एका महत्त्वाच्या संशोधनाचे प्रोव्हिजनल पेटन्ट!

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

पेटन्टची गोष्ट 

भारतीय पेटन्ट कायद्यानुसार प्राथमिक टप्प्यात असलेले संशोधन संरक्षित करण्यासाठी संशोधक प्रोव्हिजनल पेटन्ट अर्जाचा उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यानंतर निश्चिंतपणे त्याचे संशोधन विकसित करू शकतो.

ही कथा केवळ रोजच्या जगण्यात घरात आणि घराबाहेरही असंख्य जबाबदाऱ्या लिलया पेलणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भातल्या एका महत्त्वाच्या संशोधनाची नाही, तर त्याबरोबरच रोजचे जगणे काहीसे अधिक सुखकर करणाऱ्या, एखाद्या नव्या निर्मितीवर दिवस-रात्र एक करणाऱ्या संशोधकाला मोठा दिलासा देणाऱ्या भारतीय पेटन्ट कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीचीही आहे.

‘फक्त पुरुषांची’ म्हणून गणल्या गेलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये लोकसंख्येचा अर्धा भाग असणाऱ्या स्त्रियाही कार्यरत असणे ही एकविसाव्या शतकात काही फार नवलाची गोष्ट राहिलेली नाही. ‘चूल आणि मूल’ हेच आयुष्य आणि त्याच आयुष्यात पूर्णपणे गुरफटून गेलेली ‘स्त्री’ अशी पारंपरिक स्त्रीची प्रतिमा वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करत ‘ती’ने पुसून टाकलेली आहे. मात्र अनेक आघाड्यांवर जाणवण्याइतके बदल घडूनही काही मुद्दे अजूनही ‘निषिद्ध’ याच सदरात मोडतात. जगभरात अनेक ठिकाणी स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी उघडपणे बोलणे टाळले जाते. मासिक पाळीविषयी अजूनही भारतीय जनमानसात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. पुरुष तर जाऊच द्या, पण अनेकदा स्त्रियादेखील ह्या विषयावर बोलणे, माहिती करून घेणे टाळतात, असे दिसून येते. 

वैद्यकीय दृष्टीने सांगायचे तर मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही मासिक पाळीशी निगडित असते. सामान्यतः पाळीचे चक्र मुलीच्या वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू होते आणि वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. 

  • मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अांतर -त्वचा. 
  • गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला चार ते पाच दिवस ही क्रिया घडते. 
  • शरीरातल्या संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत या आवर्तनाचे नियमन केले जाते.
  • ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्रवतात आणि ह्यांमुळे बीजांडे निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्युलेशन) चालना मिळते व  बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची निर्मिती होते. 
  • इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी झाली की रक्तस्रावाला सुरुवात होते. 

    अंडाशयातील किंवा गर्भाशयातील घटनांच्या आधारे प्रत्येक मासिक चक्र तीन टप्प्यांत विभागले जाऊ शकते. पहिला टप्पा म्हणजे फॉलिक्युलर फेज, दुसरा टप्पा म्हणजे ओव्ह्युलेटरी फेज आणि तिसरा टप्पा म्हणजे ल्युटिल फेज. फॉलिक्युलर टप्पा मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ओव्ह्युलेशनपर्यंत सुरू होतो, ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रॅडिओल या सारख्या हार्मोन्सच्या पातळीत तीव्र घट होते आणि फॉलिकल उत्तेजक हार्मोनच्या पातळीत वाढ होते. 

मासिक पाळीच्या दिवशी प्रोजेस्टेरॉनची कमाल पातळी 585pg/ml ते 25pg/ml पर्यंत कमी होते. प्रोजेस्टेरॉन हार्मोनची ही तीव्र घट म्हणजे पाळीच्या आरंभाची सूचना असते. मात्र या सामान्य शारीरिक घटनेच्या संदर्भात अनेक महिलांच्या तक्रारी असतात.  

