रंग मनाचे आणि पैलतीर  

विजय तरवडे 
सोमवार, 28 डिसेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

अविनाश ओगले (‘रंग मनाचे’) आणि संजीवनी खोजे (‘पैलतीर’) या व्यक्ती आज हयात नाहीत. ही पुस्तके त्यांच्या निधनोत्तर आप्तांनी प्रकाशित करून परिचितांमध्ये वितरित केली. दुकानात किंवा ग्रंथालयात उपलब्ध नसावीत. यातल्या चांगल्या ओळी, चांगल्या कविता नंतर कोणाला वाचायला मिळतील? की विस्मरणाच्या गर्तेत जातील? म्हणून त्यांचे हे यथाशक्ती धावते स्मरण.  

‘रंग मनाचे’ मला अपघातानेच मिळाले. फेसबुक येण्यापूर्वीपासून आंतरजालीय विश्वात अविनाश ओगले हे नाव बरेचसे सुपरिचित आहे. पुस्तकातल्या माहितीनुसार ओगले बेळगावकडचे उत्साही लेखक, कवी, साहित्यप्रेमी वगैरे. लोकमान्य वाचनालयाच्या स्थापनेत त्यांनी बरेच योगदान दिले. वर्तमानपत्रात सदरलेखन, टीव्हीवर सादरीकरण केले. ‘रंग मनाचे’ मध्ये विडंबने आणि गंभीर रचना संकलित आहेत. त्यांची विडंबने व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर खूपदा वाचली आहेत. गदिमांच्या ‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’ या गीताचे विडंबन सतत फिरत असते. पण ‘रंग मनाचे’मधल्या काही गंभीर ओळी लक्षणीय आहेत. 

‘पत्र तिला पहिले लिहिताना वेळ लागतो थोडा, धीट जरा होण्या शब्दांना वेळ लागतो थोडा’, ‘ओझे परंपरांचे ठरलेय जीवघेणे, वेठीस बापड्यांना धरतात येथ जत्रा’, ‘शेपूट ज्यास मोठे, त्याचा मुकुट मोठा, लांगूलचालनाचा मजला सराव नाही’, ‘आता प्राणपक्षास कोठे किनारा, सांग कसा विसरू नदीचा किनारा’ या वृत्तबध्द ओळी किंवा मुक्तछंदातली ‘किती भाग्यवान तू, तुझ्या अंगणात उगवलंय कवितेचं झाड’ ही ओळ... या वाचताना कुठल्या कुठल्या प्रथितयश कवीं’च्या सावल्यांचे भास होतात, वाटते की ही प्रत्येक कविता उंच उड्डाणाचा प्रयास करते आहे. हे सगळं वाचताना कवीशी ओळख आणि दोस्ती झाल्यासारखी वाटते आणि हा माणूस परवापरवापर्यंत आसपास होता आणि आता नाही, अन्यथा त्याला प्रत्यक्ष भेटलो असतो, दाद दिली असती... ही जाणीव अस्वस्थ करते.      

संजीवनी खोजेच्या कवितावाचनाला दर्दी श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळालेली आठवते. या मुलीने धावत्या आगगाडीखाली आत्महत्या करून काही दशके लोटली आहेत. ‘पैलतीर’ वाचताना ‘ॲना कॅरेनिना’तला प्रसंग आठवतो. ॲना देखील आगगाडीखाली जीव देते. आगगाडीचा आवाज येतो. ती मान उचलून गाडीकडे बघण्याचा प्रयत्न मात्र करते. ‘पैलतीर’मधल्या कितीएक कविता आज देखील ठसठशीत वेगळ्या वाटतात. ‘माझ्या अंगणातला गुलमोहर फुलला नाही कधीच’ म्हणताना ती त्याचे कारण सांगते, ‘कदाचित शेजारच्या वेलीने दिलेले उसने गर्भारपण त्याला पेलवले नसेल.’ ‘वेशीबाहेरची सगळी प्रेतं फुलांनी तशीच नाकारली आहेत’, या ओळी आवर्जून  

