...जेव्हा चंद्र थेट डोक्यावर येतो

अरविंद परांजपे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

विशेष स्टोरी
 

काही दिवसांपूर्वी माझ्या आतेभावाने, मुकुंद अळतेकर, याने खिद्रापूर मंदिराविषयीचा एक वॉट्सअॅप मेसेज मला फॉरवर्ड केला. गेल्या काही दिवसांत माझ्या मित्रपरिवारापैकी बऱ्याच जणांकडून तो मेसेज पाठवला गेला. अनेकांनी या विषयीचे माझे मत विचारले. मूळ मेसेजचे जनक होते तुषार कोडोलीकर, ज्यात त्यांनी त्यांना खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिरात आलेल्या अनुभवाचे वर्णन केले होते. कोडोलीकरांना एका वयस्कर गृहस्थांनी सांगितले, की त्रिपुरारी पौर्णिमेला (म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला) चंद्र या मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मधे येतो. ते इतके अचंबित झाले, की त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन निसर्गाचा हा प्रयोग बघितला. त्याचेच या मेसेजमध्ये त्यांनी वर्णन केले होते.

कोपेश्‍वर मंदिर हे वास्तुकलेचे आणि शिल्पकलेचे एक अप्रतिम उदाहरण आहे. कोपेश्‍वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन, शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘शिव भोला भंडारी’ या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्‍वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.

मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्‍वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. (संदर्भ: विकिपीडिया मुक्तज्ञान कोष) याच संदर्भात अनुराधा गोयल यांचा इंटरनेटवरील लेख वाचण्यासारखा आहे. कोडोलीकर यांनी याच स्वर्गमंडपाखाली आपल्याला आलेल्या अनुभवाचे वर्णन केले आहे.

कार्तिक पौर्णिमा ही आपण जे इंग्रजी कॅलेंडर वापरतो त्याच्या नोव्हेंबर महिन्यात येते. कालगणनेच्या या पद्धतीचे मूळ नाव आहे ग्रेगोरियन कॅलेंडर. कार्तिक पौर्णिमेला चंद्र कोपेश्‍वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मधे येतो यात आश्‍चर्य वाटण्यासारखे असे काहीच नव्हते, पण जेव्हा याचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले, तर ‘ओळखीतल्या काही तज्ज्ञ लोकांना विचारले, गूगलला शोधले पण खात्रीलायक/लिखित दुजोरा काही मिळाला नाही.’ तसेच स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे. काही लोक तर या दगडाला वरून खाली पडलेले छत म्हणतात. परंतु, अत्यंत आश्‍चर्यकारक बाब म्हणजे स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्राचा वर्तुळाकार कवडसा पडतो. हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या वर्तुळाकार दगडाशी अगदी बेमालूम जुळून येतो.

ही बाब अगदी सोपी आहे, पण कित्येकदा सोपी गोष्टच सांगायला अवघड असते- विषेशत: खगोलशास्त्राच्या संदर्भात. आपण जरी त्रिमितीय किंवा तीन आयामी (३डी) जगात वावरत असलो, तरी आपले विचार आपण दोन आयामी पटलावरच मांडत असतो, म्हणजेच कागदावर (किंवा तुमच्या स्क्रीनवर – मग तो काँप्युटरचा असो की मोबाइलचा) आणि या पटलावर खगोलशास्त्रातील निरीक्षणांशी आणि ग्रहगोलांशी संबंधित काही मूलभूत संकल्पना ज्या तीन आयामी आहेत समजावून सांगणे अवघड जाते. (४था आयाम हा काळ आहे, पण तो फक्त एकाच दिशेने जातो म्हणून त्याचा विचार आपण फारसा करत नाही) याचे एक उदाहरण म्हणजे शरीराचे अवयव समजावून घेण्याकरिता कागदावरची चित्रे पुरेशी ठरत नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता तीन आयामी मॉडेल वापरण्यात येतात किंवा भूगोलाच्या संदर्भात डोंगर, नद्यांची उंची किंवा खोली दाखवणारी मॉडेल्स असतात. जरी आता संगणक युगात तीन आयामी कल्पनांचे व्हिज्युअलायझेशन अवघड राहिलेले नसले, तरी ते जनसामान्यात पोचलेले नाही. असो.

त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र या मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मधे येतो म्हणजे काय, हे समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे समजावून घेण्यास आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीस थोडा ताण द्यावा लागणार आहे.

