अद्‍भुताची सफर 

विजय तरवडे 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

गौरी देशपांडे यांनी केलेले अरेबियन नाईट्सचे भाषांतर पहिल्यांदा वाचले त्याला पंचेचाळीस वर्षे लोटली. नंतर अनेकदा सहज किंवा संदर्भ शोधण्यासाठी वाचले. पण त्यातली खुमारी सरली नाही. अरेबियन नाईट्सच्या कथा, रिचर्ड बर्टन, गौरी देशपांडे आणि रमेश रघुवंशी यांच्या प्रस्तावना आणि अगणित तळटीपा हे अनेक अंगांनी समृद्ध करणारे अनुभव आहेत. 

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अरेबियन नाईट्सच्या कथा अरबीतून इंग्रजीत आणण्यासाठी रिचर्ड बर्टन यांनी अरब प्रदेशात वास्तव्य केले. तिथली संस्कृती न्याहाळली, भाषा शिकून घेतली आणि भाषांतर सिद्ध केले. १८८५ मध्ये प्रकाशित झालेल्या या भाषांतराच्या प्रस्तावनेत रिचर्ड बर्टन म्हणतात, एका अरबाने या गोष्टी इंग्रजीत लिहायच्या ठरवल्या तर तो कसा लिहील याची कल्पना करून भाषांतर केले आहे. इंग्रजी साहित्यात आपण मोलाची भर घालत असल्याचे त्यांना भान आहेच. पण आणखीन एक पूरक उद्देश ते सांगतात. त्यांच्या मते, हिंदू आणि अरबी संस्कृतीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे ही इंग्रज सरकारची चूक आहे. हा अभ्यास नसल्याने प्रशासनात गंभीर चुका होतात. १८५७ च्या उठावाची आणि भारतीयांच्या असंतोषाची तात्कालिक कारणे आठवली म्हणजे रिचर्ड बर्टन यांच्या भूमिकेचे महत्त्व लक्षात येते. 

गौरी देशपांडे यांनी आपल्या प्रस्तावनेत रिचर्ड बर्टनच्या आधी अरेबियन नाईट्सची भाषांतरे करणाऱ्या पाश्चात्त्य अभ्यासकांची यादी आणि इतर माहिती दिली आहे. रिचर्ड बर्टनना इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, अरबी, फारसी, हिब्रू, संस्कृत, उर्दू, हिंदुस्थानी, सिंधी, मराठी व गुजराती भाषा अवगत होत्या. अरेबियन नाईट्सची रिचर्ड बर्टनकृत पहिली आवृत्ती वाराणसी येथील कामसूत्र सोसायटीने छापून प्रकाशित केली. 

बालपणी आपण स्वतंत्र म्हणून वाचलेल्या, कथासरित्सागर किंवा अरेबियन नाईट्सच्या उल्लेखानिशी वाचलेल्या सगळ्या कथा या भाषांतरांमध्ये कधी जशाच्या तशा किंवा कधी वेगळ्या प्रारूपात भेटतात. सिंदबादच्या सफरी, जादूचा दिवा, गुलबकावली, अलिफ लैला वगैरे. यातील काही धीट कथा त्यातल्या संवादांमुळे वरकरणी अश्लील वाटतील. पण रिचर्ड बर्टन आणि गौरी देशपांडे यांनी मांडलेल्या भूमिकेतून वाचल्या तर त्यांचे निरागसपण लक्षात येईल. यातल्या एकाही कथेत व्यभिचाराचे वर्णन किंवा समर्थन नाही. लबाडी ठायीठायी आढळते, पण तिला जगातील सर्वशक्तिमान शक्तीकडून शिक्षा मिळून शेवटी सत्याचा विजय होतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा मोठे आकार, जादुई शक्ती, मंत्रसामर्थ्य, दीर्घायुष्य लाभलेले राक्षस, जिनी, जिनिया इथे आहेत. पण हे सगळे देवाच्या अधीन आहेत. 

