असावा सुंदर लाळेचा बंगला

मकरंद केतकर
सोमवार, 3 मे 2021

सहअस्तित्व

या विश्वात काळ हा जसा सर्वभक्षी आहे, तसाच पृथ्वीतलावर माणूस देखील सर्वभक्षी आहे. म्हणजे शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी यानंतर फक्त माणसांना लागू पडेल अशी ‘सर्वाहारी’ ही संज्ञा वापरायला हरकत नाही. माणूस दगड, माती, प्राणी, पक्षी, वनस्पती तर खातोच, पण त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या इतर गोष्टीही खातो. अशाच एका प्राणिज खाद्यपदार्थाची ही गोष्ट आहे. 

जगात चीन हा असा प्रदेश आहे, जिथे अखाद्य असलेले पदार्थ विरळच असतील. अर्थात मी काही त्यांची चेष्टा करत नाहीये, कारण जगभरातली विविध संस्कृतींमधली माणसे विविध गोष्टींचे भक्षण करतात, जे इतर समाजातल्या लोकांना विचित्र वाटू शकते. असो तर मुख्यतः चीन आणि चिनी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या देशांमध्ये एका पाकोळीच्या घरट्याचे सेवन केले जाते.

जगभर या पाकोळीला ‘एडिबल नेस्ट स्वीफ्टलेट’ या नावाने ओळखले जाते. हिच्या नावातूनच आपल्याला कळले असेल की या पाकोळीचे घरटे ‘खाद्य’ आहे. जेमतेम चौदा पंधरा ग्रॅम वजन आणि चिमणीएवढा आकार असलेल्या या पक्ष्याच्या भारत आणि पूर्वेकडील देशांमध्ये सहा उपजाती आढळतात. हा पक्षी उंच डोंगरातल्या जंगलापासून समुद्रसपाटीच्या प्रदेशापर्यंत आढळतो. पाकोळी तसेच भिंगरी कुळातले पक्षी रात्र वगळता क्वचितच जमिनीवर उतरतात. दिवसभर हवेत उडत राहून ते माश्या आणि छोटे कीटक कमालीच्या सफाईने पकडतात. या पक्ष्यांचा वावर मुख्यतः हवेतच असल्याने त्यांचे पाय हालचालींसाठी निरुपयोगीच असतात. हेलिकॉप्टरच्या लॅंडिंग स्कीड्सप्रमाणे फक्त एका जागी बसणे या एकाच क्रियेसाठी त्यांचा उपयोग होत असल्याने तुम्हाला पाकोळी कधी चालताना किंवा पळताना दिसणार नाही. 

या वंशांतील सर्वच पक्षी अत्यंत अवघड जागी घरटी बांधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उंच इमारती, कडेकपाऱ्‍या अशा ठिकाणी आपापल्या जातीच्या नियमानुसार माती, चिखल याचा वापर करून त्यांनी तयार केलेले वाटीच्या आकाराचे घरटे तुम्ही पाहिले असेल. एडिबल नेस्ट स्वीफ्टलेट या पक्ष्याची घरटीदेखील अंधाऱ्‍या कपाऱ्‍यांमध्ये असतात. फक्त फरक एवढाच आहे, ही घरटी हे पक्षी आपल्या लाळेपासून तयार करतात. ज्ञात इतिहासानुसार चीनमध्ये या घरट्यांपासून तयार केलेले सूप औषधी आणि पोषक मानले जाते. यामुळेच या घरट्यांना चीनमध्ये मोठी मागणी आहे आणि त्यांची संख्या पाहता हळूहळू या पक्ष्यांच्या घरावर शब्दशः कुऱ्‍हाड कोसळली. हे पक्षी उंच पर्वतांमधील गुहा तसेच समुद्र किनाऱ्‍यांवर असलेल्या कपाऱ्‍यांमध्ये घरटी करतात. अत्यंत धोकादायक ठिकाणी असलेली ही घरटी काढणे आणि त्यांची चीनला निर्यात करणे हा अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय झाला आहे.

