बांगलादेश युद्धाच्या यशाचे शिल्पकार

ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन
सोमवार, 28 डिसेंबर 2020

विशेष

सोळा डिसेंबर २०२०ला १९७१ च्या युद्धाला ४९ वर्षे पूर्ण झाली. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, फिल्ड मार्शल हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे भारतीय लष्करात पहिले अधिकारी होते. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांनी लष्कराचे नेतृत्व केले होते. ‘सॅम बहादूर’ या नावानेही ते परिचित आहेत. तीन एप्रिल १९१४ ला जन्मलेल्या माणेकशॉ यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत दुसरे महायुद्ध, पाकिस्तान विरुद्धची तीन युद्धे आणि चीनबरोबर १९६२ साली झालेल्या युद्धांमध्ये वेग वेगळ्या पदांवर भाग घेतला. 

एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर पं. नेहरू यांच्या मनात त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनाच थापर यांच्यानंतर ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ करायचे होते. पण त्याला खुद्द माणेकशॉ यांनीच नकार दिला, कारण ते सीनिऑरिटीला मानत होते. त्यांच्या दृष्टीने त्यावेळी प्रथम जनरल चौधरी व नंतर जनरल कुमारमंगलम हे त्यांना सीनिअर होते. या दोन जनरल्सनंतरच माणेकशॉ यांनी चीफची जबाबदारी स्वीकारली. 

मला गाढवाने लाथ मारली
त्यांच्या बहादुरीचे अनेक किस्से आहेत. दुसऱ्या महायुद्धातील जपानबरोबरील बर्मा युद्धात, पॅगोडा हिल्सवर ताबा मिळवताना माणेकशॉ यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या. लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले होते. शस्त्रक्रिया कक्षात नेल्यानंतर जगण्याची शक्यता कमीच असल्यामुळे तेथील सर्जनने ‘मी तुमची शस्त्रक्रिया करणार नाही’ असे मोठ्या आवाजात सांगितले. एवढ्यात माणेकशॉ शुद्धीवर आले होते, म्हणून तिथून जाण्यापूर्वी सर्जनने त्यांना विचारले, की अशी अवस्था तुमची कशामुळे झाली? नुकतेच शुद्धीवर आलेले माणेकशॉ म्हणाले, ‘मला गाढवाने लाथ मारली म्हणून माझी ही अवस्था झाली.’ मरणाच्या दारात असताना त्यांचे उत्तर ऐकून सर्जनला धक्का बसला व त्यांची लढाऊ वृत्ती बघून त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि इतिहास घडला. त्यांच्या युद्धभूमीवरील शौर्यासाठी त्यांना मिलिटरी क्रॉस देऊन गौरवण्यात आले होते. 

तुम्ही युद्धाला तयार आहात का?
एकोणीसशे एकाहत्तरमध्ये युद्ध अटळ असल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मार्च महिन्यात सॅम माणेकशॉ यांना तुम्ही युद्धाला तयार आहात का, असा प्रश्न विचारला. तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी दिलेले उत्तर होते ‘नाही, सध्या आर्म्ड डिव्हीजन आणि इन्फन्ट्री डिव्हीजन्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडे युद्धासाठी तयार असलेले केवळ १२ रणगाडे आहेत. नवीन बटालियन्सना ट्रेनिंग देण्याची गरज होती. रणगाडे आणि इतर अजून जास्त युद्धसामग्री तयार करण्याची गरज होती. दारूगोळा पुरेसा नाही, सैन्याची अनेक शस्त्रे स्पेयर पार्ट्स नसल्यामुळे नादुरुस्त आहेत. थोड्या दिवसांनी मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर नद्यांना पूर येऊ शकतो. तसे झाल्यास बंगलादेशात लढाई शक्य नाही. तयारी करण्याकरिता सैन्याला कमीत कमी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वेळ पाहिजे. याच काळात हिमालयात बर्फ पडल्यामुळे चीन पाकिस्तानची मदत करू शकणार नाही आणि चिनी सीमेवर असलेले भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तानमध्ये आक्रमक कारवाईकरिता वापरता येईल.’

