किचन अँड होम अप्लायन्सेस 

ज्योती बागल
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

शॉपिंग स्पेशल 

सणावारानिमित्त विविध प्रकारच्या वस्तूंची आवर्जून खरेदी केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या दिवसांत चांगल्या ब्रँड्सच्या मोठ्या मोठ्या वस्तूंवर आकर्षक ऑफर्सही दिल्या जातात. घराला सोयीसुविधांनी समृद्ध करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे आपली रोजची कामे आणखी सोपी करण्यासाठी मिक्सर, फूड प्रोसेसर, इंडक्शन चुल्हा, फ्रिज, एसी, फॅन, आटा चक्की, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, होम थिएटर अशा वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध होम अप्लायन्सेसचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे.

आपल्या किचनमध्ये इंडक्शन स्टोव्ह असेल, तर गॅस सिलेंडर संपण्याची काळजी नसते. तसेच घरापासून लांब राहणाऱ्या लोकांना हे इलेक्ट्रॉनिक इंडक्शन जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये फिलिप्स, बजाज, प्रेस्टिज, सूर्या, पिजन इत्यादी कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. इंडक्शन स्टोव्हची किंमत त्यामध्ये दिलेल्या फीचर्सवरून ठरते. काही इंडक्शन ड्युएल स्वरूपातही येतात. काही इंडक्शनमध्ये ड्युएल फिट सेन्सर, ऑटोमॅटिक शट ऑफ, एलईडी डिस्प्ले असे फीचर्स दिले आहेत. पिजनचे इंडक्शन्स १,५०० रुपयांपासून पुढे आहेत. प्रेस्टिजचे दोन हजारांपासून पुढे आहेत. फिलिप्स इंडक्शन तीन हजारपर्यंत मिळतात.  

कमी वेळात सर्वांच्या आवडीचा नाश्ता तयार करण्यासाठी टोस्टर अगदी फायदेशीर ठरतात. टोस्टरमध्ये बजाज, मॅजेस्टी, उषा, फिलिप्स, पिजन, प्रेस्टिज, मॉर्फी रिचर्ड्स, केंट इत्यादी ब्रँड्सची मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती ७५० रुपयांपासून पुढे आहेत. यामध्ये दोन, चार आणि सहा ब्रेड स्लाइसची कॅपॅसिटी असते. काही टोस्टरमध्ये रिमूव्हेबल क्रम्ब ट्रे आणि रीहीटची सोय असते. सँडविच मेकरलाही चांगली मागणी आहे. यामध्ये प्रेस्टिज, फिलिप्स, बजाज मॅजेस्टी या कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती एक हजारच्या पुढे आहेत. टोस्टर आणि सँडविच मेकर यांची कॉम्पॅक्ट आणि आकर्षक मॉडेल्स उपलब्ध आहेत. शिवाय आता यामध्ये पिवळा, लाल, मरून, गुलाबी असे विविध रंगही उपलब्ध आहेत. 

मायक्रोवेव्हमुळे जेवताना कोणताही पदार्थ पटकन गरम करून घेता येतो. त्यामुळे महत्त्वाच्या घरगुती वस्तूंच्या खरेदीमध्ये मायक्रोवेव्हही आघाडीवर दिसतात. यामध्ये फिलिप्स, बजाज, एलजी, हायर, पिजन, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, गोदरेजसह अनेक लोकल ब्रँड्सची मॉडेल्स उपलब्ध आहेत. मायक्रोवेव्हच्या साधारण किमती पाच हजार रुपयांपासून ते २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये बजाज, फिलिप्स, प्रेस्टिज यांना जास्त मागणी दिसते. मायक्रोवेव्ह काळा आणि पांढरा या दोनच रंगात उपलब्ध आहेत. 

