एक प्रेरणादायी सायकल प्रवास

ज्योती बागल
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

विशेष
 

भटक्यांच्या आवडत्या गडांच्या यादीत हरिश्चंद्रगडाचं स्थान नेहमीच वरचं राहिलं आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील सर्वाधिक उंच गड अशी हरिश्चंद्रगडाची ओळख. जेवढा हा उंच तेवढीच याची चढण वळणावळाची आणि अवघड आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल चार हजार फूट एवढी उंची असलेल्या या गडावर अनेक वाटा जातात. पुण्याकडून जाणारी खिरेश्वरची वाट, नगर-राजूरकडून येणारी पाचनईची वाट, जुन्नर दरवाजाची आडमार्गे वर जाणारी वाट तसंच कल्याणहून चढणारी सावर्णे-बेलपाडाकडील उभ्या कड्याला अंगावर घेत चढणारी वाट... यातल्या नगर-राजूरकडून येणाऱ्या पाचनईच्या वाटेवरून अनेकजणांनी गड चढला असेल, पण याच खडतरमार्गे सायकल घेऊन कोणी गडावर गेल्याचं फारसं ऐकलं नसेल. पण अशी काही अवलिया मुलं आहेत, ज्यांनी पुणे-हरिश्चंद्र गड-पुणे असा खडतर सायकल प्रवास केला आहे. 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पाच तरुणांनी पुणे-हरिश्चंद्र गड-पुणे असा सायकल ट्रेक पूर्ण केला आहे. ओंकार घोलप, अभिषेक निला, हितेश सोनटक्के, आकाश आपटे आणि विनीत भोगे अशी त्यांची नावे. हे पाचही तरुण एन.सी.सी. कॅडेट असून त्यांची सैन्यदलात जाण्यासाठीची तयारी सुरू आहे. २३ डिसेंबरला पहाटे २ वाजता पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे सिमला ऑफिस, शिवाजीनगर इथून यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.

एकामागं एक सायकली निघाल्या... सुनसान पुणे-नाशिक महामार्ग... आणि भटकंतीची नुकतीच सुरुवात झाली असल्यानं सायकलस्वारही उत्साहात. एकूण तीन टप्प्यांमध्ये जायचं प्लॅनिंग झालं. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात पुणे ते पाचनई ठरलं. जे पुण्यापासून १८० किलोमीटर आहे. पण पहिल्या दिवशी ते शक्य झालं नाही, कारण २०-३० किलोमीटरचं अंतर पार करतायत न करतायत, तर यांच्यातील दोघांच्या सायकली पंक्चर झाल्या. मुलांनी सर्व वस्तू बरोबर घेतल्या होत्या, पण नेमकं पंक्चर कीट घेतलं नव्हतं. त्यामुळं पूर्ण रात्र या मुलांना पेट्रोल पंपावरचं काढावी लागली. जिथं शक्य होईल तिथं आजूबाजूला विचारलं, पण कोणतंही सायकल दुरुस्तीचं दुकान सापडलं नाही. शिवाय रात्र असल्यानं जास्त हालचालही करून चालणार नव्हती. ठिकाण नवीन होतं. म्हणून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर मुलांनी रात्र काढली. 