प्रीमेन्स्ट्रूअल सिंड्रोम (पीएमएस) किंवा मासिक पाळीपूर्वीचा तणाव

ओव्ह्युलेशन फेज संपत आल्यावर, पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी स्त्रिया शारीरिक आणि भावनिक लक्षणांच्या संयोगातून जातात, ज्यास प्रीमेन्स्ट्रूअल सिंड्रोम किंवा पीएमएस म्हणतात. पाळी सुरू झाल्यानंतर ही लक्षणे दूर होतात. काही स्त्रियांमध्ये पीएमएसची चिन्हे नसतात किंवा काही स्त्रियांना अत्यंत सौम्य लक्षणे जाणवतात. परंतु इतरांसाठी ही लक्षणे इतकी तीव्र असू शकतात की यामुळे रोजची कामे करणेदेखील कठीण होऊन जाते.

पीएमएसमध्ये मूड स्विंग, थकवा, चिडचिड आणि नैराश्य यासह विविध चिन्हे आणि लक्षणे आहेत. एका वैद्यकीय अंदाजानुसार प्रत्येक चारातल्या तिघीजणींना या पीएमएसचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागत असतो.

दर महिन्याला मासिक पाळी सुरू होण्याचा अंदाज मासिक पाळीच्या काही दिवस अगोदर न आल्याने स्त्री तणावाखाली येते. तिच्या घरातल्या, समाजातल्या एकूण वावरावर, तसेच तिच्या कार्यक्षमतेवरही या तणावाचे सावट राहू शकते. मासिक पाळीच्या नेमक्या तारखेचा अंदाज नसेल तर अनेकजणींना ‘त्या’ दिवसांचे नियोजन करण्यात अडचणी येत असतात. अगदी प्रवास करण्यापासून ते  विवाहांसारखे कौटुंबिक समारंभ, पूजाविधी, तसेच खेळांच्या स्पर्धा अशा अनेक बाबींच्या नियोजनात अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या महिलादेखील कामाच्या ठिकाणी जर पाळी आली तर काय.. या विचाराने बऱ्याचदा तणावाखाली असतात. मासिक पाळी अनियमित असेल तर हा तणाव आणखी वाढू शकतो. गेल्या काही दशकांत पाळी सुरू होण्याचे वयही कमी होत आहे, आणि किशोरवयीन वयात मासिक पाळी नेहमीच अनियमित असते. त्याचप्रमाणे, रजोनिवृत्तीचे वय कमी होत आहे, व रजोनिवृत्तीपूर्व वयातही पाळीचे वेळापत्रक अनियमित असते त्यामुळे त्या वयातल्या स्त्रियांनाही ही चिंता भेडसावते.

महिलांच्या ह्याच चिंतेचे मूळ नष्ट करणे आणि मासिक पाळीच्या नेमक्या तारखेचा अंदाज सांगणारे कीट विकसित करणे ह्या ध्येयाने झपाटून रत्नागिरी जिल्ह्यातल्या डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल तसेच डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटरमधील डॉ. सुवर्णा पाटील व त्यांच्या टीमने प्रयत्न सुरू केले होते. त्यातून उभे राहिले एक महत्त्वाचे संशोधन कार्य. ह्या संशोधनाचे फलित म्हणजे एखाद्या महिलेची मासिक पाळी पुढील २४ तासांत सुरू होईल की नाही याची माहिती देणारे कीट. 

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कीटद्वारे डॉक्टर ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणेचा अंदाज लावू शकतात. असे कीट मुख्यत्वे शरीरातील वेगवेगळ्या हार्मोन्सची पातळी, शरीराचे मूलभूत तापमान, आणि गर्भाशय ग्रीवाचा श्लेष्मा यांचा अभ्यास करून रिझल्ट दाखवतात/ देतात. अशा कीटचे प्रचलित आणि सर्वाना माहीत असलेले उदाहरण द्यायचे झाले तर गर्भधारणा चाचणी कीटचे (प्रेग्नसी कीट) देता येईल. 

प्रेग्नसी कीट किंवा त्याप्रकारच्या कीटचे स्वरूप आणि कार्यप्रणाली ही मुख्यत्वे  एलिसा (ELISA) किंवा रेडिओइम्युनोसे (Radioimmunoassay) सारख्या कार्य तंत्रावर आधारित असते. या प्रेग्नसी कीटमध्ये प्रामुख्याने मूत्राच्या नमुन्यातील लैंगिक हार्मोन्स किंवा ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी)चे मोजमाप केले जाते. 

