मेहनतीचे फळ

मकरंद केतकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

सहअस्तित्व

पृथ्वीतलावर सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राण्याचे वेगळेपण हे त्याच्या बुद्धीमुळे सिद्ध होते. एखाद्या अडचणीकडे पाहायचा प्राण्यांचा दृष्टिकोन आणि माणसांचा दृष्टिकोन यात मूलभूत फरक आहे. म्हणजे क्षमतेबाहेरची अडचण समोर उभी राहिली की प्राणी एकतर प्रयत्न सोडून देतात किंवा त्यावर मात करण्यासाठी तेच तेच निष्फळ प्रयत्न करत राहतात. पण माणूस स्वतःची क्षमता संपली की साधनांची निर्मिती करून आपल्या मर्यादा लंघायचा प्रयत्न करतो. 

माणसाला शिकार करताना शारीरिक क्षमतांची मर्यादा जाणवू लागली आणि मग वाढत्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याने छोटी दगडी हत्यारे ते फेकून मारता येतील अशा भाल्यासारख्या अवजारांची निर्मिती केली. यातून त्याला एका ठराविक अंतरावर असलेल्या प्राण्याला ठार करता येणे शक्य होऊ लागले. पण अजूनही त्याला पळत्या प्राण्याच्या मागे धावताना खूप ऊर्जा खर्च करावी लागत होती. या समस्येवर मात करण्यासाठी त्याने हळूहळू प्रगत केलेले नवे साधन होते कुत्रा. 

मागच्या लेखात आपण पाहिले की वीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी माणसाने कुत्र्यांच्या पूर्वजांना आपल्या टीममध्ये घेतले आणि त्याला शिकारीसाठी असे शस्त्र उपलब्ध झाले, जे त्याच्या एका इशाऱ्‍यावर सावजाच्या मागे धावत जाऊन त्याला घेरून त्याची इहलोकीची यात्रा संपवीत असे. थोडक्यात सांगायचे तर त्या वेळचे असे शिकवलेले कुत्रे म्हणजे आजची लक्ष्यभेद करणारी मिसाईल्स. यातून माणसांमध्ये जो अजून एक गुण विकसित झाला तो म्हणजे व्यवस्थापन. आपल्या हुकुमावर कमीत कमी कष्टात खूप जास्त गोष्टी साध्य करता येतात हे त्याला कुत्र्यांच्या रूपाने कळल्यावर, मग पुढे त्याने इतर अनेक प्राणी आपल्या गरजांनुसार पकडून माणसाळवले व वापरले. पण तरीसुद्धा माणसाची आणि कुत्र्याची मैत्री अबाधितच राहिली. एवढेच नव्हे तर त्याने त्यांच्यावर इतके प्रयोग केले, की कुत्रा हा आजच्या घडीला सगळ्यात जास्त प्रयोग केला गेलेला आणि सगळ्यात जुना प्राणी आहे. माणसाने संकर करून निर्माण केलेल्या कुत्र्यांच्या जातींची संख्या साडेतीनशेच्या आसपास आहे. बायकांच्या पर्समध्ये मावेल इतक्या चिमुकल्या ‘चिहुआहुआ’पासून प्रचंड मोठ्या ग्रेट डेन, फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध जातींचा त्यात समावेश होतो. 

