मारिओची पुस्तके 

विजय तरवडे
सोमवार, 9 मार्च 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन.

‘द  गॉडफादर’ लिहिणाऱ्या मारिओ पुझोने ‘द गॉडफादर पेपर्स’ पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणात कादंबरीवर लिहितालिहिता सांगितलेली स्वतःची आत्मकहाणी मूळ कादंबरीपेक्षा रोचक आहे. हेल्स किचन नावाच्या स्थलांतरितांच्या वस्तीत जन्माला आल्यावर आणि मोठा झाल्यावर त्याने लेखक-पत्रकार-संपादक व्हायचे ठरवले, काबाडकष्ट केले. वयाच्या पन्नाशीत त्याला खरेखुरे आणि आर्थिक यश लाभले. त्याच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांचे समीक्षकांनी माफक कौतुक केले. पण तो आणि कुटुंब कर्जबाजारी झालेले होते. प्रकाशकांनी ‘द गॉडफादर’ स्वीकारल्यावर चार लाख दहा हजार डॉलर्स मानधन ठरले. त्याने आनंदाने आईला बातमी सांगितली. पण आईने सर्वांना ही रक्कम चाळीस हजार सांगितली. कोणाला खरा आकडा कळू नये म्हणून! अशा अनेक आठवणी यात दिल्या आहेत. 

मारिओ पुझोची ‘द फोर्थ के’ (१९७२) ही अमेरिकेतली राजकीय पार्श्वभूमी असलेली कादंबरी आहे किंवा राजकीय कादंबरी आहे. एक चित्तथरारक बांधेसूद कथानक गुंफताना त्यातील पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःची मते मांडतो. लंडनचे वर्णन करताना पुलंची अपूर्वाई जशी सतत आपला हात ओढून आपल्याला पुण्यात आणते, तद्वत मारिओ पुझो आपल्याला चकित करीत असतो. यातला चौथा के म्हणजे फ्रान्सिस केनेडी हा केनेडींच्या वंशातील देखणा पुरुष आहे. त्याने काकांचे खून आणि तेव्हाचे वातावरण जवळून अनुभवले आहे. फ्रान्सिस पहिल्या खेपेला अध्यक्षपदी सहज निवडून येतो. 

कायद्याचा प्राध्यापक असताना फ्रान्सिस विद्यार्थ्यांसमोर म्हणतो, ‘दुष्ट जनमानसाच्या अनुनयाखातर कायदा वाकवता येतो. श्रीमंतांना त्यातून पळवाटा सापडतात. गरीब क्वचितच सुटतात. कुंटणखान्यातील दलाल, स्त्रियांचे शोषण करतात त्याप्रमाणे वकील लोक कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेतात. न्यायाधीश मंडळी कायद्याचा लिलाव करतात. हे खरे असले तरी अन्य पर्याय नसल्यामुळे ही व्यवस्था आपल्याला हवी आहे.’ फ्रान्सिस सुरुवातीला भला माणूस आहे. त्याच्याबद्दलचे एक मत - ‘तो आदर्शवादी आहे. तो विचारवंत आहे, त्याच्यापाशी नैतिकता आहे. पण राजकीय यशाच्या वाटेतले हे मोठे अडथळे आहेत. स्खलनशील नसलेला नेता म्हणजे शीड नसलेले जहाज.’ 

कादंबरीच्या सुरुवातीला दहशतवादी रोमच्या पोपची हत्या करतात. या धक्क्यातून जग सावरण्याच्या आत फ्रान्सिसच्या मुलीचे तिच्या अंगरक्षकांसह आणि विमानासह अपहरण करतात. विमान शेराबेन नावाच्या देशात नेले जाते. शेराबेनचा सुलतान स्वच्छतेचा अतिरेकी भोक्ता आहे. त्याचे वर्णन वाचले की स्वच्छतेच्या हव्यासापायी हस्तांदोलन टाळणाऱ्या सद्दाम हुसेनची आठवण येते. इथे इंच नावाचा उद्योगपती रंगवला आहे. इंटरनेटवर काही अमेरिकन वाचकांनी त्याचे वर्णन वाचून ट्रंप यांची आठवण होत असल्याचे मत नोंदवले आहे. फ्रान्सिसच्या मुलीला दहशतवादी ठार करतात. दोन माथेफिरू न्यूयॉर्कमध्ये अणुबॉम्बचा स्फोट घडवून आणतात. ख्रिश्चन क्ली या ॲटर्नी जनरलला बॉम्बस्फोटाची पूर्वकल्पना असते आणि फ्रान्सिसबद्दल सहानुभूतीची लाट उसळावी म्हणून त्याने दुर्लक्ष केले असा काहींचा संशय आहे. काही वाचकांना न्यूयॉर्कवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हे वर्णन आठवल्याची नोंद आहे. 

