बोधिसत्व पद्मपाणी 

राधिका टिपरे
सोमवार, 22 एप्रिल 2019

विशेष
ब्रिटिश सैनिक जॉन स्मिथ याने २८ एप्रिल १८१९ रोजी वाघुरा नदीच्या चिमुकल्या खोऱ्यात दडलेला अजिंठा लेणींचा सांस्कृतिक खजिना अजाणतेपणी शोधून काढला. या घटनेला बरोबर दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे नाव घेताच आपल्या नजरेसमोर सर्वप्रथम हातामध्ये निळ्या रंगाचे कमळ धरलेल्या बोधिसत्व पद्मपाणीचे सुंदर चित्र येते. अजिंठा लेण्यांची ओळख म्हणून या भित्तिचित्राला जगभर ठळकपणे मान्यता मिळालेली आहे. ‘बोधिसत्व पद्मपाणी’ म्हणजे ज्याने हातात कमळ धरलेले आहे तो! भारतीय चित्रकलेला अजरामर करणाऱ्या या अप्रतिम सुंदर भित्तिचित्राने जगभरातील कलाप्रेमींच्या मनावर गारुड केलेले आहे. सर्वांना संमोहित करून टाकले आहे. 

बौद्धधर्मातील ‘बोधिसत्व’ या संकल्पनेचा अर्थ आहे बुद्धाच्या पूर्वजन्मातील त्याचे स्वरूप! असे म्हणतात, की राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म घेऊन ‘बुद्ध’पदाला पोचण्यापूर्वी बुद्धाने अनेक जन्म घेतले होते आणि या प्रत्येक जन्मामध्ये तो ‘बोधिसत्व’ म्हणून जन्माला आला. परंतु, बोधिसत्व म्हणून प्रत्येक वेळी मनुष्याच्या रूपात जन्म न घेता बुद्धाने नाग, हत्ती, हरिण, म्हैस, सोनेरी हंस, माकड, मासा, अशा विविध प्राणीरूपांतही जन्म घेतला होता. प्रत्येक जन्मात सत्कार्य करून सरतेशेवटी बुद्धाचा अवतार घेण्याची वेळ आली, तेव्हा त्याने राजपुत्र सिद्धार्थ म्हणून शाक्‍यकुळात जन्म घेतला. राजपुत्र सिद्धार्थ हासुद्धा ‘गौतम बुद्ध’ या पदाला पोचण्यापूर्वी बोधिसत्वच होता. गौतम बुद्धाच्या अगणित बोधिसत्व रूपांपैकी बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांना नेहमीच मनुष्यरूपात, बुद्ध प्रतिमेच्या बरोबर त्याचे सेवक म्हणून दाखवले जाते. अजिंठा येथील बहुतेक गुंफांमध्ये गर्भगृहामध्ये बुद्धप्रतिमेच्या दोन्ही बाजूला कोरलेले बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पद्मपाणीच्या हातात कमळफूल असते, तर वज्रपाणीच्या हातात नेहमीच वज्र असते. 

अजिंठा लेण्यात केवळ शिल्परूपातच नाही, तर चित्ररूपातही या दोन्ही बोधिसत्वांना चित्रांकित केलेले पाहायला मिळते. अजिंठा येथील गुंफा क्रमांक एकमधील ‘बोधिसत्व पद्मपाणी’ म्हणून चितारण्यात आलेले हे सुंदर भित्तिचित्र कदाचित पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांना सोडून जाण्यापूर्वी दोलायमान अवस्थेत असणाऱ्या राजपुत्र सिद्धार्थाचेही असू शकते. कुणी सांगावे? चित्रकाराला काय अभिप्रेत होते याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. या चित्राबद्दल बोलावे आणि लिहावे तेवढे थोडे आहे असे या ठिकाणी सांगावेसे वाटते... कसे आहे हे सुंदर चित्र? 

