गोवंशाच्या अंतरंगात

मकरंद केतकर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

सहअस्तित्व

शक्तीचे, सामर्थ्याचे, समृद्धीचे, सुबत्तेचे आणि स्थैर्याचेही प्रतीक म्हणजे वृषभ. अतिशय परिपक्व संस्कृती लाभलेल्या भारतामध्ये, जिथे कृषिवल मोठ्या प्रमाणात राहतात, तिथे बैलांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.

गोवंशाला इतका मान मिळण्याचे कारण म्हणजे त्यांचा महिषवंशाच्या तुलनेत असलेला शांत स्वभाव. माझ्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवातून सांगायचे, तर अनेकदा जंगलाच्या परिघावर असलेल्या खेड्यांमधील म्हशींना त्यांचे मालक शेजारच्या रानात चरायला सोडून देतात. त्या काही दिवस तिथेच राहतात. जर कधी रानवाटेने जाताना या म्हशींशी गाठ पडली, तर त्यांचे हावभाव पाहत दुसरा रस्ता शोधावा लागतो, नाही तर त्या डोके हलवत पाठलाग करू लागतात. गायींच्या बाबतीत हा अनुभव येत नाही. बैल स्वामीनिष्ठ असतात आणि सहसा मालक सोडून तिऱ्‍हाईत माणसाला जवळ येऊ देत नाहीत. अर्थात जातींनुसार स्वभावात थोडा फरक असतोच म्हणजे जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसार, खिलारी जातीचे तगडे बैल तोरा मिरवणारे असतात. पण लहान शिंगांचे ‘लाल सिंधी’ जातीचे बैल त्यांच्यावरून हात फिरवू देतात. ते आक्रमक नसले तरी त्यांच्या कुतूहल असलेल्या स्वभावामुळे ते जवळ येऊन वास घेतात आणि कधीकधी चाटतातसुद्धा, ज्याला अनेकजण घाबरतात. 

गोवंशाच्या जंगली नातेवाइकांबद्दल सांगायचे, तर रानगवे लाजाळू असतात आणि संघर्ष टाळण्याकडे त्यांचा कल असतो, असा माझा अनुभव आहे. अगदीच कोणी मागे लागले किंवा त्यांना असुरक्षित वाटेल असे वर्तन केले तरच ते हल्ला करतात. पण भारतात मोजक्याच जंगलांमध्ये आढळणाऱ्‍या रानम्हशी याच्या अगदी उलट म्हणजे खूपच आक्रमक असतात. त्यांच्याच आफ्रिकेतल्या केप बफेलो नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहिणी सिंहांवरही हल्ला करतात. म्हणूनच जगभर गायीला तिच्या मवाळ स्वभावामुळे अधिक आपले मानले जाते. डेअरी प्रॉडक्ट्सच्या वेष्टनांवरही सहसा गायीचेच चित्र असते. आपल्याकडे बैलपोळा, वसुबारस असे सणसुद्धा या प्राण्यांच्या आपल्या आयुष्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून साजरा केले जातात. गोवंशाच्या आर्थिक माहात्म्यामुळेही असेल कदाचित, पण त्यांना आपल्या दैवतांशी जवळीक साधायला मिळाली आहे. जसे की शंकराचा नंदी, दत्ताची गाय; कामधेनू, गायीमध्ये असलेले तेहेतीस कोटी देवांचे वास्तव्य इ. आख्यायिका मला वाटते, लोकांच्या मनात या प्राण्यांबद्दल आदर कायम राहावा म्हणून केलेली तजवीज असावी.

