क्रौर्य आणि करुणेचे महाभारत 

विजय तरवडे 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

कोणता लेखक आपल्याला कोणत्या लेखकाकडे घेऊन जाईल याचे खरोखरच गणित नाही. पूर्वी चंद्रकांत खोत दर वर्षी ‘अबकडई’ नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करायचे. अंक अतिशय वाचनीय असे. ‘अबकडई’च्या एका अंकात नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला उपरोक्त शीर्षकाचा लेख वाचून मला हेरॉल्ड रॉबिन्स नावाचा लेखक ठाऊक झाला. तोवर मी हेरॉल्ड रॉबिन्सचे नावदेखील ऐकलेले नव्हते. 

कुरुंदकरसरांनी या लेखात हेरॉल्ड रॉबिन्सच्या ‘द ॲडव्हेंचरर्स’ कादंबरीची तोंडभरून स्तुती करताना तिला ‘विद्यमान (विसाव्या) शतकातले क्रौर्य आणि करुणेचे महाभारत’ म्हटले आहे. हा लेख वाचून मी ती कादंबरी विकत घेतली. वाचली. गेल्या तीस वर्षांत तिच्या अनेक प्रती मित्रांना भेट दिल्या. 

‘द ॲडव्हेंचरर्स’ कादंबरी वाचून मी अनेक दिवस सुन्न अवस्थेत होतो. कोर्टाग्युए नावाच्या एका चिमुकल्या अविकसित देशाच्या अध्यक्षाभोवती गुंफलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी आहे. पानोपानी फक्त भिववणारा हिंसाचार आणि क्रौर्य आहे. त्याच्या जोडीला काही कारुण्याचे धागे आहेत. 

कादंबरीच्या सुरुवातीच्या पानावर हिब्र्यू बायबलमधले जॉबचे अवतरण आहे, ‘ज्या गर्भातून तू जन्मलास त्या गर्भाला तुझे विस्मरण होईल, तुझ्या देहावर कृमी मेजवानी झोडतील. तू कायमचा विस्मरणात जाशील.’ आणि उपोद्‍घात सुरू होतो. नायक डॅक्सच्या मृत्यूला दशकभर लोटले आहे. देशातल्या कायद्यानुसार त्याचे दफन केलेली कबर उकरून शवपेटीतल्या सांगाड्याचे दहन करून नव्या कबरीसाठी जागा मोकळी केली जाते. या वेळी जवळचे म्हणवणारे कोणीही नाही. देश त्याला विसरला आहे. कुटुंबाचा पत्ता नाही. डॅक्सच्या माजी पत्नीचा पती जेरेमी फक्त उपस्थित आहे. शवपेटीतली डॅक्सच्या बोटातली अंगठी जेरेमीला दिली जाते... जेरेमी म्हणतो, एवढा मोठा अध्यक्ष आणि आज या प्रसंगी कोणीच नाही... कबर खोदणारा सेवक म्हणतो - Dead are alone... मृत एकाकीच असतात. 

कादंबरीतला एक प्रसंग कमालीचा अस्वस्थ करतो. देशात नुकतीच क्रांती झाली आहे. छोट्या डॅक्सचे वडील क्रांतिकारकांचे नेते आहेत. छोटा डॅक्स घराच्या अंगणात कुत्र्याच्या पिल्लाशी खेळत असताना क्षितिजाकडून गोळीबाराचे आवाज येतात. सगळे घरात जाऊन तळघरात लपतात. थोड्या वेळाने सैनिक येऊन सर्वांना शोधतात. एक सार्जंट डॅक्सच्या बहिणीवर बलात्कार करतो आणि तिला व तिच्या आईला ठार करतो. तोवर डॅक्सचे वडील आणि सैन्याची तुकडी येते. क्रांतिकारकांनी गैरसमजातून डॅक्सच्या कुटुंबावर हल्ला केल्याचे उघड होते. डॅक्सच्या बहिणीवर बलात्कार करून ठार करणाऱ्या सैनिकाला गोळ्या घालून मारले जाणार आहे. छोटा डॅक्स हट्ट करतो म्हणून त्याच्या हातात गन दिली जाते. गन कशी चालवायची ते दाखवले जाते. छोटा डॅक्स गन चालवतो. सार्जंट ठार होतो. मग डॅक्स वडिलांच्या कंबरेला मिठी मारून रडत म्हणतो, ‘आता माझ्या आईला आणि बहिणीला जिवंत करून द्या.’ 

