ऊर्जा निर्मितीचे पेटन्ट

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 17 मे 2021

पेटन्टची गोष्ट 

कोळशाचा वापर कमी होईल, प्रदूषण घटेल आणि मुबलक प्रमाणात वीजही उपलब्ध होईल यासाठी काय करता येईल यावर पुण्यातल्या अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्यांने झपाटल्याप्रमाणे काम केले. किरण तेटगुरे याच्या या संशोधनाच्या पेटन्टची अमेरिकेत नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पेटन्ट ही महत्त्वाची बौद्धिक संपत्ती म्हणून सर्वप्रथम पाश्चात्त्य देशांमध्ये नावारूपाला आली. या देशांमध्ये अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावले आणि त्यांची पेटन्ट स्वतःच्या नावावर घेतली. ती पेटन्ट आजही त्यांच्या नावावर नोंद आहेत. रेल्वे, टेलिफोन, इलेक्ट्रिक बल्ब यांसारख्या पेटन्टनी जगामध्ये वेगळ्याच क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली होती. या पेटन्टमुळे जगातील बहुतांश देश एकमेकांच्या जवळ आले. त्यामुळे अधिकाधिक संशोधन आणि त्यानंतर पेटन्ट घेण्याची एक प्रकारे स्पर्धाच जगभरात आणि विशेष करून पाश्चात्त्य देशांत सुरू झाली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या पेटन्टमध्ये कालानुरूप भरही पडत गेली. रेल्वेचे उदाहरण घेऊ. सुरुवातीच्या वाफेच्या इंजिनचा वेग ताशी वीस किलोमीटर होता आणि आज बुलेट ट्रेन ताशी पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावत आहे. या प्रगतीमागे अनेक संशोधन आणि पेटन्ट दडलेली आहेत. अशाच प्रकारे जगातला सर्वात महत्त्वाच्या शोध देणाऱ्या विजेच्या बाबतीतही प्रगती आणि त्यानुसार पेटन्टच्या नोंदी झालेल्या आहेत.

पेटन्ट एका नवीन संशोधनाला मिळते हे आता आपल्याला माहिती आहे, परंतु प्रत्येक वेळेला ते संशोधन पूर्णतः नवीनच असले पाहिजे असे नाही; तर पूर्वी झालेल्या संशोधनामध्ये अधिक भर टाकून ते संशोधन अधिक प्रगल्भ झाल्यास त्या नवीन प्रक्रियेच्या अनुषंगानेसुद्धा नव्या पेटन्टला अर्ज करता येतो. याच तत्त्वावर वाफेच्या इंजिनाचा शोध ते आज मेट्रो ट्रेनपर्यंत शेकडो पेटन्ट देऊन गेला आहे. या मूळ तत्त्वाला अनुसरून ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात नवनवीन शोध लागले आणि शेकडो पेटन्ट घेतली गेली. मुळात ऊर्जा निर्मितीचे बरेच प्रकार आहेत. हायड्रो म्हणजे पाण्याच्या साहाय्याने होणारी वीज निर्मिती, थर्मल म्हणजे कोळसा व तत्सम इंधनाच्या साहाय्याने होणारी वीज निर्मिती याचबरोबर अणुशक्तीचा वापर करूनही वीजनिर्मिती केली जाते. परंतु औष्णिक आणि अणुवीज प्रकल्पांवर प्रचंड प्रमाणात प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होतात. काही प्रमाणात का होईना या वीजनिर्मिती प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. त्यावर पर्याय म्हणून प्रदूषण न करणाऱ्या सौर तसेच पवनऊर्जा प्रकल्पांद्वारे ऊर्जा निर्मिती करण्यावर सध्या भर दिला जातो आहे. पर्यावरणासाठी धोकादायक नसणारे हे प्रकल्प ‘क्लीन सोर्स’ वीजनिर्मिती प्रकल्प म्हणून ओळखले जातात. परंतु जगामध्ये सगळीकडेच हे ऊर्जा स्रोत मुबलक प्रमाणात असतीलच असे नाही, त्यामुळे असे वीजनिर्मिती प्रकल्प चालवण्यास काही तांत्रिक अडचणी येत असतात. त्यातून हवी तेवढी ऊर्जा आपण मिळवू शकत नाही म्हणून वीजनिर्मिती प्रकल्पाशी निगडित संशोधन करणे गरजेचे आहे. कमीत कमी नैसर्गिक ऊर्जा वापरून आपण त्यातून किती अधिक प्रमाणात  ऊर्जानिर्मिती करू शकतो यावर संशोधक विचार करत आहेत, कारण काळाची गरज ओळखून सर्व राष्ट्रांना औद्योगिक व अन्य क्षेत्रांची ऊर्जेची गरज भागवायची आहे.

