व्हर्च्युअल गर्दीतले आपण..

अमृता देसर्डा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

शब्दांची सावली
एखादी व्हायरल झालेली बातमी काय काय करू शकते हे आपण आजूबाजूला पाहतो आहोत. एखाद्या व्हायरल मेसेजने किंवा एखाद्या व्हिडीओने समाजातील शांतता दुभंगून जाण्याइतपत त्यात ताकद असावी ही किती वाईट गोष्ट आहे. आज व्हर्च्युअल गर्दी जी होते, त्या गर्दीला आपण रोखू शकतो का? माणसांच्या गर्दीला एकवेळ आपण नियंत्रित करू शकतो?

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक बातमी फिरत होती. लहान मुलाच्या आत्महत्येची. म्हणजे अशा रोज अनेक बातम्या असतात ज्या आपलं लक्ष वेधून घेतात. निदान काहीकाळ तरी आपण त्या घडून गेलेल्या घटनेचा विचार करतो आणि कधी सुन्न होतो तर कधी चक चक करतो आणि काहीवेळाने सोडून देतो. रोज कितीतरी घटना घडत असतात. प्रत्येक घटना आपल्याला कळेल असे नाही. पण तरीही वाचलेल्या घटना मेंदूत कुठेतरी राहतात. कालांतराने त्या पुसल्यादेखील जातात. त्यात फेसबुकवरची बातमी तर सतत स्क्रोल केले, की बदलत असते. ती काही मिनिटांसाठीच असते. तिचे आयुष्य क्षणभर असते. त्या बातमीत एका पंधरा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण काय तर शाळेत त्याच्या शिक्षकांनी त्याला सगळ्या वर्गासमोर अपमानास्पद वागणूक दिली आणि वर्गाबाहेर काढले. हे त्या मुलाला सहन झाले नाही आणि त्याने रागाने, अपमानाने स्वतःचा जीव दिला. बातमी तशी फार मोठी नव्हती. फक्त फेसबुकवर अधूनमधून वॉलवरून फिरत होती. पण ती वाचल्यावर मेंदूत मात्र ती एका कोपऱ्यात राहिली. 

त्या मुलाला का इतका टोकाचा विचार करावा लागला आणि त्यातून त्याने स्वतःचा जीवच घेतला. पाण्यात उडी मारून जीव दिला. त्याला भान राहिले नाही का? आणि शिक्षक? त्यांनी पण त्याचा इतका का अपमान केला. त्या मुलाने अशी काय एवढी मोठी चूक केली असेल? आणि त्याचे शिक्षक त्याच्याशी काय बोलले असतील के त्याने असा विचार करून इतका टोकाचा निर्णय घेतला असावा? खरेतर फक्त ही एकच घटना त्या मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली असावी का? किंवा त्या मागे काही अजून कारणे असावीत? ते कळायला काही मार्ग नव्हता. पण तरीही ही बातमी विचार करायला लावणारी अशी होती. कुमार वयीन मुलांचे विश्व समजून घ्यायला आपण कुठे कमी पडत आहोत का? किंवा ही मुले खूप ताणाखाली जगत आहे का? असे प्रश्न उगाच मनात येऊ लागले. 

लहानपण ते तरुणपण बहुधा आपण आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतो. मग शाळा, कॉलेज , रोजच्या जगण्याचा  खर्च हा आपली वडीलधारी मंडळीच करत असतात. किमान आपल्या देशात तरी मुलांचे शिक्षण होईपर्यंत त्यांचे आई-वडील जबाबदारी घेत असतात. शिक्षण झाल्यावर मात्र आपण पैसा कमावण्यासाठी बाहेर पडतो, जे काही शिकलो त्याचे फळ नोकरीतून, कामातून घ्यायचा प्रयत्न करतो. पण जर आपण जेवढे शिकलो तेवढे जर पैशांच्या रूपात कमवू नाही शकलो तर अपयशी ठरतो. याचाच अर्थ आज यशाची व्याख्या बदलली आहे. आज जो जास्त पैसे कमवेल, जास्त वस्तू खरेदी करू शकेल, आणि त्याचा उपभोग घेऊ शकेल अशी माणसे लौकिक अर्थाने यशस्वी असतात. हेच आजच्या पिढीमध्ये बिंबवले जाते. त्यातून आमची व्यक्तिमत्त्वे घडत राहतात. काहीजण त्या स्पर्धेत स्वतःला सामावून घेतात, काहीजण दूर फेकली जातात. तर काहीजण स्वतःला संपवून टाकतात.  

केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने प्रकाशित केलेला  ’युथ इन इंडिया- २०१७’ नावाचा अहवाल मी चाळत होते, तर त्यात १५ ते २९  वयोगटातील तरूण-तरुणींच्या आत्महत्येचे प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या  प्रमाणात ३३ % होते, आणि त्यात सगळ्यात जास्त तरुण मुलांचे प्रमाण होते. भारतात दरवर्षी एक लाखाहून जास्त आत्महत्या होतात. आत्महत्येच्या मागे असंख्य कारणे असतात. त्यात प्रेमभंग, घरगुती भांडणे, आर्थिक अडचणी, आणि इतर काही कारणे त्या अहवालात नमूद केली आहेत. आज आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण दुर्दैवाने आपल्या देशातील युवक, तरुण मुले-मुली यांच्या विकासाकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. अनेक योजना या कागदांवर राहतात. त्यांची अंमलबजावणी करण्याची योजना मात्र त्यांच्यापासून कोसो दूर असते. प्रचंड ऊर्जा असणारी ही तरुणांची लोकसंख्या एका दिशेने नेऊन त्यांना कार्यरत करणे हे आज देशापुढे खूप मोठे आव्हान आहे. ते नुसते देशापुढे नाही, तर कुटुंबातल्या प्रत्येकापुढे आहे. 

या आव्हानाला सामोरे जाणे म्हणावे तितके सोपे नाही, आणि म्हणावे तितके अवघडही नाही. फक्त विवेकी  विचारांना चालना देऊन ते विचार माणसांच्या मेंदूत जागृत ठेवणे गरजेचे आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात विवेक अर्थात सारासार विचार याबद्दल सांगितले आहे. आपण एखादी गोष्ट फार काळजी घेऊन केली नाही तरीही ते एखादवेळी चालेल पण आपण जी गोष्ट करत आहोत त्याचे भान मात्र ठेवले पाहिजे. ’विवेक’ या शब्दाचा अर्थ त्यात भान असा देखील सांगितला आहे. म्हणजे कुठलीही कृती करताना आपण भान ठेवून जर ती केली तर त्यातून कदाचित अनर्थ टळेल. त्या बातमीतील मुलाने स्वतःला संपवण्याची कृती केली. त्याला जर ती कृती करताना भान असते, तर त्याने ती केलीच नसती. त्याच्या मनात फक्त स्वतःला संपविण्याचा विचार आला असता तरी त्याच्या मनात जर भान जागृत असते तर त्याचे धाडस झाले असते का? उगाच मी त्या मुलाची आत्महत्या आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेला विवेक यांचा परस्पर अर्थ शोधत होते.  रोजच्या जगण्यात आपण आपल्या जाणिवेला विवेक जागृत ठेवला तर नक्की आपल्या जगण्यात फरक पडेल. मग रोज जे समाजात घडत आहे,  कुणी कुणाचा खून करत आहे, कुणी राग आला म्हणून स्वतःला संपवून टाकत आहे, किंवा समाजात जी जोरदार हिंसा चालू आहे त्यावर विवेकी विचाराने आळा बसू शकेल. पण असा विवेकाने प्रत्येकालाच विचार करायला जमेल असे नाही. अविवेकी विचार हा मेंदूच्या कोपऱ्यात जिवंत असतो, त्याला जर अनुकूलता मिळाली तर तो वर उफाळून येतो आणि त्याचे पडसाद थेट समाजात दिसू लागतात. 

