मानवी वसाहतवादाचा भाष्यकार 

नंदिनी आत्मसिद्ध 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

स्मरण
नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या साहित्यातून त्यांनी वसाहतीच्या जगाचा इतिहास  वेगळ्या पद्धतीने मांडला. त्याचाच घेतलेला आढावा...

अलीकडेच निवर्तलेले व्ही. एस. नायपॉल हे नेहमीच चर्चेत राहिले आणि वादग्रस्तही ठरले. भारताबद्दल ते आक्षेपार्ह लिहितात, पण भारताचं भांडवल करून आपले लेखन कसे गाजेल हे बघतात, अशी टीकाही त्यांच्यावर झाली. त्यांचे टीकाकार खूप होते आणि चाहतेही! नायपॉल यांना मात्र या कशाचीच पर्वा नव्हती. कुणी त्याबद्दल विचारलंच, तर ‘आपल्याबद्दल काय लिहिलं जातं, ते कधीच आपण वाचत नाही,’ असं ते म्हणत. माणूस मोठा आढ्यताखोर, आग्रही होता. पण आपल्या लिखाणानं त्यानं स्वतःची अशी जागा निर्माण केली होती. कादंबरीलेखनात त्यांनी नवीन रचना आणली. ज्याला सेमी-फिक्‍शनल म्हणता येईल, अशा पद्धतीचा अंगीकार त्यांनी केला. प्रत्यक्ष प्रवास करून, लोकांशी बोलून त्यांनी आपल्या भारतकेंद्री कादंबऱ्यांचा ऐवज गोळा केला आणि त्याची मांडणी करताना आपल्या कल्पनेनंही काही भाग मिसळला. लेखनाचा हा मार्ग आज तसा नवा नाही, पण नायपॉल यांनी त्याची सुरुवात केली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 

भारताबरोबरचं त्यांचं नातं वेगवेगळ्या धाग्यांनी विणलं गेलं होतं. एकतर ते मूळ भारतीय वंशाचे होते. त्यांचे आजोबा, आईचे वडील उत्तर भारतातील दुबे कुटुंबीयांपैकी होते. वेस्ट इंडीजमधल्या त्रिनिदादला मजूर म्हणून आल्यानंतर लवकरच त्यांनी बरीच प्रगती केली आणि स्वतःच्या मालकीचा मळा, दुमजली घर अशी संपत्ती जमा केली. त्यांचे वडील सूरजप्रसाद (श्रीप्रसाद) नायपॉल हे कष्ट घेऊन शिकले आणि पत्रकार म्हणून नोकरीला लागले. त्यांची सासुरवाडी सधन होती. ते व त्यांचा परिवार राहू लागला. पण आपलं वेगळं घर असावं, या जिद्दीतून त्यांनी नंतरच्या काळात स्वतःचं घर बांधलं, त्याची कहाणी पुढं नायपॉल यांनी आपल्या ‘अ हाउस फॉर मिस्टर विश्‍वास’ या कादंबरीत चितारली आहे. मॅट्रिक झाल्यावर विद्याधर नायपॉलना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळून ते इंग्लंडला शिकायला गेले, याचा त्यांच्या वडिलांना फार आनंद झाला होता. 

इंग्लंडमधल्या वास्तव्यानं नायपॉल यांची लिखाणाची प्रेरणा जोर धरू लागली. त्यांच्या लेखनात त्यांचे अनुभव, त्यांनी पाहिलेलं त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेन, इंग्लंड इथले मूळ भारतीय व इतर स्थलांतरितांचं जीवन याचं प्रतिबिंब पडत होतं. दुसऱ्या मातीत रुजताना आणि तिथल्या वातावरणात समरसण्याचा प्रयत्न करताना येणारे अनुभव, स्थलांतरितांचं तिथल्या भूमीकडून स्वीकारलं-अव्हेरलं जाणं, सांस्कृतिक फरकामुळं अशा संयोगातून निर्माण होणारं वेगळंच मिश्रण या साऱ्याचा वेध त्यांनी सुरुवातीच्या लेखनातून सातत्यानं घेतला. त्यांच्या सुरुवातीच्या चारही कादंबऱ्या तिथल्या जगण्याची ही बाजू चितारणाऱ्या आहेत. पहिली प्रकाशित कादंबरी ‘मिस्टिक मॅस्यूर’मध्ये स्थलांतरितांच्या सांस्कृतिकतेबद्दल लिहितानाच, त्यांनी तिथल्या बेटांवरील काहीशा वसाहतवादी व अप्रगत जीवनाचाही आलेख मांडला. तर ‘द सफरेज ऑफ अलविरा’ या कादंबरीच्या माध्यमातून वासाहतिक संस्कृतीत लोकशाही रुजताना होणाऱ्या गोंधळाचं चित्रण त्यांनी केलं. तसंच ‘मिग्युएल स्ट्रीट’ या कादंबरीतही त्रिनिदादसारख्या वसाहतवादी देशांमधला समाज व मानसिकता यांचं दर्शन घडवलं. ‘अ हाउस फॉर मिस्टर विश्‍वास’ (१९६१) ही अर्थातच अधिक आत्मकथनात्मक आहे. आपल्या वडिलांची सासुरवाडीत राहताना होणारी कुचंबणा आणि स्वतःचे तिथले अनुभव यातून त्यांनी ही कादंबरी साकारली. 