प्रत्येकी जेमतेम काही ग्रॅम वजनाचे नर आणि मादी मिळून प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाची चिकट लाळ निर्माण करतात. त्यापासून दगडाला चिकटलेले दुधी रंगाचे कपाच्या आकाराचे घरटे तयार केले जाते. या घरट्यात मादी एक किंवा दोन अंडी घालते. नर आणि मादी दोघे मिळून पिल्लांचे पालनपोषण करतात. गेली लाखो करोडो वर्षे हे चक्र सुरळीत सुरू होते. पण कोणे एके दिवशी या घरट्याची खाद्य म्हणून उपयुक्तता माणसाला कळली आणि बांबूंच्या उंच उंच शिड्या लावून ही घरटी अलगदपणे काढून घेणे सुरू झाले. पूर्वी पिल्ले उडून गेली की घरटी काढली जायची. पण पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला सद्सद्‍विवेकबुद्धी विसरायला लावते. त्यामुळे फार पूर्वीपासूनच प्रजनन हंगामाच्या सुरुवातीलाही म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी घरटी बांधली की ती शिड्या लावून काढून घेतली जातात. यामुळे पक्ष्यांना पुन्हा घरटे करण्याची कसरत करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा लाळ वापरायची म्हणजे त्यांच्या शरीरसंस्थेवर ताण येतो. तसेच या बांधकामात वाया जाणाऱ्‍या वेळामुळे पिल्ले जन्माला घालून त्यांना वाढवण्यातसुद्धा अधिक वेळ खर्ची पडतो. यामुळे त्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले. 

या घरट्यांच्या काढण्यामुळे जसा पक्ष्यांना धोका निर्माण झाला, तसाच माणसांच्या जिवालाही झाला. अनेक जण साठ सत्तर फूट उंचीवरून पडून मरण पावले आहेत. पण तरी ही जोखीम पत्करली जाते, कारण या घरट्यांचा व्यापार फार मोठा आहे. एक किलो वजन भरण्यासाठी तब्बल शंभर ते एकशेवीस घरटी गोळा करावी लागतात. एका किलोमागे साधारण सहा हजार डॉलर्स मिळतात. या व्यापाराची व्याप्ती वार्षिक तीन हजार मेट्रिक टन इतकी असून पाच अब्ज डॉलर्सची उलाढाल यातून होते. इंडोनेशिया या व्यापारात अग्रस्थानी आहे. त्यानंतर मलेशिया, थायलंड इत्यादी देशांचा नंबर लागतो. 

या घरट्यांच्या ‘शेतीवर’ केलेल्या अभ्यासामुळे वन्य अधिवासातील पक्ष्यांच्या आयुष्यावर होऊ लागलेले विपरीत परिणाम समोर येऊ लागले. मग वन्य अधिवासातील घरट्यांना पर्याय शोधण्यात येऊ लागले आणि कृत्रिम अधिवासातील घरटी ही कल्पना राबवण्यात येऊ लागली. म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड, जावा अशा अनेक देशांमध्ये गेल्या दोन दशकांपासून पोल्ट्रीप्रमाणे या पक्ष्यांची मोठी खुराडी बांधण्यात येत आहेत. या पक्ष्यांचे रेकॉर्ड केलेले आवाज स्पीकरवर वाजवून त्यांना आकृष्ट केले जाते आणि एकदा का त्यांना त्या अंधाऱ्‍या खोल्या उपयुक्त वाटल्या, की ते छताला लावलेल्या लोखंडी पट्ट्यांवर घरटी करायला सुरुवात करतात. कितीही उपद्रव झाला तरी हे पक्षी सहसा आपली वसाहतीची जागा बदलत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच जागेवर त्यांच्या घरट्यांचे उत्पादन घेता येते. तसेच नियोजन करून बांधलेल्या खुराड्यांमुळे घरटी काढणेही अधिक सुरक्षित झाले आहे. यामुळे उत्पादन वाढून कोणे एके काळी फक्त शाही आणि श्रीमंत घराण्यांपुरते मर्यादित असलेल्या सूपचा आस्वाद आता मध्यमवर्गीयही घेऊ शकतात.

संबंधित बातम्या