दहशतवाद्यांनी मुलीचा खून केल्यावर फ्रान्सिस काही तास आतून कोसळतो. पण लगेच सावरतो आणि आमूलाग्र बदलतो. एका ज्येष्ठ नेत्याने हे भाकित आधीच केलेले आहे - ‘वाईटात वाईट जे घडायचे, ते घडून गेले की मग माणूस अतिशय कणखर बनतो.’ फ्रान्सिसची पत्नी आधीच निर्वतली आहे. आता मुलगी नाही. मोठ्या आजारातून उठावे तसा तो उठतो आणि अतिशय कणखर पोलादी निर्णय घेऊन राबवतो. मुदत संपल्यावर दुसऱ्यांदादेखील अध्यक्षपदी सहज निवडून येतो. 
फ्रान्सिसच्या मनात वर्क कॅम्प प्रकल्प उभारून गुन्हेगारांना स्वतंत्र छावण्यांत ठेवण्याची कल्पना आहे. रेव्हरंड त्याला विरोध करतो. 

दुसऱ्या फेरीत विजय मिळाल्यावर फ्रान्सिसचे लग्न ठरते. पण रॅलीमध्ये भाग घेत असताना गर्दीत मिसळून लोकांशी हस्तांदोलन करीत असतानाच त्याचा आणि ॲटर्नी जनरल ख्रिश्चनचादेखील खून होतो. तिथल्या प्रथेप्रमाणे उपाध्यक्ष हेलन अध्यक्ष होते. एका कार्यक्रमात मनोमन फ्रान्सिसचे स्मरण करताना ती स्वतःशी म्हणते, की फ्रान्सिसची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करीन. इथे कादंबरीचे शेवटचे वाक्य असे आहे - आणि त्याच वेळी दुष्टाव्याचे साधेपण आणि चांगुलपणाचे खतरनाक कुतूहल तिच्या मनात दाटून आले. 
‘द लास्ट डॉन’ ही निखळ हळवी, स्वप्नाळू कादंबरी सुखांतिका आवडणाऱ्यांना तो आनंद देते. यातला नायक क्रॉस माफिया कुटुंबातला अनाथ तरुण आहे. त्याच्याच चुलत भावाने त्याच्या वडिलांचा खून केला आहे. क्रॉस अथेना या अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. तिचा छळ करणाऱ्या दोघांचा काटा काढतो. 

क्रॉसचे प्रेमात पडणे साध्या, सुंदर भाषेत लिहिले आहे - ‘तिचे दर्शन, तिचे बोलणे, तिचे विभ्रम, तिचा आनंद आणि दुःख... सगळे त्याच्यासाठी साक्षात सुख होते. तिच्या सहवासात त्याचे जग सुंदर होते, अन्न सुग्रास होते, सूर्याची ऊब सुखावह होती, तिच्या शरीराची ओढ आपले असणे पवित्र करते आहे असे त्याला वाटत होते. तिच्याबरोबर निजल्यावर पहाटेची भयंकर स्वप्नेदेखील दिसत नसत. कधीतरी ती आपल्या प्रेमाला प्रतिसाद देईल, एखाद्या देवदूतीप्रमाणे या नरकसदृश आयुष्यातून मला वर उचलून नेईल.’  

अथेनाची मुलगी बेथनी स्वमग्न आहे. पण ती फक्त क्रॉसला अधूनमधून प्रतिसाद देते. तिच्यावर उपचार करण्यासाठी अथेना चित्रपटसृष्टी सोडून फ्रान्सला येते. क्रॉसदेखील आपल्या माफिया कुटुंबाशी असलेले संबंध तोडून आणि मालमत्तेवर पाणी सोडून तिच्या पाठोपाठ येतो. तिच्याबरोबर आणि तिच्या मुलीबरोबर राहण्याचा निर्णय घेतो. ती लग्नाला आणि संसार मांडायला राजी होते.

संबंधित बातम्या