आपल्या ‘द मिडल पॅसेज’ (१९६२) त्यांनी विविध संस्कृतींचा लेखाजोखा मांडला. त्यात ब्रिटिश, फ्रेंच, डच, दक्षिण अमेरिकन आणि वेस्ट इंडिज अशा पाच तऱ्हेच्या वासाहतिक संस्कृतींचा समावेश होता. या पुस्तकाच्या माध्यमातून समाजवास्तव, इतिहास आणि मानवी व्यवहार यांची गुंतागुंत टिपण्यात ते यशस्वी झाले. एक अभ्यासू लेखक म्हणून त्यांची प्रतिमा ठसली. भारताच्या पार्श्‍वभूमीवरली त्यांची कादंबरीत्रयीही लक्षणीय ठरली. भारतीयांना मात्र त्यांचं हे लेखन काहीसं खटकलं. ‘ॲन एरिया ऑफ डार्कनेस’, ‘इंडिया ः वुंडेड नेशन’ आणि ‘इंडिया ः अ मिलियन म्युटिनीज’ या त्या तीन कादंबऱ्या होत. वयाच्या २९ व्या वर्षी ते प्रथम भारतात आले होते. इथे आलेले अनुभव, स्वतःच्या मुळांकडं पाहतानाचे त्यांचे विचार आणि या देशाबद्दल त्यांचं झालेलं मत अशा अंगानं हे लेखन गेलं. परदेशात या लेखनाचं कौतुक झालं आणि भारतातल्या वाचकांना ते बरचसं खटकलं. दुसरी कादंबरी १९७५ च्या आणीबाणीच्या काळानंतर त्यांनी लिहिली. भारतावर हजारो वर्षं परक्‍यांनीच राज्य केलं आणि म्हणूनच हा देश जखमी झाला, असं त्यांना सुचवायचं होतं. त्यानंतर १९८० च्या दशकात भारतात येऊन ते मुंबई, मद्रास, कोलकाता व दिल्ली या महानगरांतल्या अनेकजणांना भेटले आणि त्यातून त्यांनी या त्रयीतली तिसरी कादंबरी साकारली. नामदेव ढसाळसोबत त्यांनी मुंबई पाहिली. एका शेअर दलालाला, शिवसेनेच्या एका नेत्याला तसंच अंत्येष्टिक्रिया व श्राद्ध करणाऱ्या एका किरवंत ब्राह्मणालाही ते भेटले. या सर्वांशी आणि इतरही अनेकांशी केलेल्या बातचितीतून हे लेखन पुढं सरकलं. याद्वारे भारतातला बदलता सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पोत जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. शिवसेनेला राजकीय सत्तेच्या दृष्टीनं भवितव्य आहे, असं यात त्यांनी सूचित केलं होतं. पुढं अर्थातच ते खरं ठरलं... 

नायपॉल यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपली विशिष्ट मतं कधीही लपवली नाहीत. ते उघडपणं इस्लामबद्दल अनुदारपणे बोलत. ‘अमंग द बिलीव्हर्स’ हे त्यांचं इस्लामवरील पुस्तक इस्लामी जगतात संताप निर्माण करणारं ठरलं, यात नवल नाहीच. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता. पण अनेक मुस्लिम नेत्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मात्र एकूणच जगाचा मूड बदलला आणि हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारताशी आपली मुळं भिडली आहेत, हे त्यांनी नाकारलं नाही, पण जुनं सारंच ते विसरू पाहत होते. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात विशेष कोपरा अथवा स्मरणरंजनाची भावना अजिबात नव्हती. मात्र तरीही भारताचा संदर्भ घेऊन त्यांनी तीन कादंबऱ्या लिहिल्या. आपली मुळं शोधण्याचा प्रयत्न परदेशस्थ लेखक करताना दिसतात. पण नायपॉल यांच्या बाबत असंही नव्हतं. खरं तर ही एक विसंगतीच होती. एकीकडं भारतातील अनेक गोष्टींना ते नावं ठेवत. मात्र बाबरी मशिदीच्या पतनानंतर हिंदुत्ववाद्यांना आवडेल अशी प्रतिक्रिया देत त्यांनी म्हटलं होतं, ‘ही तर इतिहासाची पुनर्रचना आहे.’ त्यामुळं अर्थातच हिंदुत्ववादी खूष झाले होते. 