आज एकविसाव्या शतकात वीजेशिवाय आपले पानही हलत नाही. देशाच्या औद्योगिक विकासासाठी पुरेसा वीजपुरवठा गरजेचा आहे. आज जी राष्ट्रे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत, त्यांना विकासाचा एक विशिष्ट वेग राखणे शक्य होत असते. जगातले बरेच देश ऊर्जेची प्रचंड मागणी आणि पुरेशा पुरवठ्याचे गणित जुळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर आपण ‘ग्लोबल एनर्जी स्टॅटिस्टिकल इयर बुक २०१८’च्या ‘एनरडेटा’द्वारा (Enerdata) प्रकाशित केलेल्या माहितीचा आढावा घेतला तर जगातील एकूण वीज वापराचे प्रमाण २०१७ मध्ये २.६ टक्क्यांनी वाढले होते. यावरून जागतिक स्तरावर विजेचा वापर किती वेगाने वाढतो आहे याचा अंदाज येतो आणि यापुढे हा वापर अधिक वेगाने वाढणार आहे.

भारत, चीन आणि आफ्रिकेतल्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांची ऊर्जेची मागणी कधीही कमी होणार नाही म्हणून वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये पर्यावरणास अनुकूल, तसेच कमी खर्चिक आणि कार्यक्षम तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. पारंपरिक ऊर्जानिर्मिती साधनांची सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाहन उद्योग बनवणाऱ्या कंपन्याही कात टाकत आहेत. सर्वांचे लक्ष आता विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीकडे आहे. नैसर्गिक संसाधनातून मिळणाऱ्या खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांवर जसे आपण मागील एक शतक अवलंबून होतो तसेच आता पुढचे शतक विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवर असणार आहे असे काही उद्योजकांनी भाकीत केले आहे.

कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमधून जगभरात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. अमेरिकेमध्ये वीज निर्मितीसाठी कोळशाचा सर्वात जास्त वापर होतो. भारतातही जवळपास ७० टक्के वीजनिर्मिती प्रकल्प कोळसा वापरतात. कोळशाच्या वापरामुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासंदर्भात अनेक करार करण्यात आले आहेत. ‘क्योटो प्रोटोकॉल’ आणि ‘पॅरिस कन्व्हेन्शन’ हे जगभरात गाजलेले पर्यावरण विषयक करार होते. अमेरिकेची विजेची गरज कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांद्वारे भागवली जात असल्याने अमेरिकेने सदर कराराच्या बाबतीतले बंधन स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच काहीशी परिस्थिती भारतातही आहे. आपल्याला औद्योगिक विकासासाठी वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे, परंतु त्याचवेळी पर्यावरणाचाही समतोल राखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोळशाच्या थर्मल प्लांटच्या बाबतीत भारतातील कोळसा हा पूर्णतः शुद्ध कोळसा नसल्याकारणाने वीजनिर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, म्हणून भारतातील टाटा, अदानी सारख्या बड्या कंपन्या त्यांच्या थर्मल प्लांटसाठी इंडोनेशिया मधून कोळसा आयात करतात. यामुळे प्रदूषण काहीसे कमी होते पण त्याचबरोबर आपल्या देशाची परकी चलनाची गंगाजळीही कमी होते.

