नवापूरची तूर डाळ

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 12 जुलै 2021

पेटन्टची गोष्ट

बौद्धिक संपदा मिळालेली सुवासिक पौष्टिक तूर डाळ म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील नवापूर तूर डाळ! पूर्णतः पारंपरिक पद्धतीने आदिवासी तयार केलेली ही तूर डाळ जिऑग्राफिकल इंडिकेशन मिळाल्यामुळे एक दर्जेदार उत्पादन म्हणून जगासमोर येऊ लागली आहे.  

डाळी आणि कडधान्ये हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या रोजच्या आहारात कोणत्या ना कोणत्या रूपात अगदी न चुकता येणाऱ्या काही कडधान्यांपैकी काही धान्यांना बौद्धिक संपदा मिळाली आहे, हे आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धान्य पदार्थांच्या बौद्धिक संपदा मिळविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रातील नवापूर तूर डाळ आणि मंगळवेढा ज्वारीला जिऑग्राफिकल इंडिकेशन (जीआय -भौगोलिक निर्देशांक) मिळाला आहे. ‘जीआय’ म्हणजे आपल्या पूर्वजांचे पेटन्ट हे आपण आधीच्या काही लेखात पाहिले आहे. आपल्या पूर्वजांनी बुद्धीचा वापर करून एखाद्या विशिष्ट वातावरणात वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ निर्माण केला असेल तर त्याला ‘जीआय’च्या रूपाने बौद्धिक संपदा हक्क मिळतो आणि ते आपल्या पूर्वजांचे पेटन्ट असते, हे पेटन्ट समूहाचे असते; मग तो कारागिरांचा समूह असो वा शेतकऱ्यांचा समूह, पण तो त्या निर्धारित भागातीलच असला पाहिजे. आजरा घनसाळ तांदुळाचे जीआय क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या केवळ ३५ गावांपुरते मर्यादित आहे. थोडक्यात म्हणजे इतर गावात जीआय नोंदणीनुसार माती, पाणी आणि वातावरण नसेल आणि त्यामुळे त्या गावाचा समावेश जीआय नोंदणी नकाशामध्ये नसेल तर त्या गावात पिकणाऱ्या तांदूळ ‘आजारा घनसाळ’ म्हणून विकता येणार नाही.

जीआय नोंदणीमुळे त्या विशिष्ट समूहाला एकाधिकार मिळतो. पेटन्ट आणि जीआय मधला मुख्य फरक म्हणजे पेटन्ट व्यक्तीला दिले जाते आणि जीआय समूहाला दिला जातो. दोन्हीही एकस्व अधिकार आणि बौद्धिक संपदा आहेत. जीआय नोंदणीमध्ये ज्या प्रदेशांतून तो पदार्थ आला आहे त्याचे नाव बहुधा पदार्थाशी जोडले गेलेले असतेच. उदाहरणार्थ ‘दार्जिलिंगचा’ चहा. थोडक्यात जीआय पदार्थाची मक्तेदारी ही प्रदेशनिष्ठ असते. जीआय पदार्थांच्या नावाचा वापर फक्त तो समूहच करू शकतो आणि जर कोणी त्या पदार्थाच्या नावाचा बेकायदेशीर वापर केला तर जीआय कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार त्या समूहाला प्राप्त झालेला आहे. याच कायद्याच्या आधारे दार्जिलिंग चहाच्या नावाचा वेगवेगळ्या देशांमध्ये होणारा गैरवापर थांबवण्यात संबंधित उत्पादकांना यश मिळाले होते. अशा या पूर्वजांच्या जीआयरूपी पेटन्टमध्ये महाराष्ट्राच्या नवापूर तूर डाळीने बाजी मारली आहे. नवापूर डाळीची जीआय नोंद सर्वांना फलदायी ठरत आहे.

बौद्धिक संपदा मिळालेली सुवासिक, पौष्टिक तूर डाळ म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील ‘नवापूर तूरडाळ’! पूर्णतः पारंपरिक पद्धतीने आदिवासी समूहाने बनवलेली ही तूरडाळ जीआय मिळाल्यामुळे एक दर्जेदार उत्पादन म्हणून जगासमोर येऊ लागली आहे.  

नवापूर तूर डाळीमधील फॉलिक ॲसिड हा घटक स्त्रियांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक असतो. गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या फॉलिक अॅसिडमुळे अनेक प्रकारचे जन्मदोष टाळण्यास मदत होऊ शकते. न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थच्या निष्कर्षानुसार आहारात फॉलिक ॲसिडचा पुरेसा समावेश असल्यास जन्मापूर्वी बाळामध्ये निर्माण होऊ शकणारे दोष बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. एवढेच नाही तर तूर डाळीतून मिळणाऱ्या फायबरमुळे जुनाट आजारांचा धोकादेखील कमी होतो. आहारात डाळींचा नियमित समावेश असेल तर काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग, टाइप टू मधुमेह तसेच हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजार होण्याची शक्यताही कमी होते, असे वैद्यकशास्त्र सांगते.

