वतःच्या मनाप्रमाणं जे वाटेल ते वागण्याचं धाडस करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला दोषी धरायचं? खूप प्रश्‍नांची मालिका सध्या तयार होते आहे. या प्रश्‍नांचा प्रवास मला कुठं नेईल माहीत नाही. पण किमान स्वतःशी प्रामाणिक राहून आणि मनात चांगला हेतू ठेवून वागणं म्हणजे नीतीनं वागणं असं तरी म्हणायला हरकत नाही. नैतिकता शाश्‍वत आहे की अनैतिकता? या प्रश्‍नांची उत्तरं शोधायला कदाचित खूप वेळ लागेल. कदाचित याची उत्तरं कधी सापडणारही नाहीत.
 

संबंधित बातम्या