स्वयंपाक करताना मिक्सर, ग्राइंडर याचा वापर तर अनिवार्य झाला आहे. मसाला कोणत्याही प्रकारचा असो, पण मिक्सरमुळे तो कमी वेळात तयार होतो. त्यामुळे प्रत्येक घरात एक तरी मिक्सर असतोच. तसेच आत्ताच्या घडीला निरोगी राहणे गरजेचे आहे, त्यामुळे खास घरी तयार केलेल्या ज्युसला लोक प्राधान्य देतात. यासाठी घरात ज्युसर तर असायलाच हवा. मिक्सर, ग्राइंडर आणि ज्युसरमध्ये फिलिप्स, बजाज, पॅनासॉनिक, हॅवेल्स, प्रेस्टिज, मॉर्फी रिचर्ड्स, ज्योती, बटरफ्लाय, युनिमॅक्स या कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. बजाजमध्ये ‘क्लासिक मिक्सर ग्राइंडर’, ‘बजाज जीएक्स मिक्सर ग्राइंडर’, ‘बजाज मेव्हरीक मिक्सर ग्राइंडर’, ‘बजाज फूड फॅक्टरी’ हे प्रकार दिसतात. यांच्या साधारण किमती दोन हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बटरफ्लायमध्ये ‘बटरफ्लाय स्मार्ट मिक्सर ग्राइंडर’, ‘बटरफ्लाय मॅचलेस मिक्सर ग्राइंडर’, ‘बटरफ्लाय जेट एलिट मिक्सर ग्राइंडर’, ‘बटरफ्लाय डिझायर मिक्सर ग्राइंडर’ इत्यादी प्रकार दिसतात. यांच्या साधारण किमती तीन हजार ते सहा हजारांच्या दरम्यान आहेत. प्रेस्टिजमध्ये ‘प्रेस्टिज डिलाईट प्लस’, ‘प्रेस्टिज एक्सप्रेस मिक्सर ग्राइंडर’, ‘प्रेस्टिज सुप्रीम मिक्सर ग्राइंडर’, ‘प्रेस्टिज ऑटोमॅटिक मिक्सर ग्राइंडर’, ‘प्रेस्टिज नक्षत्र’ इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती दोन हजार रुपयांपासून सहा हजारांपर्यंत आहेत. 

आटा चक्कीमध्ये कॉम्पॅक्ट स्वरूपातील उत्तम चक्की उपलब्ध आहेत. यामध्ये बजाज, नटराज, मिल्टन, मिलसेंट, अजंता, हायस्टार अशा अनेक कंपन्यांच्या आटा चक्की पाहायला मिळतात. या सर्वच चक्की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स असून सहजपणे वापरता येतात. आटा चक्क्यांच्या साधारण किमती १० ते २० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. 

फॅनमध्ये बजाज, फिलिप्स, हॅवेल्स, फिलिप्स, अँकर, उषा, ओरिएन्ट इत्यादी कंपन्यांचे टेबल आणि सिलिंग फॅन्स उपलब्ध आहेत. टेबल फॅनच्या साधारण किमती १,५०० ते ३,५०० रुपयांच्या दरम्यान आहेत, तर सिलिंग फॅनच्या किमती तीन हजारपासून पुढे आहेत. यामध्ये ब्लॅक, मरून, ऑफ व्हाइट, व्हाइट इत्यादी रंगांना जास्त मागणी आहे. तसेच बजाज आणि उषाच्या फॅन्सना जास्त मागणी आहे. 

एसीमध्ये एलजी, बजाज, पॅनासॉनिक, सॅमसंग, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, ब्लू स्टार, हिताची, वोल्टास या कंपन्यांची मॉडेल्स पाहायला मिळतात. एसीची किंमत त्याची किती टन कपॅसिटी आहे आणि त्या प्रॉडक्टला किती स्टार दिले आहेत यावरून ठरते. सॅमसंगचा एक टन कपॅसिटी असलेला एसी २५ ते ३० हजारांपर्यंत आहे, तर फाईव्ह स्टार असलेला १.५ टन ४० हजारांपर्यंत आहे. व्हर्लपूलचा थ्री स्टार असलेला १.५ टन कपॅसिटीचा एसी २८ ते ३० हजारांपर्यंत आहे. हिताचीचा दोन टन कपॅसिटी असलेला एसी साधारण ४० ते ४२ हजारांपर्यंत मिळतो. वोल्टासचा १.५ टन कपॅसिटीचा एसी ३१ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. थ्री स्टार असलेला ब्लू स्टारचा १.५ टन कपॅसिटीचा ३० हजारांपर्यंत, तर एलजीचा फाईव्ह स्टार असलेला १.५ टन कपॅसिटीचा एसी साधारण ४० हजारपर्यंत मिळतो.  

वॉशिंग मशीन हे तर धावपळीच्या काळात अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. यामध्ये सॅमसंग, एलजी, हायर, गोदरेज, व्हर्लपूल अनेक कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. वॉशिंग मशीन्समध्ये फ्रंट लोडिंग आणि अप लोडिंग हे दोन प्रकार असतात. यांची क्षमता किलोमध्ये मोजली जाते आणि त्यानुसारच किमती ठरतात. वॉशिंग मशीन्समध्ये काही फुल्ली ऑटोमॅटिक आहेत, तर काही सेमी ऑटोमॅटिक आहेत. सॅमसंगचे फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड मशीन १३,५०० रुपयांपर्यंत मिळते, याची कपॅसिटी ६.२ किलो एवढी आहे. व्हर्लपूलचे ७.५ किलोग्रॅम कपॅसिटी असलेले फाईव्ह स्टार, फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोडिंग मशीन १६ हजारांपर्यंत मिळते. एलजीचे फाईव्ह स्टार इन्व्हर्टर फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोडिंग मशीन ३० हजारांपर्यंत उपलब्ध आहे. याची कॅपॅसिटी सात किलो आहे. तर दहा किलो कॅपॅसिटीचे सेमी ऑटोमॅटिक टॉप लोडिंग मशीन २० हजारांपर्यंत मिळते.  