नवापूरच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व
नवापूर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर ही तूर ‘देशी तूर’ या नावाने ओळखली जाते. भात आणि देशी तूर ही या डोंगराळ भागातल्या रहिवाशांच्या रोजच्या आहारातले मुख्य घटक. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या शेतीत कोणत्याही रसायनांचा वापर न करता नवापूर तुरीची लागवड केली जाते. या परिसरात सरासरी तपमान असते २७ अंश ते ३८ अंश सेल्सियसच्या दरम्यान. साधारण ११६५ मिलिमीटर ते १२६५ मिलिमीटर एवढा पाऊस या भागात पडतो. म्हणूनच येथील नैसर्गिक थंडावा कायम राखला जातो आणि त्यामुळे या भागात होणाऱ्या या तूर डाळीला पांढरट सोनेरी रंग आणि विशिष्ट असा सुगंध प्राप्त होतो आणि त्या डाळीची गुणवत्तादेखील वाढते. खाद्य, इंधन अशा विविध प्रकारे या डाळीचा वापर फारच मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या आहारातील मुख्य घटक मानले जाणारी प्रथिने ह्या डाळीतून मुबलक प्रमाणात मिळतात. पिकाचा उर्वरित भाग प्राण्यांना खाद्य म्हणून पुरवला जातो.

तुरीला निसर्गाची विशेष भेट
नवापूर तालुक्यातील बहुतांश भागातल्या मध्यम काळ्या रंगाच्या मातीमुळे येथे होणाऱ्या तुरीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते. अनुकूल हवामानामुळे नायट्रोजनचे संश्लेषण अधिक प्रमाणात होते त्यामुळे पिकाच्या पोषक वाढीला मदत होते आणि उत्पादनामध्ये अमिनो अॅसिडचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. अमिनो अॅसिड हे प्रोटिन्सचे एक रूप आहे, आणि नवापूर देशी तुरीला असणाऱ्या विशेष सुगंधाचे मुख्य कारणसुद्धा हेच आहे.

नवापूरच्या तूर डाळीमध्ये इतर डाळींच्या तुलनेत पोषण-विरोधी घटक कमी आढळतात. हे पीक शेंगांच्या कुटुंबाशी संबंधित आहे त्यामुळे मातीची सुपीकता वाढवते आणि वातावरणातील नायट्रोजनचे निर्धारण करून, मायक्रोन्युट्रिएन्ट्स आणि मातीमध्ये जैविक पदार्थ जोडते, त्यामुळे शेतकरी इतर पिकेसुद्धा घेऊ शकतात. तुरीचे उत्पादन ९० ते ९५ दिवसात पूर्णपणे नैसर्गिकरीत्या आणि फक्त पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. पारंपरिक पद्धतीची लागवड, रासायनिक पदार्थ आणि खतांचा वापर नसल्याने तसेच कमीत कमी उपकरणे वापरल्याने या डाळीचा उत्पादन खर्च तुलनेने होतो. राखेवर भाजून जात्यावर दळल्यामुळे नवापूर डाळीला लाभलेल्या नैसर्गिक सुगंधात भरच पडते.

नवापूर तूर डाळीचा जीआय हा केवळ तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांना फलदायी ठरणारा आहे असे नाही तर या डाळीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या प्रथिनांच्या प्रमाणामुळे आरोग्याविषयी जागरूक असलेल्या प्रत्येकाला उपयुक्त ठरणारा आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनावरचा खर्च वाढत असताना या डाळीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायला हवे. या डाळीमुळे अगदी काही प्रमाणात का असेना पण इंधनाची बचत शक्य आहे. चांगली शिजण्यासाठी इतर तूर डाळीला समजा कुकरच्या चार शिट्या कराव्या लागत असतील तर नवापूर तूर डाळीला केवळ दोनच शिट्या लागतील. म्हणजे एका अर्थाने नवापूर तुरीच्या वापराने देशावरचा इंधनभारही किंचितसा कमी होऊ शकतो असे म्हणता येईल.

नवापूर तूर डाळीच्या जीआयसाठी बळीराजा कृषक बचत गटाने विशेष मेहनत घेतली. त्यातही एक कृषिभूषण तरुण  विशाल गावित यांचे नवापूर तुरीच्या या प्रवासात विशेष योगदान आहे. दिल्ली येथे पेटन्ट कार्यालयामध्ये नवापूर डाळीला जीआय मिळावे यासाठी जेव्हा सादरीकरण झाले त्यावेळी बळीराजा कृषक बचत गटातील सगळी मंडळी त्यांच्या पारंपरिक वेशात उपस्थित होती.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जीआय मिळालेल्या आपल्या नवापूर तूर डाळीला विशेष महत्त्व आले आहे. भारत सरकारने डाळींच्या आयातीविषयी नुकताच एक निर्णय घेतला आहे. डाळींची गरज भागवण्याकरता पुढील पाच वर्षे आपण दरवर्षी एक लाख टन डाळ आयात करणार आहोत. कधी काळी आपला देश डाळींच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता पण आता मात्र आपल्याला आयातीवर विसंबून राहावे लागत आहे. आपल्या डाळीला योग्य किंमत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळींचे पीक घेणे सोडले आहे. या परिस्थितीत नवापूर तूर डाळीला मिळालेल्या जीआयमुळे या डाळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळायला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी त्यामुळे एकत्र आले आहे, त्याचबरोबर ग्राहकांना पौष्टिक पदार्थ मिळायला सुरुवात झाली आहे त्याचा परिणाम मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय गणिताशी होऊन शेतकरी पुन्हा डाळीच्या पिकाकडे वळू लागले आहेत. जीआयच्या नोंदीमुळे होत चाललेला हा सकारात्मक बदल भारताला स्वयंपूर्ण बनवेल शिवाय २०२३च्या आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्षात कदाचित सातसमुद्रांपलीकडील बाजारपेठही पादाक्रांत करेल.

संबंधित बातम्या