गाय, म्हैस, गवा, तसेच शेळ्या मेंढ्या व त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे सगळे प्राणी ‘बोव्हिडी’ या कुळातले भाऊबंद आहेत. सुमारे तीन कोटी वर्षांपूर्वी, म्हणजे डायनासोर्सचे युग संपल्यावर जवळपास तीन कोटी वर्षांनंतर या कुळाचा उदय झालेला आढळतो. चिंकारा आणि काळवीट हेसुद्धा याच कुळातील प्राणी आहेत. पण चितळ किंवा सांबर हे मात्र ‘सर्व्हिडी’ या कुळात समाविष्ट आहेत. तसे पाहिले तर दोघांमध्येही तशी बरीचशी साम्य आहेत, जसे की दुभंगी खूर, अर्धवट चावून साठवलेले अन्न परत तोंडात आणून रवंथ करणे आणि इतर साधर्मिक शरीररचना. पण तरी दोघांमधील मुख्य फरक म्हणजे बोव्हिड कुळातील प्राण्यांच्या शिंगांचा गाभा हा अस्थिसदृश टणक असतो आणि त्याला वरून कठीण कवच असते. त्यांच्या शिंगांना फाटे नसतात. सर्व्हिड कुळातील प्राण्यांमध्ये शिंगे अस्थिरूपच असतात, मात्र सुरुवातीला त्यांच्यावर मखमली आवरण असते. त्यातून वाढणाऱ्‍या शिंगाला रक्तपुरवठा केला जातो आणि शिंगांची वाढ पूर्ण झाल्यावर हे आवरण गळून पडते. या प्राण्यांच्या शिंगांना फाटे असतात व ती दरवर्षी गळून परत उगवतात. बोव्हिडींची शिंगे कायमस्वरूपी असतात. 

या दोन्ही कुळातील प्राण्यांना ‘रुमिनंट’ म्हणजेच रवंथ करणारे म्हणून ओळखले जाते. वनस्पतींमध्ये असलेले सेल्युलोज कच्च्या अवस्थेत पचायला अवघड असते. त्यावर उपाय म्हणून या प्राण्यांच्या पोटाची रचना चार भागात झालेली आहे. तोंडाने खुडलेला चारा लहान तुकडे करून आणि लाळेत मिसळून ‘रुमेन’ नावाच्या पहिल्या कप्प्यात साठवला जातो. तिथले स्नायू ते तुकडे घुसळतात. या कप्प्यातल्या सूक्ष्मजिवांमुळे तो लगदा आंबतो व पचण्यायोग्य होऊ लागतो. या प्रक्रियेत मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तो ढेकर देऊन बाहेर काढला जातो. नंतर हा लगदा दुसऱ्‍या कप्प्यात जातो आणि फुरसत मिळेल तेव्हा तिथून परत तोंडात आणून दळून अधिक पचण्यायोग्य केला जातो. इथे पुन्हा सूक्ष्मजीव प्राणवायूच्या साहाय्याने त्याला आंबवण्याची क्रिया करतात. गिळलेला लगदा पुढे तिसऱ्‍या कप्प्यात जातो, जिथे परत स्नायूंद्वारे दळला जाऊन आंबवला जातो. शेवटी इतकी प्रक्रिया होऊन तयार झालेला लगदा मुख्य जठरात येतो. तिथे त्याच्यावर पाचकरस प्रक्रिया करतात आणि त्याला लहान आतड्यात ढकलतात. इथे त्यातील पोषकतत्त्वे शोषून घेऊन रक्तात मिसळून शरीराच्या विविध भागांना पुरवली जातात. यानंतर उरलेला चोथा एग्झिट घेण्याआधी ‘कायकम’ नावाच्या कप्प्यात येतो. इथे चोथ्यातले वापरण्यायोग्य अन्न आंबवून शोषून घेतले जाते व न पचलेल्या भागाचे शेण होऊन बाहेर टाकले जाते. म्हणूनच शेणामध्ये गवताच्या काड्या आढळतात आणि त्यातल्या वनस्पतींच्या अवशेषांमुळे ते जळण म्हणून वापरता येते. 

ही प्रक्रिया वाचून तुम्हाला अंदाज आला असेल, की किती मोठ्या प्रमाणात यात आंबवण्याची क्रिया घडते. यातून खूप मोठ्या प्रमाणात मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होतात. हे दोन्ही वायू उष्णता शोषक आहेत व जागतिक तापमान वाढीमध्ये डेअरी उद्योगाचा काही प्रमाणात हातभार असल्याचे या विषयातील काही अभ्यासक मानतात. पण दुसरीकडे वृक्षतोड आणि इतर अनेक गोष्टींमुळे या वायूंना शोषणारी सिस्टीमही संकटग्रस्त होत आहे. तिला भक्कम केल्यास आपल्या पुढच्या अनेक पिढ्या दुग्धजन्य मिठाईचा नक्कीच मनसोक्त आस्वाद घेऊ शकू यात शंका नाही.

संबंधित बातम्या