महिला क्रिकेटमधील ‘सचिन’

अमित डोंगरे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

विशेष
 

भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर म्हणून संबोधली जाणारी मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. भारताकडून कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वाधिक धावा करणारी मिताली आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे.

थोडीशी वादग्रस्त कारकीर्द असली, तरी तिचे महानपण कमी होत नाही किंवा तिने देशासाठी दिलेले योगदान कमी होत नाही. निवडसमितीचे सदस्य, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य किंवा प्रशिक्षक तसेच सहकारी खेळाडू यांच्याशी तिचे फारसे कधीच जमले नाही. कोणत्याही गोष्टी लपवून ठेवणे जसे काहींना जमते, तसेदेखील तिला जमले नाही. त्यामुळे असे काही प्रसंग घडले ते त्या त्या वेळी लख्खपणे उघड उघड दिसले. मितालीने यंदाच्या मोसमातदेखील मंडळाच्या निवड समितीचे सदस्य तसेच प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी झालेल्या वादावर कधी माघार घेतली नाही. आपली कारकीर्द आणखी वाढविण्यासाठीच तिने गेल्या महिन्यात टी-२० मधून निवृत्ती जाहीर करताना एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सुतोवाच केले. 

२०१८ मध्ये महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवेळी तिचे आणि मंडळाचे प्रचंड वाद झाले होते. मंडळाच्या सदस्या डायना एडल्जी आणि प्रशिक्षक रमेश पोवार हे पक्षपाती असल्याचा आरोप तिने मंडळाच्या समितीकडे लेखी स्वरूपात केला होता. या स्पर्धेतील उपांत्य लढतीतून तिला वगळण्यात आल्यामुळे तिने हे पाऊल उचलले होते. मात्र, मिताली लवकरच या प्रकारातून निवृत्ती जाहीर करणार असल्याचे माहीत असल्याने नवोदित फलंदाजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव मिळावा यासाठीच तिला तळात फलंदाजी करण्याची विनंती केली होती. मात्र, तिने हे समजून न घेता वाद निर्माण केला असे स्पष्टीकरण पोवार यांनी त्यावेळी दिले होते. अर्थात इतक्या मोठ्या स्पर्धेत तेदेखील उपांत्य सामन्यात असे अचानक बदल करतात का, हे पोवार प्रशिक्षक असूनही त्यांना कसे लक्षात आले नाही याचे आश्चर्य वाटते. म्हणजेच हा वाद नक्की फलंदाजीच्या क्रमांकाचा होता, की अन्य कोणत्या कारणाचा हे आता केवळ मिताली किंवा पोवारच सांगू शकतील. संघ बैठकीत मिताली कधीही पुढाकार घेत नाही, प्रशिक्षकांना ब्लॅकमेल करते, स्वत:च्याच कामगिरीबाबत गंभीर असते, एक संघ म्हणून कधीच विचार करत नाही असे अनेक आरोप पोवार यांनी मितालीवर केले होते. याच स्पर्धेतील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात २५ निर्धाव चेंडू खेळलेल्या मितालीने अर्धशतकी खेळी केली होती, त्यावरदेखील पोवार यांनी टीका केली होती. तसेच त्यावेळची संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिच्याशीदेखील तिचे फारसे जमत नव्हते असेही पोवार यांनी माध्यमांमध्ये सांगितले होते. मितालीने मात्र हे आरोप फेटाळून लावताना पोवार यांच्याच निष्ठेवर शंका घेतली होती व ते सातत्याने पक्षपाती निर्णय घेतात असे सांगताना डायना एडल्जी यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. अखेर हा वाद मंडळाच्या बैठकीत संपुष्टात आला.

आता निवृत्ती जाहीर केल्यानंतरदेखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आपण उपलब्ध असल्याचे मितालीने सांगितले असले, तरी नवोदितांना संधी देण्याची तसेच आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत तिची पुन्हा संघात निवड होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तरीदेखील ती आशावादी आहे, मात्र निवडसमितीने तिची पूर्वीप्रमाणे आपोआप निवड होण्याची शक्यता फेटाळली आहे. अशा स्थितीत मिताली काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. छत्तीस वर्षीय मिताली देशाची सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून ओळखली जाते. कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० क्रिकेटमध्ये देशाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा हजारांपेक्षाही जास्त धावा करणारी मिताली देशाची पहिलीच व सध्यातरी एकमेव खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग सात अर्धशतकी खेळी करण्याची कामगिरीदेखील तिच्या नावावर जमा आहे. टी-२० सामन्यांमध्येदेखील दोन हजार धावा करणारी पहिलीच खेळाडू होण्याचीदेखील तिने कामगिरी केली आहे. तिच्या याच वर्चस्वामुळे आणि सातत्यामुळे तिला महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर असे संबोधले जाते. सर्वाधिक दोन विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये अनुक्रमे २००५ आणि २०१७ मध्ये तिने संघाचे नेतृत्व केले हादेखील एक विक्रमच आहे. त्याचबरोबर दोनशे एकदिवसीय सामने खेळणारी देशाची ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

राजस्थानमधील जोधपूरमध्ये जन्मलेल्या मितालीने पुरुष खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळण्याचा सराव केला. त्यावेळी महिला क्रिकेट अगदी बाल्यावस्थेत होते. तिचे खरे क्रिकेट सुरू झाले ते ती हैदाराबादमध्ये स्थायिक झाल्यानंतर. वयाच्या १० व्या वर्षी स्पर्धात्मक क्रिकेट सुरू केल्यानंतर १९९७ मध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तिची वयाच्या १४ व्या वर्षीच भारतीय संघात निवड झाली होती, मात्र अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तिला स्थान मिळू शकले नाही.

आयर्लंडविरुद्ध १९९९ मध्ये एकदिवसीय सामन्यांत तर इंग्लंडविरुद्ध २००२ मध्ये कसोटीत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००६ मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले. पदार्पणातील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात तिने शतकी खेळी केली. तसेच केवळ तिसरीच कसोटी खेळताना तिने कॅरेन रॉल्टन हिचा विक्रम मोडताना २१४ धावांची खेळी केली. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांच्या इतिहासात एक हजार धावा करणारी मिताली पहिलीच भारतीय क्रिकेटपटू आहे. २००३ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१५ मध्ये तिला देशाचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कारदेखील मिळाला. जसे सध्या विविध खेळांतील खेळाडूंच्या कारकिर्दीवर चित्रपट काढले जात आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, मिल्खा सिंग यांच्याच पंक्तीत आता मितालीदेखील बसणार आहे. लवकरच तिच्याही कारकिर्दीवर चित्रपट येत असून त्याचे चित्रीकरणदेखील याच वर्षी सुरू होत आहे. तिची चित्रपटातील भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा करणार असे चर्चिले जात आहे. 

माझा जीवनपट पडद्यावर सादर करण्यात प्रियांकाच जास्त योग्य ठरेल असे स्वतः मितालीनेदेखील सांगितले आहे. असो, देशाची एक महान महिला क्रिकेटपटू अशी ख्याती असली, तरी मितालीची कारकीर्द जितकी यशस्वी ठरली, तशीच वादग्रस्तदेखील. पण तरीदेखील तिच्या योगदानावर कोणीच शंका घेणार नाही. त्यामुळेच तिच्या कारकिर्दीवर येत असलेला चित्रपट प्रदर्शित झाला, की त्यापासून देशातील अनेक महिला क्रिकेटपटू निश्चितच प्रेरणा घेतील असा विश्वास वाटतो.  

संबंधित बातम्या