पहिला हमसफर

मकरंद केतकर
सोमवार, 11 जानेवारी 2021

सहअस्तित्व

माणसाच्या आयुष्यातून प्राणी वजा केले की त्याच्या आयुष्याला शून्य अर्थ राहतो, हे अजिबात अतिशयोक्तिपूर्ण विधान नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारात असे क्वचितच एखादे क्षेत्र असेल जिथे प्राण्यांचा शिरकाव झालेला नाही. विविध प्रकारचे प्राणी आपल्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचे भारवाहक झालेले आहेत. ते नसते तर आज फार वेगळे जग दिसले असते. अन्न, वस्त्र, निवारा, भाषा, प्रवास, भारवाहन, व्यापार, सजावट, सुरक्षा, संदेशवहन, औषधे, मानसोपचार, युद्ध, कला, मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, देवत्व, संशोधन असे हे मारुतीचे न संपणारे शेपूट आहे. 

प्राण्यांशी आपला संबंध कसा आला हे पाहण्यापूर्वी माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट थोडक्यात सांगणे आवश्यक आहे. कारण उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाची बदललेली जीवनपद्धती आणि बुद्धीत झालेले बदल यामुळेच त्याचे इतर प्राण्यांवर असलेले अवलंबित्व वाढत गेले. माणसाइतका इतर कुठलाच प्राणी इतक्या मोठ्या प्रमाणात इतर प्राण्यांवर अवलंबून नसेल. या उत्क्रांतीचा मागोवा घेताना काही शास्त्रज्ञांनी एक गृहीतप्रमेय मांडले. त्यानुसार साधारण पन्नास लाख वर्षांपूर्वीचा काळ होता, जेव्हा आफ्रिकेमध्ये माणसांचे पूर्वज वृक्षनिवासी आणि चतुष्पाद होते. घनदाट जंगले हा त्यांचा अधिवास होता. कालांतराने नैसर्गिक कारणांमुळे आफ्रिका खंडात तापमान बदल होऊ लागले व घनदाट वनांचे सलग प्रदेश अक्रसून तुकड्यातुकड्यात शिल्लक राहू लागले. यामुळे या कपीमानवांना अन्नाच्या शोधात झाडांवरून उतरून गवताळ प्रदेश पार करून दुसऱ्‍या भागात जाणे भाग पडू लागले. अशाने त्यांच्यातील माद्यांवर अपत्य वाढवणे आणि त्याला घेऊन अन्नाच्या शोधात वणवण करणे असा दुहेरी ताण येऊ लागला. हाच तो काळ असावा जेव्हा त्यांच्यात समझोता होऊन नरांकडे अन्न गोळा करण्याची जबाबदारी आली आणि माद्या एकत्र राहून अपत्ये सांभाळू लागल्या. जो नर अधिक अन्न गोळा करू शकेल त्याला साहजिकच पितृत्वाच्या अधिक संधी उपलब्ध होऊ लागल्या. त्यातूनच मग अधिक अन्न गोळा करण्यासाठी पुढचे दोन पाय मोकळे ठेवून दोन पायांवर चालत अधिक अन्न गोळा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. 

या गृहीतप्रमेयाला पुष्टी देणारा एक प्रयोग स्मिथसोनियन संस्थेच्या संशोधकांनी पश्चिम आफ्रिकेतील रिपब्लिक ऑफ न्यू गिनिया या देशातील ‘चिंपांझी’ या माणसाशी सर्वात जवळचे नाते सांगणाऱ्‍या कपींवर केला. या प्रयोगात त्यांनी निवडलेल्या कपींना सहज उपलब्ध होणाऱ्‍या अन्नाबरोबर दुर्मीळ अन्नही आलटूनपालटून दिले जायचे. ज्यावेळी दुर्मीळ अन्न मिळायचे तेव्हा ते कपी दोन्ही हातांनी जास्तीत जास्त अन्न गोळा करून दोन पायांवर चालत जायचे. तसेच त्यांना असेही आढळले की जेव्हा हे चिंपांझी पपई आणि तत्सम फळांच्या शेतांवर धाडी टाकायचे, तेव्हा अन्न गोळा करून दोन पायांवर पोबारा करायचे. थोडक्यात म्हणजे या गृहीतप्रमेयानुसार असे मानायला वाव आहे, की या नव्या सवयीमुळे कपीमानव त्याच्या कुळातील इतर शेजाऱ्‍यांपेक्षा वेगळा ठरत गेला. 

