वर्तुळातला एक बिंदू..

 अमृता देसर्डा  
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

शब्दांची सावली     

तिला कळत नव्हते कसे वागायचे, काय बोलायचे, आणि काय करायचे. तशी ती खूप शिकलेली, कमावती, आणि चार-चौघींसारखी. अर्थात तिचे सारे काही सुरळीत चालू असूनही काहीच सुरळीत चालू नव्हते. प्रत्यक्षात ती गोंधळलेली होती. कारण ती सदतीस वर्षांची तथाकथित लग्नाचे वय टळून गेलेली एक स्त्री होती. तिला मुलगी म्हणणे योग्य, की अयोग्य हे काही मला कळत नव्हते. तरीही ती एक अविवाहित प्रौढ स्त्री होती. तिच्या आयुष्यात तिचा स्वतःचा जोडीदार असावा असे तिला एका बाजूला वाटत होते, आणि जर मिळाला नाही तर तसेच एकटे राहण्याचा पर्याय तिच्याकडे होता. पण दुसरी बाजू तिला पचत नव्हती. ती कुटुंबात वाढलेली, सुरक्षित जगलेली मुलगी होती. आपले लग्न जर नाही ठरले तर काय होईल, आपल्याला आपले कुटुंब नाही मिळाले तर काय होईल? आई-वडिलांचे छत्र किती दिवस टिकेल याबाबत तिला शंका होती. पण तरीही ती तिचा रोजचा दिवस ढकलत तिच्या आई-वडिलांच्या कुटुंबात राहत होती. तिचे जगणे तिने नाइलाजाने स्वीकारले होते. हा नाइलाज परिस्थितीतून आलेला होता. तिच्या जगण्यात एक हतबलता होती. तिचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले कारण तिने तिच्या आयुष्यात लग्न न करण्याचा निर्णय घेतला नव्हता. आज अनेक तरुण-तरुणी एकटे राहण्याचा निर्णय घेऊन स्वतःला जसे वाटेल, जसे पटेल त्या प्रमाणे जगत असतात. ती मात्र या गोष्टीला अपवाद होती. तिच्यासारखे असंख्य अपवाद आज आजूबाजूला दिसत असतात. कुठलीही भूमिका न घेता जगणे,  ही भूमिका घेऊन जगणारी माणसे आज प्रचंड प्रमाणात वाढत आहेत असे वाटते. मग ती भूमिका लग्न करण्याची असो किंवा लग्न मोडण्याची, किंवा लग्न न करण्याची असोत.  

आजही लग्न हा विषय माणसाच्या आयुष्यातला तसा महत्त्वाचा विषय मानला जातो. योग्य वेळेत, योग्य त्या साथीदारासोबत लग्न होणे हे अगदी सामान्य वाटणारे स्वप्नं जर पूर्ण झाले नाही तर ज्यांना लग्न करायचे आहे, पण लग्न होत नाही अशी माणसे मात्र विनाकारण या संस्थेच्या दबावात भरडली जातात. प्रयत्न करूनही लग्न झाले नाही तर काय होईल हा नकारात्मक प्रश्न त्यांना छळत राहतो. मुख्य म्हणजे आपण ज्या समाजात राहतो ते लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्यामागे  काय बोलतील ही भीती त्यांना त्रास देत असते. त्यामुळे ते समाजाचे जे नीती-नियम आहेत ते पुरेपूर सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत भिडस्तपणे जगत असतात. 
  तिच्यासारख्या आज अनेक स्त्रिया आहेत, पुरुष आहेत ज्यांना जोडीदार नाही. ज्यांना प्रियकर किंवा प्रेयसी नाही. ज्यांचे कुठेही कसलेही प्रेमप्रकरण चालू नाही. या सगळ्यांना जगताना काय वाटत असेल? त्यांनी त्यांच्या जोडीदारांची स्वप्ने पाहिली असतील? का लग्न व्हायची वेळ निघून गेली, कोणी चांगला जोडीदार मिळाला नाही म्हणून लग्न करायचे राहून गेले या मुद्द्याचा त्यांनी स्वीकार केला असेल? त्यांच्या शारीरिक गरजा त्यांनी कशा भागवल्या असतील? किंवा त्यांनी त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा दाबून आत्मसंयम कसा केला असेल? यांच्या बाबतीत कितीतरी प्रश्न असेच अधांतरी राहत असतील. 

