रिकाम्या पोटातलं भरीव स्वप्नं!
शब्दांची सावली
एक लहान दहा वर्षांची मुलगी माझ्याशी बोलत होती. तिचे डोळे पाण्यानं भरले होते. तिचे ओठ सुकून गेले होते. तिच्या गालांवर तिच्या पाणीदार डोळ्यांतले अश्रू ओघळू लागले. ती रडत रडत मला म्हणाली, ’अमृता मला पोटच नाही, मी काय करू? मला भूकच लागत नाही.’ मी तिच्याकडे नीट निरखून पाहू लागले. आणि आश्चर्य म्हणजे ती जे मला काही सांगत होती ते अगदी खरं होतं. तिच्या पोटाच्या जागी तिचं पोट नव्हतं. तिथं एक काळा खड्डा पडला होता.तिच्या फ्रॉकमधून तो आरपार दिसत होता. मी लगेच माझ्या पोटाला हात लावला. माझं माझ्या जागेवर होतं. माझं प्रिय पोट मला सोडून गेलं नव्हतं. हे पाहून मला हायसं वाटलं. पण त्या मुलीकडे पाहून मला वाईट वाटायला लागलं.
’’तुझं पोट कसंकाय गायब झालं, आणि तू कुठून आलीस? या आधी मी तुला कधी पाहिलं नाही.’’ मी तिच्याकडे पाहून करुणेने तिला विचारलं.
’’मी इथेच असते, तुझ्या आसपास. तू कधी माझ्याकडे पाहत नाहीस. तू खूप कामात असतेस ना.’’
’’आजच तू का भेटलीस मला? काही कारण?’’ मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून तिला प्रश्न विचारला.
’’तुला भेटायला काहीच कारण नाही माझ्याकडे. पण तरीही तुला भेटायचं असं ठरवलं आणि आले.’’
’’ओह्ह. मग बोल काय अडचण आहे तुला? तुझं पोट कुठं असेल?’’
’’काय माहित, काळाने माझं पोट खाऊन टाकलं बहुदा. त्याला आवडलं असावं.?’’
मी यावर खूप हसले इतकी हसले की माझं पोट दुखायला लागलं. माझं हसू पाहून ती आणखीनच केविलवाणी झाली. मला तिची दया आली. मी मग माझं हसू आवरून घेतलं.
’’सॉरी हा, तू अशी अडचणीत आणि मी फिदीफिदी हसतेय पोट धरून.’’
’’हो हस की, तू हसलंच पाहिजेस. कारण तुझ्याकडे पोट आहे ना. मी काय बिनपोटाची. मला ना भूक ना भावना, ना काही सांगायला. काळाने घात केलाय माझ्यावर.’’
’’हे बघ, तू लहान आहेस आणि किती मोठ्या गोष्टी बोलतेस. काळाने घात केला म्हणजे काय? मी साधी मुलगी आहे, तुझ्यासारखी प्रगल्भ नाही.’’
’’म्हणूनच तर तुझ्याशी बोलतेय मी.’’ ती माझ्याकडे कुत्सित नजरेनं पाहून मला म्हणाली.
’’हे बघ, खरं काय ते सांग. तू अशी का? आणि तुझं पोट कुठं आहे? तू जेवली नाहीस तर जगणार कशी? पोट नाही तुला ही केवढी भयंकर गोष्ट आहे. कळतंय का तुला मी काय म्हणते आहे ते?’’
’’हो, मी माझं पोट काळाला देऊन टाकलं. माझी आई आणि माझं भांडण झालं, मला दर दोन मिनिटाला खायला लागतं, मी खादाड आहे असा तिनं धोशा लावला होता माझ्यामागे. मग मी ठरवलं. आपलं पोटच गायब केलं तर सगळे प्रश्न मिटतील. आणि मग हे घडलं. काळाने माझं ऐकलं आणि माझं भरलेलं पोट हिरावून घेतलं.’’
मला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. ती एक बावळट मुलगी आहे असं मला वाटलं. तिचं बोलणं ऐकून मला खूप हसू येत होतं. पण तिच्याकडे पाहून ते हसू क्षणात जात होतं. कारण ती खूपच दीनवाणी दिसत होती. मी बराच वेळ तिच्या शरीराकडे पहायला लागले. मी लहानपणी तिच्या वयाची होते तेव्हा तिच्यासारखीच दिसत असावी असं मला वाटून गेलं. आम्ही दोघी मग खूप वेळ शांत राहिलो. मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बराचवेळ पाहत राहिलो. मी काही बोलत नाही हे पाहून ती मला म्हणाली,
’’तुझा विश्वास नाही ना माझ्यावर. पण मी कधीच खोटं बोलत नाही. आणि तुझ्याशी तर कधीच बोलणार नाही. मला खायला खूप आवडतं, इतकं आवडतं की मला जर अन्न मिळालं नाही तर मी भोकाड पसरते. सगळं घर डोक्यावर घेते. मला काहीच सुचत नाही. भूक ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मला माहित आहे सारखं खाण्याचा विचार करणं चुकीचं आहे. पोटाला लागतं तितकंच माणसानं खाल्लं पाहिजे. पण मी काय करू? माझं पोट कधीच समाधानी राहिलं नाही. त्याला सतत काहीतरी हवं असायचं. ते मी कितीही भरलं तरी क्षणात रिकामं व्हायचं. आईला माझ्या या वृत्तीचा कंटाळा आला होता. ती खूप चिडायची माझ्यावर. मी खूप प्रयत्न केला पण मी माझ्या पोटावर ताबा मिळवू शकले नाही, आणि मग काळ आला आणि माझं पोट हिसकावून मला जिवंत सोडून निघून गेला.’’