त्रिनिदाद व पोर्ट ऑफ स्पेन सोडून ते लंडनला स्थायिक झाले. तिथं त्यांना त्रासही झाला, कारण त्यांचे वेगळे उच्चार, दिसणं इत्यादी. ते दिवस तसे अस्वस्थ व दुःखदायकच होते. त्या काळात मानसिकदृष्ट्या खचण्याचा अनुभवही त्यांनी घेतला. मात्र ते तिथं टिकून राहिले, लिखाण व इतर कामांमधून मन रमवत राहिले. आपलं लेखकपण जपलं आणि ते सिद्धही करून दाखवलं. पुढं तर त्यांना इंग्लंडमध्ये ‘सर’ हा किताब देऊन गौरवण्यात आलं. आजच्या भारतावर नायपॉल यांच्या विचारांचा पूर्वीसारखा पगडा दिसत नाही. गेल्या शतकात नायपॉल भारताबद्दल काय म्हणतात वा लिहितात, याबद्दल इथले लोक जास्त संवेदनशील असायचे. वसाहतवादी जगणं, त्यात होत गेलेले बदल यांचं चित्रण त्यांच्याइतकं सातत्यानं कुणी केलं नसेल. जगण्याची धडपड, त्यातल्या विसंगती आणि फोलपणा याबद्दल ते कायमच लिहीत आले. वसाहतवादातील धनिकांचा माज हाही त्यांच्या लेखनाचा विषय होता आणि त्यातून सुटण्यासाठी झालेल्या चळवळींमधील लोकांचा वैचारिक गोंधळ व स्ववंचना हाही! स्थलांतरित हे मुळांपासून तुटलेले, स्वतःचं घर नसलेले, भूमी नसलेले असतातच. पण नायपॉल यांना पृथ्वीतलावरील मानवी वसाहतींतला एकूणच माणूस हा इथं उपरा असल्याची जाणीव पोखरत होती... सुमारे पन्नास वर्षांची नायपॉल यांची लेखन कारकीर्द वादग्रस्त ठरली आणि लक्षणीयही! कादंबरी अमुक एका पद्धतीनंच लिहायला हवी, असं नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. वास्तव आणि कल्पना या दोहोंच्या मधोमध कुठंतरी त्यांचं लिखाण होतं. इतिहास 

आणि वर्तमान यांचाही मेळ त्यात बरेचदा असे. नवी संस्कृतीची वाटचाल भविष्याकडं होत असली, तरी भूत व वर्तमानात तिची मुळं असतात, हे नायपॉल जाणून होते. त्यांच्या लिखाणात त्रिनिदाद ते लंडन व इतर विकसनशील देश या त्यांच्या स्वतःच्या प्रवासाचा सामाजिक-सांस्कृतिक आलेख वाचायला मिळतो. 

‘बेंड इन द रिव्हर’ या त्यांच्या पुस्तकात एक वाक्‍य आहे, ‘द वर्ल्ड इज व्हॉट इट इज; मेन हू आर नथिंग, हॅव नो प्लेस इन इट.’ नायपॉल मात्र नेहमीच या नकारात्मकतेच्या पलीकडं जाऊन, स्वतःला प्रस्थापित करण्याची जिद्द बाळगून होते आणि त्यात ते यशस्वी ठरले, असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं विस्कळित व्यक्तिगत आयुष्य, दुसऱ्यांना दुखवणारी त्यांची मतं आणि शेरेबाजी, तीव्र रागलोभ, हे सारं आता थांबलं आहे. मागं उरलं आहे ते त्यांचं लेखन. अजून बरीच वर्षं लोक ते वाचणार आहेत... नायपॉल वॉज व्हॉट हि वॉज...

संबंधित बातम्या