खळखळून हसणारे विडंबन

विजय तरवडे
सोमवार, 13 जुलै 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

विपुल लेखन करणारे विनोदी लेखक अनेकदा ठराविक पात्रांना जन्म देतात. त्याचा फायदा असा की पहिल्या कथेत, लेखात त्या पात्राचे शारीरिक वर्णन केले, स्वभाववैशिष्ट्ये सांगितली, की पुढच्या वेळेस ते पात्र आयते वापरता येते.  

  सत्तरच्या दशकात आम्हाला जेम्स बॉंड पुस्तकातून ठाऊक झाला. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर त्याचे चित्रपट बघण्याचा परवाना प्राप्त झाला. चित्रपटातले कथानक तेच असले, तरी पाश्चात्यांचे सफाईदार कलादिग्दर्शक, ट्रिक सीन्स आणि जेम्स बॉंडची धाडसी प्रणयदृश्ये हे त्या चित्रपटांचे यूएसपी होते. जेम्स बॉंडवर कितीही संकटे आली तरी तो मरणार नाही, हरणार नाही, लढाईत जिंकणार आहे, हे ठाऊक असल्याने चित्रपट बघताना कोणताही मानसिक ताण नसे. जेम्स बॉंडला ००७ उपाधी होती. यातील दोन शून्ये म्हणजे एका कामगिरीत त्याने दोन शत्रूंना ठार केल्याची नोंद होती. त्या काळात शर्ट इन करून ‘००७ बेल्ट’ वापरणे ही फॅशन लोकप्रिय झाली होती. 

पुस्तके वाचून झाली. चित्रपट पाहून झाले. त्यातले नावीन्य सरले आणि काही वर्षांनी अचानक रमेश मंत्री यांचा जनू बांडे भेटला. जनू बांडे हे एक खळखळून हसवणारे अफलातून विडंबन होते. ज्याने तरुणपणी जेम्स बॉंडचा आनंद घेतला आहे, त्या सिनेमातली जेम्स बॉंडची जगावेगळी उपकरणे, शस्त्रे, न्यूटनने प्रतिपादलेले गुरुत्वाकर्षणाचे, गतीचे आणि भौतिक शास्त्रातले सगळे नियम फाट्यावर मारून केलेल्या त्याच्या अतर्क्य मारामाऱ्या वगैरेंचा आनंद घेतला असेल, त्याला जनू बांडेची मौज समजेल. ००७ जेम्स बॉंडचा जनू बांडे ०००५ आणि मिस्टर एमचे श्रीयुत ण करून लेखकाने सलामीलाच षटकार ठोकला आहे. वसंत सरवटे यांनी प्रत्येक पात्राची अफलातून अर्कचित्रे सादर केली आहेत. 
 श्रीयुत ण जनूवर विविध कामे सोपवतात आणि त्या निमित्ताने जनूसह आपले देखील विदेश पर्यटन होते. पहिल्या भेटीत एकमेकांची ओळख पटण्यासाठी गुप्तहेर परवलीचे शब्द – पासवर्ड्स वापरतात. इथे लेखकाने जनूला ‘आई थोर तुझे उपकार’ किंवा ‘गेट आउट ऑफ इंडिया’सारखे परवलीचे शब्द वापरले आहेत. जेम्स बॉंडच्या सिनेमात पावलोपावली येणाऱ्या चुंबनदृश्यांची पुस्तकात पानोपानी थट्टा केली आहे. सगळे विनोद घटनाप्रधान आहेत. शाब्दिक कोट्या नाहीत. त्यामुळे त्यांची उदाहरणे देता येत नाहीत. गुप्तहेरांचे आपसातले संवाद रंगवताना लेखक ‘अक्षरशः सुटला’ आहे. विदेशी गुप्तहेराशी बोलताना जनू सांगतो, 'आमच्या देशात हेरखातेच नाही. जे आहे ते सरकारला स्वतःसाठीच लागते. म्हणजे विरोधी पक्षातला कोण सभासद फुटून आपल्याकडे येतो किंवा आपल्यातला फुटून तिकडे जातो, कोणावर पाळत ठेवायची, कोणाचे फोनवरचे संभाषण टिपायचे, यातून बिचारे गुप्तहेर आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे लक्ष देणार तरी कधी?'

 हॉलिवूडमधले कलाकार भारतातील एका साधूच्या कच्छपी लागल्यावर त्यांना तिथून अमेरिकेत नेण्यासाठी जनूला भाडेतत्त्वावर अमेरिकेत नेले जाते. तिथे तो एका साधूचे रूप धारण करतो. हॉलिवूडचे निर्माते त्याला करारपत्र देतात. तो न वाचता सही करतो, तेव्हा निर्माते म्हणतात, 'आमच्याकडे अशीच पद्धत आहे. एका नटीने चुकून करारपत्राऐवजी रेल्वेच्या टाइमटेबलवर सही केली. आम्हीदेखील त्यावर सही केली. कोणाच्याच लक्षात आले नाही. काहीही अडचण न येता चित्रपट पूर्ण झाला!'   

 जनूला आलुविया देशात हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी जावे लागते. तिथल्या प्राचार्यांनी गुप्ततेच्या नियमाखातर स्वतःचे नाव कोणाला कळू दिले नव्हते. लग्नानंतर बायकोलादेखील नाही. दोघे एकमेकांना नवरा आणि बायको अशी हाक मारीत. एका प्रसंगी जनूने त्यांची थट्टा केल्यावर ते म्हणतात, 'मिस्टर बांडे, ही थट्टेची वेळ नाही. आपल्या हेरगिरी महाविद्यालयात सकाळी दहा ते सव्वा दहा आणि दुपारी चार ते सव्वा चार याच वेळात थट्टा करायला परवानगी आहे. एरवी थट्टा करणारा शिक्षेस पात्र होतो.' एका देशातला शास्त्रज्ञ जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विश्वबंधुत्वाची लस तयार करतो आणि ती टोचल्यावर माणूस प्रेमळ होतो. ही लस ताब्यात घेण्यासाठी जनू जे कारनामे करतो ते मुळातूनच वाचायला हवेत. त्यात यश मिळाल्यावर श्रीयुत ण म्हणतात, 'जगातली सारी राष्ट्रे विश्वबंधुत्वाने बांधली गेली, तर हेरखाते बरखास्तच की. मग तुम्हाला आम्हाला नोकऱ्या कोण देणार? आणि मग हाणामाऱ्या नसतील, तर जीवनात गंमत काय राहिली?'  

 जनू बांडेबद्दलचा एक किस्सा सांगायलाच हवा. एका तरुण मित्राने शाळेत असताना वाचनालयात समग्र जनू बांडे वाचला होता. पण जेम्स बॉंड ठाऊक नसल्याने त्याला त्यातली मुख्य गंमतच समजली नाही. पुढे काही वर्षांनी जेम्स बॉंडचे चित्रपट पाहिल्यावर त्याला जनू बांडेची पुस्तके अंधूक आठवली. त्याने फेसबुकवर चौकशी केली. पुस्तके शोधली, वाचली आणि विडंबनाचा आनंद घेतला. सोशल मीडियाच्या या काळात मंत्री हवे होते. जनू बांडेप्रमाणेच त्यांनी बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्गचे नवे अवतार म्हणून बाळू फाटक आणि गुणाजी तोंडबुके नक्की साकार करून आपल्याला हसवले असते.

संबंधित बातम्या