हीच आत्मपरीक्षणाची वेळ... 

डॉ. वैजयंती पटवर्धन
बुधवार, 6 मे 2020

विशेष
 

नवीन वर्ष २०२० उजाडले ते नेहमीच्याच उत्साहात.. नव्या कल्पना.. नव्या आशा.. नवे प्लॅन्स, नवी रिझोल्युशन्स! सगळे नेहमीसारखेच.. दरवर्षीसारखे! कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात चीनमधील कोरोना रुग्णाविषयीची एखादी बातमी-अगदीच दुर्लक्षित; डॉक्टर असूनही मला फारसे काही देणेघेणे नाही, अशा प्रकारे फारशा गांभीर्याने वाचलेलीही नाही!

फेब्रुवारीमध्ये मात्र इतर देशांच्याही बातम्या आल्या, चीनमधील आकडेवारी काळजीचे प्रमाण वाढवू लागली आणि मार्च उजाडता उजाडता भारतातही पहिला रुग्ण सापडल्याची बातमी येऊन थडकली. पुढील काही दिवसांतच विजेचा लोळ पसरावा त्या प्रखरतेने आणि वेगाने सर्व जगच या विषाणूच्या जीवघेण्या विळख्यात सापडले. 

आपल्याकडे सुरुवातीला (आणि नंतरही) बऱ्याच जणांनी कोरोना प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाहीच, ज्याला काही डॉक्टरांचाही अपवाद नव्हता. पण लवकरच कोरोनाच्या जगभरातल्या थैमानाचे आकडे, प्रसारमाध्यमातून येणाऱ्या ब्रेकिंग न्यूज, आरोग्य खात्याने अत्यंत जागरूकतेने आणि द्रष्टेपणाने केलेल्या उपाययोजना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांनी वेळोवेळी दिलेले आश्वासक आदेश आणि कठोर उपाययोजनांचे मार्गदर्शन, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सुरुवातीला २० तासांचा जनता कर्फ्यू आणि नंतर प्रथम २१ दिवस आणि पुढे अजून २१ दिवसाचे लॉकडाऊन सुरू झाले. 

सध्या मी हाताळत असलेल्या आरोग्य प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यांमुळे मला वर्क फ्रॉम होम करणे शक्य होते. डॉक्टर असूनही बघता बघता आयटीवाल्यांप्रमाणे दिवसाचे १०-१२ तास मी लॅपटॉप, स्काईप, झूम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस मीटिंग्स आणि कॉल्स अशा चक्रात अडकले! अगदी आपण डॉक्टर आहोत हे विसरून जावे त्याप्रमाणे!

या दिनक्रमाच्या पहिल्या २-३ दिवसांच्या चक्रातच त्यातील स्ट्रेसची जाणीव झाली. पेशंटशी, माणसांशी इंटरॅक्ट करणे आणि मशिनसमोर पूर्णवेळ काम करणे यात किती जमीन आस्मानाचा फरक आहे. वर्क ‘फ्रॉम’ होम रुटीनशी जुळवून घेता घेता मोठे आव्हान होते, ते वर्क ‘फॉर’ होम, अर्थातच घरकामे! घरातली नित्यकर्मे. बाईने अचानक मारलेल्या दांड्या, तिच्या रजेच्या वेळेची तणतण.. आता निदान २१ दिवस घरातली सर्व काम करायची? अंगावर कोरोनाच्या भीतीपेक्षा मोठा काटा आला! मग सुरू झाला ओव्हरटाइम-वर्क फ्रॉम आणि फॉर होमच्या रगाड्याचा! 

सकाळी चहा, नाश्ता, भांडी, जेवणाची तयारी होत नाही, तोपर्यंत ऑफिसचे कॉल्स-त्यातही मधे मधे लागणारी चहा कॉफीची तल्लफही स्वतःच्या हाताने कॉफी करून घेऊन भागवायची! मीटिंगच्या मधे ‘बायो ब्रेक’मध्ये जाऊन पटकन कुकर लावणे आणि आमटीला फोडणी देऊन गरम गरम आमटी भातावर ताव मारत सगळ्यांनी दुपारचे जेवणही एकत्र घेणे... त्यासाठी जेवणाच्या सुटीची वाट बघणे... मजा यायला लागली!