आपल्याला हे माहीत आहे, की पृथ्वीवर एखादे स्थान किंवा जागा दाखवायची असेल तर आपण अक्षांश-रेखांशाचा वापर करतो. कल्पना करा, की तुमच्या समोर पृथ्वीचा गोल आहे आणि त्यावर या अक्षांश आणि रेखांशाच्या रेषा काढल्या आहेत. आपण अशीपण कल्पना करूया, की हा गोल एका पारदर्शक पदार्थाने तयार केलेला आहे. हा असा पदार्थ आहे, की तो कितीही फुगवला किंवा मोठा केला तरी तो फुटणार नाही. तसेच या गोलावरून आपण पृथ्वीचे संदर्भ काढून टाकले आहेत. म्हणजे आता यावर फक्त रेषाच उरल्या आहेत. आता समजा हा गोल इतका फुगवला की तो नभपटलालाच जाऊन भिडला. तर आपल्याला नभपटलावर म्हणजेच आकाशावरसुद्धा या अक्षांश आणि रेखांशाच्या रेषा दिसतील. 

अशाच पद्धतीचा वापर खगोलशास्त्रज्ञ आकाशात तारे, ग्रहगोल, चंद्र, सूर्य आणि इतर खगोलीय पदार्थांची स्थिती दाखवण्यास करतात. अक्षांशाच्या समान रेषांना क्रांती रेषा (Declination) म्हणतात, तर रेखांशाच्या समान रेषांना विषुवांश रेषा (Right Ascension) म्हणतात.

या वृत्तालाही दोन ध्रुव आहेत - खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुव आणि पृथ्वीच्या विषुववृत्तासारखेच (equator) याचेपण वैषुविकवृत्त (celestial equator) आहे. पण या गोलावर आणखीन एक वृत्त आहे, ज्याला आयनिक वृत्त (ecliptic) म्हणतात. सूर्याचा प्रवास याच वृत्तावरून क्रमाक्रमाने होत असतो. सूर्याच्या या प्रवासात त्याची क्रांती उणे २३.५ ते अधिक २३.५ अशी बदलत असते. त्यास कारण, की ज्या पटलात पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते, पृथ्वीचा अक्ष त्या पटलास ६६.५ अंशानी कललेला आहे. तसेच सर्व ग्रह आणि चंद्रसुद्धा याच वृत्ताच्या जवळपासच प्रवास करतात. हा गोल पृथ्वी स्वतःच्या अक्षावर एक फेरी २३ तास ५६ मिनिटांनी पूर्ण करते. (आपण जो २४ तासांचा एक दिवस मानतो तो त्याचा संबंध सूर्याशी आहे.)

प्रत्येक निरीक्षकाच्या बरोबर डोक्यावरच्या बिंदूला ख-स्वस्तिक (zenith) म्हणतात. तसेच आणखीन एक वृत्त आहे, ज्याची आपल्याला ओळख करून घ्यायला हवी. ते वृत्त म्हणजे यामोत्तर वृत्त (meridian) - हे वृत्त ख-स्वस्तिक, खगोलीय गोलाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांच्यातून जाते. सूर्य जेव्हा या वृत्तावर येतो तेव्हा ती बरोबर मध्यान्हाची वेळ असते. सूर्य किंवा चंद्र या बिंदूवर असतील, तर त्यांच्यामुळे पडणारी सावली ही बरोबर त्या निरीक्षकाच्या पायाखाली पडेल किंवा जर छताला भोक असेल, तर सूर्य किंवा चंद्र यांच्या बरोबर खाली पडेल.

यावरून कदाचित तुमच्या लक्षात आलेच असेल, की १२ नोव्हेंबरच्या रात्री खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिरात काय घडले असेल. त्या रात्री जेव्हा चंद्र यामोत्तर वृत्ताजवळ होता तेव्हा चंद्राची क्रांती आणि कोपेश्‍वर मंदिराचे अक्षांश जवळ जवळ एकच असणार आणि चंद्र हा ख-स्वस्तिक बिंदूजवळ असायला पाहिजे.

इतपत सोपे होते, पण मग माझ्यातील जिज्ञासू जागा झाला आणि मी या घटनेचा आणखीन खोलात जाऊन अभ्यास केला आणि तोच तुमच्या समोर मांडत आहे. 

कोपेश्‍वर मंदिर वास्तूचे अक्षांश १६.६ अंश आणि रेखांश ७४.७ अंश आहे. स्वर्गमंडपावर जो खुला भाग आहे त्या भागाचा व्यास मला मिळाला नाही, पण विकिमॅपियातील चित्रांवर तिथे दोन खुले वृत्ताकार भाग दिसले. यातील स्वर्गमंडप कुठला ते लक्षात आले नाही, पण चित्रांवरून यांचे पश्‍चिमेकडील वृत्ताचा व्यास ४.७ मीटर तर पूर्वेकडील वृत्ताचा व्यास ६.५ मीटरच्या आसपास असावा.

या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा १२ नोव्हेंबर रोजी होती. त्या संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सायंकाळी ७.०४ वाजता चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत होते. १२ नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा वाजता म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी ००.३० वाजता चंद्र कोपेश्‍वर मंदिराच्या यामोत्तर रेषेवर आला होता. त्या वेळी चंद्राची क्रांती +१४.८५ अंश होती. म्हणजे चंद्र कोपेश्‍वर मंदिराच्या ख-स्वस्तिक बिंदूपासून फक्त १.७४ अंश दक्षिणेस होता. हा कोन बऱ्यापैकी कमी असल्यामुळे चंद्रप्रकाशाचा जमिनीवर पडलेला वर्तुळाकार कवडसा जमिनीच्या वर्तुळाकार दगडाशी जुळून आल्याचे वाटले तर नवल नाही.