एक क्रमांकाच्या विहारातील मागील भिंतीवर, गर्भगृहाच्या डाव्या बाजूला, अगदी सुरुवातीला एक अप्रतिम भित्तिचित्र आहे. हे चित्र म्हणजे अजिंठा लेण्यातील सर्वोत्कृष्ट चित्र ‘बोधिसत्व पद्मपाणी’ होय. अजिंठा लेणीतीलच नव्हे, तर भारतीय चित्रकलेच्या इतिहासातील हे सर्वांत सुंदर चित्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे भित्तिचित्र खूप मोठे आहे. ‘सर्वसंग’ आणि ‘परित्याग’ या दोन्ही शब्दांचा अर्थ ज्या लहानमोठ्या गोष्टींमधून अभिप्रेत होईल अशा सर्व गोष्टींना सामावून घेणारे हे सुरेख म्युरल बौद्ध धर्माचे प्रमुख तत्त्व आपल्यासमोर उलगडून सांगते. या भित्तिचित्रातील बोधिसत्व पद्मपाणीची मध्यवर्ती व्यक्‍तिरेखा आकाराने मोठी असून त्याच्या चित्राभोवती बाकीचे संपूर्ण भवताल मांडलेले आहे. बोधिसत्व पद्मपाणीचे हे सुंदर चित्र म्हणजे चित्रकाराच्या कलेचा उत्कट आविष्कार आहे. या चित्रातील पद्मपाणीचे देखणे रूप डोळ्यांना अत्यंत सुखावणारे आहे. गोरा रंग, उंचीपुरी शरीरयष्टी, भरदार छाती, गोलाकार अजानुबाहू, रुंद कपाळ आणि उंच मान यामुळे हा पद्मपाणी मनात भरतो. पण सर्वांत मनोवेधक आहेत ते पद्मपाणीच्या चेहऱ्यावरचे अत्यंत शांत आणि सोज्वळ भाव. धारदार नाक आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिरावलेली त्याची शांत सोज्वळ नजर. त्यांच्या नजरेतील अपार करुणा आणि ओठावर विलसणारे मंद स्मितहास्य यामुळे बोधिसत्व पद्मपाणी अध्यात्माचे परिपूर्ण रूपच भासतो आहे. मोत्यासारखी नितळ कांती असणारे त्याचे मुखकमल तारुण्याच्या सुंदर तेजामुळे अत्यंत प्रसन्न वाटते. त्याच्या चेहऱ्याभोवती विलसणारी आभा, मानेवर रुळणारे काळेकुरळे केस आणि डोक्‍यावर शोभणारा रत्नजडित मुकुट पाहून बोधिसत्व पद्मपाणीच्या चेहऱ्यावर आपली नजर खिळून राहते. मुकुटामध्ये माणकांच्या जोडीला निळ्या रंगाची अगणित रत्ने जडवलेली आहेत. या सुंदर रत्नजडित मुकुटाची कारागिरी पाहून मन थक्‍क होते. या सर्वांत उठून दिसणारी बोधिसत्वाच्या गळ्यातील मौक्‍तिकमाला आणि तिच्या मध्यभागी असणारे टपोरे निलम रत्न आपली नजर वेधून घेते. बोधिसत्वाच्या गळ्यात मोत्यांचे अनेकपदरी सुंदर यज्ञोपवीत आणि दंडावर बाजूबंद शोभताहेत. पद्मपाणीच्या दोन्ही कानांत वेगवेगळी कर्णफुले आहेत. सर्वांत सुंदर आहे ते त्याच्या हातातील कमलपुष्प! निळसर पांढऱ्या रंगाचे हे ‘कुमुदिनी’ कमलपुष्प आणि ते धरणारे कोमल हात या दोन गोष्टी चित्रकाराने इतक्‍या प्रभावीपणे चितारल्या आहेत, की मन थक्क होऊन जाते. पद्मपाणीच्या हातातील कमलपुष्प त्याच्या नावाला परिमाण देणारे असून पावित्र्याची ग्वाहीसुद्धा देते. पद्मपाणीने नेसलेले वस्त्र इकत पद्धतीच्या विणकामाचा रेशमी प्रकार आहे, जे त्याने धोतराप्रमाणे नेसले आहे. विणकामाची ही पद्धत त्या काळात जास्त प्रचलित होती असे लक्षात येते. कारण अजिंठा लेण्यातील भित्तिचित्रातून भेटणाऱ्या अगणित व्यक्‍तिरेखांच्या अंगावर या विणकामातील सुती किंवा रेशमी प्रकारची वस्त्रे पाहायला मिळतात. पद्मपाणी त्रिभंग मुद्रेमध्ये उभा असल्यामुळे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक वैशिष्ट्यपूर्ण लय प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पद्मपाणी अधिकच आकर्षक आणि प्रसन्न दिसतो आहे. चित्रकाराने त्याच्या चित्राला त्रिमितीय परिणाम दिलेला आहे हे आपल्या जाणवत राहते. 

