नातूंचे पुणे 

विजय तरवडे 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

विनायक नारायण नातू यांनी लिहिलेले ‘आधीच पुणे गुलजार’ हे बहुधा त्यांचे पहिले आणि शेवटचे पुस्तक असावे. त्यात पहिलेपणाच्या - ताजेपणाच्या - खुणा आहेत. नातू सराईत लेखक नसल्यामुळे पुस्तक अतिशय खुमासदार झाले आहे. एखाद्या आजोबांनी गप्पांची मैफल जमवावी आणि अघळपघळ भाषेत आठवणी सांगाव्यात तशा विसाव्या शतकातल्या पुण्याच्या झकास आठवणी आहेत. पण अघळपघळ गप्पा असल्या तरी इथे अतिशयोक्ती क्वचित आहे. 

प्रस्तावनेत नातू म्हणतात, की सदरचे पुस्तक हा पुण्याचा इतिहास नाही. पण पुस्तकाला लिहिलेल्या इतर दोन प्रस्तावनांमध्ये विश्राम बेडेकर आणि म. श्री. दीक्षितांच्या भलावणीमुळे इथल्या तपशिलांवर तथ्यांशाचे शिक्कामोर्तब होते. दोनशे पानांच्या पुस्तकात पानोपानी म्हणजे अक्षरशः हजारभर आठवणी असतील. 

अघळपघळ शैली असली तरी पुस्तक करताना सगळ्या गप्पा विषयवार लावून ओळीने मांडल्या आहेत. त्यातली सर्वांत रोचक आठवण म्हणजे नातूंच्या वाड्याच्या जमीनविषयक मूळ कागदपत्रांवर तत्कालीन अधिकारी खुद्द घाशीराम कोतवालची सही आहे! स्वस्ताईच्या आठवणी उगाळायला आपल्याला आवडते. अर्थशास्त्र, चलनवाढ आणि त्यामुळे दरसाल होत जाणारी भाववाढ वगैरे विसरून रुपयाला नऊ शेर दूध हे वाचायला मजा वाटते. नातू सांगतात, ‘दुधातील अतिरिक्त चरबीमुळे दूध पिणारास चरबी चढू नये म्हणून पिळलेल्या दुधात पाण्याचा वापर मुक्त हस्ताने आधीच करून ठेवीत.’ कावरे, बुवा, गुजर आणि गणू शिंदे हे चारी आईसक्रीमवाले गेल्या शतकात फॉर्मात होते. आईसक्रीम फक्त दूध, दही व आंबा अशा तीनच प्रकारचे मिळे. कसबा नवग्रह मंदिराशेजारील एका हॉटेलचे नाव ‘पोट ऑफीस’ होते. सद्दी सरलेले अनेक नाट्यकलाकार खानावळी चालवीत. 

पुण्यावर लिहिताना शनिवारवाडा विसरून कसे चालेल? दिल्लीदरवाजासमोर भाषण ऐकायला बसलेल्या एका श्रोत्याला (हा श्रोता नातूंच्याच वाड्यातला बिऱ्हाडकरू) मस्तानीच्या भुताने झपाटले व तो स्त्रीच्या आवाजात हिंदीत बोलू लागला.. स. प. कॉलेजचे प्राचार्य करमरकर यांचे बंधू मांत्रिक होते. त्यांनी मस्तानीशी संवाद साधून आणि मंत्रोपचार करून त्या व्यक्तीची सुटका केली, असे यात लिहिले आहे. 

खुन्या मुरलीधराची हकिकत सर्वज्ञात. पण नातूंच्या शैलीत वाचायला मजा येते. पेशव्यांचे सावकार गद्रे यांच्या मालकीची मुरलीधराची मूर्ती हवी म्हणून नानांनी अरब सैनिक पाठवले. गद्र्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे शिपाई बोलावले. युद्धात नानांचा पराभव झाला. नातू म्हणतात, ‘मूर्ती हिंदूंची, पळवायला अरब आणि रक्षणाला ख्रिस्ती सैन्य.’ 

टांगे १९५० च्या दशकात सार्वजनिक वाहतूक करीत. एका टांग्यात दोनच प्रवाशांना बसता येई. न. चिं. केळकर, सरदार नातू आणि आबासाहेब मुजुमदार नेहमी टांग्याने प्रवास करीत. सायकलींचा वापर भरपूर होता. बहुतांश सायकलविक्रेते मराठी होते. सायकल वापरण्यासाठी म्युनिसिपालिटीला दरसाल कर द्यावा लागे. रात्री सायकल चालवताना समोरच्या बाजूला छोटा रॉकेलचा दिवा लावणे सक्तीचे होते. सार्वजनिक वाहतुकीत मोटर आली तेव्हा तिला विरोध करताना शाहीर नानिवडेकर यांनी ग्रामोफोन रेकॉर्ड काढली, त्या गाण्याचे बोल होते, ‘ही मोटार वाहिनी आली अपुल्या देशा बुडवाया.’ 