आज व्हॉटसअप वरची एखादी व्हायरल बातमी काय काय करू शकते हे आपण आजूबाजूला पाहतो आहोत. एखाद्या व्हायरल मेसेजने किंवा एखाद्या व्हिडीओने समाजातील शांतता दुभंगून जाण्याइतपत त्यात ताकद असावी ही किती वाईट गोष्ट आहे. आज व्हर्च्युअल गर्दी जी होते, त्या गर्दीला आपण रोखू शकतो का? माणसांच्या गर्दीला एकवेळ आपण नियंत्रित करू शकतो. कारण प्रत्यक्षात ती माणसे आपल्याला दिसत असतात, त्यांना आपल्याला स्पर्श करता येऊ शकतो. कदाचित त्यांना प्रयासाने रोखू शकतो. पण जे व्हर्च्युअल समूह आहेत, जे लाखोंनी एका क्‍लिकवर एकत्र येतात आणि धुमाकूळ माजवतात त्यांचे आपण काय करणार आहोत? या अजिबातच चेहरा नसणाऱ्या पण तरीही सर्वत्र असणाऱ्या या असंख्य अगदी मोजताही न येणाऱ्या आभासी समूहांना विवेक नावाचे मूल्य अजिबात माहीत नाही. त्यांना फक्त एखादी व्हायरल क्‍लीप, किंवा व्हिडिओ अविवेकी वागण्यासाठी पुरेसा पडतो. अविवेक फोफावला जाऊन समाज मग आणखीन हिंसक बनतो. ही हिंसा मात्र फक्त व्हर्च्युअल राहत नाही. ती ई-रूपात तर असतेच, पण तिचे स्वरूप प्रत्यक्षात देखील मोठे होते. ती प्रत्येकाच्या आजूबाजूला नांदत राहते. मग रिमोटच्या एका क्‍लिकवर किंवा मोबाईलच्या धावत्या स्क्रीनच्या चौकटीत ती क्षणाक्षणाला बदलत असते. तिचे रूप हे कधी मानवी असते तर कधी राक्षसी. किंवा ती अक्राळविक्राळ देखील होते. याचाच अर्थ जर आपण भान ठेवून वागलो नाही तर त्याचे रूपांतर हे हिंसेत किंवा विनाशात होते.  शासन अफवा पसरू नये म्हणून वचक ठेवायचा प्रयत्न करत राहते, पोलीसयंत्रणेला कामाला लावते, अगदी सोशल मीडिया, मोबाईल यांवर कुठल्याही गोष्टी जाऊ नयेत म्हणून त्यांवर नियंत्रण आणायचा प्रयत्न सध्या करत आहे. पण इतक्‍या मोठ्या माणसांच्या समूहाला एकाचवेळी नियंत्रित आणणे शक्‍य आहे? माणसे त्यांच्यातला विवेक एकाचवेळी जागृत ठेवून कृती  करू शकतील? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतील. 

माणूस हा कुठलातरी आधार घेऊन जगत असतो. त्या आधारात प्रेम, आपुलकी, माया, परमेश्वर किंवा देव यांचा समावेश होतो. त्या आधाराचा आधार घेऊन जगणारा माणूस हा सश्रद्ध म्हणून ओळखला जातो. या आधाराला जर विवेकी वागण्याची ताकद मिळाली तर माणूस किती शांततेत जगू शकेल. पण प्रत्येकवेळी आपण असा विचार करत नाही. किंबहुना आपण अगदी कधीतरीच तसा विचार करतो कारण आपल्यावर बऱ्याचदा अविवेकाची झालर बांधलेली असते. आणि त्या झालरीपुढे आपल्याला काही दिसत नाही. त्याच्या झापडीत आपण मश्‍गूल होतो.  

आपल्यातला विवेक जागृत राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल, कसे वागता येईल याचा आपण विचार करायला हवा. घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करून काही मिळत जरी नसले तरी घडलेली गोष्ट पुन्हा होऊ नये, यासाठी आपण आपल्यापुरते भान ठेवून कृती करायचे जरी ठरवले तरी पुरेसे आहे. त्या शाळेतल्या मुलाचे आयुष्य पुन्हा काही त्याला मिळणार नाही, किंवा एखाद्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ ने जे नुकसान झाले आहे ते पुन्हा भरून येणार नाही. पण तसे घडू नये म्हणून प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे हे निश्‍चित.

संबंधित बातम्या