म्हणतात ना, माणसानं आयुष्यात जमेल तेवढ्या ओळखी कराव्यात. कधी, कुठे, कोणाची कशी मदत होईल सांगता येत नाही. या मुलांमधील ओंकार घोलपचा एक मित्र राजगुरुनगरमध्ये राहायला होता. मग काय, सकाळ होताच त्यानं त्याला फोन केला आणि मदतीला बोलावून घेतलं. तो मित्रही एका हाकेवर धावून आला आणि या मित्राच्या मदतीनंच यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. तिथून त्यांनी ओझर गाठलं. फ्रेश होऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. पोटपूजा केली आणि पुढं ओतूर-ब्राह्मणवाडा-कोतुळ-कोथळा हा प्रवास साधारण ८-९ तासांत पूर्ण केला. आधी बराच वेळ गेल्यानं त्यांचं पहिल्या टप्प्याचं ठरलेलं टारगेट पूर्ण झालं नव्हतं, म्हणून गेलेल्या वेळेचा बाऊ न करता त्यांनी पुढचा प्रवास अधिक जोमानं करायचं ठरवलं. इथं हरिश्चंद्र गडापासून २० किलोमीटर अलीकडं असलेल्या गावातील एका मित्राकडं मुक्काम केला आणि सकाळी पाचनईमार्गे हरिश्चंद्र गडावर मोर्चा वळवला. या मार्गे चढाई करत असताना सायकली उचलून गडावर घेऊन जाव्या लागल्या. याआधी कोणीही अशाप्रकारे ट्रेक केल्याचं फारस ऐकिवात नाही. तसंच सायकलींसह या मुलांनी फक्त दोन तासांत पायथ्यापासून कोकणकड्यापर्यंत चढाई पूर्ण केली. गड चढत असताना मधेमधे सायकल चालवता यायची, तर काही ठिकाणी उचलून वरती चढावं लागत होतं. पाचनई मार्ग हा खर तर सायकलसाठी नाहीये. पण या पाचही जणांपैकी कोणीही याआधी या गडावर गेलं नसल्यामुळं रस्ता एवढा आव्हानात्मक आहे हे त्यांना माहीत नव्हतं आणि हाच त्यांच्यासाठी एक प्लस पॉइंट होता. कारण रस्ता एवढा अवघड आहे याची भीती कोणाच्याही मनात नव्हती. त्यामुळं माघार घेण्याचा विषयच नव्हता. कोथळा गावात एक मुक्काम झाला, तर दुसरी रात्र हरिश्चंद्रगडावर गेली. रात्री गडावरून आजूबाजूचा नजारा आणखी सुरेख दिसतो. दूरवर पसरलेलं आकाश, लखलखणाऱ्या असंख्य चांदण्या, बोचरी पण हवी हवीशी वाटणारी गार हवा. इथं गडावर भाड्याने तंबूही मिळतात. 

या मुलांना सायकल घेऊन गडावर चढताना आणि उतरताना बघून अनेकांना आश्चर्य वाटत होतं आणि तसातसा मुलांचा उत्साह वाढत होता. काही लोकांना तर एवढं कौतुक वाटलं, की त्यांनी या मुलांच्या ग्रुपबरोबर फोटोदेखील काढले. गड उतरताना मात्र वाटेत यांना एक आजी भेटल्या आणि त्यांनी गडावरून उतरण्याचा एक सोप्पा रस्ता त्यांना सांगितला. मग त्याच मार्गानं मुलांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ठरलेल्या मार्गात जरा बदल करत पाचनई-वाघदरी-कोतुळ-ब्राह्मणकडा-ओतूर-आळेफाटा-नारायणगाव-पुणे असा हा तिसरा दिवस परतीच्या प्रवासातच गेला; शिवाय सोबतीला जोरदार पाऊसही होता... हा प्रवास संपला तो मध्यरात्री साधारण एक वाजताच्या सुमारास, तोही प्रवासाची सुरुवात झाली होती तिथंच, म्हणजेच शिवाजीनगर, सिमला ऑफिस इथं. एकूण तीन दिवसांचा हा प्रवास जवळजवळ ३८० किलोमीटरचा होता.

प्रवासात कोणात्याही प्रकारचं जास्तीचं ओझं होऊ नये म्हणून मुलांनी खाण्यासाठी बरोबर फक्त पाव आणि चीज स्लाइस घेतल्या होत्या. पाठीवर जास्त ओझं असेल तर सायकलिंग होत नाही. वाटेत घरगुती मेस किंवा हॉटेल बघूनच ते जेवण करायचे. जेणेकरून बाहेरचं अन्न बाधू नये. बरोबर एक लिटरची पाण्याची बाटली ठेवली होती, जिथं जिथं पिण्याचं पाणी दिसेल तिथून भरून घेत असत. 

या मोहिमेसाठी या मुलांनी खास माउंटन बाइक्स वापरल्या. त्यामुळे खडबडीत, उंचवट्याच्या भागातूनही व्यवस्थित सायकल चालवता येते. या सायकली इतर सायकलींपेक्षा वजनाला कमी असतात. त्यांची बॉडी ॲल्युमिनिअमची असते. रस्त्यावर असणाऱ्या खड्यांमध्ये या सायकलींना इतर सायकलींप्रमाणं त्रास होत नाही. शिवाय गिअर असल्यानं स्पीडही भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळं चढावर सहज सायकल चढवता येते. 