घरात प्रत्येकाचे रुटीन साधारण असेच. त्यामुळे ज्याला जमेल तशी त्यांनी घरकामात मदत करायची; हे न सांगताच घडू लागले. दोन्ही वेळेचा नाश्ता, जेवण शक्यतो एकत्र करायचे ठरले. डायनिंग टेबलावरच्या गप्पाटप्पा, मुलाने आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या पदार्थाचा प्रयोगही खूप चविष्ट वाटू लागला. या लॉकडाऊनमध्ये मेनू मोजक्या पदार्थांवर आला. कशाला हवेत इतके पदार्थ, हे पटले! महात्मा गांधींचे गरजा कमी करा हे तत्त्व किती योग्य आहे ते समजले! मग जेवणाचा डायनिंग हॉल टाइप मेनू १ किंवा २ डिश मिलवर आला. सलाड, फळे मुलांसाठीही अपरिहार्य होऊ लागले... केवढा हेल्थ बेनेफिट! दोन-तीन दिवसांत घराच्या मोजक्या, ताज्या अगदी साध्या पद्धतीने केलेल्या पदार्थांना गप्पांबरोबर एकत्र बसून जेवण्याने अमृताची चव लागू लागली. मॉडर्न लाइफस्टाइलच्या नावाखाली चित्रविचित्र पदार्थ खाण्यापेक्षा आजीच्या हातची वरणातली फळ, आत्याचे थालीपीठ, मावशीची उकरपेंडी आणि बटाटेवडा अशा आठवणीतल्या पदार्थांना जास्त भाव मिळू लागला. त्या रुचकर पदार्थांनी लहानपणीच्या आठवणींना वाट करून दिली!

अर्थात घराबाहेर जाणे फारसे नसल्याने कपडे, वाहने, पेट्रोल, सौंदर्य प्रसाधने वगैरेची फारशी गरजच नव्हती. त्यामुळे सगळ्यांना, अगदी घरच्यांनासुद्धा खूपच प्युअर फॉर्ममध्ये भेटतोय, असे वाटायला लागले. तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे आपण असेच होतो ना? सगळ्यांचेच मुखवटे जणू उतरले या कोरोनाच्या दहशतीमुळे! पण खूप मोकळे वाटत होते हे नक्की. हा काळ एक प्रकारच्या विपश्यनेचाच म्हणता येईल. TIME to Introspect.. Time to meet Self.. Time to Listen to the Inner Voice.

जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारल्या. जुने अल्बम बघितले. मुलांच्या लहानपणीचे, स्वतःचे तरुणपणाचे, लहानपणीचे.. अंगावरच्या स्वास्थ्याच्या टायर्स येण्याआधीचे फोटो बघून गंमत वाटली.. पण भूतकाळातले आज हयात असलेले नसलेले सगे सोयरे बघून मन आणि डोळे अनेकदा चिंब झाले...

डॉक्टर पालकसुद्धा व्यवसायाच्या मागण्यांमुळे आपल्या कुटुंबीयांचे आपलेपण, मुलांचे बालपण विसरायला शिकतात. दुसऱ्यांच्या वेल बीइंगची, जीवाची जबाबदारी घेणे खरेच सोपे नसते! मुलांच्या लहानपणीचे फोटोही आज तोच अनुभव देऊन गेले. 

कोरोना ड्युटीवरच्या पोलीस आणि नर्सेसच्या कुटुंबीयांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ पोस्ट्स सगळ्यांना चटका लावून गेल्या. सर्व जण मृत्यूच्या भीतीच्या दहशतीखाली जगत असताना दुसऱ्यांना जगवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटल कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस.. सगळ्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा खरेच खूप अभिमान वाटतो!  