पण हे कीट फक्त गर्भधारणा झाली आहे की नाही एवढ्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. जर गर्भधारणा झालेली नसेल तर पुढची मासिक पाळी कधी येईल किंवा पुढील चोवीस तासात त्या महिलेची पाळी सुरू होईल की नाही याचे उत्तर हे प्रेग्नसी कीट देऊ शकत नाही. तसेच जगभरातदेखील अशा प्रकारच्या संशोधनाची नोंद उपलब्ध नाही. अशा  प्रेग्नसी कीटच्या वापरासाठी प्रसाधनगृहाचा वापरही बंधनकारक ठरतो आणि म्हणूनच पुढील चोवीस तासांत एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू होईल की नाही याचा अंदाज वर्तवण्यासाठी डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक चाचणी संच (कीट) विकसित केला आहे. हे कीट प्रामुख्याने मासिक पाळीच्या ल्यूटियल टप्प्यातील हार्मोनल बदलांच्या आधारे रिझल्ट देते आणि विशेष म्हणजे हे कीट वापरण्यासाठी फक्त लाळेचा थेंबाच्या स्वरूपातला नमुना ह्या कीटच्या टेस्ट पॅडवर टाकावा लागतो, आणि केवळ दोन मिनिटातच त्या महिलेला  पुढच्या चोवीस तासात तिची मासिक पाळी सुरू होणार आहे अथवा नाही याचा अंदाज घेता येऊ शकतो. 

हे कीट विकसित करण्यासाठी डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. योगायोगाने २०१८ साली पाडव्याच्या दिवशी पुण्यात त्यांची आणि माझी भेट झाली. त्या भेटी दरम्यानच त्यांच्या टीमचा मासिक पाळी संदर्भात एक टेस्ट कीट बनविण्याचा मानस मला समजला. कीट विकसित करण्यासाठी लागणारी सामग्री आणि निधी गोळा करणे हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यासाठी वेगवेगळ्या संशोधन संस्थांना भेटी देऊन ह्या कीटची उपयुक्तता पटवून देणे गरजेचे होते. ह्या कीटची कार्यप्रणाली कशी असेल याविषयीचे प्रस्ताव पुणे, मुंबई व बंगळूर येथील संशोधन संस्थांसमोर त्यांना मांडायचे होते. पण त्याआधी ही नावीन्यपूर्ण कल्पना ‘चोरीला जाऊ नये’ म्हणून आम्ही त्यांना ‘प्रोव्हिजनल 

पेटन्ट’ अर्ज करण्याचा सल्ला दिला 
आणि त्यावर्षीच्या जून महिन्यामध्ये भारतीय पेटन्ट कार्यालयात प्रोव्हिजनल पेटन्टसाठी अर्ज सादरदेखील केला. भारतीय पेटन्ट कायद्यानुसार प्राथमिक टप्प्यात असलेले संशोधन संरक्षित करण्यासाठी संशोधक प्रोव्हिजनल पेटन्ट अर्जाचा उपयोग करून घेऊ  शकतो आणि त्यानंतर निश्चिंतपणे त्याचे संशोधन विकसित करू शकतो. भारतीय पेटन्ट कायद्यातील या सुविधेचा फायदा घेऊन डॉ. पाटील यांनी त्यांचे कीट आधी सुरक्षित केले आणि नंतर चिकाटीने संपूर्ण कीट विकसितदेखील केले. त्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात आल्यावर आम्ही पूर्ण तपशीलवार पेटन्ट अर्ज दाखल केला. असंख्य महिलांच्या दृष्टीने अति महत्त्वाच्या असणाऱ्या (आणि ज्या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांची मनःशांतीही काहीशी अवलंबून असते) प्रश्नाला उत्तर देणारे पेटन्ट भारतात दाखल झाले, ही एक अत्यंत अभिमानाची घटना आहे आणि भारताचे अलौकिक बौद्धिक योगदान अधोरेखित करणारे आहे, 
(या लेखाबरोबरच ‘पेटन्टची गोष्ट’ हे सदर समाप्त होत आहे.)
 

संबंधित बातम्या