ओंकारचं मडपारगाव हे गाव हरिश्चंद्रगडाजवळ आहे. परंतु, आत्तापर्यंत तो गडावर कधी गेला नव्हता. आजीकडून गडाविषयी बरंच काही ऐकलं असल्यानं गडावर जाण्याची ओढ होतीच. पण योग जुळून येत नव्हता. तसंच वाचनातही गडाविषयी, हरिश्चंद्र राजाविषयी बरंच ऐकलेलं होतं. आता पुण्यात राहत असल्यामुळं गावी जाणं जरी कमी झालं असलं, तरी ट्रेकिंग करण्याची मुलांना भारी हौस असते. ओंकार आणि त्याच्या मित्रांनी अनेकदा ट्रेकिंगचा अनुभव घेतला आहे. पण सायकलनं एखादा किल्ला सर केला आहे असा हा पहिलाच ट्रेक आहे... आणि त्यांच्या म्हणण्यानुसार याआधी कोणी असं केल्याचं ऐकिवात किंवा पाहण्यात नाही.

या सर्व मुलांच्या घरच्यांनीही त्यांना हा खडतर सायकल प्रवास करायला विरोध न करता प्रोत्साहनच दिलं. कारण पुढं या सर्व मुलांना सैन्यदलात जायचं असून त्यांनी आतापासूनच मनाची आणि शरीराची तयारी करायला हवी. तसंच यांच्याबरोबर पालकांनाही मनाची तयारी करावी लागते. या प्रवासाला घरच्यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या मनाची तयारी झाल्याचंच जणू दाखवून दिलं आहे आणि मुलांनी असा खडतर प्रवास सहज पूर्ण केल्यानं घरचेदेखील त्यांच्यावर खूश झाले आहेत.  

मला याच वर्षी सायकल घेतली असल्यानं मित्राबरोबर बोलताना सहज विषय निघाला, ''आपण सायकलवर हरिश्चंद्रगडावर गेलो तर...'' माझ्या या कल्पनेला मित्रानंही दुजोरा दिला आणि आमचं फायनल झालं. त्यावेळी बरेचजण म्हणाले, ''तुम्ही सायकलवर जाल, पण गडाच्या पायथ्यापर्यंतच पोचू शकाल. कारण सायकल वरती घेऊन जाणं अवघड आहे. मग मात्र आम्ही मनाशी पक्कं केलं, की आपण जायचं आणि तेही सायकल घेऊनच जायचं, यांना दाखवून द्यायचं. यावर घरच्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं, की 'जे करायचं ते पूर्ण तयारी करून आणि काळजी घेऊन कर. गरज तिथं मोठ्यांची मदत घे.' 
 आम्ही एकूण पाचजण होतो. त्यानुसार आमचं प्लॅनिंग सुरू झालं. आम्ही पाचही जण एन.सी.सी कॅडेट असल्यामुळं आम्हाला पळणं, सायकल चालवणं, ट्रेकिंग यांची उत्तम प्रॅक्टिस होती. आम्ही सर्वजण १९ ते २० वयोगटातले आहोत. रस्त्याचा अभ्यास आम्ही गुगल मॅपवरून केला. एकूण तीन दिवसांचा हा प्रवास असणार होता, तसं आम्ही प्रत्येक दिवशी किती अंतर कापायचं हे ठरवलं. टप्प्याटप्प्यानं कसं जायचं ते ठरवलं. गुगल मॅपच्या मदतीबरोबरच गावाकडच्या ओळखीच्या लोकांकडून काही माहिती घेतली; शिवाय प्रवास सुरू असताना रस्त्यात भेटलेल्या वाटाड्यांचीदेखील आम्हाला बरीच मदत झाली. म्हणजे पुढं रस्ता चांगला आहे, की खराब आहे, कोणत्या रस्त्यानं गेल्यावर लवकर पोचू किंवा कुठून जायला हवं, कुठून जास्त सोयीस्कर पडेल हे भेटणाऱ्या लोकांनी सांगितलं.  या प्रवासातून मला स्वत:ला बरंच काही शिकायला मिळालं आहे. उदा. कोणतही संकट आलं तरी घाबरून जायचं नाही, धीर सोडायचा नाही. तसंच आपली इच्छाशक्ती असेल, तर आपण काहीही करू शकतो. 
- ओंकार घोलप

संबंधित बातम्या