खरोखर, अजिंठा लेणीतील हे चित्र सर्वोत्तम आहे याबद्दल कुणाचेही दुमत होणार नाही. जो कुणी अनाम कलाकार या भित्तिचित्राचा कर्ता होता, तो सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ चित्रकार असावा असे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. केवळ बोधिसत्व पद्मपाणीच नाही, तर या संपूर्ण भित्तिचित्रातील इतर व्यक्‍तिरेखांना चित्रामध्ये विवक्षित जागी ठेवून या चित्रकाराने कमालीचे कौशल्य दाखविले आहे. कारण कलाकाराला अभिप्रेत असणारी संकल्पना आणि त्यातून त्याला जे काही सांगावयाचे आहे ते सांगण्याचे संवादचातुर्य या गोष्टी भित्तिचित्राच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या असतात हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. त्यामुळे पद्मपाणीची मुख्य व्यक्‍तिरेखा आणि सोबत असणाऱ्या इतर लहानसहान व्यक्‍तिरेखा या एकमेकांना पूरक असल्यामुळे संपूर्ण भित्तिचित्राचा प्रभाव पाहणाऱ्याच्या मनावर अपेक्षेप्रमाणे गारुड करतो. बौद्ध धर्माला अपेक्षित असणारा संदेश जनमानसात पोचवण्याचे काम हे भित्तिचित्र निश्‍चितच प्रभावीपणे करते. बोधिसत्व पद्मपाणीच्या डाव्या बाजूला उभी अतिशय देखणी स्त्री एकूणच भित्तिचित्राच्या भव्यतेमध्ये भर घालते. तारा किंवा अजिंठ्याची कृष्णसुंदरी म्हणून ओळखली जाणारी ही स्त्री-प्रतिमा पद्मपाणीच्या पत्नीची आहे. एकीकडे पद्मपाणीला अप्रतिम अशा गौरवर्णीय रंगात सादर करताना, त्याच्या पत्नीला सावळ्या रंगात रंगवण्याचे धाडस अजिंठ्याच्या कलाकारांनी का केले असावे असा प्रश्‍न पडतो. परंतु, अजिंठा लेण्यात काळ्यासावळ्या सौंदर्याला चित्रकारांनी इतके प्राधान्य दिले आहे, की जागोजागी आपल्याला हे असेच अप्रतिम सावळे सौंदर्य भेटत राहते. अजिंठ्याची ही कृष्णसुंदरी कमालीची सुंदर आहे. चित्रामध्ये पूर्णाकारात (लाइफ साइझ) असलेल्या या स्त्रीचे कमनीय देहसौंदर्य चित्रांकित करताना चित्रकार कुठेही कमी पडलेला नाही. तिचा शिडशिडीत बांधा, हंसासारखी निमुळती मान, चेहऱ्यावरील शांत सोज्वळ भाव यामुळे ‘कृष्णसुंदरी’ बोधिसत्वाच्या बरोबरीने पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. कृष्णसुंदरीच्या अंगातील वस्त्रे नेहमीप्रमाणेच अतितलम आणि झिरझिरीत असल्यामुळे त्याचे अस्तित्व नजरेला दिसत नाही. पण चित्रकाराने तुलिकेच्या हलक्‍याशा फटकाऱ्याने या तलम वस्त्राचे अस्तित्व हळुवारपणे दर्शवले आहे. तिच्या गळ्यातील मौक्‍तिकमाला आणि त्यातील निलरत्ने अतीव सुंदर असून कृष्णसुंदरीचे सौंदर्य त्यामुळे वृद्धिंगत झाले आहे. मानेवर रुळणारे रेशमी गोंडे, कानातील गोल कर्णफुले आणि कमलपुष्पाच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर टपोरे डोळे यामुळे ती अधिकच सुंदर दिसते आहे. या अर्धोन्मीलित डोळ्यांतून केवळ प्रसन्नता व्यक्‍त होताना दिसत आहे. धारदार नाकाचा शेंडा, डोळे आणि ओठ यावर चित्रकाराने शेवटचा हात फिरवताना दिलेला फिकट रंगाचा स्पर्श यामुळे या चित्राला कमालीचा उठाव मिळालेला आहे. तिच्या उजव्या हातात तिने एक कमळ धरलेले आहे. कृष्णसुंदरीच्या डोक्‍यावरील मुकुटही पद्मपाणीइतकाच सुंदर असून रत्नमाणकांनी जडवलेला आहे. 

