बळ

दीपा कदम
सोमवार, 11 जानेवारी 2021

विशेष

‘मी पहिली आहे, पण शेवटची असणार नाही...’ अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे हे उद्गार अमेरिकेतीलच नव्हे तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वचजणींची उमेद वाढविणारं आहे. अमेरिकेत तीव्र झालेल्या वांशिक भेदाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि दक्षिण आशियायी वंशाच्या कमला हॅरिस यांनी बजावता कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरणे त्यांना वेगळं ठरवते.  अमेरिकेच्या प्रशासनातील हरवलेला मानवी चेहरा आणि संवेदनशीलता पुन्हा प्राप्त करणे ही मोठी जबाबदारी असणार आहे. त्यासाठी कमला हॅरिस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. कमला हॅरिस यांचा भारतीय मुळाशी नातं जोडलं जातं ते इथेच…

नेतृत्व करणाऱ्या महिलांची वैशिष्‍ट्यपूर्ण कामगिरी कोविड काळामध्ये अधिक उजळून पुढे आली आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळताना या महिला नेतृत्वाने मानवी समान हक्काला प्राधान्य दिले आहेच. शिवाय आव्हानांना थेट समोर जाण्यानेही त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण सिद्ध झाले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन आणि जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल यांची या संदर्भात ठळक नोंद केली गेली आहे. लॉकडाउन न करता कोविडच्या संसर्गाला आटोक्यात ठेवण्याची सिद्धी जेसिंडा आर्डेन यांना प्राप्त झाली आहे. तर ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन या देशातील कोविड संसर्ग आणि मृत्यूच्या प्रमाणाच्या तुलनेत जर्मनीमध्ये कोविड संसर्ग आणि मृत्यूची संख्या कमी राखण्यास जर्मनीला यश आले आहे. तैवानच्या अध्यक्षा त्साय इंग वेन यांनी देखील कोविडचे मृत्यू कमी होणे, कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना वेगळे काढून उपचार करण्यावर अधिक भर देत संपूर्ण लॉकडाउनची वेळ येऊ दिली नाही. महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत महिला नेतृत्वाने परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळल्याचे अभ्यासकांचे निरिक्षण आहे.

इडनबर्ग विद्यापीठाच्या ग्लोबल हेल्थ चेअरचे अध्यक्ष देवी श्रीधर यांनी कोविड संसर्गाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असणारे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांमार्फत बाहेरच्या दबावापोटी न घेतलेले निर्णय महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत नोंदवले आहे. जेसिंडा आर्डेन, अँजेला मर्केल आणि त्साय इंग वेन यांनी संसर्ग रोखण्यासाठी जनसमूहांच्या दबावाला किंवा जगभरात जे सुरू आहे, त्याचीच री न ओढता केलेल्या प्रयोगांचा आधार असल्याचेही श्रीधर मानतात. कोविड संसर्गाच्या आव्हानाचा सामना करताना महिला नेतृत्वाने लॉकडाउनचा आधार न घेता संसर्गाला रोखण्यासाठी शोधलेले मार्ग म्हणूनच उल्लेखनीय ठरत आहेत. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलेल्या ‘Women Leaders and Pandemic Performance - A Spurious Correlation’ या पेपरमध्ये आक्रस्ताळेपणा आणि दिशाभूल न करता घेतलेल्या खंबीर निर्णयांमुळे महिला नेतृत्व कसे उठून दिसते हे दाखवून दिले आहे. 

कठीण परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याच्या वैशिष्ट्यामुळे आणि आव्हानांना भिडण्याच्या अनोख्या क्षमतेमुळे महिलांचे नेतृत्व वेगळं ठरतं. मात्र नेतृत्व करण्याची संधी कितीजणींना मिळते? कोविड संसर्गासोबत दोन हात करणाऱ्यामध्ये नर्सेसचे प्रमाण ७० टक्के आहे. मात्र आरोग्य क्षेत्रात उच्च पदांवर केवळ पंचवीसच टक्के महिला काम करतात असे नमूद करताना जागतिक आरोग्य संघटनेने ही परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. 

‘टाइम मॅगझिन’ने यंदापासून ‘किड ऑफ द इयर’ पुरस्कार सुरू केला आहे. भारतीय वंशाच्या पंधरा-वर्षांच्या गितांजली रावला सायबरमधील संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गितांजलीने तिच्या मुलाखतीत नवनवीन संशोधन करण्याची साखळी सुरूच राहायला पाहिजे आणि त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. गितांजली रावने केलेले वक्तव्य आणि कमला हॅरिस यांनी केलेले ‘उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणारी मी पहिली असले तरी शेवटची असणार नाही’ हे वक्तव्य पंखांना बळ देणारे आहे हे नक्की.

संबंधित बातम्या