आपोआप लक्षात राहतात. एका कवितेत ती म्हणते –

‘... खरं तर दिवसाचे रंग बदलत असतात 
नि माणसंही कधीकधी 
पाठमोरी होतात एक दुसऱ्यांना
तेव्हाही दिवस भराभर रंग बदलत असतील.’
पाऊस कधी नको असताना येतो तर कधी वाट पाहूनही येत नाही – ’

‘सगळ्या कागदाच्या नावा
आपण अलगद उलगडतो
आणि लिहायला घेतो त्यावरच 
कवितेतल्या काही ओळी 
एका कधीच न येणाऱ्या 
पावसाच्या प्रतीक्षेनंतर.’

‘तिच्याविषयी थोडेसे’ या कवितेतल्या एका तुकड्यात प्रत्यक्ष कवयित्री भेटल्या-सापडल्यासारखे वाटते – 

‘लहानपणी खेळायची ती 
पावसाच्या पाण्यात कागदाच्या 
होड्या सोडायचा खेळ प्रत्येक होडीत असायचा 
एखादा मनभरला साजण
कुठलीच होडी काठाला लागल्याची बातमी
नंतर तिला समजली नाही.’

तर चौसष्टाव्या कवितेत आत्महत्येची पूर्वसूचना डोकावल्यासारखी वाटते – 
‘जगण्याच्या प्रत्येक वळणावर 
नकार मिळावा
यालाच आयुष्य म्हणायचं असेल 
तर आता माझं पुरेसं जगून झालं आहे.’

पण समारोपाची कविता पुन्हा जगण्याचा हुरूप जागवते. तिचा स्वतःचा आणि वाचकांचा देखील... १९९२ सालच्या आधी केव्हातरी लिहिलेली ही दीर्घ कविता लॉकडाउनच्या काळात फेसबुकवर उद्धृत झाली तेव्हा अनेकांना कोरोनामुळे आलेल्या एकाकीपणात तिने दिलासा दिला होता. काही वाचकांना स्वतःच्या आवाजात तिची ध्वनिफीत बनवण्याचा मोह झाला. खूप मोठी कविता आहे. त्यातल्या काही ओळी इथे देतो – 

‘आता हे गाणं 
आपण सर्वांनी मिळून गायचं आहे...

गाण्याच्या ओळीतले शब्द 
मागेपुढे झाले तरी
एकमेकांवर ओरडायचं नाही. 

बेसूर का होईना, 
पण गायचं.
यापूर्वी इथे गाणं 
अस्तित्वातही नव्हतं 
एक मात्र करायचं.
सराव संपल्यानंतर
एकमेकांना प्रेमाने निरोप द्यायचा. 

असं रोजच करायचं...
म्हणजे मग गाणं सुरेल होईल. 

आता आपल्याला 
सुरुवात करायची आहे.
हे गाणं
आपण सगळ्यांनी
मिळून 
गायचं आहे.’   

या कवितेतल्या भावनेला फेसबुकवर कोरोना-लॉकडाउन-एकाकीपणाच्या संदर्भात मिळालेला प्रतिसाद पाहून भवभूतीचा श्लोक आठवला – ‘उत्पत्स्यते मम तु कोपि  समानधर्मा कालोह्ययं निरवधि विपुलाच पृथ्वी.’ चमत्कार झालेले कधी ऐकले नाहीत. पण चमत्कार घडणे शक्य कोटीतले असेल तर माझी आणि वाचकांची दाद या दोन्ही कवींपर्यंत – ते जिथे असतील तिथे – पोचो.    

* * * 
या लेखासोबतच ‘आठवणीतील अक्षरे’ हे सदर वाचकांचा निरोप घेत आहे

संबंधित बातम्या