अष्टावधानी

दीपा कदम
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

‘ती’ची लढाई

कोविडच्या आधी तरी महिलांची परिस्थिती फार उत्तम कुठे होती. तेव्हाची ती कदाचित बिकट असेल तर कोविडनंतर आता ती अधिक खडतर झालीय म्हणता येईल... पण कोविडमुळे सगळंच उद्‌ध्वस्त झालंय असं काही झालेलं नाही. चांगलं काहीतरी घडेलच की...‘गेम’ या संस्थेने केलेल्या महिलांशी साधलेल्या संवादात ही अंधारात प्रकाशाची तिरीप दिसून आली.

कोरोना काळात जगण्याच्या गाडीला टाळा लावणाऱ्या लॉकडाउनचे महिलांवर काय परिणाम झाले याविषयी आजवर वेगवेगळ्या पाहण्या झालेल्या आहेत. लॉकडाउन, त्यातून उभी राहिलेली अनिश्चितता, ताणले गेलेले नातेसंबंध आणि एकुणातच उपजीविकेवर वेगवेगळ्या स्तरावर झालेल्या वेगवेगळ्या परिणामांचे चित्र या पाहण्यांनी मांडले. एका पाहणीत लॉकडाउनच्या काळात महिलांच्या संदर्भात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून आले होते. आणखी एका पाहणीत ५२ टक्के महिलांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचेही दिसून आले आहे. मुळातच भारतात केवळ ११ टक्के महिला नोकरी करतात, त्यातील ५२ टक्के महिलांच्या हातून नोकरी गेली असेल तर नोकरी करणाऱ्या महिलांचा टक्का हा आता केवळ सातआठ टक्के एवढाच येण्याची भीती आहे. 

हातातून गेलेल्या नोकऱ्या, मुलांच्या शाळा, घराची नेहमीपेक्षा अधिकची जबाबदारी, नवऱ्याचे वर्क फ्रॉम होम, कुटुंबातील इतरांची जबाबदारी अशा परिस्थितीत वाढलेला ताण. तर काही ठिकाणी शारीरिक, मानसिक छळ यातूनही शिल्लक राहिली आहे ती बाई. तरीही या परिस्थितीकडेही बाई संधी म्हणून पाहतेय. कोविडपूर्व काळात तरी परिस्थिती फार उत्तम कुठे होती. तेव्हा परिस्थिती अधिक बिकट होती, आता अधिक खडतर झालीय म्हणता येईल... पण कोविडमुळे सगळंच उद्‌ध्वस्त झालंय असं काही झालेलं नाही. चांगलं काहीतरी घडेलच की...‘गेम’ (Global Alliance for Mass Entrepreneurship) या संस्थेने केलेल्या महिलांशी साधलेल्या संवादात ही अंधारात प्रकाशाची तिरीप दिसून आली.

नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण ११ टक्केही नसेल तर उद्योगात किती महिलांचा सहभाग असेल. महिलांचे उद्योगातले प्रमाण वाढावे यासाठी ‘गेम’ने मोहीम सुरू केली आहे. येत्या दशकात १० दशलक्ष उद्योजक निर्माण करायचे आणि त्यापैकी पाच दक्षलक्ष महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी ‘गेम’ने केलेली पाहणी उल्लेखनीय आहे. महिलांना कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे, कशाप्रकारच्या अडचणी त्यांना येतात याचा ऊहापोह यानिमित्ताने करण्यात आला आहे.

फूड, हेल्थकेअर, ब्यूटीपार्लर, सलोन आणि शिक्षण या क्षेत्रात महिला काम करतच आहेत, पण ४० ते ५० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल असणाऱ्या महिला उद्योजक त्यांचे उद्योग पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी मात्र तयार नसतात. आश्चर्य वाटेल पण उद्योग वाढवण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याविषयी अनेकींसोबत चर्चा करण्यात आली, तेव्हा त्यांना यासाठी करावे लागणारे बदल, प्रयत्न मान्य आहेत. त्याविषयी त्यांची काहीच तक्रार नाही. मात्र हे सर्व आपल्या नवऱ्याला किंवा/आणि सासरच्या लोकांना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज त्यांना वाटते. उद्योगाची भरधाव सुटू शकणारी गाडी सासरच्यांना परवानगीसाठी किंवा नवऱ्याची खप्पामर्जी होऊ नये म्हणून अडलेली आहे.

यशस्वी महिला उद्योजिकांविषयी जोपर्यंत आजूबाजूला चर्चा होणार नाही; जेव्हा महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार नाहीत, तोपर्यंत पुढचं पाऊल उचलण्याविषयी बळही निर्माण होणार नाही. महिलांच्या आत्मविश्वासाला थोडी जरी फुंकर घातली, त्यांना योग्य मार्गावर येण्यासाठी प्रोत्साहित केलं तर महिला कुठलंही काम धसास लावतात. खेडेगावातल्या महिलांना इतर महिलांनी केलेल्या उद्योगाच्या कथा प्रेरित करतात, पण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी, आणि तिथे टिकाव धरण्यासाठी महिलांमध्ये नसणारा आत्मविश्वास निर्माण करणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. शहरी भागातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातल्या महिला संघटित उद्योगासाठी एकत्रित येण्यास आणि प्रयोग करण्यास अधिक तयार असतात असेही या पाहणीत दिसून आले आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटांसोबत बरेच काम केलेले आहे. लॉकडाउनच्या काळात सगळंच ठप्प झालेलं असताना महामंडळाने मास्क बनवण्याची कामं महिला बचत गटांकडून करून घेतली. लॉकडाउनच्या काळात खरेदी महोत्सव, बाजारपेठा वगैरे बंद असल्याने महिला बचत गटाच्या उत्पादनांची विक्री नव्हती. या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना कामाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडू न देण्याचे आव्हान होते. कोरोना काळातली गरज आणि महिलांकडे असलेल्या माफक रिसोर्सेस मधून मास्क बनवणे शक्य होते. काही नगरपरिषदा, जिल्हा परिषदांनी देखील महिला बचत गटांकडून मास्क बनवून घेतले. पापड, कुरडया बनवणाऱ्या हातांनी लाखो मास्कची निर्मिती करून संधीचं सोनं केलं, असं महिला बचत गटांसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक कुसुम बाळसराफ सांगतात. महिला मल्टिटास्कर असतात याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. त्या जर फूडच्या व्यवसायात असतील तर त्या उत्तम पदार्थ तयार करू शकतातच, पण कमीत कमी किमतीत, काटकसरीने त्या फूड कॉस्टही कमी करतात. पदार्थाची विक्री त्या जितक्या हजरजबाबीपणाने करतात ते एखाद्या एमबीए झालेल्या तरुणालाही जमणार नाही. महिलांना आवश्यकता असते ती त्यांच्यातली ताकद त्यांना दाखवून देण्याची. त्यांच्या समोर येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याची. मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक निर्माण करणे, उद्योगाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी धोरणात्मक सुधारणेला नक्कीच वाव असल्याचे बाळसराफ निदर्शनास आणतात. नोकरीच्या चाकोरीतून बाहेर येऊन काम करण्यासाठी महिलांनी उद्योगाकडे वळावे यासाठी आता कुठे सरकार पातळीवर प्रयत्न सुरू झालेत. मल्टिटास्किंग हे वरदान बाईला जर निसर्गाचं देणं म्हणून लाभलं असेल तर त्याची किमया उद्योग क्षेत्रात दाखवण्यासाठी स्काय इज द ओन्ली लिमिट...

संबंधित बातम्या