हे बालसाहित्य आहे का? आहेही आणि नाहीही. हे आपल्यातल्या लहान मुलाला सुखावते. आपल्याला पुन्हा लहान करते. पण प्रौढत्वाचा, प्रगल्भतेचा हात सोडू देत नाही. अरबांमुळे अनेक शतके युरोपियन आक्रमक मसाल्याच्या पदार्थांसाठी भारतात येऊ शकले नाहीत. शेवटी वास्को द गामाने भारतात येण्यासाठी समुद्रमार्ग शोधला. अप्रत्यक्षपणे काही शतके आपल्यावरची इंग्रजी राजवट रोखणारे हे अरब कसे होते? त्यांच्या चालीरीती, त्यांच्या श्रद्धा आणि समजुती या कथांमधून उलगडतात. आपल्या आणि त्यांच्या दोघांच्या तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीतली साम्यस्थळे आणि भेद ठाऊक होतात. पहिल्या खंडाला सुरुवात करताना ‘अल्ला हो आलम’ या शब्दात ईशचिंतन केले आहे. तळटीप सांगते, की जेव्हा आपल्या तोंडून अंशतः किंवा पूर्ण असत्य बाहेर पडण्याची शक्यता असेल तेव्हा आधी ‘अल्ला हो आलम’ म्हणण्याची (माफी मागण्याची) पद्धत होती. अरेबियन नाईट्सबाबत अरबांमध्ये असलेला एक समज म्हणजे जो या सगळ्या कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला मरण येते! 

हे वाचायला आपल्याला का आवडते? रोजच्या रटाळ आणि हतबल जगरहाटीपासून दूर नेणाऱ्या नाईट्सच्या जगात आपण तात्पुरते जातो. असे काहीसे जग कुठे तरी असू शकेल असे वाटते... पण ते तसे नसते हे आपल्यालाही माहीत असते. तरीही प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे अतिमानवी शक्तीचे, अजब, जादुई जगाचे आकर्षण वाटून जातेच जाते. मग शक्यतेला धाब्यावर बसवणारे हे साहित्य वाचून तो रोजचे रखरखीत वास्तव विसरतो, स्वतःला जादूच्या स्वाधीन करतो आणि म्हणतो, ‘हे खरेच असे का नाही होणार?’ 

या भाषांतरात वापरलेल्या भाषेबद्दल आवर्जून सांगायला हवे. अशा पार्श्वभूमीवर लिहिताना जवळपास सर्वच मराठी लेखक शुद्ध मराठीऐवजी हिंदी-उर्दूमिश्रीत गढूळ मराठी वापरतात. संवादांमध्ये बहुवचनी संबोधने आणि बोजड वाक्यरचना केली की त्यांचे मध्ययुगीन वातावरण आणि ऐतिहासिक कलाकृती सिद्ध होते! गौरी देशपांडे यांनी मात्र साधी, स्वच्छ आणि शुद्ध मराठी भाषाच वापरून आखाती प्रदेशातील मध्ययुगीन वातावरण प्रभावीपणे उभे केले आहे. वाचताना मंत्रमुग्ध झालेला वाचक, पुस्तक खाली ठेवल्यावर कथेच्या वातावरणातून वर्तमानात झटकन येऊ शकत नाही. 

अरेबियन नाईट्स किंवा कथासरित्सागर हे खास पौर्वात्त्यांचे सांस्कृतिक ठेवे- इंग्रजीत असे काही नाही. पण जॉर्ज मेरेडिथ या अवलिया लेखकाने (या लेखकाचे नोबेल पुरस्कारासाठी सात वेळा नामांकन झाले होते) १८५६ मध्ये ‘द शेव्हिंग ऑफ शागपाट’ ही अरेबियन पार्श्वभूमी असलेली अद्‍भुतरम्य आणि निखळ विनोदी कादंबरी लिहिली. या कादंबरीत शागपाटच्या मस्तकावरील केसात ‘चीफ ऑफ आयडेंटिकल’ रोपण झालेला असतो. तो कापल्यावर जुलमी राजवट कोसळणार असते. शिबली नावाचा पर्शियन न्हावी अनेक संकटांवर मात करून जादूची तलवार मिळवतो आणि त्या  तलवारीने शागपटच्या डोक्यावरचा केस उडवतो. जुलमी राजवट कोसळते. सर्वत्र आनंदीआनंद होतो. शिबली आणि नायिकेचे मीलन होते. अरेबियन नाईट्समध्ये बेमालूम समावेश करता येईल अशी मजेदार कथा. तीनशेहून जास्त पानांची ही कथा वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. गौरी देशपांडे यांनी हिचेही भाषांतर केले असते, तर बहार आली असती.

संबंधित बातम्या