भारतीय सैन्यावर राजकीय नेतृत्वाचा प्रचंड दबाव होता, की युद्ध लगेच एप्रिल महिन्यामध्ये सुरू करावे. परंतु सॅम माणेकशॉ यांनी सांगितल्यानंतर काही तथाकथित तज्ज्ञांनी त्यांच्याविरुद्ध एक अपप्रचार मोहीम सुरू केली आणि असा पण सल्ला देण्यात आला, की जर भारतीय सैन्य युद्धाकरिता तयार नसेल बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला पाकिस्तानी सैन्याला बांगलादेशमधून हाकलण्याचे काम द्यावे.  

तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. इंदिरा गांधींनी माणेकशॉ यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारत सरकारने आता काय करावे, असा सल्ला मागितला. त्यावर सॅम माणेकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना विजयाची खात्री दिली. मात्र, त्यासाठी राजकीय व इतर कुठलाही हस्तक्षेप न करता सैनिकी पद्धतीने युद्ध लढण्याची मोकळीक द्यावी, असा प्रस्ताव मांडला. इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशॉ यांचा हा प्रस्ताव मान्य केला आणि  एक मोठा विजय मिळवण्यात आला. इंदिरा गांधींशी त्यांचा थेट संवाद असल्यामुळे नोकरशाही कुठल्याही प्रकारचा अडथळा सैन्याच्या तयारीमध्ये करू शकले नाही व उत्तम तयारी करता आली.

युद्धकाळात सैन्याचे नेतृत्व
पाकिस्तानी हवाई दलाचा तीन डिसेंबरला अचानक हल्ला झाला. त्यावेळी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीमध्ये नव्हते. माणेकशॉ यांनी स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेऊन लढाई सुरू करण्याचे हुकूम दिले. हा निर्णय त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास दाखवतो. पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन ईस्ट पाकिस्तानच्या मोठ्या शहरांचे रक्षण किल्ल्यासारखी रचना (strong point defences) करून करण्याचे ठरवले होते. परंतु युद्ध सुरू व्हायच्या काही महिने आधी ईस्ट पाकिस्तानच्या सीमेवरील बॉर्डर पोस्ट्सवर भारतीय सैन्याने सप्टेंबरपासून छुपे हल्ले केल्यामुळे पाकिस्तानला आपले सैन्य मोठ्या शहरांपासून काढून सीमेवर आणावे लागले. या डावपेचामुळे पाकिस्तानी सैन्य ना सीमेवर ना शहराभोवती लढण्याकरता तयार होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याची म्यानमार सीमा आणि समुद्राकडून नाकेबंदी केल्यामुळे त्यांचे तिथून पळून जाणे अशक्य झाले. 

युद्धात अनेक अभिनव डावपेचांचा वापर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच टांगेलमध्ये भारतीय सैन्याचा एअर ड्रॉप करण्यात आला, हेलिकॉप्टरच्या मदतीने बंगलादेश मधल्या नद्या पार करणे किंवा मोठ्या शहराजवळ असलेल्या किल्ल्यांवरती हल्ला न करता त्यांच्या मागे जाऊन त्यांचा परत जायचा रस्ता अडवणे इत्यादी. बंगलादेशमध्ये भारतीय सैन्याची वेगाने हालचाल करण्याकरता घोडे, रिक्षा, बैलगाड्या आणि अशा अनेक अभिनव वाहनांचा वापर केल्यामुळे आणि सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे ईस्ट पाकिस्तानमधील पाकिस्तानी सैन्य हे भांबावून गेले आणि कुठेही त्यांना चांगल्या पद्धतीने लढाई करता आली नाही.

पाकिस्तान विरुद्ध मानसिक युद्ध
नऊ दिवसांच्या युद्धानंतर १३ डिसेंबरला सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला सांगितले, की एकतर तुम्ही शरण या अन्यथा आम्ही तुमचा खात्मा करू. भारतीय सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी घेरले आहे. चितगाव, चालना आणि मांग्ला बंदरांशी तुमचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तेथून तुम्हाला मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. मुक्ती बाहिनी आणि बाकी लोक बदला घेण्यासाठी तयारच आहेत. तुम्ही स्वतःच्या सैनिकांचा जीव का धोक्यात टाकत आहात? तुम्हाला घरी जायचे नाही का? आपल्या मुलाबाळांसोबत राहायचे नाही का? त्यामुळे वेळ दवडू नका, शस्त्रे खाली टाका. आम्ही तुम्हाला एका सैनिकाप्रमाणे वागणूक देऊ, असे सॅम माणेकशॉ यांनी रेडिओ मेसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे मनोधैर्य खचले व लढण्याची क्षमता ढासळली आणि अवघ्या १४ दिवसांत युद्ध संपले.

