सन्मानाचा लढा अव्याहत

दीपा कदम
सोमवार, 1 मार्च 2021

‘ती’ची लढाई

आपल्याकडे महिलांना लिंगभेदाचा कोणकोणत्या स्तरावर सामना करावा लागत असेल याचं विषण्ण करणारं वास्तव प्रत्येक दिवशी नव्या रूपात आपल्या समोर येतं. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्या प्रतिष्ठेचं एवढं मोठं अवडंबर माजवण्यात येतं की कौटुंबिक हिंसाचारापासून मुलींवर होत असणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटनाही त्या अवडंबराखाली गाडल्या जातात.

रामायण आणि महाभारतातल्या कथांचे दाखले आपण वारंवार देत असतो. कधी एकवचनी रामासाठी, तर कधी महाभारतातल्या कौरव पांडवामध्ये झालेल्या युद्धासाठी. गेल्या आठवड्यात मात्र या दोन्ही महाकाव्यांचा संदर्भ दिल्ली न्यायालयाच्या निकालात नव्याने देण्यात आला. स्त्रीचा सन्मान राखणं आणि त्याचं संरक्षण सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद करीत न्यायालयाने माजी मंत्री, पत्रकार एम.जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्या विरोधात केलेला अब्रूनुकसानीचा दावा निकाली काढला. स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्या भूमीत रामायण, महाभारत घडले तिथे अजूनही स्त्रियांना लैंगिक छळ आणि मानहानीला सामोरे जावे लागत आहे, असे सांगत न्यायालयाने छळाला अन्यायाला बळी पडलेली स्त्री आपल्या छळाविषयी, आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी कधीही आवाज उठवू शकते, असे मत नोंदवले आहे. 

जगभरात लिंगभेद, वर्णभेद आणि वांशिक भेदाविषयी कायमच चर्चा होत असते. आपल्याकडे महिलांना लिंगभेदाचा कोणकोणत्या स्तरावर सामना करावा लागत असेल याचे विषण्ण करणारं वास्तव प्रत्येक दिवशी नव्या रूपात आपल्या समोर येतं. कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळापासून क्लासला जाणाऱ्या मुलीवर होणाऱ्या बलात्कारापर्यंतच्या कितीतरी घटना घडत असतात. हे कशातून घडते? अलीकडच्या या निकालाने या शोधाची दिशा दाखवली आहे.

दोन महत्त्वाच्या कारणांसाठी या निकालाची नोंद आवश्यक ठरते. स्त्रियांना सर्व पातळीवर समतेची आणि सन्मानाची वागणूक मिळण्याचा हक्क आहे. त्या बरोबरच भारतीय समाजात लैंगिक अत्याचार किंवा त्याविषयीच्या उल्लेखाविषयी अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात ‘टॅबू’ आहे की त्याविषयी आवाज उठविण्यासाठी हत्तीचं बळ गोळा करावं लागतं, तेव्हा कुठे तोंडातून ‘ब्र’ निघतो. त्यामुळे अत्याचाराविषयी कधीही आवाज उठविण्याचा अधिकार तिला आहे हा दुसरा मुद्दा. कधीही कोणाविषयी लैंगिक तक्रार करण्याची मुभा मिळाल्यास त्याचा गैरवापर केला जाईल आणि त्याचा हत्यार म्हणूनही वापर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र दहा वर्षांनी आरोप केले तरी ते सिद्ध करण्याची जबाबदारीही आणि आव्हानही त्या बाईसमोर असतंच की.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्या प्रतिष्ठेचे एवढे मोठे अवडंबर माजवण्यात येतं की कौटुंबिक हिंसाचारापासून मुलींवर होत असणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटनाही त्या अवडंबराखाली गाडल्या जातात. आपल्याकडे पुरुषाच्या प्रतिष्ठेला एक गूढ वलय चढवलेलं असतं आणि ते एका महिरपी मांडवामध्ये संरक्षित केलेले असते. पुरुषाच्या प्रतिष्ठेला असलेल्या अहंकाराच्या संरक्षकही अनेकदा स्त्रियाच असतात, ज्या कदाचित त्या पुरुषी प्रतिष्ठेच्या पहिल्या बळी असतात. बहुसंख्य वेळा ती बायको, मुलगी, बहीण, आईही असते. हेच वर्तुळ विस्तारत जातं. तळहातावर जोपासलेली हीच प्रतिष्ठा वागवत हाच पुरुष समाजात वावरायला सुरुवात होते, तेव्हा हाच अहंकार डोकं वर काढतो. घरात पोसलेल्या अहंकाराला बाहेरही फुंकर घातली जाईल अशी अपेक्षा असणारे पुरुष अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयांमध्ये महिला सहकाऱ्यासोबत तसेच वर्तन ठेवतात. हे सरसकट जरी नसले तरी कार्यालयाच्या ठिकाणी, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना काम करताना पुरुषांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या मानहानीचा त्रास अनेकदा झेलावा लागतो. 

समाजात वावरताना, कामाच्या ठिकाणी महिलांना समान वागणूक मिळणे हे काही महिलांवर केलेल उपकार नव्हेत, तर तो त्यांचा हक्क आहे; हे वारंवार अधोरेखित करण्याची वेळ याच मानसिकतेतून येत राहते.

संबंधित बातम्या