या पार्श्वभूमीवर, कोळशाचा वापर कमी होईल, परिणामी प्रदूषण कमी होईल आणि मुबलक प्रमाणात वीजही उपलब्ध होईल यासाठी आपल्याला काय करता येईल या प्रश्नांवर पुण्यामध्ये शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्यांने झपाटल्याप्रमाणे काम केले. मूळचा रायगड जिल्ह्यातला हा विद्यार्थी आपल्या भावाबरोबर आणि वडिलांबरोबर एका मिशनप्रमाणे प्रदूषण आणि विजेच्या या प्रश्नावर कामाला लागला आणि उत्कृष्ट असे उत्तर त्यांनी शोधले. त्याच्या या आविष्काराला आम्ही पेटन्ट रूपामध्ये नोंद करून घेतले व तेच पेटन्ट आज आपण अमेरिकेमध्ये नोंदीसाठी घेऊन गेलो आहोत. गमतीने मी त्या मुलाच्या कर्तृत्वाला ‘भारतीय आइन्स्टाईन’ असे नाव दिले आहे. त्या मुलाचे नाव आहे किरण तेटगुरे. 

किरणच्या संशोधनामुळे निम्म्या प्रमाणात कोळशाचा वापर करून नेहमी एवढीच वीजनिर्मिती करता येईल, म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या प्रदूषण पातळी निम्म्यावर आणता येईल आणि वीजनिर्मिती दुपटीने करता येईल. अशा विषयाचे हे पेटन्ट!.

या पेटन्टवर काम करताना आम्ही एक स्वप्न बघितले आहे -अमेरिका आपल्या या पेटन्टवर विसंबून रहायला हवी. आजपर्यंत अनेक अमेरिकी पेटन्टवर आपला देश विसंबून आहे आणि त्यासाठी आपण रॉयल्टी मोजत आहोत. पेटन्टच्या माध्यमातून  आपल्या देशातील पैसा मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडे जात आहे अशा वेळेला किरणचे हे संशोधन अमेरिकेकडे जाणाऱ्या पैशाच्या या ओघावर परिणाम करेल. किरणच्या या पेटन्टच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय अर्ज आम्ही दाखल केला आहे. जीनिव्हामध्ये त्याच्या परीक्षण अहवालामध्ये किरणच्या पेटन्टमधील नोंदीविषयी सकारात्मक बाजू दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे जसे आम्ही भारतामध्ये किरणच्या पेटन्टची नोंद करू शकलो त्याच प्रमाणात अमेरिकेमध्ये त्याच्या या वीजनिर्मितीच्या नवीन आविष्काराची नोंदणी करू शकू. त्या वेळेला अमेरिकेतील बड्या कंपन्यांना हे पेटन्ट लायसन्स रूपाने देऊन त्यातून रॉयल्टी घेऊन भारतामध्ये त्यात मोठी गुंतवणूक करता येईल. भारताला स्वावलंबी बनवताना येथील प्रदूषणाची पातळी कमी करण्याची संधी या पेटन्टमध्ये उपलब्ध आहे. या अनुषंगाने एका कंपनीची स्थापनाही करण्यात आली आहे. या प्रवासाचा भाग म्हणून आम्ही टाटांच्या वेगवेगळ्या वीजनिर्मितीच्या प्रकल्पांनासुद्धा भेटी दिल्या आहेत व तेथूनही आम्हाला सकारात्मक मार्गदर्शन मिळाले आहे. आता आम्ही गरुड झेप घेण्याची वाट पाहत आहोत. अमेरिकेतील पेटन्ट हे दिवाळीच्या आधी प्राप्त होईल अशी आशा आहे. भारतातील वीजनिर्मितीसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल असा ठाम विश्वास आहे.

संबंधित बातम्या