पन्नासच्या दशकात राजकीय मतभेद असलेल्यांच्या मनात परस्परांविषयी सौहार्द असे. हिंदू महासभेचे भोपटकर आणि कॉम्रेड फडके येरवड्याच्या तुरुंगात एकत्र असतानाची एक आठवण वाचनीय आहे. याखेरीज विविध प्रकरणांमध्ये काकासाहेब गाडगीळ, स. गो. बर्वे, यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी आल्या आहेत. 

रस्त्यावरील करमणुकी या प्रकरणात जादूचे खेळ करणारे, कव्वाल्या गाणारे, कसरतीचे खेळ करणारे आणि झाडपाल्याची औषधे विकणाऱ्यांची खुमासदार वर्णने आहेत. 

गेल्या शतकात पुण्यामध्ये प्रभातखेरीज नवयुग, सरस्वती सिनेटोन आणि आर्यन फिल्म कंपनी या तीन कंपन्या होत्या. चाकण ऑईल मिल्सच्या जागेतही पूर्वी चित्रपट स्टुडिओ होता. शंकरशेट रस्त्यावर समोरासमोर दोन स्टुडिओ होते. ज्या चित्रपटगृहांचे उल्लेख आहेत, त्यातील वसंत आणि रतन वगळता सगळी काळाच्या उदरात गडप झाली आहेत आणि ज्यांनी तिथे बसून चित्रपट पाहिले आहेत त्यांना या आठवणी वाचताना गलबलायला होते. लोकमान्य टिळकांनी ज्या ‘आर्यन’मध्ये बाबूराव पेंटर यांचा ‘सैरंध्री’ सिनेमा बघितला त्या आर्यनच्या जागी आता वाहनतळ आहे. त्या काळी एकच प्रोजेक्टर असे आणि रीळ बदलताना जो वेळ जाई त्या वेळात स्लाईडवर ‘शिवाजी महाराजांचा कित्ता गिरवा, सैन्यात दाखल व्हा, महिना सोळा रुपये पगार, कपडे आणि जेवण फुकट’ अशी जाहिरात दाखवली जाई. नाटकांसाठी ‘किर्लोस्कर’ (आताचे वसंत चित्रपटगृह) आणि ‘विजयानंद’ अशी दोनच नाट्यगृहे होती. ‘विजयानंद’मध्ये कधी कधी कुस्त्यांचे सामनेदेखील होत! नाट्यव्यवसायाला उतरती कळा लागली तेव्हा बालमोहनच्या एका स्त्रीपार्टी नटाने भाजीचा गाळा टाकला, तर दुसऱ्या प्रख्यात अभिनेत्याने स्त्रियांचे कपडे शिवण्याचे दुकान थाटले. बालगंधर्वांचे एक बंधू रेशन खात्यात नोकरीला लागले. तर एक गायक नट सोमवार पेठेत गायनाचे वर्ग चालवू लागले. (१९६१ ते १९६३ तिथल्या सरदार लक्ष्मीबाई रास्ते शाळेत मी स्वतः होतो. आम्हाला गायन शिकवणारे शिक्षक ते  
हेच की त्यांचे पुत्र-पुतणे हे ठाऊक नाही.) या सर्वांची व इतरांची नावे आणि अनेक मजेदार आठवणी पुस्तकात दिल्या आहेत. जिज्ञासूंनी वाचावीत. पेंटर फडके यांची एक आठवण गमतीदार आहे. ‘संगीत एकच प्याला’ नाटकाचे पोस्टर रंगवताना ते ‘संगीत १च प्याला’ असे लिहीत. तमाशाची दोन थिएटर्स होती. आर्यभूषण आणि इब्राहिम. इब्राहिमचे पुढे ‘शिरीन’ चित्रपटगृह झाले, नंतर त्याचे नामांतर ‘अल्पना’ असे झाले. २०१८ च्या दरम्यान ते काळाच्या उदरात विलीन झाले. 

गेल्या शतकातले पुणे आज उरणार नाही हे समजते. डोळ्यांसमोर बघताबघता सगळे भूतकाळात विरघळून जाते आहे. अशा वेळी ही पुस्तके भूतकाळ पुन्हा जगल्याचा आभासी आनंद देतात.

संबंधित बातम्या