   माणसे बहीण, भाऊ, वडील, आई, आजी, आजोबा, नवरा, बायको या नात्यांनी एकमेकांना बांधून ठेवून जगतात, एकमेकांना आपली सुखदु:खं शेअर करतात. नवरा-बायको हे नाते तसे बघितले तर पूर्णपणे मानलेले नाते आहे. जे एकमेकांच्या मनाच्या जडणघडणीवर अवलंबून आहे. बाकीची नाती तरी जन्माने आपल्याला चिकटतात. पण हे नाते असे आहे जे आपण स्वतः विचार करून, निर्णय घेऊन तयार करत असतो. तो निर्णय कधी फसतो, तर कधी टिकतो. या नात्याचे आयुष्य हे त्या अर्थाने दोघांवरही अवलंबून असते.  

कुटुंबसंस्था ही विवाहसंस्थेवर अवलंबून आहे असा एक विचार मनात आला. लग्न झाल्यावर जी शारीरिक गरजा भागविण्यासाठी अधिकृतता येते ती कितपत महत्त्वाची आहे हा प्रश्न देखील पडतो. कारण लग्न झाले काय किंवा नाही झाले  काय. माणूस त्याला जे काही करायचे आहे, त्याला ज्या इच्छा किंवा आकांक्षा आहेत ते पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. कुटुंबाचा पाया जर लग्नसंस्था आहे असे विधान काहीकाळ खरे आहे असे मानले तर, लग्न करणारे स्त्री-पुरुष खरेच त्यांचे वैवाहिक आयुष्य उत्तम पद्धतीने जगत आहेत का? त्यांच्यात होणारा विसंवाद हा कधीकधी इतका टोकाचा होतो की लग्न मोडण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय उरत नाहीत.  

आपल्या मनात लहानपणापासून आपल्या भवतालच्या गोष्टी रुजत जातात, त्यातून आपण घडत असतो. मग लग्नाविषयी आपल्या घरात होणाऱ्या चर्चा ऐकतो, किंवा आजूबाजूचे लोक जे करतात त्यांचे आपण अनुकरण करतो. त्यामुळे जे विचार आपल्या मनात तयार होत जातात ते काहीअंशी पक्के होत जातात. समजुती ठाम होतात. त्या इतक्‍या ठाम होतात, की त्यांचे कितीही वाईट परिणाम समोर घडताना दिसत असले तरीही आपण त्या मनात घट्ट रुजून बसलेल्या समजुती बदलायला सहजी तयार होत नाही. त्यामुळे कुटुंब हे लग्नाच्या आधारावर टिकतात अशी एक समजूत अनेकांच्या मनात रुजून बसली आहे. पण मी याबाबतीत माझ्या काही मित्र-मैत्रिणींशी बोलले. त्यांना कुटुंबाचा पाया लग्नसंस्था आहे हे विधान अजिबात पटले नाही. त्यांच्यामते या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.  लग्नसंस्था हा कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहे, पण तो कुटुंबाचा पाया नाही. कुटुंबाच्या वाढीसाठी लग्न पूरक ठरते आणि कुटुंब विस्कळीत होण्यासाठी देखील लग्न कारणीभूत ठरू शकते. 

या सगळ्या गोष्टी इतक्‍या एकमेकांत गुंतलेल्या आहेत याचे कारण या सर्व संस्थांचा केंद्रबिंदू हा स्त्री आणि पुरुष आहे. हे दोन्ही घटक इतके मूलभूत आहेत, की या दोघांच्या एकत्र येण्याने निर्माण झालेले कुटुंब पुढे वाढत जाऊन त्या कुटुंबातून समाज घडत जातो. माणूस हा समाजात एकत्र राहणारा प्राणी आहे. तो नुसता एकत्र राहत नाही तर त्याच्या मनातील भावना, राग, लोभ, प्रेम, द्वेष यांच्यासकट तो एकमेकांशी नाते ठेऊन जगत असतो. कुटुंबामध्ये फक्त नवरा-बायको नसतात. कुटुंब ही संकल्पना त्या अर्थाने लग्नापेक्षा व्यापक अशी संकल्पना आहे. कुटुंब हे एक जर मोठे वर्तुळ आहे असे आपण मानले तर त्या वर्तुळातील एक बिंदू म्हणजे लग्नसंस्था. हा बिंदू जणूकाही एका मोठ्या वर्तुळातला एक छोटा वर्तुळच असतो. जो त्यात असणे हे फार गरजेचे असते आणि नसतेही. कारण लग्न केले तरी ते आजच्या काळात टिकेल याची खात्री नसते. पण तरीही कुटुंब आणि त्यातील हे वर्तुळ आपल्याला नाकारून चालत नाही. आजचा समाज हा त्या बाजूने कुटुंबकेंद्रित असा बनलेला आहे. 