माणसांच्या करामतीमुळे त्यांच्यात जनुकीय सरमिसळ झाली असली तरी या सगळ्यांचा मूळपुरुष (किंवा मूळश्वान म्हणू) हा लांडग्यासारखा प्राणी होता. सुरुवातीला मोठे प्राणी कदाचित फार जास्त माणसाळले नसतील पण त्यांची पिल्ले मात्र नक्कीच माणसाळली असावीत. ही सगळी प्रक्रिया कशी झाली असावी याचा शोध लावण्यासाठी रशियामधील दिमित्री बेल्याएव्ह यांनी १९५९ साली रशियात आढळणाऱ्‍या सिल्व्हर फॉक्स या खोकडांच्या जातीवर केलेल्या प्रयोगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूळचे शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थी असलेले बेल्याएव्ह हे दुसऱ्‍या महायुद्धानंतर मॉस्कोमधील केसाळ प्राण्यांवर संशोधन करणाऱ्‍या संस्थेत रुजू झाले. त्यांनी वाचलेले डार्विनचे संशोधन आणि या संस्थेत त्यांनी केलेली कुत्र्यांची निरीक्षणे यातून त्यांना एक गोष्ट उमगली, की कुत्र्यांच्या अनेक जातींमध्ये शारीरिक वैशिष्ट्यात समानता दिसते. जसे की निरागस डोळे, पडलेले कान, वळलेली शेपूट, मऊ केस, भावनिक गुंतवणूक इ. थोडक्यात म्हणजे मालकालाच सर्वस्व मानणारा प्राणी. हे गुण जर वन्यप्राण्यात आढळत नाहीत तर मग कुत्र्यांमध्ये विकसित कसे झाले? याचे त्यांनी मांडलेले गृहीतप्रमेय असे होते, की माणसाने पूर्वापार या प्राण्यांच्या जन्मलेल्या पिल्लांपैकी फक्त मायाळू स्वभावाची पिल्लेच आपलीशी केली व निवडक प्रजननामुळे पिढी दर पिढी हे प्राणी अधिकाधिक मायाळू आणि माणसाच्या गरजा पुरवण्यासाठी सुयोग्य होत गेले. त्यांच्या या गृहीतप्रमेयाच्या सिद्धतेसाठी त्यांनी चंदेरी खोकडांच्या शेकडो जोड्या पकडून त्यांच्यावर प्रयोग सुरू केले. सुरुवातीला त्यांनी या सगळ्या खोकडांपैकी जे त्यातल्या त्यात सर्वाधिक मायाळू होते त्यांना वेगळे काढले व फक्त त्यांनाच प्रजननाची संधी दिली. त्यांनी या प्रयोगात मायाळूपणाचे निकष ठरवून त्याला गुणदेखील ठरवले होते. त्यानुसार प्रत्येक नव्या पिढीतील सर्वाधिक मायाळू पिल्लांनाच वेगळे काढून त्यांना प्रजननाची संधी दिली जायची. या प्रयोगात त्यांना डॉ. ल्युडमिला ट्रस्ट या सहसंशोधिकेची मोलाची मदत लाभली आणि डॉ. ट्रस्ट यांनी अजूनही हा प्रयोग सुरूच ठेवला आहे.

एकोणीसशे एकोणसाठ साली प्रयोग सुरू केल्यानंतर जेमतेम दशकभरात त्यांना अपेक्षित परिणाम दिसू लागले. पाळीव झालेल्या खोकडांचे कान मुडपलेले होते आणि शेपूट वक्राकार दिसू लागली होती. पंधराव्या पिढीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स त्यांच्या मूळच्या जंगली भावंडांपेक्षा निम्म्याने कमी होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव अधिक शांत होता. सततच्या गुणाधारित निवडक प्रजननामुळे नव्या पिढ्यांमध्ये उत्तेजक संप्रेरके निर्माण करणाऱ्‍या ग्रंथींचा आकार लहान होत गेला. सेरोटोनीन नामक संप्रेरके अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागली. ज्यामुळे ही नवी पिढी अधिक आनंदी होती. अजून पुढच्या पिढ्यांचे चेहरे जास्त गोजिरे होते. तसेच त्यांच्या मूळ चंदेरी काळ्या केसांच्या ऐवजी त्या जागी ठिपकेदार केस उगवू लागले होते. याशिवाय प्रकटलेले नवे गुण म्हणजे त्यांना माणसांच्या नजरेचे इशारे कळू लागले. नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता वाढली. ते माणसाच्या विरहात करुण रुदन करायचे आणि तो आला की आनंदी आवाज काढायचे. जर फक्त पंधरा ते वीस वर्षांत इतका मोठा फरक घडू शकतो, तर हजारो वर्षांच्या साहचर्यात किती मोठे बदल घडले असतील? हेच आपल्या पूर्वजांच्या मेहनतीचे फळ आहे. आपल्या जुळवून घेण्याच्या क्षमतेने माणसाला हजारो वर्ष भुरळ घालणाऱ्‍या त्याच्या या चारपायी मित्राची विविध खास वैशिष्ट्ये पुढच्या लेखात पाहू.

संबंधित बातम्या