कुक्कुटकथा

मकरंद केतकर
सोमवार, 12 एप्रिल 2021

सहअस्तित्व

एकीकडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे?’ या कोड्यात शास्त्रज्ञांना टाकून दुसरीकडे जागतिक पातळीवर पोल्ट्री व्यवसाय वार्षिक पंचेचाळीस अब्ज डॉलर्सच्या उलाढालीपर्यंत पोहोचून अब्जावधी लोकांना रोजगार आणि पोषण देणाऱ्‍या पक्ष्याची ही छोटीशी कुक्कुटकथा आहे. 

निसर्गाशी फारशी जवळीक नसलेल्या एखाद्या शहरी शाळकरी पोराला, त्याला ठाऊक असलेल्या पक्ष्यांची यादी करायला सांगितली तर कोंबडीचा नंबर नक्कीच वरच्या दर्जाच्या मानकऱ्‍यांमध्ये लागेल. फक्त शेतीच नव्हे तर औषधे, खते, मनोरंजन, धर्म तसेच संस्कृती अशा विविध क्षेत्रात या पक्ष्याचे स्थान फार महत्त्वाचे आहे. फारसे उडू न शकणारे, मोठ्या पायांचे, बोजड असूनही चपळ असणारे पक्षी ज्या कुळात येतात, त्या ‘फेजीनिडी’ कुळाची कोंबडी सदस्य आहे. गावठी कोंबडीचे रानटी वंशज आजही भारतातल्या जंगलात सापडतात. सातपुडा पर्वतरांगेपासून उत्तरेकडच्या जंगलात आढळणारा ‘लाल रानकोंबडा’ (रेड जंगल फाउल) हा जनुकीय दृष्ट्या गावठी कोंबडीशी सत्तर टक्के जवळीक दाखवतो. याचबरोबर, सह्याद्रीतली रानभटकंती ज्यांनी केली आहे त्यांना ‘कॅssss कॅककॅsss कॅक-क-कॅक’ अशी बांग ठोकणारा ‘राखी रानकोंबडा’ (ग्रे जंगल फाउल) चांगल्याच परिचयाचा असतो. त्याच जंगलात ‘कॅकॅकॅक कॅकॅकॅक’ असा एकसुरी आवाज काढणारी काकोत्रीही (रेड स्पर फाउल) अनेकांनी पाहिली आणि ऐकली असेल. 

चटकन माणसाळणारा, वेगवान पैदास असणारा, देखभालीचा खर्च अत्यंत कमी असलेला आणि प्रथिनांचा चांगला पुरवठा करणारा हा पक्षी सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंड तसेच दक्षिण आशियातील माणसाच्या सेवेत दाखल झाला. वाचून आश्चर्य वाटेल, पण अनेक संशोधकांच्या मते सुरुवातीला अन्नापेक्षा कुक्कुट-युद्धाच्या मनोरंजक खेळासाठी कोंबड्या पाळल्या गेल्या असाव्यात. त्यानंतर हळूहळू त्यांचा अन्नासाठी वापर वाढत गेला. कुक्कुटपालनाच्या पद्धतीचे इसवी सन चारशे वर्षांपासूनचे जुने पुरावे इस्राईल देशातल्या मारेशा या शहराजवळील एका पुरातत्त्व उत्खननात मिळाले आहेत. चाकू सुऱ्‍यांचे घाव असलेली कोंबड्यांची हजारो हाडे संशोधकांना तिथे सापडली. त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की यात नरापेक्षा माद्यांची हाडे जास्त आहेत. कोंबड्यांच्या झुंजीत फक्त नरांचा वापर होतो, माद्यांचा नाही. याचाच अर्थ तिथल्या लोकांनी अन्नासाठी कुक्कुटपालनाचे तंत्र अवगत केले होते. एखादी गोष्ट अन्न म्हणून सर्वमान्य व्हायला अगदी संपूर्ण समाजाची नसली, तरी त्यातल्या अधिकतम सदस्यांची मान्यता मिळावी लागते. घरगुती पातळीवर कमी खर्चात सहज पाळता येणारा आणि झटपट पैदास होणारा सामिष अन्नाचा स्रोत म्हणून कोंबडी हा पक्षी प्रसिद्ध होत गेला असावा. 