बोधिसत्व पद्मपाणी आणि कृष्णसुंदरी यांच्यामध्ये एक चवरीधारी उभा आहे. त्याच्या डोक्‍यावरचा मुकुट वेगळ्या धाटणीचा आहे. कदाचित परकीय मुलुखातील असावा. त्याने अंगात घातलेला अंगरखा निळ्या रंगाचा आहे. बोधिसत्व पद्मपाणीच्या उजव्या हाताला एक अतिशय धिप्पाड शरीरयष्टीचा, काळ्या कुरळ्या केसांचा, तरुण उभा आहे. त्याने उजव्या हातात काठी किंवा दंडुका धरलेला आहे. मात्र डाव्या हाताचे बोट ओठाशी नेत तो स्वतःशीच आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहे. तो कुठल्या तरी गहन विचारात गढलेला आहे. ही व्यक्तीसुद्धा परकीय वाटते. कदाचित आफ्रिकन देशातून आलेली. त्या काळात भारतीय व्यापाऱ्यांचा आफ्रिकन देशांशी व्यापाराच्या निमित्ताने संबंध येत होता. आफ्रिकेतूनही लोक व्यापारासाठी भारतवर्षात येत असावेत. यापैकी कित्येकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, असेही म्हटले जाते. कारण अजिंठा लेण्यातील कितीतरी भित्तिचित्रांमध्ये आफ्रिकन लोकांची चित्रे पाहायला मिळतात. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा, लांब बाह्यांचा, गळाबंद अंगरखा आहे. डोक्‍यावरील कुरळ्या केसांत अगदी वेगळी घडण असलेला, हिरेमाणके जडवलेला सोन्याचा पट्टा घातलेला दिसत आहे. त्यामुळेही त्याचे वेगळेपण लक्षात येते. बोधिसत्व पद्मपाणीच्या भोवतालचे विश्‍व कसे भौतिक सुखामध्ये रममाण झालेले आहे हे दाखवण्यासाठी चित्रकाराने अनेक गोष्टींचा या चित्रामध्ये समावेश केलेला आहे. थोडे वरच्या बाजूला डोंगर, वृक्षराजी दाखवण्यात आली आहे. तिथे मोर आणि लांडोर यांची जोडी दिसत आहे. मोराची चोच उघडी दाखवली आहे. याचा अर्थ त्याचा केकारव चालू आहे. तो मीलनाच्या इच्छेने लांडोरीला साद घालतो आहे. त्याच्या जवळ एक स्त्री-पुरुष जोडी एकत्र दाखवण्यात आली आहे. स्त्रीने आपला डावा हात पुरुषाच्या खांद्यावर ठेवला आहे, तर उजव्या हाताने ती त्याच्याबरोबर लडिवाळपणा करत आहे. हे दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदी आहेत. माकडे झाडावर उड्या मारताना दिसत आहेत. 

