नव्या परिप्रेक्ष्यातून 

विजय तरवडे 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

बिपन चंद्र या इतिहासकाराचे नाव पहिल्यांदा गोविंदराव तळवलकर यांच्या ‘नवरोजी ते नेहरू’ या पुस्तकात वाचले. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित इतर पुस्तकात त्यांचे उल्लेख आढळले. १९८५ मध्ये झालेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल काही वेगळे मुद्दे मांडले होते. ‘इंडियन नॅशनल मूव्हमेंट (लेखक - बिपन चंद्र)’ या पुस्तकात हे मुद्दे विस्ताराने आणि इतर तपशिलांसह आले आहेत. लेखनासाठी उपरोक्त ग्रंथासाठी संग्रहित (अर्कायव्हल) लेखनाखेरीज खासगी कागदपत्रे, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि इतर नेत्यांच्या संग्रहित आणि निवडक लेखनाखेरीज स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय भाग घेतलेल्या खेड्यापाड्यातील, तालुक्यांमधील, प्रांतांमधील व्यक्ती आणि अखिल भारतीय पातळीवर किंवा वसाहतीच्या प्रशासकीय यंत्रणेत काम केलेल्या व्यक्ती अशा १५०० हून अधिक व्यक्तींच्या मुलाखतींचा आधार घेतलेला दिसतो. 

तसेच १८९७ ते १९४७ या काळातील क्रांतिकारक, १९२० च्या दशकारंभीच्या अकाली चळवळी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंडियन नॅशनल आर्मी, स्टेट पीपल्स मूव्हमेंट (बलवंतराय मेहता, मणिलाल कोठारी आणि जी. आर अभ्यंकरांची १९२७ ची चळवळ), आदिवासींची विविध आंदोलने... यातील बरीच आंदोलने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनात्मक चौकटीच्या बाहेर असली तरी त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये मतभेदाच्या भिंती नव्हत्या. कोणत्याही टप्प्यावर ती राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहाला पर्याय म्हणून उभी राहिली नाहीत. उदाहरणार्थ, ‘व्हाय आय ॲम ॲन अथेइस्ट’ या पुस्तकात स्वतः भगतसिंग म्हणतात, ‘तीव्र गरज असेल तरच बलप्रयोग समर्थनीय ठरतो; धोरण म्हणून सर्व जनचळवळींसाठी अहिंसा अटळ आहे.’ 

प्रारंभीच्या टप्प्यात दादाभाई नवरोजींनी वसाहतवादातून झालेल्या भारताच्या न्यूनविकासावरची टीका विकसित करून वसाहती वर्चस्वाच्या मूलभूत घटकाचे महत्त्व कमी केले. त्यांनी स्वातंत्र्यलढा पुढे नेऊन त्याचा बुद्धिजीवी आणि शिक्षित तरूणांमध्ये पाया तयार केला. १९०८ ची स्वदेशी चळवळ आणि लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांची होम रूल लीग यांनी १९१५ ते १९१९ च्या काळात हे धोरण पुढे नेले. 

गांधीजींचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी होते. जनआंदोलनांचा धोरणकर्ता म्हणून असलेला त्यांच्या पैलूचे अँतोनियो ग्राम्शींना झटकन आकलन झाले. जगभरच्या असंख्य लोकांना व चळवळींना त्यांची भुरळ पडली. उदाहरणार्थ, नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिका), मार्टिन ल्युथर किंग, ज्युनियर (अमेरिका), लेक वलेसा (पोलंड)  आणि जगातील अनेक जनआंदोलनाच्या नेत्यांनी त्यांना स्वीकारले. नेल्सन मंडेला यांचे उद्‍गार, ‘आजवर आम्हाला शिस्तबद्ध केडरबेस्ड आंदोलने ज्ञात होती आणि शिस्त नसलेली जनआंदोलने ठाऊक होती, गांधीजींनी आम्हाला शिस्तबद्ध जनआंदोलनांची रीत शिकवली.’ 

इंडिया लीग डेलिगेशनने १९३२ मध्ये खेड्यापाड्यात दौरे काढून दिलेल्या अहवालात सर्वसामान्य नागरिकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांना ‘स्वराज्याऐवजी अधिक शाळा, चांगले रस्ते आणि इतर सोयी पुरवल्या, कर कमी केले तर काय हरकत आहे?’ असे विचारल्यावर लोक उत्तरले, ‘स्वराज्य हा स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वयंशासनाचा विषय आहे.’ एकदा आंदोलन सुरू केल्यावर अधूनमधून मागे का घेतले या प्रश्नावर ‘जन-चळवळ तिच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे अमर्याद काळ किंवा दीर्घ काळ चालवणे शक्य नाही, केव्हा ना केव्हा तिला ओहोटी लागते, कोणतीही जन-चळवळ कायम जोरात चालत नाही, ती अल्पकालीनच असली पाहिजे, शांतता आणि एकजुटीकरणाच्या, उसंत घेण्याच्या टप्प्याने खंड पाडल्यावर चळवळीने स्वतःला दृढ करावे, आवश्यक सुधारणा कराव्यात आणि पुढच्या आक्रमक टप्प्यासाठी सज्ज व्हावे’ असे गृहितक सांगितले जाते. 

ब्रिटिशांमध्ये दोन घटक होते. पब्लिक स्कूलमध्ये शिकून आलेले काही सनदी अधिकारी सुसंस्कृत होते. चळवळीविरुद्ध कठोर पावले क्वचित उचलीत. मात्र दुसरा घटक क्रूरकर्मा होता. उदाहरणार्थ  
‘जालियनवाला बाग’मध्ये जनरल डायरने केलेले अमानुष कृत्य. १९३२ मध्ये सरकारने असहकारिता आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि मालमत्ता जप्त करून लिलावात कवडीमोल भावाने विकल्या आणि दंड व करवसुली केली. १८९०च्या दशकात चीनमधील मार्शल आर्टस् (कुंग फू वगैरे) पटूंनी एकत्र येऊन ब्रिटन व जपानची सत्ता उलथून पाडण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला. तेव्हा पाश्चात्यांनी लष्कर पाठवून चीनच्या गावागावातल्या मार्शल आर्टसपटूना पकडून चौकाचौकात नागरिकांसमोर शिरच्छेद केले किंवा गोळ्या घातल्या. 

ब्रिटिशांचे ‘फोडा आणि झोडा’ हे धोरण फक्त हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी नव्हते. १९३५-३६ च्या दरम्यान सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हाईसरॉयना सल्ला दिला होता की नेहरूंना अटक करू नये. मद्रासचे राज्यपाल लॉर्ड जॉन अर्स्किन यांच्या मते, ‘नेहरू अशा प्रकारची जितकी भाषणे देतील तितके अधिक चांगले, कारण त्यांच्या या स्वभावामुळेच काँग्रेस फुटणार आहे. खरे म्हणजे, आपण त्यांचे अतिरेकी कौतुक आणि अनुनय केला पाहिजे. कारण ते अभावितपणे काँग्रेस संघटनेवर आतूनच प्रहार करीत आहेत.’ 
पहिला उठाव १८५७ मध्ये झाला. तेव्हापासून सलग ९० वर्षे चाललेला लढा, भारताचे आर्थिक शोषण, भारतीयांविरुद्ध ब्रिटिशांनी लढवलेले सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय डावपेच, त्यांना भारतीय नेत्यांनी आणि जनतेने दिलेली उत्तरे हे सारे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून वाचताना आणि समजून घेताना बरेच काही नवे ठाऊक झाले, बौद्धिक आनंद मिळाला तो निराळा.

संबंधित बातम्या