कमी रक्त सांडून युद्ध जिंकणारे नेतृत्व 
खरे सांगायचे तर शरणागतीच्या वेळी पाकिस्तान सैन्याची युद्ध क्षमता शाबूत होती. त्यांना अजून अनेक दिवस युद्ध लढता आले असते व भारताला अजून अनेक सैनिकांचे रक्त सांडावे लागले असते. पण या मानसिक युद्धामुळे पाकिस्तान मनात युद्ध हरले आणि माणेकशॉ यांच्या या इशाऱ्यानंतर १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने पांढरे निशाण फडकावले. कमीत कमी रक्त सांडून युद्ध जिंकणे यालाच कुशल युद्ध नेतृत्व म्हणतात.

ढाका शहरात ९४ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. भारतीय लष्कराचे पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर लेफ्टनंट जनरल एएके नियाजी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली.

माणेकशॉ यांचे युद्ध कौशल्य आणि नेतृत्व 
माणेकशॉ यांनी मुक्ती बाहिनी हा बंगाली सैनिकांचा एक कमांडो विभाग तयार केला. त्यामध्ये हजारो बंगाली सैनिकांना ट्रेनिंग देऊन पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता तयार करण्यात आले. मुक्ती बाहिनीने युद्धात चांगले काम केले. फिल्ड मार्शल माणेकशॉ हे स्वतंत्र भारताच्या इतिहासामधले सर्वात यशस्वी सेनानी होते. युद्ध रणनीतीची उत्तम जाण, कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्याची क्षमता, राजकीय नेतृत्वाला निर्भीडपणे सल्ला देण्याची हिंमत, सैनिकी मूल्यांवर निष्ठा, आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे कौशल्य असे अनेक पैलू त्यांनी १९७१ च्या युद्धामध्ये दाखविले. पाकिस्तानी सैन्याची शरणागती स्वीकारायला माणेकशॉ यांनी स्वतः जावे असे इंदिरा गांधी यांना वाटत होते, परंतु हा मान जनरल जगजीत सिंग अरोरा यांचा आहे म्हणून त्यांनी जाण्याचे नाकारले आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला.

सेवानिवृत्तीनंतर
माणेकशॉ यांना १९७२ मध्ये पद्मविभूषण सन्मान व फिल्ड मार्शल रँक मिळाली. पण त्यांना फिल्ड मार्शल या पदाचा पगार निधनाच्या ८ महिने आधी म्हणजे २३ वर्षांनंतर देण्यात आला. अर्थात त्यांनी याकरिता कधीही तक्रार केली नाही. या युद्धातील यशाचे ते एक सर्वात मोठे शिल्पकार होते. २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात माणेकशॉ यांचे निधन झाले. सॅम यांच्या अंत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही. ही राष्ट्रीय शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण तो देशाचा अपमान होता, कारण माणेकशॉ हे सगळ्या भौतिक सुखाच्या पुष्कळ पुढे होते.

सैनिकांच्या आणि देशवासीयांच्या मनामध्ये त्यांचे स्थान अटळ आहे. निवृत्तीनंतर ते सैन्याच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देत राहिले आणि युद्ध नेतृत्व या विषयावर  त्यांचे  ट्रेनिंग देत राहिले. १९८८ मध्ये स्टाफ कॉलेजमध्ये वेलिंग्टन येथे प्रशिक्षण घेत असताना मला माणेकशॉ यांचे युद्ध नेतृत्व या विषयावरील विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप शिकता आले. तो एक अविस्मरणीय असा अनुभव होता.

१९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १४ दिवसांत शरण आणताना फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांनी निर्धार, खंबीर वृत्ती या गुणांचा परिचय करून दिला. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता माणेकशॉ यांना मिळाली. अर्थात त्यांच्या युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुणांमुळेच. युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते, ती सेनापतींनी आखलेल्या युद्धनीतीवरून. शत्रूची तयारी जोखून त्याप्रमाणे युद्धनीती आखणारे माणेकशॉ एक सेनापती होते.

संबंधित बातम्या