कोरोनाने सगळ्यांनाच खूप भावनिक.. अंतर्मुख केले आहे का? क्लिनिकला जाण्यासाठी अनेकदा घराबाहेर जावेच लागते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत असलेले अगदी निर्मनुष्य रस्ते, प्रत्येक चौकातली स्मशानशांतता, चौका-चौकातले पोलिसांचे ताफे, बॅरिकेड्स, मोठ्या दिमाखात सजलेली झगमगाट करणारी बंद दुकाने, शोरूम्स... उजाड.. अस्वथ. सिग्नल किंवा रहदारीचा अडथळा बिलकुल नाही, तरीदेखील अशा रस्त्यांवरून जाणे इतके भीषण वाटते सांगू... सगळे उदास! नको ते बाहेर जाणे-येणे.

पहिले काही दिवस भीती, गोंधळ, ॲडजस्टमेंट, तारांबळ, टेन्शन.. त्यातही सोशल मीडियावरचे जोक्स, नवऱ्याचे काम करण्याचे विनोद, जोडीला माध्यमांवरील बातम्या, रोज लागणाऱ्या मालिका.. यामध्ये रुळत असताना अचानक आलेल्या रामायण, महाभारत, हम पांचसारख्या ३०-३५ वर्षांपूर्वीच्या  मालिका दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागल्या. ही नावीन्यपूर्ण संकल्पना सगळ्यांनाच खूप आवडली... एकूणच आमच्या लहानपणीची ती कुटुंबकेंद्रित दिनचर्या, सवयी, इतकेच नव्हे तर मनोरंजनसुद्धा लोकांना सवयीचे झाले, किंबहुना आवडू लागले. 

माणूस शेवटी सवाईचा गुलाम आहे म्हणतात. काउन्सेलिंग करताना आम्ही जे हीलिंगचे तत्त्व वापरतो, की सवय मोडायला २१ दिवस लागतात, तेच तत्त्व आत्ताही लागू पडले. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा फार त्रासदायक झाली नाही.

लोक नियम मोडतच होते, कोरोनाची लागण आणि मृत्यूचे आकडेही वाढतच होते. तुलनेने भारताला कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी नियंत्रित ठेवण्यात यश आले. बघता बघता महिना संपला. एकूणच लॉकडाऊनचा पहिला राउंड संपला. मानसिक आधार देण्यासाठी काउन्सेलिंग आणि टेलिमेडिसिनद्वारे वैद्यकीय सल्ला,  इतका मी डॉक्टर म्हणून प्रत्यक्ष रोगाशी संबंध ठेवला. घरात बाळ आणि आजी असल्याने प्रत्यक्ष रुग्ण तपासणे शक्य नव्हते. एकूण दिवसाचे १५-१६ तास  काम होत आहेच, पण एका वेगळ्या आत्मशक्तीचा शोध लागला. कोरोनाची भीती असली तरी कुठेतरी देव आणि दैव यांच्यावरचा विश्वास अजूनच दृढ झाला. त्यामुळे भगवद्‍गीतेतील तत्त्व जे एरवीसुद्धा आयुष्याला लागू पडते, ‘कर्मण्ये वाधिकारस्ते: मा फले शु कदचनंम.. विचार न करता, फळाची आशा न ठेवता येणाऱ्या प्रवाहाप्रमाणे मोकळेपणाने स्वीकार करायची.’ मानसिकता अजूनच बळकट झाली.