रेफ्रिजरेटरमध्ये पॅनासॉनिक, सॅमसंग, व्हर्लपूल, एलजी, गोदरेज, सोनी, हायर या कंपन्यांचे सिंगल आणि डबल डोअरची मॉडेल्स उपलब्ध आहेत. रेफ्रिजरेटरची कॅपॅसिटी लिटरमध्ये दिलेली असते, त्यावरून त्याची किंमत ठरते. व्हर्लपूलचा २६५ लिटरचा फोर स्टार इन्व्हर्टर फोर्स्ट फ्री डबल डोअर फ्रिज २५-२६ हजारांपर्यंत मिळतो, तर ३४० लिटरचा ३०-३१ हजारांपर्यंत मिळतो. सॅमसंगचा १९२ लिटरचा फोर स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट कूल सिंगल डोअर १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. हायरचा १८१ लिटरचा टू स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर फ्रिज १० हजारांपर्यंत उपलब्ध आहे. गोदरेजचा २९० लिटरचा थ्री स्टार इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री डबल डोअर फ्रिज २४ हजारापर्यंत उपलब्ध आहे. एलजीचा ६८७ लिटरचा फ्रॉस्ट फ्री साईड बाय साईड फ्रिज ७७ हजारांपर्यंत मिळतो. रेफ्रिजरेटरमध्ये सॅमसंगच्या मॉडेल्सना चांगली मागणी आहे.      

वॉटर प्युरिफायरमध्ये ॲक्वागार्ड, केंट, ब्लू स्टार, ॲक्वा फ्रेश, युरेका, ॲक्वा इंडिया सुपर ग्रँड, हॅवेल्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, केंट वंडर अशा अनेक कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांची कॅपॅसिटी लिटरमध्ये असते. ॲक्वागार्डमध्ये ॲक्टिव्ह कॉपर आणि मिनरल टेक्नॉलॉजीचा वापर केला असून यामधील टॅंक स्टेनलेस स्टीलचा आहे. याची किंमत ३० हजार रुपये आहे. केंटचा आठ लिटरचा वॉल माउंटन प्युरिफायर १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहे, तर ग्रँड प्लस नऊ लिटरचा वॉल माउंटन प्युरिफायर १६ हजारांपर्यंत मिळतो. युरेकाचा सात लिटरचा प्युरिफायर आठ हजारांपर्यंत मिळतो. ब्लू स्टारचा सात लिटरचा प्युरिफायर नऊ हजारांपर्यंत मिळतो. 

टीव्ही आणि साउंड सिस्टीममध्ये सोनी, सॅमसंग, पॅनासॉनिक, एलजी, मी टीव्ही, ओनिडा, कोडॅक, थॉमसन अशा अनेक कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती मॉडेल्सच्या फीचर्स आणि आकारानुसार ठरतात. सोनी ब्राव्हियाचा ४३ इंच फुल एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही ३५ हजारांपर्यंत मिळतो. सॅमसंगचा ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. एम टीव्ही ५५ इंच अल्ट्रा एचडी अँड्रॉइड एलईडी टीव्ही ३७ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. हल्ली स्मार्ट एचडी टीव्हींची मागणी वाढत आहे. 

याशिवाय रोटीमेकर, कॉफी-टी मेकर, इलेक्ट्रिक चॉपर्स, कुकर्स, थर्मास, डिश वॉशर यांनादेखील चांगली मागणी असून यातही अनेक ब्रँड्सचे पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही होम अप्लायन्स, गॅजेटची किंमत त्यामध्ये असणाऱ्या फीचर्समुळे कमीजास्त ठरते. त्यामुळे किंमत न बघता ग्राहक कोणत्याही गॅजेट्समध्ये किती ॲडव्हान्स्ड फीचर्स आहेत आणि ते कसे फायदेशीर ठरू शकतात हे बघून वस्तू घ्यायची की नाही ते ठरवतात. सध्या ऑनलाइन खरेदी-विक्री वाढली असल्याने, सहज आपल्या आवडीची मॉडेल्स निवडता येतात, शिवाय एकमेकांबरोबर तुलनाही करता येते.    
(लेखात उल्लेख केलेल्या वस्तूंचे आकार
 आणि किंमत यात बदल होऊ शकतो.) 

 

संबंधित बातम्या