लहान मुलांना हवी बचतीची सवय

ॲड. सुकृत देव 
रविवार, 31 जानेवारी 2021

विशेष

‘बचत’ हा शब्द आत्ताच्या काळातला सर्वांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. बचत ही खूप आवश्यक, पण तेवढीच अवघड गोष्ट आहे असे मी म्हणतो. कारण आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी बचत म्हणजे ‘आपल्याला मिळणारे पैसे खर्च न करता बाजूला टाकणे’ हे जरा अवघडच असते. सध्याचे जग हे धावते जग आहे. सगळ्यांनाच ‘फास्ट’ आणि ‘इझी मनी’ हवा असतो. जेवढे जलद पैसे येतात, तेवढ्याच जलद ते खर्च पण होतात हे लक्षात घेतले पाहिजे.

लोकांच्या सवयी बदलल्या आहेत, खर्च वाढले आहेत, प्रत्येकाला महाग गाड्या, मोठी 
घरं लागतात. या गोष्टींची गरज वाढत चालली आहे. लोकांचे अनावश्यक खर्च पण वाढलेत. पण लोकांना समायोजन करायचे नाहीये. बचतीची सवय/मानसिकता नसेल तर आर्थिक नियोजनदेखील अवघड जाते. बचत करणारे लोकही काटकसर करत असतात. आपल्याला मिळणारे पैसे, खर्च न करता जास्तीत जास्त कसे वाचवता येतील याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे बचत करणारे लोक नक्कीच पुढे जाऊन जास्तीत जास्त आनंद घेऊन आपले आणि आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करत असतात. 

लहान वयात तुम्ही जोमाने पैसे कमवता. पण जसजसे वय वाढते, तसतसे उत्पन्न कमी होऊ शकते. त्यावेळी हे बचत केलेले पैसे कामी येणार आहेत. म्हणूनच लहान मुलांना खूप आधीपासूनच पैसे बचतीचे सवय लावणे अत्यावश्‍यक आहे. 

‘पिगी बँक’ हा शब्द लहान मुलांसाठी खूप आवडता आहे. पिगी बँक असणे ही मुलांना बचत करण्याची सवय लावण्यासाठी उत्तम माध्यम आहे. लहान मुले पिगी बँकमध्ये पैसे टाकण्यासाठी सगळीकडून नाणी, नोटा गोळा करतात. पिगी बँकेत पैसे टाकण्याची मजा किंवा आनंद काही वेगळाच आहे आणि याच आनंदाचे रूपांतर पुढे जाऊन सवयीत होते. हीच सवय पुढे आयुष्यामध्ये आनंद देते. मुलांना बचतीसाठी ही सवय लावणे जेवढे आवश्‍यक आहे, त्याचबरोबर ही सवय मोठ्यांनीदेखील आत्मसात करण्याची गरज आहे. 

लहान मुले पिगी बँकेत पैसे टाकतात; जितक्या जास्त वेळा पैसे टाकतील तेवढे चांगलेच आहे. कारण पिगी बँक तेवढ्या लवकर भरेल. पिगी बँक भरली की ते पैसे मुलांच्या नावावर बँकेमध्ये जमा होणे आवश्‍यक आहे. त्यालाच आपण खरी बचत म्हणू. हे पैसे शक्यतो खर्चच होणार नाही, हा नियमदेखील केला पाहिजे; मुलांनीही आणि पालकांनीही.

मुलांना अगदी लहानपणापासून पिगी बँकेमध्ये पैसे टाकण्याची सवय लावणे हे त्यांच्याच फायद्याचे ठरणार आहे. काही मुलांना हट्ट करून वस्तू मागण्याची सवय असते. अशा वेळी त्यांना तू अमुक एक कालावधीसाठी पैसे साठवलेस तरच तुला ती वस्तू मिळेल, अशी अट घालता येईल. त्यामुळे पैसे साठवले तरच आपल्याला हवे ते घेता येते, हा विचार मुलांच्या डोक्यात पक्का बसेल. पैशांची किंमत आणि पैसे साठवण्याची आवश्‍यकता या गोष्टी लहानपणापासून त्यांच्या लक्षात येतील. 

पिगी बँकेत पैसे टाकणे, म्हणजेच पैसे साठवणे ही मानसिकता तयार होणे आवश्‍यक आहे. तरच मुले मोठी होऊन सवयीने खर्च कमी करून बचत करतील आणि योग्य गुंतवणूकही करतील.

संबंधित बातम्या