मृत्यूच्या दहशतीतून वाचल्यानंतर तरी माणसाला जीवनाची किंमत कळेल ना? कोरोनामुळे आलेल्या जगभरातल्या 
महामारीने एक प्रलय तांडव आणले हे खरे असले, तरी या प्रलयानंतरचे जग नक्कीच वेगळे असेल. हा प्रलय नवनिर्मितीसाठीच आहे की काय? मला खरेच तसे वाटते. स्वावलंबनाची सवय झाल्यावर गरज मर्यादित ठेवण्याची मानसिकता पुढेही राहील ना आपली? मोकळ्या निर्मनुष्य, पण मुक्त हवेतून जाता-येतानाचा मोकळा श्वास मास्क काढल्यानंतर अनुभवावा असे नक्कीच वाटेल ना? मग गरजेशिवाय प्रवास, वाहनांचा धूर, कोंडी, बेदरकारपणे वाहने चालवण्याची गुर्मी बदलेल का आपली?  

कोरोनाच्या येण्याने निसर्गाला, प्राण्यांना काही फरक पडला नाही. माणसाला पडला, कारण माणूस ‘माणूस’ म्हणून जगतच नव्हता! निसर्गावर विजय मिळवण्याच्या नादात तो स्वतःची ओळखच, मुख्य म्हणजे निसर्गाचे पालकत्व विसरला! आता या वास्तवाची जाणीव झाल्यावर त्या निसर्गालाच आडवण्याची, नष्ट करण्याची अमानवी महत्वाकांक्षा संपेल का माणसाची? कोरोनाने माणसाला आत्मपरीक्षण करायाला नक्कीच भाग पाडले!

कोरोनानंतरच्या जगात आपल्याला सगळ्यांना कळलेले असेल, की पैसे, सत्ता, सौंदर्य, संपत्ती या गोष्टी भौतिक सुख देणाऱ्या वाटल्या, तरी त्यांच्या मागे आपण स्वतःचे भान, मनःस्वास्थ हरपून धावत गेलो, ते किती कुचकामी आहे! घरातली आपल्या माणसांमध्ये भलेही मतभेद असतील, काही गोष्टी पटत नसतील, पण त्यांचा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम ही केवढी मोठी संपत्ती आपल्याकडे असते. नसलेल्या गोष्टींचा अट्टाहास करून मनाने दुरावण्यापेक्षा आहे त्या गोष्टींवर, एकमेकांवर प्रेम करता येईल का? माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि आनंदाने जगण्यासाठी प्रेम, आपुलकी, काळजी, भीतिमुक्त जगणे इतके पुरेसे आहे.

कोरोनाने स्वतःशी ओळख करून दिली आहे, स्वतःवर प्रेम करायला शिकवले, एकमेकांची सोय बघायला हवी हे शिकवले! प्रेम, जी माणसाच्या आयुष्यातली सर्वोच्च भावना आहे, तिला आणि तिलाच कवटाळायला हवे, हे प्रत्येकाला पटेल ना? चला तर मग, हे सगळे संपल्यावर आपण सगळे भेटूया एकमेकांना, अगदी नवे म्हणून.. सक्षम, सुज्ञ, प्रेमळ, एकमेकांचा विचार करणारे, एकमेकांवर, निसर्गावर प्रेम करणारे, एकमेकांचे मन ठेवणारे! कोरोनाच्या लढ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, स्वछता पाळूया, काळजी घेऊया आणि नव्या विचाराने, नव्या जाणिवेने आयुष्य सुरक्षित करूया.  

घरात प्रत्येकाचे रुटीन साधारण असेच. त्यामुळे ज्याला जमेल तशी त्यांनी घरकामात मदत करायची; हे न सांगताच घडू लागले. दोन्ही वेळेचा नाश्ता, जेवण शक्यतो एकत्र करायचे ठरले. डायनिंग टेबलावरच्या गप्पाटप्पा, मुलाने आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या पदार्थाचा प्रयोगही खूप चविष्ट वाटू लागला. या लॉकडाऊनमध्ये मेनू मोजक्या पदार्थांवर आला. कशाला हवेत इतके पदार्थ, हे पटले! महात्मा गांधींचे गरजा कमी करा हे तत्त्व किती योग्य आहे ते समजले!

संबंधित बातम्या