पद्मपाणीच्या उजव्या बाजूला अनेक जोड्या दाखवलेल्या आहेत. एकीकडे स्त्री-पुरुष जोडी उत्तान अवस्थेमध्ये एकमेकांमध्ये रममाण झालेले आहेत. स्त्रीला तिच्या अंगावरील वस्त्रांचेदेखील भान नाही. अगदी वरच्या बाजूला एक गंधर्व गांधर्वीसह आकाशात भ्रमण करताना दिसतो आहे. या ठिकाणी चित्र स्वच्छ दिसत नसले, तरी गंधर्वाचा रंग काळासावळा आहे तर गांधर्वी गोऱ्या रंगात दाखवलेली आहे. गंधर्वाच्या हातामध्ये नग्न तलवार दिसत आहे. गांधर्वीने आकाशात भ्रमण करताना आधारासाठी आपला डावा हात आपल्या जोडीदाराच्या खांद्याभोवती लपेटलेला आहे. तिच्या अंगातील इकत पद्धतीचे रेशमी वस्त्र अगदी पायाच्या घोट्यापर्यंत पोचलेले आहे. तिच्या पायातील पैंजण दाखवताना ते विशिष्ट प्रकारे लोंबताना दाखवले आहे. कारण गंधर्व आकाशात उडताहेत. त्यांच्या शरीराची गतिमानता दाखवताना चित्रकार कुठेही कमी पडलेला नाही हे विशेष. थोडे डाव्या बाजूला एक सिंह बसल्याचे दाखवलेले आहे. अजिंठ्याच्या आजूबाजूच्या जंगलात वाघ आणि बिबटे यांचा आजही वावर आहे. त्यावेळी तर तो नक्कीच असणार. परंतु, आज संपूर्ण भारतात फक्‍त गुजरातच्या किनाऱ्यालगत गीरच्या जंगलातच सिंह उरलेले आहेत. परंतु, असे म्हणतात की दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या या भागात सिंहांचा वावर होता. त्यामुळेच अजिंठा लेण्यातील भित्तिचित्रांमध्ये आपल्याला सिंहाची चित्रे बऱ्याच जागी पाहायला मिळतात. 

गंधर्वांच्या खाली किन्नर दंपत्ती दिसताहेत. वरचे शरीर मनुष्याचे आणि खालचे धड पक्ष्याचे असणारे किन्नर म्हणजे दैवी गायक, वादक होय. आपल्याला अजिंठा लेण्यातील भित्तिचित्रात आणि शिल्पकामात अनेक ठिकाणी या किन्नरांच्या जोड्या पाहायला मिळतात. या मंडळींच्या हातामध्ये असलेली विविध प्रकारची वाद्ये पाहून संगीत ही कलासुद्धा त्याकाळी जनमानसात किती रुजलेली होती याची आपल्याला जाणीव होते. पुरुष किन्नराच्या हातात सारंगीसारखे वाद्य आहे. हा किन्नर तन्मयतेने त्याच्या हातातील वाद्य वाजवताना दिसतो आहे. त्यांच्या थोडे खाली बुटक्‍या यक्षांची एक जोडी एकमेकांना लगटून प्रेमालाप करताना दिसते आहे. उडणाऱ्या गंधर्वांच्या खालच्या बाजूस एक तरुण जोडपे दिसते आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते जोडपे बोधिसत्व पद्मपाणीच्या सर्वसंगपरित्याग या भावनेपासून कोसो दूर आहे... भौतिक सुखाच्या मोहमायेत अडकलेले आहे. स्त्री आकर्षक पद्धतीने बसली असून, शरीराच्या कमनीयतेचे प्रदर्शन करून प्रियकराला अधिक मोहात पाडते आहे असे वाटते. उत्तानता त्यांच्या रोमरोमांत भरलेली आहे आणि हे चित्रातून अभिप्रेत करण्यात चित्रकार पूर्णपणे यशस्वी झालेला आहे याबद्दल कुणाचेही दुमत होणार नाही. बाजूलाच दोन प्राण्यांचे चित्र दिसते आहे. त्यातील एक प्राणी कुत्रा आणि दुसरे मांजर आहे असे वाटते. चित्रामध्ये डोंगर, प्राणी, वृक्ष हे सर्व दाखवून संपूर्ण चित्राला वास्तवाचा स्पर्श देऊन चित्रकाराने भित्तिचित्राला परिपूर्ण रूप देण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे जाणवते. चित्रामध्ये पार्श्‍वभूमीवर सुपारी तथा अशोक वृक्ष अतिशय सुंदररीत्या रेखाटलेला दिसतो. 