’’अगं पण हा काळ कोण? आणि मला सांग एक गोष्ट, संपूर्ण जगात काय फक्त तूच भुकेली आहेस का? कितीतरी माणसं पोटासाठी जगत असतात. राबत असतात. आणि स्वतःच्या हातानं करून खात असतात. आणि आपल्याला दिवसातून किमान दोन वेळा तरी भूक लागतेच. त्यात वेगळं काय आहे? आणि तुला नाही का वाटत तू विचित्र बोलते आहेस. आणि मुळात तू मला भेटायला का आलीस? माझा पत्ता तुला कुणी दिला?’’
’’किती प्रश्न पडतात तुला? माझा मेंदू बिनापोटाचा आहे. तो काय एवढी माहिती साठवू शकत नाही. हळूहळू बोल.’’
’’काय बोलू?’’
’’प्रश्न विचार’’
’’ओके, तू कोण आहेस?’’
’’मी एका काळाची प्रतिनिधी आहे.’’
’’म्हणजे?’’
’’म्हणजे वाघाचे पंजे...’’
’’फालतूपणा करू नकोस.’’ मी चिडले तिच्यावर. तशी ती नरमली.
’’सॉरी, मी भविष्यकाळाच्या पुढच्या पोटकाळातली एक प्रतिनिधी आहे. जिला पोट नाही, भूक नाही.’’
’’बापरे, आणि तू मला वर्तमानात कशाला येऊन भेटते आहेस?’’
’’तुला भेटायचं होतं. तू माझ्यासारखी असावीस असं वाटलं. पण प्रत्यक्षात तू वेगळी निघालीस.’’
’’म्हणजे?’’ मला ती काय बोलतेय हे समजत नव्हतं.
’’सोड अमृता. मी काळाची मैत्रीण आहे. तुला समजणार नाही. चल मी निघते. मला उशीर होतोय.’’
’’कुठं जाणार तू आता?’’
’’ज्याला पोट नाही, भूक नाही अशा माणसाला भेटायला.’’
’’हे हे हे, अशक्य आहे मुली असा माणूस मिळणं, या जगात असा एकही माणूस नाही ज्याला पोट नाही. अर्थात तू सोडून.’’
’’कर माझी तू चेष्टा, पण काळ तुला उत्तर देईल. चल मी निघते.’’
’’थांब थांब, अशी जाऊ नकोस, तुझं नाव तर सांग.’’
ती फक्त माझ्याकडे पाहू लागते आणि अचानक गायब होते.
मला अजिबात कळत नाही. फक्त अंधार अंधार दिसू लागतो. कुठल्यातरी चक्रात मी अडकली आहे असं वाटू लागतं. मी तिला, म्हणजेच त्या लहान मुलीला थांब थांब म्हणतेय, आणि ती न हसता, न बोलता, भावनाहीन होऊन माझ्यापासून लांब
लांब निघून जात आहे. मी तिच्याकडे
ओढली जातेय. पण तिच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीये. पोट नसलेली ती मला काहीतरी अमूर्त सांगू पाहतेय. त्यातच
मला भाजीच्या फोडणीचे वास येत आहे, खमंग भाजलेल्या पोळीचा वास त्यात मिक्स झाला आहे. स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज ऐकू येतोय. मला कुणीतरी हाक मारतंय..
’उठ, सकाळचे आठ वाजून गेलेत. आज सुट्टी नाहीय. आवरून लवकर निघायचं आहे आपल्याला.’
मी माझ्या बिछान्यात होते. डोळ्यांसमोर असलेला अंधार संपून उजेड झाला. आणि मी जागी झालेय हे कळलं. ती मुलगी जिच्याशी मी बोलत होते ती माझ्या स्वप्नात येऊन गेली होती. ती कोण होती हे अजिबात माहित नव्हतं. पण माझ्या लहानपणी मी जशी दिसायचे अगदी तशीच होती. मी
पण लहानपणी भूक सहन नाही झाली की खूप रडायचे. अन्नापुढे काहीच महत्त्वाचं नव्हतं माझ्यासाठी. त्या मुलीला अशी स्वप्नात पाहून माझा क्षणभर माझ्यावर अजिबातच विश्वास बसत नव्हता. मी स्वतःला चिमटा काढला. आणि चक्क माझं पोट माझ्या जागेवर आहे ना हे तपासून पाहिलं. आणि स्वतःशीच हसले. ती स्वप्नातली मुलगी कोण होती माहित नाही. ती माझ्याच स्वप्नात का आली मला माहित नाही. तिच्या नसलेल्या पोटातला कुठला काळ मला आव्हान देतोय, तो काय सांगतोय हे काहीच कळत नव्हतं.तरीही माझ्या रिकाम्या पोटातून जे काही विचार येत होते त्यातून काहीतरी भरीव निर्माण होईल याची जाणीव मला होतेय असं वाटत होतं. मी उठले. कारण दिवसभराच्या कामासाठी मला उठावंच लागणार होतं. माझ्या रिकाम्या पोटातल्या भुकेने ओरडायला सुरुवात केली. स्वयंपाक घरात स्वयंपाक चालू होता. माझ्या तोंडाला त्या भाजीच्या फोडणीच्या वासाने पाणी सुटू लागलं. मी बिछान्यातून उठले आणि माझ्या रिकाम्या पोटाला कुरवाळत माझ्या भुकेला शमवण्यासाठी थेट स्वयंपाकघरात निघून गेले.