कादंबरी ८०० पानी आहे. मुख्य कथानकात काही उपकथानके आणि असंख्य मानवी नमुने गुंफलेले आहेत. फक्त काही ढोबळ घटना पाहिल्या तर तिच्या आशयाची कल्पना येईल. 

डॅक्स वयात येतो. त्याच्या वडिलांचा पक्ष सत्तेवर येतो. डॅक्स राजदूत होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याला आणि त्याच्याबरोबर आपल्याला, माणसांचे उत्थान आणि स्खलन बघायला मिळते. नाझी जर्मनीतून ज्यूंची हकालपट्टी होत आहे. तिथे थांबलेल्या ज्यूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. एका धनाढ्य ज्यूची दोन मुले रॉबर्ट आणि कॅरोलिनशी डॅक्सची मैत्री होते. नाझींनी रॉबर्टला अटक केल्यावर रॉबर्ट कैदेतून निसटतो. त्याचा शोध घेण्यासाठी नाझी पोलीस कॅरोलिनला धरून नेतात. तिला नग्नावस्थेत कोंडून ठेवले जाते. विकृत लैंगिक अत्याचार होतात. याच वेळी जर्मनीत बीफची टंचाई आहे. जर्मनीला कोर्टाग्युएकडून बीफची निर्यात सुरू होणार आहे. डॅक्स ही निर्यात अडवून ठेवण्याचा निर्णय घेतो. त्यापूर्वी प्रीस्ट आणि दोन साक्षीदारांना घेऊन कोठडीत जातो, कॅरोलिनशी रीतसर लग्न लावतो. आता ती राजदूताची पत्नी झाली आहे. तिला कोठडीतून दूतावासात नेतो. बीफच्या निर्यातीबाबत नाझी अधिकाऱ्यांवर दडपण आणून तिला अमेरिकेला नेण्यासाठी परवानगी मिळवतो. दोघे अमेरिकेला जातात. 

दोघांचा संसार सुरूच होत नाही. तुरुंगातील अत्याचारांमुळे कॅरोलिनच्या मनात सेक्सबद्दल भयगंड निर्माण झाला आहे. डॅक्स जवळ आल्यावर तिला भोवळ येते. एरवीदेखील वेळी-अवेळी नाझी अधिकारी आल्याचे भास होतात. भानावर असते तेव्हा तिला आपण डॅक्सला संसारसुख देऊ न शकल्याचा अपराधगंड सतावत राहतो. दुसरीकडे तिचा आत्मकेंद्रित व्यापारी वृत्तीचा बाप डॅक्सपासून घटस्फोट घेण्यासाठी दडपण आणतो. जेरेमी नावाचा अमेरिकन मित्र तिची भयगंडातून सुटका करतो. ती डॅक्सला घटस्फोट देऊन अमेरिकेला जाते. ज्या लोकांनी आपल्याला देशोधडीला लावले, मुलाचा आणि मुलीचा छळ केला त्यांच्याशी पुन्हा व्यापार करायला कॅरोलिनचा बाप कचरत नाही. 

डॅक्स मायदेशी परततो. बालमैत्रीण अंपाराचे वडील राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या अप्रत्यक्ष दडपणाखाली अंपाराशी लग्न. लग्नाआधी तिला अन्य कोणाकडून दिवस  
गेल्याचे समजणे, कोरियन युद्ध, देशांतर्गत बंडाळी, डॅक्सकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि सगळ्याला चिकटून आलेले एकाकीपणदेखील. एका बंडाळीत डॅक्स मारला जातो. 

यानंतर उपोद्‍घातात सांगितलेल्या हकिकतीचा पुढचा भाग येतो. जेरेमी घरी परतल्यावर कॅरोलिनला अंगठी देतो. कॅरोलिनने आपल्या मुलाचे नाव डॅक्स ठेवले आहे. पण तिला ती अंगठी नको आहे. ती स्वयंपाकघरात जाऊन अंगठी भट्टीत टाकते आणि बटन चालू करते. अंगठी जळून-विरघळून गेली आहे. 

युद्धाच्या रम्य (?) कथा...

संबंधित बातम्या