ढालगज

मकरंद केतकर
गुरुवार, 25 मार्च 2021

सहअस्तित्व

नेता आणि अनुयायी या मूलभूत कल्पनेचा विस्तार होऊन साम्राज्ये अस्तित्वात आली. राज्याचा विस्तार आणि स्थैर्य ह्या दोन गोष्टींसाठी सैन्याची निर्मिती झाली आणि त्याबरोबर निर्माण झाली सैन्यात वापरली जाणारे अस्त्रे आणि शस्त्रे. आजच्या जगात आधुनिक युद्धात जे महत्त्व रणगाड्याचे आहे, तेच महत्त्व यंत्रयुगाच्या पूर्वी हत्तींचे होते. 

अचाट शक्ती, भेदक क्षमता आणि सहनशक्ती हे तीन महत्त्वाचे गुण आहेत, जे एखाद्या अस्त्रात योग्य प्रमाणात असतील तर ते अस्त्र शत्रूसाठी घातक सिद्ध होते. हत्तींमध्ये हे त्रिगुण आढळतात म्हणून त्याला युक्तीबरोबरच शक्तीचेही प्रतीक मानले जाते. वेगवान छापेमारी करायची असेल तर घोडदळ आणि नासधूस करायची असेल तर हत्ती, असे युद्धाचे सोपे गणित पूर्वी होते. हत्तींचा युद्धातला वापर आशियासोबतच युरोपातील योद्ध्यांनीही केलेला आढळतो. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात कार्थाजिन सैन्याचा सेनापती हनीबल याने इटलीच्या उत्तरेकडून रोमन सैन्यावर हल्ला केला. रोमन सत्ताधीश असे मानत होते की त्यांच्या साम्राज्याच्या उत्तरेला असलेली आल्प्स पर्वतरांगांची अभेद्य भिंत त्यांचे उत्तरेकडून आपसूकच रक्षण करेल. परंतु, हनीबल अनपेक्षितपणे बरोबर त्याच पर्वतरांगांमधून आणि तेही डिसेंबरच्या कडक्याच्या थंडीत पायदळ आणि चक्क आफ्रिकन हत्तींची फौज घेऊन इटलीमध्ये उतरला आणि रोमन सैन्याची धूळधाण उडवत पुढची पंधरा वर्षे त्याने त्या प्रदेशात अधिकार गाजवला. इटलीच्या बाजूला आल्प्सचे कडे तीव्र उताराचे असल्याने त्याला हत्ती उतरवणे शक्य होत नव्हते, तर त्याने त्याच्या सैन्याला कामाला लावून हत्ती चालू शकतील असे रस्ते तयार केले, इतके त्या युद्धात हत्तींना महत्त्व होते. युद्धभूमीत पोहोचेपर्यंत प्रतिकूल वातावरणामुळे त्याच्या सैन्यातले अनेक हत्ती आणि सैनिक प्राणास मुकले, परंतु हनीबलच्या अजोड युद्धनीतीमुळे त्याने उरलेल्या सामग्रीच्या अचूक नियोजनावर युद्धात बाजी मारली. याचप्रकारे भारतीय उपखंडात वापरल्या जाणाऱ्या सैन्य हत्तींबद्दल सांगायचे तर ग्रंथ लिहून होईल इतक्या रोमांचक घटनांबद्दल माहिती उपलब्ध आहेत.