हा अनुभव तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये घ्यायचा असेल, तर मात्र कठीण आहे. या वर्षी पौर्णिमा ३० नोव्हेंबर रोजी आहे. त्या रात्री चंद्र कोपेश्‍वर मंदिराच्या यामोत्तर रेषेवर रात्री १२.४० ला येईल (म्हणजे १ डिसेंबर ००.४० वाजता), त्या वेळी चंद्राची क्रांती २१.८ अंश असेल. म्हणजे चंद्र कोपेश्‍वर मंदिराच्या ख-स्वस्तिकपासून तब्बल सुमारे ५.२ अंश उत्तरेला असेल आणि चंद्राचा ९९.८ टक्के भाग सूर्य प्रकाशित असेल. खरे तर आदल्या रात्री म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी चंद्र यामोत्तर रेषेवर रात्री ११.५२ वाजता येईल आणि त्याची क्रांती १८ अंश ४२ कला असेल. तरी तो ख-स्वस्तिकच्या दोन अंश उत्तरेकडेच असेल. चंद्र प्रकाशाचे म्हणाल, तर चंद्राचा ९९.६ टक्के भाग सूर्य प्रकाशित असेल.

पण २०२१ ची परिस्थिती फारच चांगली असेल. त्या वर्षी पौर्णिमा १९ नोव्हेंबर रोजी आहे. त्या दिवशी दुपारी २.२७ वाजता चंद्र – पृथ्वी आणि सूर्य या क्रमाने एका रेषेत येतील. खरे तर त्या दिवशीच्या २४ तासांत चंद्र यामोत्तर रेषेवर येणारच नाही. पण १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५१ वाजता चंद्र यामोत्तर रेषेवर येईल आणि त्याची क्रांती १६.७ अंश असेल म्हणजे चंद्र ख-स्वस्तिक बिंदूपासून फक्त ०.१ अंश उत्तरेस असेल आणि चंद्राचा ९९.७ टक्के भाग सूर्यप्रकाशित असले. तर तुम्हाला हे दृश्य बघायचे असेल किंवा अनुभवायचे असेल, तर ही रात्र नक्कीच जास्त योग्य असेल. कारण मग पुढच्या पाच वर्षांत पौर्णिमेच्या दिवशी चंद्र या मंदिराच्या ख-स्वस्तिक बिंदूवर (अचूक) येणार नाही.

प्रकाश आणि स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार जमिनीवर वर्तुळाकार कवडसा हा काही चंद्राप्रकाशापुरताच मर्यादित नाही. दर वर्षी ६ मे रोजी सूर्यप्रकाशामुळेसुद्धा स्वर्गमंडपाचा असाच कवडसा दुपारी १२.२८ वाजता इथे पडतच असणार, पण याकडे कदाचित कुणाचे लक्ष तरी गेले नसावे, दुर्लक्ष झाले असावे किंवा हे सांगायचे राहून गेले असावे. त्या दिवशी जेव्हा सूर्य यामोत्तर रेषेवर असेल तेव्हा त्याची क्रांती ही मंदिराच्या अक्षांश इतकी असेल आणि सूर्य बरोबर ख-स्वस्तिक बिंदूवर येईल.

अर्थात प्रकाशाचा हा खेळ तुम्हाला तुमच्या घरीपण करता करता येईल, जर तुमच्या घरी सूर्यप्रकाश येत असेल तर. तुमच्या किंवा तुमच्या आप्तेष्टांच्या एखाद्या महत्त्वाच्या दिवशी जर, जसे वाढदिवस, सूर्यप्रकाशाची तिरीप तुम्हाला जमिनीवर किंवा भिंतींवर जिथे दिसली तिथे खूण करून वेळपण लिहून ठेवा. पुढच्या वर्षी याच दिवशी याच वेळी तुम्हाला त्या खुणेवर सूर्यप्रकाशाची तिरीप दिसेल.

सूर्य, चंद्र यांच्यामुळे होणारा प्रकाशाचा हा खेळ फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधे असलेल्या अक्षांशावरच दिसतो, कारण सूर्याची क्रांती उणे २३.५ ते २३.५ इतकीच बदलते. रोममधील पँथिऑन या प्राचीन मंदिराचे भव्य छतदेखील असेच उघडे आहे आणि त्यात मोठा गोलाकार झरोका आहे. ते मंदिर आणि त्यातून येणारे ऊन आणि पाऊस इत्यादी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पण तिथे सूर्य ख-स्वस्तिक बिंदूवर कधीच येणार नाही, कारण रोमचे अक्षांश ४१.९ अंश आहे. 

संबंधित बातम्या