साधारण बत्तीस लाख वर्षांपूर्वी कपीमानव पूर्णपणे द्विपाद झाला होता. बत्तीस लाख वर्षे जुन्या असलेल्या एका स्त्रीच्या सांगाड्यावरून ही खात्री देता येते. चारपैकी दोन पाय आता हातामध्ये रूपांतरित झाल्याने त्याला अधिक कार्यक्षम आयुष्य जगता येऊ लागले होते. यातूनच त्याच्या मेंदूचा विकास होत गेला व अंदाजे पंचवीस लाख वर्षांपूर्वी त्याने दगडी हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. दोन पायांमुळे वेग कमी झाला असला तरी कपीमानवाच्या मूळच्या समूहाने राहण्याच्या सवयीला आता कल्पकता आणि कार्यक्षम हातांची जोड लाभली होती. नरांनी अन्न मिळवण्याची जबाबदारी तशीच टिकवून ठेवली होती. हत्यारांच्या साहाय्याने त्यांना अधिक सहजतेने शिकार करता येऊ लागली होती. लक्षावधी वर्षांच्या प्रवासानंतर ते अधिक प्रगत, फेकता येतील अशी हत्यारे वापरत होते तसेच व्यूहरचना करून मोठ्या प्राण्यांची शिकार करत होते. यासाठी लागणारे प्राण्यांच्या सवयी लक्षात ठेवणे, रस्ते शोधणे हे गुण नरांमध्ये विकसित होत गेले. तर गृहकौशल्य, मुलांचे नीट संगोपन करणे हे गुण स्त्रियांमध्ये अधिक विकसित झाले. 

साधारण तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वीचा काळ असावा. कपीमानव आता आदिमानव होऊन अधिक स्थैर्याचे जीवन जगत होता. तेव्हा त्याच्या विश्वात पहिल्यांदा श्वान कुळाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांचा शिरकाव झाला. तुम्ही कधी निरीक्षण केले असेल तर श्वान कुळातील प्राणी शिकार करण्यात उस्ताद असले, तरी आयत्या अन्नाच्या भोवती ते चटकन गोळा होतात. म्हणजे वाघाने शिकार केली की त्यातले तुकडे पळवायला कोल्हे लगेच घुटमळू लागतात. असेच काहीसे त्या वेळी आदिमानव आणि लांडगे यांच्यात झाले असावे. माणसाची फिरस्ती कमी होऊन तो ठराविक ठिकाणी अधिक काळ राहत असावा. त्याने त्याच्या कबिल्यासाठी आणलेल्या शिकारीकडे आकृष्ट होऊन लांडगे या वस्त्यांच्या बाजूला फिरकू लागले असावेत, ज्यातून त्यांना माणसाने टाकून दिलेले अन्न मिळत असावे. पुढे या दोघांमधील साशंकता कमी होत सहचर्य वाढत गेले. दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांच्या शक्तिस्थानांचा पुरेपूर उपयोग करता येऊ लागला. पुढे पुढे त्याचा इतका विकास झाला की ‘कुत्रे नसते तर इतर प्राणी माणसाळू शकले नसते आणि मानवी संस्कृतीही समृद्ध होऊ शकली नसती,’ असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आजच्या कुत्र्यांच्या पूर्वजांनी माणसांशी जुळवून घेताना त्यांना शिकारीत मदत केली, केलेल्या शिकारीचे इतर प्राण्यांपासून रक्षण केले आणि माणसांच्या घराची राखणही केली. माणसाच्या या पहिल्या मानवेतर हमसफरबद्दल अधिक माहिती पुढील लेखात घेऊ.

संबंधित बातम्या