हत्ती पोसणे ही सोपी गोष्ट नाही. प्रौढ हत्तीला खायला रोजचा कमीत कमी दीडशे किलो चारा आणि प्यायला कमीत कमी दीड-दोनशे लिटर पाणी लागते. याशिवाय त्याला फिरायला नेणे, आंघोळ घालणे, स्वच्छता राखणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, थोडक्यात म्हणजे रेग्युलर मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग हे ठरलेले खर्चही जोडीने आलेच. हे सगळे अवाढव्य तंत्र सांभाळता येण्यासाठी सैन्यातल्या हत्तींसाठी पीलखाने म्हणजे गजशाळा असत. रायगडावर जगदीश्वर मंदिराच्या बाहेर असलेला संस्कृत शिलालेख सांगतो, ‘या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’ शिलालेखात गजशाळेचा उल्लेख ‘कुंभिगृह’ असा आहे. श्रीकृष्णाच्या सेनेचे चतुरंग सेना म्हणून जे वर्णन केले जाते त्या सेनेचे चार भाग असत पायदळ, घोडदळ, गज आणि रथ. कालांतराने यातला रथ कालबाह्य झाला, परंतु उर्वरित तीन भाग पुढची अनेक शतके तसेच राहिले. महाभारतातील अंतिम युद्धात आचार्य द्रोण आणि त्यांचा पुत्र अश्वत्थामा यांनी पांडव सेनेचा संहार चालवला होता. ते पाहून श्रीकृष्णाने शत्रूगोटात ‘अश्वत्थामा मेला’ अशी पुडी सोडून दिली. हे ऐकल्यावर खात्री करण्यासाठी द्रोण सत्यवचनी युधिष्ठिराकडे गेले तेव्हा तो कानांवर हात ठेवून म्हणाला, ‘अश्वत्थामा मेला. पण तो माणूस होता की हत्ती माहीत नाही.’ ‘अश्वत्थामा हतः इति नरो वा कुंजरो वा।’ आणि मोठ्या चतुराईने हत्ती नामक शाब्दिक कवचाच्या आडून धर्मराजाने द्रोणांचे मनोबल खच्ची केले.

साम्राज्य जेवढे मोठे तेवढीच सैनिक हत्तींची संख्याही मोठी असायची. मगधाधिशांकडे तीन हजार तर चंद्रगुप्त मौर्याकडे नऊ हजार हत्ती होते. मौर्य साम्राज्यात हत्तींच्या तुकडीच्या प्रमुखाला गजाध्यक्ष तर गुप्त राजांच्या हत्ती दळाच्या प्रमुखाला ‘महापिलूपती’ असे म्हटले जायचे. या प्राण्याला इतके महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्याला पकडणे, त्याला प्रशिक्षण देणे, त्याची निगा राखणे, त्याचे प्रजनन करणे यावर विशेष लक्ष दिले जायचे व त्याचे लेखी पुरावेही उपलब्ध आहेत. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे गजशास्त्र या ग्रंथप्रमाणेच कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही हत्तींबाबत विस्तृत मार्गदर्शन केलेले आढळते. सैन्यहत्ती सर्व प्रकारच्या हल्ला सहन करणारा, त्याच्या स्वाराला सुरक्षित ठेवणारा, दिलेल्या आज्ञा अचूक ऐकणारा, शत्रूसैन्यातील ‘हत्ती, घोडे, पायदळ, रथ’ यांचा पराभव करणारा असला पाहिजे. त्याने सोंड, सुळे, कान, डोके, पाय आणि एवढेच नाही तर शेपटीनेसुद्धा वार केले पाहिजेत, असे उल्लेख तत्कालीन लिखाणात सापडतात. 

मी एकदा एका प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांसोबत चर्चा करत असताना त्यांनी मला मध्ययुगीन युद्धातली एक नीती सांगितली. हत्तींचा वापर करून शत्रूने किल्ल्याचे दरवाजे फोडू नयेत म्हणून दरवाज्याला लोखंडी खिळे लावले जायचे. शनिवारवाड्यातही असे खिळे पाहायला मिळतात. अशावेळी शत्रूकडून एक युक्ती केली जायची. त्या खिळ्यांसमोर एक उंट आडवा ठेवला जायचा व हत्ती धावत येऊन उंटाला धडक द्यायचा. खिळे घुसल्याने उंट मरायचा पण दरवाजा मोडायचा. अशा तऱ्हेने अगदी यांत्रिक वाहनांचा शोध लागेपर्यंत युद्धात हत्तींचा पुरेपूर वापर झाला. पण ते म्हणतात ना की पहिले विमान उडले आणि किल्ल्यांचे महत्त्व संपले (कारण आकाशातून हल्ला करणे शक्य झाले) तसेच हत्तींचे झाले. 

जाता जाता आठवलेली एक गंमत सांगतो. पेशव्यांकडे भवानी नावाची एक हत्तीण होती. ती युद्धात पुढे राहून ढालीसारखे काम करायची. म्हणून तिला ‘ढाल-गज’ भवानी म्हटले जायचे. आता हा शब्दप्रयोग कुठल्या अर्थाने केला जातो पाहा!

संबंधित बातम्या