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात युरोपातही कुक्कुटपालनाने मान्यता मिळवली असल्याचे आढळते. अर्थात मसाल्यांप्रमाणेच या पक्ष्यांचाही प्रवास आशियाई देशांकडूनच तिकडे झाला. पुढे त्यांच्यावर संकराचे प्रयोग करून अधिक मांस व अंडी देणाऱ्‍या अनेक जाती निर्माण केल्या गेल्या. यापैकी आपल्याला सवयीने ब्रॉयलर हे नाव ऐकून पाठ असले तरी ‘ऱ्‍होड आयलंड रेड’ नावाची जात भारत तसेच जगभर मांस व अंड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. 

मांसाबरोबरच अंडी हासुद्धा प्रथिनांचा एक उच्चतम व स्वस्त स्रोत आहे. अनेकांना पडणारा एक साहजिक प्रश्न म्हणजे कोंबडी रोज अंडी कशी काय देते? याचे उत्तर ‘आपण त्यांच्या प्रजनन क्रियेत केलेला हस्तक्षेप’ असे आहे. अंडी घालणे ही क्रिया फक्त प्रजननाशी निगडित आहे आणि कुठलाही पक्षी वर्षातून एक किंवा दोन वेळा फक्त प्रजननासाठीच अंडी घालतो. अगदी कोंबड्यांचे रानटी नातेवाईकसुद्धा वर्षातून एकदा किंवा दोनदा अंडी घालतात. अंडी घातल्यानंतर ती उबवायला घेतली की पक्ष्यांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात व शरीरातील अंडी निर्मितीची प्रक्रिया थांबते. पण अंडे घातल्यावर जर ते तिथून काढून घेतले, तर पक्षी पुन्हा अंडे घालतो. जगात जे जे पक्षी संकटग्रस्त आहेत त्यांच्या प्रजननासाठी ही पद्धत वापरली जाते. उदा. राजस्थानमध्ये माळढोक पक्ष्याच्या संवर्धन योजनेनुसार, त्या पक्ष्याने अंडे घातले की ते त्याच्या अधिवासातून उचलून आणून संशोधन केंद्रातील कृत्रिम अंडी उबवणी यंत्रात ठेवले जाते. जेणेकरून अधिक पिल्ले निर्माण केली जाऊ शकतील व या संकटग्रस्त पक्ष्याची संख्या वाढवता येईल. तर, कोंबडीमध्येही अशाच पद्धतीने अंडे काढून घेतले जाते व ती जवळपास रोज अंडे देत राहते. जातींनुसार अंडी देण्याच्या संख्येत फरक असला, तरी जन्मल्यानंतर सहा महिन्यांनी वयात आलेली कोंबडी साधारण दीड वर्षाच्या काळात सरासरी अडीचशे ते तीनशे अंडी घालते. यानंतर ती मोल्टिंगवर जाते म्हणजे तिची जुनी पिसे गळून नवी पिसे येण्याची प्रक्रिया सुरू होते व याचवेळेला कुक्कुटपालक तिला मांसासाठी विकून टाकतात. अंड्यांमधून पिल्ले जन्माला येण्यासाठी तिचे नरासोबत मीलन होणे आवश्यक असते, अन्यथा अंडी अफलित राहतात जी आपण खातो. तसेच तिला पुरेसे कॅल्शियम आणि पोषण न मिळाल्यास कोंबडी पुरेशी अंडी देऊ शकत नाही. वर म्हटल्याप्रमाणे झुंजीमध्ये कोंबडे वापरले जातात, कोंबड्या नाही. पण म्हणून कोंबडी मवाळ असते असे अजिबात नाही. दहा बारा पिल्लांचा कळप घेऊन ऐटीत फिरणारी कोंबडी पिल्लांना धोका आहे असे जाणवल्यास घशातून उग्र आवाज काढते, पंख पसरून इशारा देते आणि तरीही शत्रूने माघार घेतली नाही तर आक्रमक होऊन हल्ला चढवते. तिची नखे आणि चोच शत्रूला चांगलेच घायाळ करू शकतात. पिल्लाच्या रक्षणार्थ त्यांच्या आईने विषारी सापालाही चोची मारून पळवून लावल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. 

पुढील काही लेखांमधून माणसाशी जवळीक साधलेल्या अशाच आणखी 

काही विविध बहुगुणी पक्ष्यांची माहिती 

आपण घेऊ.

संबंधित बातम्या