कुटुंब आणि विवाह/लग्न यांवर चिंतन करण्याला किंवा या संस्थांचे पुढे काय होईल हा प्रश्न माझ्या मनात तिच्यामुळे आला. ती एक फक्त स्त्री आहे म्हणून तिला अनंत अडचणी आहेत असे आपण जरी जुन्या समजूतीनुसार मानले तरीही तिच्याकडे आज पर्याय उपलब्ध असूनही ती निर्णय घेऊ शकत नाही. किंवा तिला निर्णय घ्यायचाच नाहीय. आज ती जर कुटुंबाशिवाय समाजात राहिली असती तर तिचे लग्न न होणे हे आपण तितक्‍या सहजपणे घेतले नसते. ती आज तिच्या आई-वडिलांच्या सोबत राहते आहे, त्यामुळे ती त्यांची मुलगी आहे, ती कितीही कमावती असली तरीही ती आज त्यांची जबाबदारी आहे. उद्या ते तिच्यासोबत नसतील तेव्हा ती कुणाचीतरी पत्नी असणे कसे योग्य आहे हे गृहीतक आपल्या मनात इतके घट्ट रुजले आहे, की एखाद्या गावात किंवा पुणे-मुंबई सारखी शहरे सोडून ती एकटी कुठेतरी राहिली तर तिच्याकडे समाज 

कुठल्या नजरेने बघेल हा प्रश्न मनाला पडला आणि मी जर तिच्या जागी असते तर काय केले असते हा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. अशा प्रश्नांना उत्तरे मिळायला हवीत. 
पुढच्या शंभर वर्षात वाढणारी पिढी लग्न आणि कुटुंबाकडे कसे पाहते याचा आपण विचार करायला हवा. समलिंगी सबंध, लिव्ह-इन रिलेशन्स या संकल्पना आधीही होत्याच पण आज अधिकृतपणे जगभरात रुजत आहेत. भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या सर्व गोष्टींकडे मागची पिढी कशी पाहते, या नवीन पर्यायी संकल्पनांचा कसा स्वीकार करते आणि त्यांच्या पुढची पिढी या गोष्टी कशा हाताळते यांवर कुटुंब आणि लग्न या संस्थेचे भवितव्य अवलंबून आहे असे उगाच वाटत राहते. याहीशिवाय कदाचित वेगळेच पर्याय पुढच्या शंभर किंवा दोनशे वर्षांत समाजात रुजू शकतील यात शंका नाही. कदाचित हीच नवी सुरवात असावी.

पुढच्या शंभर वर्षांत वाढणारी पिढी लग्न आणि कुटुंबाकडे कशी पाहते याचा आपण विचार करायला हवा. समलिंगी संबंध, लिव्ह-इन रिलेशन्स या संकल्पना आज अधिकृतपणे जगभरात रुजत आहेत. या सर्व गोष्टींकडे मागची पिढी कशी पाहते, या नवीन पर्यायी संकल्पनांचा कसा स्वीकार करते आणि त्यांच्या पुढची पिढी या गोष्टी कशा हाताळते यांवर कुटुंब आणि लग्न या संस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

लग्न हा विषय माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा विषय मानला जातो. योग्य वेळेत, योग्य त्या साथीदारासोबत लग्न होणे हे अगदी सामान्य वाटणारे स्वप्न. हे स्वप्न जर पूर्ण झाले नाही तर? ज्यांना लग्न करायचे आहे, पण लग्न होत नाही अशी माणसे मात्र विनाकारण या संस्थेच्या दबावात भरडली जातात. प्रयत्न करूनही लग्न झाले नाही तर काय होईल हा नकारात्मक प्रश्न त्यांना छळत राहतो. मुख्य म्हणजे आपण ज्या समाजात राहतो ते लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्यामागे काय बोलतील ही भीती त्यांना त्रास देत असते. त्यामुळे ते समाजाचे जे 
नीतीनियम आहेत ते पुरेपूर सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत भिडस्तपणे जगत असतात.

संबंधित बातम्या