या संपूर्ण चित्रातून कलाकार प्रभावीपणे बौद्ध धर्माची तत्त्वप्रणाली आपल्यासमोर उलगडून दाखवतो आहे असे वाटते. मोह, माया, मद, मत्सर, वासना, लालसा यांनी भरलेल्या या आयुष्यात किती अडकून पडायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. बोधिसत्व पद्मपाणीच्या आजूबाजूचा संपूर्ण भवताल याच विकार आणि वासनेने, मोहाने भरलेले आहे. मात्र खुद्द बोधिसत्व या सर्वांपासून अलिप्त आहे. हा अलिप्तपणा त्याच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून स्पष्टपणे जाणवत राहतो. जोपर्यंत भौतिक सुखाचा त्याग केला जात नाही तोपर्यंत मनुष्याची आसक्ती कमी होणार नाही. जोपर्यंत आसक्‍ती कमी होणार नाही तोपर्यंत जन्म-मृत्यूच्या चक्रातून मनुष्यप्राण्याची सुटका होणार नाही आणि जोपर्यंत जन्म-मृत्यूच्या चक्रातून मनुष्याची सुटका होणार नाही तोपर्यंत त्याला संपूर्ण मोक्ष आणि निर्वाणप्राप्ती मिळणार नाही. याच भावनेने प्रेरित होऊन राजपुत्र सिद्धार्थने आपल्या पत्नी आणि मुलाचा त्याग केला होता. म्हणूनच बोधिसत्व पद्मपाणीचे हे चित्र राजपुत्र सिद्धार्थ म्हणूूनच काढलेले असावे असे मनापासून वाटत राहते. चित्रकाराने इतक्‍या उत्कटपणे बोधिसत्व आणि त्याची पत्नी यांना भित्तिचित्रातून अभिव्यक्‍त केले आहे, की त्याच्या कलापूर्ण श्रेष्ठतेबद्दल आपली खात्री पटते. अजिंठा लेण्यातील भित्तिचित्रांचे हेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी चितारलेल्या भित्तिचित्रातून चित्रकारांनी अभिव्यक्‍त केलेल्या भावना या बौद्ध धर्माविषयी संवाद साधत आहेत हे ठामपणे जाणवत राहते. बौद्ध भिक्षूंना समाजापर्यंत जी तत्त्वे पोचवायची आहेत त्यासाठी कलात्मक संवादाचा एक पर्याय  म्हणूनच या भित्तिचित्रांना रंगविण्याचा निर्णय त्याकाळात घेतला गेला असणार याबद्दल शंका नको. अजिंठ्याच्या पद्मपाणीबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात. या ठिकाणी एवढेच सांगावेसे वाटते, की कधीकाळी भारतीय चित्रकला जेव्हा तिच्या उच्चतम उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचलेली होती तेव्हा आपल्या पूर्वजांनी चित्रांकित केलेली ही भित्तिचित्रे म्हणजे आपल्यासाठी अनमोल खजिनाच आहे. आपले हे सांस्कृतिक पूर्वसंचित आपल्या सुदैवाने आपल्याला अनुभवता येते आहे. त्याचा आनंद उपभोगतानाच या संचिताचे जतन करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावर आहे हे आपण विसरून चालणार नाही.
 

संबंधित बातम्या